Swami Amazing
Tuesday, May 12, 2026
जननी जन्मभूमी आमदार लहामटे
अकोले, ता. १३ : “जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही सुंदर असते, याचा प्रत्यय मला माझ्या लव्हाळी गावाकडे पाहिल्यावर आजही येतो,” अशा भावनिक शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक सकाळ प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या आपल्या जन्मगावाची महती, इतिहास आणि लोकसंस्कृती उलगडून सांगितली.
“सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांनी वेढलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लव्हाळी गावात माझे बालपण गेले. याच मातीत मी रांगलो, खेळलो, धावलो आणि शिकलो. पुढे शिक्षणासाठी साकिरवाडी येथे गेलो, तर राजूर ही माझी कर्मभूमी ठरली,” असे ते म्हणाले.
लव्हाळी गावाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी गावात रस्ते, वीज आणि पाण्याच्या सुविधा नव्हत्या. मातीची आणि कौलारू घरे हेच गावाचे वैशिष्ट्य होते. पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी केली जाई. फुटलेली कौले बदलून नवीन कौले टाकली जात. “अशा साध्या, संघर्षमय वातावरणात माझा जन्म झाला. वडील शाळामास्तर होते, तर आई शेती आणि घरकाम सांभाळत होती. दोन भाऊ, एक बहीण आणि मी असा आमचा परिवार होता,” असे त्यांनी सांगितले.
गावातील सामाजिक रचनेविषयी बोलताना त्यांनी बारा बलुतेदार पद्धतीची आठवण सांगितली. “सुतार बाबा शेतीची लाकडी कामे करायचे, लोहार बाबा नांगर, विळे, कोयते, कुऱ्हाडी तयार करून द्यायचे. परीट घोड्यावर येऊन कपडे व गोधड्या धुऊन द्यायचा. तेली वर्षभर पुरेल इतके तेल आणून द्यायचा, तर वंजारी बोंबील व मांदेली देऊन जायचा. चार महिन्यांनंतर पीक आल्यानंतर त्यांना धान्यरूपाने बिदागी दिली जायची,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनपद्धतीचे जिवंत चित्र उभे केले.“वाघ बारसं हा आमच्या गावातील अत्यंत महत्त्वाचा सण होता. त्या दिवशी आम्ही लहान मुले जंगलात जाऊन लाकडे गोळा करायचो. त्यानंतर चूल पेटवून मोठ्या भगुल्यात भाताची खीर तयार केली जायची. मग नदीच्या काठावर जाऊन अंघोळ करायचो. आमच्यातील एक जण ‘वाघ्या’ बनायचा आणि बाकीची मुले भाताचे छोटे गोळे करून त्याच्यावर मारायची. सूरपारंब्या खेळण्यात संपूर्ण दिवस कसा निघून जायचा ते समजायचेही नाही. संध्याकाळी पुन्हा नदीत डुबकी मारून जनावरे घेऊन घरी परतायचो,” असे त्यांनी सांगितले.
“रात्रीच्या वेळी गावात ‘चिली पाटी’सारखे पारंपरिक खेळ रंगायचे. गावातील लोक एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे. त्या काळातील वातावरण अतिशय रमणीय आणि जिव्हाळ्याचे होते,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनातील एकोप्याची आठवण सांगितली.
गावातील ‘इर्जुक’ परंपरेविषयी बोलताना ते म्हणाले, “इर्जुक म्हणजे सामुदायिक श्रमदान. एखाद्या शेतकऱ्याचे शेत तयार करणे, फुटलेला बांध बांधणे, पडघई किंवा राबणीची कामे असली की गावकरी एकत्र येऊन काम करायचे. दिवस मावळतीला गेला की तिखट-गोड जेवणाचा बेत असायचा. त्यानंतर गाणी, नाच आणि आनंदाने गाव दुमदुमून जायचे. त्या काळातील गावगाडा हा खऱ्या अर्थाने माणुसकीवर चालणारा होता.”
आपल्या वडिलांच्या शिक्षणसेवेच्या आठवणी सांगताना त्यांनी म्हटले, “वडील शाळामास्तर असल्याने रात्री गावात रात्रशाळा भरायची. गावातील गायखे म्हणजे गुराखी तरुण मोठाले टोंगळे, कोपरी आणि अर्धी इजारी घालून शिकायला यायचे. त्यांना अगदी सोप्या पद्धतीने अक्षरओळख शिकवली जायची. ‘इकडून एक वाटी, तिकडून एक वाटी, मध्यभागी एक काठी म्हणजे क’ अशा पद्धतीने मूळाक्षरे शिकवली जात होती. शिक्षण, संस्कार आणि सामुदायिक जीवन हेच त्या काळातील गावाचे खरे वैभव होते,” असे ते म्हणाले.
Monday, April 27, 2026
समाजभान जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
समाजभान जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडणारी पत्रकारिता, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि शिक्षण क्षेत्रातील समर्पित नेतृत्व यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. आपल्या कार्यातून त्यांनी केवळ वैयक्तिक ओळख निर्माण केली नाही, तर समाजजीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे.
पत्रकार म्हणून शांताराम काळे यांनी ग्रामीण भागातील समस्या, विकासकामांतील अडथळे, नागरिकांच्या अडचणी आणि सामाजिक घडामोडी प्रभावीपणे समाजासमोर मांडल्या. वस्तुनिष्ठता, निर्भीडपणा आणि जनसामान्यांच्या हितासाठी ठाम भूमिका घेणारे पत्रकार म्हणून त्यांनी विश्वासार्हता संपादन केली आहे. ग्रामीण पत्रकारितेला जबाबदारीची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
त्यांचे कार्य केवळ बातम्यांपुरते मर्यादित राहिले नाही. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, विविध जनहिताच्या उपक्रमांना चालना देणे आणि युवकांना विधायक मार्ग दाखविणे हे कार्य सातत्याने केले. समाजाशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख दृढ झाली आहे.
स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूरचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कारमूल्यांची जोड मिळावी, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. शिक्षण हीच ग्रामीण विकासाची खरी गुरुकिल्ली आहे, या विश्वासातून त्यांनी काम पुढे नेले.
त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली, पालकांचा विश्वास दृढ झाला आणि विद्यार्थ्यांसाठी नवी संधी निर्माण झाली. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत समतोल साधत समाजासाठी कार्य करणारे शांताराम काळे हे निश्चितच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.
आजच्या काळात समाजासाठी नि:स्वार्थीपणे काम करणारी माणसे दुर्मीळ होत चालली आहेत. अशा वेळी शांताराम काळे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे आशेचा किरण ठरतात. समाजहिताचा ध्यास घेऊन काम करणाऱ्यांचा सन्मान होणे, हीच खरी समाजाची प्रगती ठरेल.
Friday, April 3, 2026
येडूबाई देवी यात्रेत भाविकांची उसळलेली गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती येडूबाई यात्रेत लाखोंची गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती
येडूबाई देवी यात्रेत भाविकांची उसळलेली गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती
येडूबाई यात्रेत लाखोंची गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती
📍 अकोले, ता. १८ : अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूबाई देवी यात्रेत यंदा लाखो भिल्ल समाज बांधवांनी उपस्थिती लावत श्रद्धेचा जल्लोष केला. चैत्र पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या या तीन दिवसीय यात्रेत नवसपूर्तीसाठी हजारो बोकड व कोंबड्यांची आहुती देण्यात आली.
भिल्ल समाजाची कुलदेवता मानल्या जाणाऱ्या येडूबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अंगावर असूड मारत, कापूर जाळत, लोटांगण घालत भाविकांनी गडावर जात देवीचा जयजयकार केला.
यात्रेची सुरुवात पहाटे अभिषेकाने होत असून त्यानंतर देवीला पारंपरिक पोशाख चढविण्यात येतो. दुपारी गोंधळ, आरती व भजन कार्यक्रम पार पडतात. सायंकाळी ‘छबिना’ मिरवणूक काढण्यात येते. डफ, हलगीच्या निनादात काठ्या नाचवत मिरवणूक गावातून गडावर पोहोचते.
छबिना मंदिरात आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत वाघाई व गाडीवान देवतांसमोर नवसपूर्तीसाठी बोकड व कोंबड्यांची आहुती दिली जाते. त्यानंतर परिसरात सामूहिक स्वयंपाक व भोजनाचा कार्यक्रम रंगतो.
यात्रेदरम्यान भिल्ल समाजातील बांधव काही दिवस मुक्काम करत परस्पर संवाद, नातेसंबंध व सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात. त्यामुळे हा उत्सव सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरतो.
दरम्यान, गड परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी होत आहे. तर प्राण्यांच्या आहुतीला पर्याय शोधावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असली तरी ही परंपरा कायम ठेवण्याचा भिल्ल समाजाचा ठाम पवित्रा आहे.
Tuesday, March 31, 2026
Sakal
https://news2.sakaalmedia.com/SmartBureauapi/ereporterapp
Monday, March 16, 2026
Monday, March 9, 2026
*पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या हस्ते ऋणानुबंधचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण संपन्न*
https://godatirnews.com/runanubandh-purskar-2025/
Subscribe to:
Posts (Atom)




