मूळ प्रश्नाच्या खोलात जाऊन प्रश्नाशी संबंधित असलेल्यांच्या मानसिकतेत बदल करायचा. त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल; पण माघार घ्यायची नाही. ही समाजसेविका संध्या चौगुले यांच्या कामाची अनोखी रीत आहे. साताऱ्यातली काही गावे त्यांनी अशीच बदलली आहेत. एकेका गावाला सलग एक वर्ष, काही गावांना सलग दोन वर्ष असा संघर्ष करून त्यांनी हा बदल घडवून आणला आहे. "या पद्धतीने वेळ लागेल, होणारे बदल मात्र कायमचे असतील'' हे संध्याताईंचे म्हणणे आहे.
"वर्गातली पोरगी कुठं गेली; काय करती ते बगा आणि आणि तुमचं बगा काय चाललंय'' दारूचं दुकान थाटून बसलेल्या नवऱ्याला बायकोने विचारलेला हा प्रश्न.
"घरात संडास आहे का?'' लग्नाच्या बैठकीत एका धनगर समाजातल्या मुलीने थेट नवरेमंडळींना विचारलेला हा प्रश्न. आपल्याकडची गावे अजूनही पुरुषसत्ताक आहेत. अशा वातावरणात एका मुलगी, तेही लग्नाच्या बैठकीत असा प्रश्न का विचारते काय आणि शौचालय नाही म्हणून लग्नाला नकार देते काय..
वरील दोन महिलांनी विचारलेल्या प्रश्नांमध्येच समाजसेविका संध्या चौगुले यांच्या कामाचं उत्तर आहे.
संध्याताईंनी स्वत:ला कधीच रिकामं ठेवलं नाही. मिळणारा प्रत्येक क्षण वापरला. तोही दुसऱ्यासाठी. त्यावेळी त्यांचं नुकतंच लग्न झालेलं; पण पती नोकरीनिमित्त उस्मानाबादला. सकाळी दोन पर्यंत महाविद्यालयात प्राध्यापकी. त्यानंतर वेळच वेळ. सुरवातीला त्यांना प्रश्न पडायचा, की या वेळेचं करायचं काय? कसा घालवायचा हातातला वेळ? या विचारानं त्या अनेकदा अस्वस्थ होत. स्वत:चा वेळ वापरता यावा, म्हणून सहजपणे खेड्यापाड्यांतल्या महिलांमध्ये मिसळत गेल्या. कधी एखादी बाई गोठ्यात शेण गोळा करत असेल, तर गप्पा मारता मारता तिला मदत कर... कधी एखादी अंगण साफ करत असेल, तर तिचा झाडू हातात घेऊन सफाईचं काम सुरू कर...असं एक एक काम सुरू झालं; असं करत करत हळू हळू गावाचं रंगरूप पालटू लागलं. मग संध्याताईंनी दुसरं गाव घेतलं. तेही असंच बदललं. मग तिसरं.. चौथं.. पाचवं.. उरलेला वेळ घालवण्यासाठी सहजपणानं सुरू झालेलं काम आकाराला येऊ लागलं आणि संध्याताईंचा स्वत:चाच खेडी बदलण्याचा नवा, अनोखा पॅटर्न समोर आला.
गावं बदलली कशी?
संध्याताईंच्या कामाला कोणतंच ठोकळेबाज नाव नाही. साताऱ्याच्या आसपासची गावं त्यांनी गावकऱ्यांच्याच सहकाऱ्यानं बदलली आहेत. कामाला सुरवात कशी झाली? असं विचारल्यावर संध्याताई म्हणाल्या, "पती उस्मानाबादला एका महाविद्यालयात होते. एनएसएस शिबिराचा एखादा कॅम्प आपल्या भागात आणावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी इंगळेवाडी इथं कॅम्प घेतला. रिकामपणामुळे होणारी माझी अस्वस्थता एव्हाना त्यांना कळाली होती. त्यांनी मला सुचवलं, की या भागात काम कर म्हणून. काय करायचं ते ठरलेलं नव्हतंच. इंगळेवाडीला येत राहिले. इथल्या बायकांमध्ये मिसळत राहिले. तेव्हा एक जाणवलं, की इथल्या बायका सुधारलेल्या आहेत; पण अजिबात बाहेर पडत नाहीत. बोलायचं असलं तरी आडून आडून बोलतात. मी गावात योगवर्ग सुरू केला. हेतू एवढाच, की कोणत्यातरी निमित्तानं का होईना या महिला एकत्र येतील. भरपूर वेळ दिला. नंतर एक दोघींच्या मदतीनेच एका घरासमोरचा उकिरडा साफ केला. माझं नावच तेव्हा "झाडूवाली बाई' असं पडलं होतं. माझं खरं नाव तर कित्येकांना माहितीही नव्हतं. "आमच्या इथं पण कचरा आहे, आपण मिळून साफ करू', अशा गावातल्या बायका म्हणायला लागल्या. असं करत करत गाव चकाचक झालं. मग गावाला "धूरमुक्त' बनवायचं ठरलं. अनेकजणी सांगायच्या, "नवरा माझं ऐकत नाही. तूच येऊन सांग ना.' निर्धूर चुलींचा प्रसार केला. गाव धूरमुक्त झालं आणि मी "चूलवाली बाई' झाले. मग पाठोपाठ शौचालय चळवळ राबवली. त्यातही गावातल्या महिला पुढेच. मग कोणतंही काम असूदेत त्या पुढे होऊन कामाला लागायच्या. ज्या महिला बाहेर पडत नव्हत्या त्या आता पुरुषांच्या बरोबरीनं कामं करत होत्या. अर्थात हा दिवस उगवायला जवळपास वर्षभर वाट पहावी लागली मला.''
वर्षभराचा हा प्रवास इतका सहज तर नक्कीच नसणार.. वाक्य पूर्ण करायच्या आतच संध्याताई बोलायला लागल्या, "माझं कॉलेज दुपारी दोनला संपायचं. चारपर्यंत स्वत:चं आवरून गाडीवरून मी इंगळेवाडी गाठायचे. महिलांना एकत्र करून त्यांच्याशी गप्पा मारायचे, काही कामं करायचे. हळूहळू त्यांना वाटायला लागलं, की ही बाई आपल्यासाठी येते आहे. मग त्यांनीही मी सांगेल, ते ऐकायला सुरवात केली. रात्री उशिरापर्यंत गावातच थांबायचे.'' रात्री उशिरा? अडखळतंच विचारलं, "हो. याचं श्रेय मला नाही, तर माझ्या वडिलांना. माझ्या जन्माच्या वेळी त्यांना वाटलं होतं, की मुलगा होईल म्हणून; पण झाले मी. मग त्यांनी मला मुलासारखंच वाढवलं. ते मिलिट्रीत होते. लहानपणापासूनच त्यांचे माझ्यावर प्रयोग सुरू असायचे. कधी झाडाच्या अगदी शेंड्यावर चढायला लाव, तर कधी अंधाऱ्या रात्रीतून मला एकटीलाच पाठव... असं काहीही. त्यांच्यामुळेच माझ्यात बिनधास्तपणा आला.''
दुर्गळवाडीचं काम
इंगळेवाडी चकाचक झाल्यानंतर संध्याताईंना त्यांच्या गावातूनच म्हणजे दुर्गळवाडीतून "स्वच्छतेचं निमंत्रण' आलं. या गावातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्याने इथल्या महिलांना जमवायला फारशी कसरत करावी लागली नाही. दारू हीच दुर्गळवाडीची खरी समस्या होती. अनेकजण दारू पिऊन बायकोला, आईला मारायचे. सुरवातीला संध्याताईंनी महिलांच्या मदतीने थेट दारूबंदीलाच हात घातला; पण गावाची पुरुष मंडळी त्यांच्या विरोधात गेली. "तुझ्या घरात तू नीट नांद, आता तुझा गावाशी काही संबंध नाही. इथं अजिबात फिरकायचं नाही' अशा धमक्याही गावातल्या "कट्टर पिणाऱ्यांनी' दिल्या. मग संध्याताईंनी कामाचा अजेंडा थोडा बदलला. त्यांनी दुसऱ्या कामाकडे लक्ष दिलं. गावातल्या महिलाशी ताकदीनं संपर्क वाढविला आणि ग्रामस्वच्छता, धूरमुक्त गाव, शौचालयाची चळवळ गावात राबवली. गावातल्या "पिणाऱ्यांचा' वॉच संध्याताईंकडे होताच. मात्र आपल्या दारूला हात नाही ना लावत; मग त्यांनीही गावात सुरू केलेल्या कामांना विरोध केला नाही. महिला एकत्र तर आल्या होत्या; पण त्यांचं सक्षमीकरण होणं, महत्त्वाचं होतं. त्याशिवाय "पिणाऱ्या' नवऱ्यांविरोधात लढायला बळ येणार नव्हतं. गाव कारभाऱ्यांना हाताशी धरून एकाच दिवसांत 13 बचत गट स्थापन केले. बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. महिलांना बळही मिळालं आणि त्याही कामाला लागल्या. स्वत:च्याच गावात संध्याताईंनी जवळपास दोन-तीन वर्षं अक्षरक्ष: दिवसरात्र काम केलं. या दरम्यान, त्यांच्या बाजूने गावातली तरुण मंडळी महिला असं मोठं पाठबळ निर्माण झालं होतं. अनेक तरुणांची दारूही सुटली होती. जे पिणारे नवरे होते त्यातले अनेकजण संध्याताईंच्या वर्गातलेच. एकानं सांगितलं, की तुझ्यामुळं माझी बायको मला रागवते, "वर्गातल्या पोरीचं काय चाललंय आणि तुमचं बगा, अशी म्हणते. मला वाटतं, की दारूचं दुकान बंद करावं पण मी जगू कशावर'' त्याचं बोलणं बरोबरच होतं. त्याला जगण्यासाठी पर्याय उभा करून द्यायला हवा होता. संध्याताईंनी स्वत: काही पैसे दिले आणि वाद्यांचा व्यवसाय उभा राहिला. आणि त्याचा मार्ग बदलला. आता गावात पुष्कळ बदल झाला आहे. डबकी नाहीशी होऊन स्वच्छता आली. गावात झाडंही भरपूर लागली. विशेषत: नवरे हे बायकांच्या मुठीत व खुशीत आहेत.
"दुर्गळवाडीनंतर अनपटवाडी, ठोंबरेवाडी, बेबलेवाडी, आसले, उंबरी, लोधडे या गावांतही अशीच कामं केली. गावात काम सुरू झाल्यावर सगळ्यांत जास्त त्रास व्हायचा, तो गाव पुढाऱ्यांचाच त्यांना वाटायचं, की मी काम केलं तर त्यांना इलेक्शनला प्रॉब्लेम येईल. पण मला राजकारणात रस नव्हताच. हे त्यांनाही नंतर पटलं आणि काम सुरू राहिलं. नवख्या गावात गेलं, की पहिलं स्वच्छतेचं काम हाती घ्यायचं, स्वत: कचरा उचलायचा. घराघरांत जायचं. महिलांच्या बरोबरीनं त्यांची घरंही आवरायची. मग एखाद्या पोराच्या डोक्यात उवा झालेल्या असल्या तर त्याही काढायच्या. असं जे मला करता येईल ते करत राहिले. अजूनही या सगळ्या गावांत मी जाते.'' संध्याताई सांगत होत्या.
कातकरी वस्ती
या सगळ्या गावांपैकी कोणत्या गावांत जायला, काम करायला जास्त आवडतं?
"कोणत्याच नाही'' संध्याताईंचं या उत्तरानं सुरवातीला गोंधळल्यासारखं झालं. पण त्यांनी लगेचच हा गोंधळ सोडवला.
"एकदा एका कार्यक्रमासाठी जवळच्याच कातकरी वस्तीवर गेले होते. तुंबलेली गटारं. त्यातून वाहणारं सांडपाणी. त्यामुळं दुर्गंधी. माणसंही मागासलेली. माझं भाषण सुरू असताना समोर बसलेल्या एका महिलेच्या मांडीवरून एक मुलगा उठला. त्याला तहान लागली म्हणून तो वाहणाऱ्या सांडपाण्याकडे गेला. खाली वाकला आणि तेच पाणी पिला. त्याच्या आईला याचं काही वाटलं नाहीच. तीही जागेवरून हलली नाही. या प्रसंगानंच मला या वस्तीत काम करायला भाग पाडलं. आणि याच कामानं मला खूप समाधानही दिलं.
काय काम झालं नेमकं तिथं? विचारल्यावर संध्याताई म्हणाल्या, "कातकरी जमातीची आदिवासी लोकं इथं राहायची. दिवसभर झिंगे, मासे पकडायचे. ते विकायचे त्या पैशातून दिवस भागवायचा. उरलेल्या पैशातून कुटुंबच्या कुटुंब दारू प्यायचं. महिनोंमहिने अंघोळ नाही. अंगाला वास यायचा. घरात तर घाणीचंच साम्राज्य. कचरा तिथंच, झोपायचंही तिथंच सगळीकडे घाणीचच साम्राज्य. त्यामुळं माझं पहिलं काम होतं ते म्हणजे स्वच्छता करणं. त्यासाठी एनएसएस कॅम्प घेतला. कार्यक्रम अधिकारी टी.आर. गारळे, ग्रामसेवक, पती पांडुरंग चौगुले व सगळी एनएसएसची टीम अशा सगळ्यांनी मिळून दिवसभर स्वच्छता केली. कचऱ्याचे ढीगच्या ढीग जाळले. एका दिवसांत वस्ती चकाचक झाली. सगळ्यांनी त्या दिवसाचा पगार मदत म्हणून दिला. जवळपास दहा हजार रुपये जमले. वस्ती तर साफ झाली, आता पुढचं काम माझं होतं. पण वस्तीतल्यांची मानसिकताच वेगळी होती. त्यांना वाटायचं आपल्याला मदत म्हणजे यांचा काहीतरी स्वार्थ. इथं काम करण्याच्या निमित्तानं बाहेरून ही लोकं पैसा घेतात. पैसे मिळाले की जातात, अशी यांची समजूत. अर्थात तसे दोन चार प्रसंग घडलेही होते या आधी. पण मी तशी नाही, त्यांनी माझ्यावर तरी विश्वास ठेवावा. मी त्यांच्या पालांमध्ये जात राहिले. त्यांना मी आपली वाटावे म्हणून त्यांचा खेकड्याचा रस्सा, दूध न घातलेला चहाही पिला. पण तरी काही फरक नाही. ते माझ्याशी फार काही बोलायचे नाही. बोलणंच नाही तर काम दूरच. मी अनेकदा निराश व्हायचे, पण गावातले सगळेच जण मला आपले वाटायचे मला त्यांना मदत करायची होती; पण त्यासाठी ते मला बोलवायला आलेले नव्हते. त्यामुळं त्यांच्या कलेनं घेणं, हेच महत्त्वाचं होतं. त्यांच्या मानसिकतेत बदल घडवायचा असेल तर खूप खोलवर जायला लागणार होतं. मग मी त्यांच्या मुलांसाठी गोळ्या, बिस्कीट असं काही ना काही घेऊन जाऊ लागले. मग आपोआपच मुलं माझ्याजवळ थांबायची. माझी वाट बघत बसायची. ही बाई आपल्या पोरांना खाऊ घालते, जीव लावते म्हटल्यावर पालावरच्या बायकाही माझ्याशी बोलू लागल्या. इथली मुलं शाळेत जात नव्हती. वस्तीवर असणारी शाळेची खोली म्हणजे मटक्याचा अड्डाच झाला होता. गोळा झालेल्या 10 हजारांत मी माझे 50 हजार घातले आणि ही खोली पुन्हा शाळेसारखी केली. मुलांना शाळेचे साहित्य, गणवेश, आणले. भिंती सजविल्या. शाळा सुरू केली. कॉलेज सुटलं की वस्तीवर यायचं, मुलांना घेऊन बसायचं, ती बसायची नाहीत. पण रागवायचं नाही. त्यांना शिकावं वाटलं तर शिकवायचं. काही मुलं कामालाही जायची मग त्यांच्या सोयीनं शाळा सुरू झाली''
संध्याताई भरभरून बोलत होत्या, "वस्तीवरल्या बायका मला सहेली.. सहेली म्हणायच्या. त्यांना माझं नाव माहीत नव्हतं. पैशाची बचत व्हावी; म्हणून मी बचत गट सुरू करावा, या विचारात होते. त्यांना सांगितलं, पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मग ठरलं, की प्रत्येकीनं रोज एक रुपया द्यायचा. पण मधूनच त्यांच्यातल्या त्यांच्यातच टूम निघाली, की मी त्यांचे पैसे घेऊन पळून जाईन म्हणून. त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. इतकं करूनही माझ्यावर अविश्वास दाखवल्यानं मला खूप वाईट वाटलं. मी त्यांचे पैसे दिले आणि मुद्दामुनच दोन दिवस तिकडं फिरकले नाही. मी आले नाही म्हणून त्याच माझ्याकडे सहेली सहेली करत आल्या. मी पुन्हा जाऊ लागले. आज या महिलांचा बचत गट तर आहेच पण स्वत:चा व्यवहार त्या स्वत: करतात.''
काम सुरू झाल्यानं कातकरी वस्ती प्रकाश झोतात आली. अनेकजण मदत द्यायला तयार व्हायचे, अनेकांनी कपडे दिले. आजही त्यांच्या घराचा वरचा मजला कपड्यांनीच भरला आहे. वस्तीची संख्याही वाढली आहे. त्यांच्या घरातही दुपारनंतर कातकरी वस्तीवरची मुलं खेळायला येतात. दरवर्षी कातकरी वस्तीत दिवाळीही साजरी होते. दिवाळीत त्यांच्या रांगोळ्या म्हणजे खेकडे, मासे अशाच. त्यांचं जगणंच ते त्यातून मांडायचे. आता ही वस्ती बदलली आहे. इथं चौथीपर्यंत शाळा आहे. पूर्वीसारखी अस्वच्छता आता शोधूनही सापडणार नसल्याचं संध्याताईंनी सांगितलं.
पतीचे योगदान
या सगळ्या कामाच्या पाठीमागे त्यांचे पती पांडुरंग चौगुले असल्याचं संध्याताईंच्या बोलण्यातून जाणवलं. "गावागावात कामं सुरू झाल्यावर गावगुंडांचे धमक्यांचे फोन यायचे, तेव्हा असे धमक्यांना तेच(पती) हॅंडल करायचे. चौगुलेंचं दोनच वर्षांपूर्वी पोटाच्या अल्सरने निधन झालं(नोव्हें 2009). तेव्हाही एक फोन आला होता, "जिरली ना आता, आता तरी कामं थांबवा' हे ऐकून मला रडूच कोसळलं. आधारच नाहीसा झाल्यासारखं वाटलं. कारण त्यांच्या सांगण्यावरूनच कामं होत होती. वेळोवेळी ते मदत करायचे. पण माझ्या मुलांनी त्यावेळी आधार दिला. मुलं म्हटली, की काही झालं तरी काम थांबवायचं नाही. बाबांची इच्छा पूर्ण करायची.''
संध्याताईं थांबल्या आणि पुन्हा बोलायला लागल्या, "खूप मदत व्हायची त्यांची. मी बाहेर असायचे, तेव्हा घर सांभाळण्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंत सगळी कामं तेच करायचे. मला यायला रात्र व्हायची तेव्हा लोकं काहीही बोलायचे, पण मला त्यांनी कधीही वेळेचा हिशोब मागितला नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविल्यानंच मी इथपर्यंत पोहचू शकले. ते अचानक गेल्यानं मनुष्यबळ अर्ध झालं पण तरी मी दुपटीनं कामं वाढवली. सध्या फलटण, माण तालुक्यातल्या बारा गावांमध्ये पाणलोटाचं काम सुरू आहे. शिवाय जी गावं मॉडेल म्हणून तयार झाली तिथं जाणं येणं असतंच.''
संध्याताईंना वाटतं, की आपल्या समाजरचनेत बायकांना, मुलींना खूप प्रोटेक्ट केलं जातं. ते करण्याची अजिबात गरज नाही. तिला तिचं जगू द्यावं. येणारे धक्के पचवू द्यावे. त्याशिवाय स्त्रीही खंबीर होणार नाही. आजही गावागावांत जातात, तेव्हा त्या हेच सांगतात. कारण महिला बदलल्या, खंबीर झाल्या तरच त्या कुटुंब बदलतील आणि पर्यायाने गावंही!
हिरवाई बद्दल...
वाटेने जाता येता सुरू केलेला आणि प्रचंड लोकप्रिय झालेला हिरवाई हा संध्याताईंचा आणखी एक उपक्रम.
महाविद्यालय यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ते घर सदर बझार हा संध्याताईंचा रोजचा येण्याजाण्याचा रस्ता. रस्त्याच्या कडेला फारशी झाडं नव्हती. म्हणून जाता येता रोज एक झाड लावत लावत एक रांगच तयार झाली. मग त्यामागे आणखी एक रांग लावली; असं करत करत जवळपास दोन एकरांवर झाडं लागली. ही झाडं आज पाच वर्षांची झाली आहेत. आज तिथे विविध प्रकारची झाडे आहेत. या हिरवाईत एक छोटीशी नर्सरीही आहे. ज्याला झाड हवंय त्यानं इथं यायचं आणि फुकटात झाड घेऊन जायचं. "झाड लावण्यापेक्षा त्यांना वाढवणं, मोठं करण्यातंच खरं सुख असल्याचं संध्याताई सांगतात. या हिरवाईच्या जंगलात वर्षभरात विविध उपक्रम सुरू असतात. दरवर्षी दिवाळीही येथे साजरी होते.
-----------
संध्याताईंचा प्रवास
1987 : झाडे लावण्याच्या कामास सुरवात
2001 : इंगळेवाडी, बेबलेवाडी, ठोंबरेवाडी येथे ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, महिला सबलीकरणाचे काम
2002 : लोधवडे(ता.माण) येथे
2002 : कातकरी वस्ती येथील कामास सुरवात
2003 : दुर्गळवाडी, उंबरी या गावांमध्ये कामास सुरवात
2004 : अनपटवाडी(ता.वाई)
2005 : आकळे, वेळे, कामठी, सोनके येथे वनराई बंधारा बांधण्याचे काम. निर्मलग्राम
2005 : हिरवाई प्रकल्प, वनमहोत्सवास सुरवात
2006 : झोपडपट्ट्यातील मुलांसाठी विनामूल्य हिरवाई सपोर्टिंग स्कूलची सुरवात.
2007 : हिरवाई निसर्ग यात्रेस सुरवात(दहा हजार मुलांचा सहभाग)
2010 : शेती व पाणलोट क्षेत्र विकासाबाबत बारा गावांमध्ये जनजागृती