जात्यावरच्या ओव्या, भूपाळया गेल्या कुठे?..
आमची आजी अगदी पहाटे उठायची.
कोंबडा आरवला की तिची पहाट व्हायची. ‘आजीच्या जवळ घडयाळ कसले आहे.
चमत्कारिक मात्र आम्हाला ते कळले होते.
आमची
आजी अगदी पहाटे उठायची. कोंबडा आरवला की तिची पहाट व्हायची. ‘आजीच्या जवळ
घडयाळ कसले आहे. चमत्कारिक मात्र आम्हाला ते कळले होते. पहाटे उठून आजी
‘वळयत’ जाते मांडायची पायलीभर नाचणे तासाभरात दळून संपवायची.
पहाटेची निरव शांतता, जात्याची मंजुळ घरघर यात आजीच्या कंठातून
उमललेल्या सुमधुर ओव्यांचा मिलाफ हवाहवासा वाटायचा! आजीच्या ओव्या आमच्या
घराच्या प्रत्येक अवयवाला परिचयाच्या आहेत. आजीच्या ओव्यांचे आमच्या घरावर
संस्कार झाले आहेत.पहिली माझी ओवी गं पहाटेच्या वेळेला
राम या देवाला .. राम या देवाला
दुसरी माजी ओवी गं यशोदेच्या कान्हाला
कृष्ण या देवाला.. कृष्ण या देवाला
तिसरी माझी ओवी गं.. पंढरपूर तीर्थाला
विठ्ठल देवाला.. विठ्ठल देवाला
संत जनेच्या मदतीला विठ्ठल धावला होता. असं सांगितलं जातं. आमची आजी या ओव्या देवांच्या चरणी अर्पण करायची. त्या मनमुक्त म्हणायची. दळता दळतानाच स्वत:लाच हरवायची. तिची देवावरील श्रद्धा भाव प्रेम तिच्या ओवीत आणि दळतानाच्या समर्पणात दडले होते.
आमच्या आजीने श्वासाच्या अंतापर्यंत जाते ओढले पण ती कधी थकल्याचे जाणवले नाही. किंवा दळण्यासाठी कधी कुरकुरही केली नाही. याचे श्रेय कोकणच्या निसर्गाला आहे. अशा प्रकारचे निरामय आरोग्य कोकणच्या माणसाला लाभले आहे. कोकणच्या नंदनवनात नांदणारे हेच ते तेजस्वी चैतन्य जे प्रत्येक माणसाच्या हृदयात नांदते आहे. हा चैतन्यरूपी विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयात वास करतो आहे. पण हा खरा देव आम्हाला कधी कळलाच नाही. म्हणूनच एकेकाळी तुकाराम महाराज आंतरिक म्हणाले..
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन
विसरोनी गेले ख-या देवा
कोकणात नांदणारा निसर्गरूपी देव आपला खरा देव आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही सगळी पंचतत्त्वे, आपल्या देशात नांदतात, आपला देहत्व मुळी परमेश्वर स्वरूपी चैतन्याचा आविष्कार आहे. म्हणूनच निसर्गाच्या प्रत्येक नियमाला आपण बांधील आहोत. त्यांच्याशी आपलं अतुट नातं आहे. निसर्गाच्या नियमांशी आपण सुसंगत वागलेच पाहिजे. या निसर्गाच्या नियमांशी आपले वाडवडील सुसंगत वागले. म्हणूनच या निसर्ग देवतेने त्यांना आमच्या आजीसारखे निरामय आरोग्य बहाल केले. आमच्या आजोबांनाही निरामय असे दीर्घायुष्य लाभले.
आमचे आजोबा वारकरी होते. गळयात तुळशीमाला धारण केली होती. केशरी गंधाचा टिळा कपाळी लावीत. आजोबा प्रात:काळी लवकर उठायचे ‘उठा उठा सक ळीक वाचे स्मरावा गजमुख’ हे गजाननाचे स्मरण प्रात:काळच्या मांगल्याला भारून टाकायचे. आजोबांच्या या भूपाळया संस्कार रूपे आम्हालाही अवगत आहेत.
पहाटेच्या आजीच्या ओव्या आणि आजोबांच्या भूपाळया. पहाटे कोंबडा आरवल्यापासून उजाडेपर्यंत काम करतानाही भगवंताचे स्मरण माणसाच्या हृदयातील ईश्वरतेचा विकास आहे. त्याच्या प्रक्षेपणाचा प्रकाश आहे! ही दिव्यत्वाची प्रभा आहे.
आपल्या संचीतात पुण्याईचा साठा करणारे हे पुण्यधन आहे! हे दिव्यत्व हे पुण्यधन तुम्हाला आम्हाला सगळय़ांना या निसर्ग देवतेने अगदी सहज बहाल केले आहे. निसर्गाच्या या वरदानाचा आपण सदुपयोग करू या. सूर्यनारायण एकदा या भूतळावर अवतरला की चैतन्याचे सगुण साकार आविष्कार या भूतलावर चराचरात लवथवताना दिसतात.
पाखरांचा किलबिलाट काय सांगतो आपल्याला? .. काय सांगत असतात ही पाखरे अनाकलणीय भाषेतून?.. कुठे लपून बसलीय ती सुरेल तालात चिवचिवणारी नाजुक मैना? ..ही खारूताई आपल्या मिशा पुसत सकाळी सकाळीच काय कुरतडते आहे आणि कसली धावपळ चालली आहे तिची? गाय हंबरते आहे गोठयातून आणि ते पाहा तिचे वासरू शेपूट उंचावून उंडरते आहे.. बाबानी या वासराला मोकळे सोडले वाटते.. आता बाबा गाईच्या दुधाची गरम गरम धार काढतील.. अजूनही गाय हंबरते आहे..
वासरू तिच्या कासेला ढुशी देणार.. तेव्हाच ती पान्हा सोडणार.. हा हवाहवासा घुंगरांचा कर्णमधुर आवाज.. नक्कीच आबानी बैलगाडी जुंपली. देवळातल्या घंटानादाने परिसर भारून गेलाय. विठ्ठलाच्या देवळात सकाळची आरती सुरू झाली.. आरतीचा आवाज कृष्णा काकांचा आहे. गुरे वासरे आता माळावर चरतायत.. गुराखी काळया खडकावर घोंगडी अंथरून बसलाय, कोवळया रूपेरी किरणात..
पोरीबाळी नदीवरून भरले हांडे घेऊन रमत गमत घराकडे परतल्यात. प्रात:काळच्या रूपेरी किरणांचा सडा अंगणभर पसरून आला त्याने आपले हातपाय सर्वदूर पसरलेत.. झाडांच्या पानांतून झिरपणारी रूपेरी सिताचवरी झाडाखाली नाचते आहे. उबदार नाजुक सुकुमार वा-याची झुळुक मनाला सुखावते आहे. सारेच वास्तव्य बोलके आणि मंगलमय मनाला पावित्र्याच्या मंदिरात घेऊन जाणारे.. सदैव हवेहवेसे वाटणारे!