Monday, April 20, 2020

गर्याबरोबर माशीही चावली गेलीय हे समजलो तेंव्हा बराच उशीर झाला होता

बर्याच दिवसानी बा माझ्याकडं आला व्हता ,कारण व्हतं पाहुण्यांचं पाहुणे वाट चूकून माझ्याकड आल्याने त्यांना इकडंच बोलावलं तसे वरचेवर ये जा चालू आसते पण सगळी बच्चे कंपनी जून्या घरी राहात आसल्याने त्यांना इकडे करमत नाही .पाहुणे गेल्यावर थोडावेळ गप्पा झाल्या .त्यानींच विषय काढला कि चंभारवळात मोहर आहे जायचा का काढायला मी एका पायावर तयार झालो बर्याच दिवसात मोहर खाल्ली नव्हती मी हातात ताट घेऊन तयार झालो. मी येतोय खरी पन मी हात नय लावनार ही पहिली आट त्यांनी घातली .मोहर खायला मिळतीय याचंच आप्रुप .तुम्ही फक्त जागा दाखवा मी पूढंचं सगळं बघतो.आसं ठसक्यात सांगून मोकळा झालो .वडीलांनी माझ्याकडे फक्त बघीतले आणी हासले .ते का हासले हे कोडं मला सुटलं नाही तशी गरजही वाटली नाही. घे कूर्हाड आणं चल .चंभारओहळात जाऊन थांब मी आलोच.पुढच्या पाचंच मिनटांत मी जागेवर पोहचलो .काही वेळातचं वडील आले .वाटाच्या बाजूला चं बोंडार्याच्या खोडात मोहर होती .वडील खोडाजवळ पाच मिनिटे शांत ऊभे राहिले माश्यांची ये जा निट निरखून घेतली .मग तोंडावर पडलेला पाचोळा बाजूला केला .कानोसा घेतला आणी माझ्याकड बघीतले .मी तयारीतचं होतो .मला सर्व सुचना देऊन ते बाजूला झाले. धावसा बारीक आसल्याने हात घूसत नव्हता .खोड फोडावच लागनार व्हतं मी वडलांकडे बघीतले त्यांनी आनुमती दिली .मग काय खोडावर जोरात कुर्हाडीचा घाव घातला. तश्या माश्या भनभनत बाहेर आल्या.आता काही खरं नाय मी बाजूच्या गवताचा चूडा केला आणि धावशात कोंबला .मि माचीस ची काडी वडनार तसा वडलांनी माझ्या दंडाला धरून बाजूला ओढला .काय करतोस हे तू ,मध पन काढायची आन् माश्या पन पेटवायच्या हा कंचा न्याय .आहो पन त्या चावतील ना मी केवीलवाना प्रयत्न केला .काय व्हत नाय तेनी माशा चावल्यावर मानसा मरत नसत्यात .हो बाजू आणं ती ताट हातात धर मी गपगुमान हातात ताट घेवून बसलो. त्यांनी खोडाला कान लावला आंदाज घेतला आणि हळू्वार फूंकर मारली जादू केल्यागत माशा बाजूला झाल्या. पहिला गरा माझ्याकडे दिला आणि सांगीतले कि म्हसोबा, कोटम्या,मावल्या आन् गारूड्याला निवद उडव .मी इकडे तिकडे बघीतला, वडील खोडात हात घालून कानोसा घेत होते हिच संधी साधून सगळा गरा दाताखली दाबला .दोनदा तिनदा चावल्यावर चवीत फरक पडला गर्याबरोबर माशीही चावली गेलीय हे समजलो तेंव्हा बराच उशीर झाला होता .माशी मरतानाही तिचं काम चोख बजाऊन गेली होती .जिभेला डंक मारला होता जीभीची आग व्हायला लागली ,तोंडातला बोकना थूकून टाकला .आवघड जागेचा दुखना आन् जावई डाक्टर .दाखवता सोय नाही आन् सांगताही सोय नाही. आशी गत झाली .काय झाला रं कयाला चुळबूळ लावलेय वडलांनी ताटात मधाचा पोळा ठेवत विचारले .कूठ काय ,काहीच नय मी चाचरत बोललो .यी आता इकडं आन् पोळी काढ माश्या बाजूला झाल्याती ते बाजूला सरकत बोलले .मी त्यांच्या हातात ताट देवून पुढं सरसावलो .जीभ दाताखाली घसरणे चालूच होते .सगळा ध्यान जिभीकड लागला व्हता .पण सांगताही येत नव्हते. तसाच खोडात हात घालून अंदाज घेवू लागलो .वडलांनी करवंदीची पाच पाना तोडली .मी सुध्दा ते काय करतात ते बघू लागलो .त्यांनी पाच निवद तयार केले थोडी थोडी मध चारी दिशांना उडवली बा म्हसोबा, कोटम्या,गारुडीराया,मावलीआयांनो घ्या तुमचा निवद. काही चुकला माकला तर संभाळून घ्या .आजून काहीतरी पुटपुटत डोळे बंद केले.मी मात्र बघतच राहीलो किती हि निसर्गाशी एकरुपता .मला हे जमेल का .ऐ आरं आटंप झावळा पडला घरी जाया टाईम व्हयील .मी माझ्याच तंद्रीतून बाहेर आलो. मी चार पोळी काढली आसतील पन् दोन्ही हात गिरबाडून मोकळा झालो होतो .वडील खाऊ कि गिळू आसे बघत होते .मी त वरून तपेला ओळखला आन् बाजूला झालो .त्यांनी आलगद दोन पोळी काढली .निघ आता पोळी संपली घी गठूडा बांधून .ते धावशावर दगड ठेवत बोलले .आहो पन मह्या हाताला तर तीन पोळी लागली होती मी जागेवरून न उठताचं बोललो.तुह्या बापाचीच आहे सगळी ,उदया ह्या जित्राबाला खायला नको .माझ्याकडे न बघताच त्यांनी घरचा रस्ता धरला .आहो पन मला सांगा ना एक पोळा का ठेवला ते मी ताट सावरीत त्यांच्या मागं निघालो.आरं येड्या आपन पोळी काढून घेतली आता त्यांना तिथं रह्याचा कि नय हे त्यांची मेन माशी ठरवील .उद्या बर्याच माशा नवीन जागा शोधाया जातील .एखादी जागा पसंत झाली की सगळा बिर्हाड तिकडं जाईल .ह्या धावपळीत माशा फुलांवर जानार नाहीत .म्हणून त्यांची उद्याची सोय .आन् जागा चांगल आसल तर एक एक मोहर नय जात.तिडचं राहातेय. मी मान हालवली .कधी एकदाचा घरी जातोय आन् आरशात बघतोय आशी आवस्था झाली होती .मी पळतचं घरी आलो पायरीवर गठूडा ठेवला आन् घरात घूसलो .आरशासमोर उभा राहून कुठं सुक लागलाय ते चाचपून बघत होतो.हासण्याचा आवाज आला म्हणून मागं वळालो तर माझी सौ जोरजोरात हासत होती .काही सांगायच्या आत ,काय झालंय ते तिला कळालं होतं .ती फक्त हासत होती आणि मी कय करू आन् काय नको हे मला समजत नव्हतं.तेवढ्यात वडीलही आले .त्यांच्या लगेच लक्षात आले नाही पन जेंव्हा लक्षात आले तेंव्हा मात्र शिव्यांची लाखोली वाहिली .मी मात्र गूपचूप ऐकून घेतले.आता मात्र जीभ चांगलीच सुजली होती.मी बोलायचो एक आणि दुसर्याच्या ऐकायला जायचे भलतेच.आरं मी तुला निवद दाखवायला सांगितला आन् तू लगेच आळं वळाया भिडलाय मग आसं व्हनारचं वडील समजावनिच्या स्वरात बोलत होते .मी सगळ्या देवांची माफी मागितली इथून पुढं आसं व्हणार नाय याची काळजी घेईन .एक डाव माफ करा आसं म्हणून पाचपावलीना पाया पडलो. आवडीचा रस्सा आसुनही फक्त भातावरच वेळ मारून नेली .रात्री बराच वेळ विचार करत होतो शाळेत न जाताही माझा बाप हे सर्व कुठं शिकला आसलं मी एवढा शिकूनही आडानीचं राहिलो .आज मला त्यांच्यासारखं निसर्गाशी एकरूप होता येईल काय .त्यांनी मानलेल्या निसर्ग देवतेवर मी त्यांच्याइतका विश्वास ठेविल काय .सगळ्यात शेवटी एकचं उत्तर आलं ते म्हणजे ""होय "" होय ते करावचं लागेल .
                      *रघु बो-हाडे