*काजव्यांचा अद्भुत निसर्गसोहळा*
लेखिका-नीलिमा जोरवर
*प्रकाशित* - सकाळ अग्रोवन दि.१५.५.२०२२
रखरखता उन्हाळा, नाही म्हटलं तरी थोडा असह्य. दिवसा उन्हाने नुसती काहिली होते. जीव पाणी पाणी करतो. अशावेळी कुठे झाडाचा आसरा किंवा सावली शोधून दुपार कशीतरी निभवायची. ही परिस्थिती रानावनात जास्त जाणवते. गावशिवारात ओळीने असलेल्या घरांच्या दारासमोर कुठे फणसाच्या किंवा आंब्याच्या सावलीला पडून आराम करण्याशिवाय गत्यंतर नसते. नसता या आडरानात पिण्याच्या पाण्याची अडचण तेथे शेतीसाठी पाणी कोठून येणार. म्हणून शेतकरी असले तरी गावातील लोक फक्त एकच हंगामात शेती करतात. पावसावर अवलंबून असलेली शेती. पाऊस संपला कि शेतीची कामेही उरकतात. मग नंतरचा वेळ रिकामाच असतो, पुढचा हंगाम येईतो. म्हणूनच टोळक्य-टोळक्याने सावलीत बसून गप्पा करत असलेले स्त्री-पुरुष दिसतात. अनेकदा गप्पा या विनोदाने भरलेल्या किंवा यंदा ‘बुहाड्यात’ कोणती पात्र नाचवायची त्याची तयारी किंवा फुगडी-कांबड नृत्यासाठी नवीन गाणी रचणे असे. गेल्या काही वर्षांत अजून एका विषयाची भर चर्चेत पडली ती म्हणजे ‘काजवा महोत्सवाची’.
“यंदा काजवा महोत्सव लांबणार वाटत्ये “
“अजून हवेत गारवा आला नाही”
“कुढमूढ एखाद-दोन देखायला लागलय”
“एखादा तरी पाऊस व्हायला पाहिजे तेव्हा काजवे झाडांवर चमकू लागतील”
अशा चर्चा या उन्हाच्या तडाख्यात अजूनच उत्सुकता ताणत जातात.
काही दिवसांनी उष्णता कमी करण्यासाठी वारे वाहू लागतात. जमिनीतील, घरातील बियाणे ठेवलेल्या कंदाना धुमारे फुटतात. जमिनीच्या वर कोवळे कोंब बाहेर येऊ लागतात. हवा बदलते. तापमन कमी होऊन आद्रता वाढू लागते. मध्येच एखादा वळीव कोसळून जातो. तापलेल्या मातीतून मृद्गंध दरवळू लागतो. आता उन्ह असतात पण गारवाही असतो. शेतीच्या पुढच्या हंगामची पूर्वतयारी, बी-भरण, घर-सप्रांची शाकारणी, जनावरांसाठी पड्व्या बांधण्याची तयारी सुरु होते. पावसापूर्वी ही सर्व कामे आटोपायची असत्तात. यासाठी लागणारा पैसा येणार असतो तो ‘काजवा महोत्सवातून’ त्यामुळे रात्रीच्या वेळी काजवे दिसू लागले कि लोक पर्यटनासाठी येथे येतात आणि त्यातून लोकांना रोजगार मिळतो. वर्षातीन सगळ्यांना कमाई करून देणारा हा काळ. विशेषतः भंडारदरा परिसरातील आदिवासी बहुल गावांतील ही स्थिती, याचे फायदे इतर हॉटेल व्यावसायिकांना देखील होतात.
मागच्या १० वर्षांत अचानक प्रसिद्धी मिळून इथल्या काजव्यांची ख्याती सर्वदूर पसरली आणि निसर्गाचा हा अद्भुत सोहळा पाहायला लोक गर्दी करू लागले. अभयारण्यातील धरणाच्या कडेकडेने व इतरही जंगल भागांत ठराविक झाडांवर ही काजव्यांची दुनिया अवतरते. म्हणजे १० वर्षांपुर्वी आम्ही सहज म्हणून फिरायला गेलो कि शेंडी गावातच अंधारात रस्त्यावर निवांत बसून समोर काजव्यांनी भरलेली झाडे न्याहाळीत असायचो. हा काजव्यांचा मिलनकाळ. योग्य वातावरण तयार झाले कि आपल्या पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी हा सगळा खटाटोप. बोलणे, हावभाव, वास अशी जी जीवांच्या संवादाची माध्यमे, तसा प्रकाश हा काजव्यांच्या संवादाचे माध्यम. काजव्यांच्या मागील भागातून निघणारा चमकता प्रकाश हे या किटकाचे वैशिष्ट्य. त्यामुळे माणसांचे याकडे विशेष लक्ष गेले असावे. या मिलनाच्या हंगामात मादी आपला जोडीदार निवडते. त्यासाठी काजव्यांचे स्वयंवर भरते. हे स्वयंवर भरते ते जंगलातील झाडांवर. ओळीने काजवे आपल्या प्रकाशाने झाडांवर विविध प्रकाशमाळासारखे pattern तयार करतात. हो अगदी दिवाळी-गणपतीत आपण लावतो त्या विजेच्या माळांसारखे. या क्षणाच्या कसरतीतून ज्या नराचा प्रकाश मादीला सर्वोत्तम वाटतो, त्याची निवड मादी आपला जोडीदार म्हणून करते. त्यांचे मिलन झाले कि नर काही दिवसांत मरतो. मादी देखील ठराविक झाडांच्या बेचक्यात अंडी घालून मरते. पुढे ह्या अंड्यातून अळी-कोश-पूर्ण वाढ झालेला काजवा अशी प्रक्रिया असते. म्हणजे काजव्यांचा पूर्ण जीवनकाल जर आपण पाहिला तर तो फारच थोडा म्हणजे अगदी एक-दीड महिन्यांचाच काळ. मेच्या मध्यापासून ते जून-जुलै. जास्त पाऊस येतो तेव्हा या भागात वारे खूप सुटते. त्यामुळे वाऱ्याच्या झोताबरोबर विखुरलेले, उडालेले काजवे पण अनेकदा दिसतात. अतिपाऊस, अतिवारा या परिस्थितीत काजवे आपल्या ठरलेल्या नित्यक्रम पार पडण्यासाठी सज्ज असतात. त्यांना जणू निसर्गाकडून प्रजननासाठी ठराविक वेळेचीच परवानगी मिळालेली असते.
*पर्यावरणीय परिसंस्थेतील काजव्यांचे महत्व काय?*
असा प्रश्न अनेकांना पडला असणार. पूर्वी शेताच्या बांधांवर, नदी-तलावांच्या काठाला इतकेच काय गावातील घरांच्या आजूबाजूला देखील काजवे दिसायचे. काजवे हे जेथे प्रदूषणमुक्त हवा व रसायनमुक्त माती आहे, अशा ठिकाणी आढळतात. त्यामुळे संतुलित पर्यावरणाचे द्योतक (Indicator) म्हणून याला मानले जाते. शेतीसाठी काजव्यांचे विशेष महत्व आहे. मुख्य म्हणजे काजवे परागीकरण करण्यास मदत करतात आणि गोगलगायीसारखे उपद्रवी प्राणी हे काजव्यांचे खाद्य आहे. त्यामुळे आपोआपच गोगलगायींचा उपद्रव कमी होतो.
*काजव्यांची संख्या (population) कमी होण्याची कारणे*
जसजशी रासायनिक शेती विशेषतः तणनाशक, कीटकनाशक यांचा वापर वाढत गेला तसतसे बागायती भागात काजवे दिसेनासे झाले. आदिवासी भागात देखील गेल्या १० वर्षांत रासायनिक शेतीचे प्रमाण वाढत आहे, हे वास्तव आहे. याचा परिणाम म्हणून देखील येथे काजव्यांची संख्या कमी होत आहेच.
काजव्यांचे अस्तित्व हे ठराविक झाडे, उंच गवत, पाणथळ जागांचे किनारे अशा ठिकाणी असते. जमिनींच्या बदलत्या वापरानुसार गवत कापून शेतीसाठी जागा तयार करणे, झाडे तोडणे व पाणथळ जागांची संख्या कमी होणे किंवा तेथे बांधकाम होणे अशा गोष्टींमुळे त्यांचे वस्तीस्थान नष्ट झाल्यामुळे काजवे कमी होत आहेत.
पर्यटकांचा जंगलातील अनियंत्रित वावर, बेजबाबदार वर्तणूक आणि मुख्य म्हणजे प्रकाशाचे प्रदूषण यामुळे गेल्या काही वर्षांत काजव्यांची संख्या कमी होत आहे. आधी शेंडी गावात दिसणारे काजवे आता १५-२० किमी आतल्या गावांत दिसू लागलीत. तेथेही लोक त्यांचा पाठलाग करत पोहचले तर त्यांनी कोठे जावे? माणसांची ही घुसखोरी , काजव्यांना उपद्रवकारक ठरू नये म्हणून काही उपाययोजना नक्कीच करता येतील.
*काजवे संवर्धनासाठी घ्यावयाची खबरदारी*
माणसाला सृष्टीच्या अद्भुत गोष्टींचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. या काळात चालणाऱ्या काजव्यांच्या नयनरम्य सोहळ्याचे त्याला आकर्षण असतेच. आकाशात जसे तारकांचे नभोमंडळ असते तशा जमिनीवर तारका उतरल्यासारख्या भासतात. निसर्गाच्या या अद्भुत सोहळ्यात आपल्या अस्तित्वाची खाणाखुण कोठेही न ठेवता शांतपणे हे दृश्य अनुभवणे, हे निसर्गप्रेमींचे लक्षण. या माणसांच्या सहजप्रेरणा. पण आजकाल निसर्गाकडून प्रत्येक गोष्ट ओरबाडण्याची सवय माणसाला जास्त लागली आहे. आणि इथेच गडबड होते.
काजव्यांच्या बाबतीत म्हणायचे तर प्रकाश हा यांचा जोडणारा मुख्य दुवा. आणि जेव्हा अनेक माणसे, रोज-रोज... गाड्यांचे प्रकाशझोत फिरवत काजवे बघायला रात्रभर फिरतात, तेव्हा काय होईल याची कल्पना जाणकारांना यावी. यासाठी सुजाण नागरिकांनी स्वतःसाठी काही नियम बनवूया व ते पाळण्याचा प्रयत्न करूया.
१. शक्यतो काजवे पाहण्यासाठी रात्री प्रवास ण करता दिवसा एखाद्या आदिवासी गावात पोहचावे. रात्री स्थानिकांच्या संगतीने काजव्यांचा सोहळा शांतपणे अनुभवावा. या काळात जंगलात पिकलेल्या करवंद, आंबे, अळव, फणस अशा रानमेव्याचा आस्वाद घेता येईल. शिवाय यातून स्थानिक संस्कृती समजून घेता येईल व तुमच्या माध्यमातून स्थानिक गावकऱ्याना रोजगार उपलब्ध होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा परतीचा प्रवास करावा.
२. काजवे पाहताना विजेऱ्यांचा वापर फक्त रस्ता पाहण्यासाठी करावा. झाडावर विजेऱ्यांचा प्रकाशझोत पसरवू नये.
३. मोबाईल अथवा साध्या कॅमेऱ्यातून फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. हे फोटो व्यवस्थित येत नाहीत पण काजव्यांना याचा त्रास नक्की होतो.
४. बाटलीत काजवे धरण्याचा अट्टाहास करू नये. तुम्ही पकडलेले काजवे हे काही काळातच मरू शकतात.
५. स्थानिक वनविभागाने केलेल्या सुचानाचे योग्य पालन करावे. भंडारदरा परिसरातील काजवे महोत्सवासाठी यंदा काही महत्वाचे नियम बनवले आहेत. सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी श्री. गणेश रणदिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी काजवा महोत्सवामध्ये काजवे बघण्यासाठी संध्या. ६ ते रात्री १० पर्यंतचीच वेळ असणार आहे. यानंतर येणाऱ्या व जाणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश बंदी आहे. पूर्वपरवानगी घेतलेल्या छायाचित्रकारांशिवाय अन्य कुणाला फोटो काढण्यास मनाई आहे. जंगलात प्लास्टिक नेऊ नये, म्हणून चेकपोस्टवर चेकिंग होणार आहे. शिवाय रस्त्यापासून २० मीटरच्या पुढे पर्यटकांना जाता येणार नाही, यासाठी स्थानिक ४० पेक्षा जास्त स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. या बाबी नक्कीच स्वागतार्ह आहेत मात्र या नियमांचे पालन करून आपणही सुजाण नागरिकाची भूमिका घ्यावी आणि काजव्यांचा हा अद्भुत निसर्गसोहळा अखंड-अबाधित राखण्यास आपापल्या परीने सहभागी व्हावे.
*आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे.*
- नीलिमा जोरवर
- ९४२३७८५४३६