Thursday, October 27, 2011


दिवाळीत केवळ मातीची पणती उजळायची नसते; आत्मदीप चेतवून ज्ञानाचा, प्रेमाचा प्रकाश प्रत्येक हृदयात पसरवायचा असतो. प्रत्येक चेहऱ्यावर प्रफुल्ल हास्य फुलवायचे असते. समाजाच्या समृद्धतेसाठी प्रार्थना करून कृतज्ञतेचा दीप लावायचा असतो. 

आजी म्हणायची, "पुता, मातीचा दिवा हो, कापसाची वात हो.'' त्या न कळत्या वयात आजीचा हा आशीर्वाद विचित्र वाटायचा. मोठ्ठा बालिष्टर हो, असा आशीर्वाद देण्याऐवजी आजीचा हा काय आचरटपणा, असंही वाटायचं. आणि कळू लागलं तेव्हापासून आजीचा आशीर्वाद कधी पूर्णतः खरा करता येईल, याचा विचार करीत त्या दिशेने धडपड करतो आहे. पणतीमधील वात तेवण्यासाठी वात तेलात बुडालेली असावी लागते आणि त्याच वेळी तिचं एक टोक बाहेरही असावं लागतं. ती वात पूर्णपणे तेलात बुडालेली असली तर ती प्रकाश देऊ शकत नाही. जीवन हे दिव्याच्या वातीप्रमाणे आहे. तुम्हाला या जगात राहावं लागतं, तरीही त्यापासून अलिप्त राहावं लागतं. तुम्ही जगातील भौतिक गोष्टींमध्येच बुडून गेलात तर तुमच्या जीवनात आनंद आणि ज्ञान येऊ शकणार नाही. याच जगात राहूनसुद्धा भवसागरात न बुडता एक टोक बाहेर ठेवू शकला तर आनंद आणि ज्ञानरूपी प्रकाश पडेल. मोठी कसरत आहे खरी, पण या दिवाळीनिमित्त त्या दिशेने आणखी एक पाऊल टाकायला हवं. दिवाळी हा अशा प्रकारे निर्माण झालेल्या ज्ञानप्रकाशाचा उत्सव आहे. तो चांगल्याने वाईटावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव आहे. प्रकाशाने अंधारावर आणि ज्ञानाने अज्ञानावर मिळविलेल्या विजयाचा उत्सव आहे. या दिवशी दीपओळी उजळल्या जातात, त्या फक्त घराच्या सजावटीसाठी नव्हे, तर जीवनाबद्दलचे हे सत्य सांगण्यासाठीच. आपणच व्हायचे दीप-वात आणि ज्ञानाचा, प्रेमाचा प्रकाश प्रत्येक हृदयात पसरवायचा आणि प्रत्येक चेहऱ्यावर प्रफुल्ल हास्य चेतवायचे.

सण हा काळानुसार बदलत असतो. त्याचा अर्थ बदलत असतो. परंपरेतील एक धागा पुढच्या "क्षणां'ना आधुनिक करीत जातो. वैदिक काळात सणाला "क्षण', तर उत्सवाला "समन' म्हणत असत. पहिल्यापासूनच दीपावली हा सर्व "क्षणां'चा राजा आहे. धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या हा सण अतिशय महत्त्वाचा. इसवी सनाच्या उदयालाही हा सण साजरा होत होता. इ. स. 50 ते 400 च्या सुमारास कामसूत्रामध्ये वात्स्यायनाने "यक्षयामी' उत्सवाचा उल्लेख केला आहे. हा उत्सव "दीपालिका' म्हणजे दीपावलीचाच मानला जात असे. हर्षाने इ. स. 676 मध्ये लिहिलेल्या "नागानंद' नाटकात "दीपप्रतिपद-उत्सव' वर्णिला आहे. काश्‍मीरमधील "नीलमत पुराण' या ग्रंथात (इ. स. 500 ते 800) दीपमाला उत्सव कसा पाळावा, हे सांगितलं आहे. सोमदेव सूर्य या जैन ग्रंथकाराने आपल्या "यशस्तिलकचंपू' या गद्यकाव्यात मालखेडच्या राष्ट्रकूट राजाच्या काळातील दीपावली उत्सवाचे, तसेच अल्‌ बेरुणी या विदेशी प्रवाशाने इ. स. 1030 मध्ये भारतात होणाऱ्या दिवाळी सणाचे सविस्तर वर्णन केले आहे. आद्य मराठी (इ. स. 1293) "रुक्‍मिणी सैंवर'मध्ये विदर्भातील दीपावलीचं वर्णन केलं आहे. या प्रत्येक काळात एक सूत्र कायम राहिलं, ते म्हणजे प्रेमाच्या प्रकाशाने सारी हृदयं उजळायची.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात. तुम्ही लावलेला प्रत्येक दिवा हेच दर्शवतो. काही लोकांमध्ये सहनशक्ती असते, तर काहींमध्ये प्रेम, शक्ती, उदारता असते; तर काही जणांमध्ये लोकांना एकत्र करण्याची क्षमता असते. तुमच्यातील सुप्त गुण एखाद्या पणतीसारखे असतात. तुमच्या मनात ज्ञानाची पणती चेतवून ज्ञान मिळवलं तर तुमची सर्व अंगांनी प्रगती होते. वर्तमान जगात हे ज्ञानदीप जेवढे लावाल तेवढे तुम्ही अधिक उजळून निघता. हे उजळून जाणं म्हणजे नवचैतन्याचा अनुभव घेणं. दिवाळी म्हणजे वर्तमान क्षणात राहणं. त्यामुळे भूतकाळातील सर्व दु:खदायक गोष्टी आणि भविष्याबद्दलच्या सर्व काळज्या विसरून वर्तमानात राहा. सध्याच्या ताणतणावाखाली आपण स्वतःलाच नीट पाहत नाही. या प्रकाशात स्वतःलाही पाहून घ्या. केवळ पैसा महत्त्वाचा नाही, त्यासाठी कोणत्याही सिग्नलना न जुमानता सुसाटत जाणं हे अयोग्य होय. आपण कुणाशी व का स्पर्धा करतोय? या दिवाळीच्या प्रकाशात तेही दिसतं का पाहा.

भेटवस्तू आणि मिठाई यांची देवाणघेवाण हीसुद्धा एक सांकेतिक गोष्ट आहे. भूतकाळातील सर्व कटुता विसरून यापुढील काळासाठी नव्याने मैत्रीचा हात पुढं करणं, असा त्याचा अर्थ आहे. कोणताही उत्सव सेवावृत्तीशिवाय अपूर्ण आहे. आपल्याला जे मिळालं आहे, ते आपण दुसऱ्यांनाही वाटलं पाहिजे. कारण, देण्यानेच आपल्याला मिळतं आणि तोच खरा उत्सव. उत्सवाचा आणखी एक अर्थ असा, की सर्व मतभेद विसरून आत्म्याच्या तेजावर तळपणं. समाजातील प्रत्येकाने सुज्ञ व्हायला हवं. तसेच, आनंद आणि सुज्ञपणा सगळीकडे पसरवायला हवा आणि हे तेव्हाच होईल, जेव्हा सर्व जण एकत्र येतील, ज्ञानात राहून उत्सव साजरा करतील.

वात होऊन एक टोक बुडण्यापासून सांभाळत स्वतःला उजळून घेण्याचा अर्थ तर कळला, पण आजी आणखी एक सांगायची," मातीचा दिवा हो'. म्हणजे काय? आपण दिवाळीमध्ये जो दिवा लावतो तो मातीचा असतो. मग त्यामध्ये आपण वात लावून, थोडं तेल टाकून मग दिवा लावतो. या मातीच्या दिव्यामागे, वातीमागे आणि तेलामागे आध्यात्मिक कारण आहे. मातीचा दिवा (पणती) प्रतीक आहे या शरीराचं. आपलं शरीर बनलं आहे मातीपासून. वात ही जशी पणतीमध्ये असते, पण तरीही पणतीपासून वेगळी, त्याचप्रमाणे आत्मा या शरीरामध्येच असतो, पण तरीही शरीरापासून वेगळा; पण त्या वातीवर तो दिवा लावायलासुद्धा तेल हे लागतंच. आणि हे तेल आहे ज्ञानाचं प्रतीक. जेव्हा तेल नसतं तेव्हा ज्योत लागू शकत नाही आणि प्रकाश पडू शकत नाही. आज बहुतांशी लोकांना हे ज्ञानरूपी तेल न मिळाल्याने बहुतांशी व्यवहार अंधकारातच होतात आणि म्हणूनच आजकाल आपण आपल्या संबंधांमध्ये दुःख उपभोगतो. तुमच्या हृदयात प्रेमाचा दीप, घरात समृद्धीचा, मनात करुणेचा, तसेच अज्ञानाचा अंधकार घालवण्यासाठी ज्ञानाचा दीप चेतवा आणि जे जे भरभरून मिळालं आहे, त्या समृद्धतेबद्दलच्या कृतज्ञतेचा दीप चेतवा.

No comments:

Post a Comment