Wednesday, June 6, 2012


कोकणकडा ( हरीश्चंद्रगड)
आतून अर्ध वर्तुळाकार असलेल्या या कड्यावर गिरीप्रेमींचे स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे . कोकणकड्याची कातळ भिंत जवळपास अर्धा किमी लांब आणि १६०० फुट सरळ खोल आहे . कोकणकड्याचा माथा समुद्रसपाटीपासून ४५०० फुट उंच आहे . हा कडा थेट कोकणात कोसळतो म्हणून यास कोकणकडा म्हणतात . हरीश्चंद्रगडाचा भाग असलेला हा कडा सर करण्या अवघड वाटत असला तरी अनेक साहस वीरांनी तो पार केला आहे .
जाण्याच्या वाटा :

१)राजूर = राजूर -पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे.
२) तोलार खिंड = हल्लीच राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. ही वाट राजूर, अंबित, पाचनई, मुळा नदीचे खोरे, घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात तोलारखिंडीत पोहचते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात गडावरील मंदिरात पोहचता येते. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्‍या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.
३)खिरेश्वरकडील वाट
खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात. मुंबई-जुन्नर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. पुण्याहून आळेफाटामार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबीफाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते.
४)नळीची वाट
नळीची वाट बेलपाड्यातून(मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा) हरिशचंद्रगडावर जाते. या वाटेने जाताना तब्बल दहा-बारा तासांचा प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाइंब) समावेश असलेला खडतर मॅरेथॉन ट्रेक करावा लागतो.

No comments:

Post a Comment