Sunday, October 4, 2015

दुर्गभ्रमंती, गिर्यारोहण, निसर्गसहली आणि पावसाळी पर्यटनासाठी चांगला परिसर अशी कळसुबाई रतनगड हरिश्चंद्रगड माळशेज घाट या भागाची आजवरची ओळख आहे, मात्र जैवविविधतेने नटलेल्या या परिसराची आणखी एक ओळख पुढे येतेय ती येथील रानफुलांच्या अनोख्या पुष्पोत्सवामुळे! मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव... तो संपतो न संपतो, तोच सुरु होणारा जलोत्सव... आणि आता सह्यगिरीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसुबाई - हरिश्चंद्रगडाच्या या परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे.
फुलाची ही दुनियाच अदभूत अशी आहे. किती किती फुले? त्यांच्या त-हाही तितक्याच. रंग, रूप, गंध, आकार, रचना.. प्रत्येकाचे आपले निराळे वैशिष्ट्ये. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर काही वास नसलेली... काही औषधी गुणधर्म असलेली तर काही चक्क कीटकपक्षी! पिवळीधमक सोनकी तर आठ - पंधरा दिवस रंगाची मुक्त उधळण करते, कारवी मात्र रुसून बसल्याप्रमाणे सात वर्षे मुक्यानेच काढते अन सप्तपदी भरली की फुलांनी फुलून सुगंधाने मोहरून जाते. कारवीची फुले निळ्या रंगाची असतात. ती फुलली की सारे रान निळे निळे दिसू लागते. कारवीच्या या रंग आविष्कारला सुरुवात झाली की स्थानिक आदिवासी ' नीळ आली,नीळ आली' असे म्हणू लागतात.
सर्वोच्च शिखर कळसुबाई, खड्या उंचीचा महाकाय हरिश्चंद्रगड, बुलंद, बेलाग अशा विशेषणांना साजेसे अलंग, मदन, कुलंग हे कुर्रेबाज दुर्गत्रिकुट. पाबर, भैरव, शिंदोळा, घनचक्कर, कात्राबाई यांना सामावून घेणारी दुर्गराज रतनगडाची बलाढ्य पर्वतरांग. अस्ताव्यस्त पसरलेले दुर्गम डोंगरकडे आभाळाला भिडणारे सुळके, उरात धडकी खोल द-या, जीवघेणे उतार, साम्रदची सांदण.... आणखीनही बरेच काही..... निसर्ग शिल्पाचे कोंदण लाभलेली ही ठिकाणे पाहिली की भटकंतीचे चीज होते.
हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे. त्यात रानफुलांबाबत सह्यगिरी आणि त्यातही कळसुबाई हरिश्चंद्रगडाचा हा परिसर [कासच्या पठाराच्या बरोबरीने] जगभरातल्या १८ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी ( हॉट स्पॉट) एक समजला जातो. पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर, डोंगरमाथ्यावर, उतारावर, कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपाने इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण सुरु असते. येथील रानसम्राज्ञीने हिरवा शालू परिधान केला आहे. जागोजागी अजूनही निर्झराचं मंजुळ गाणं ऐकू येत आहे. फुलांचा बहर रंगीबेरंगी फुलपाखरांना निमंत्रण देतो आहे. रुंजी घालणा-या मधमाश्या फुलांना बिलगताहेत.... निसर्गाने गंधर्व - किन्नरांची मैफल भरविल्यासारखे वाटते आहे. त्यात नटखट उनाड वा-यावर डोलणारी अगणित फुले जणू भोवतीने फेर धरून नाचत रानप-यांच्या नृत्यांच्या आविष्काराचा भास घडवत आहेत. या मयसभेतील फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई या नाट्याची भैरवी आता सुरू झाली आहे. हा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. मान्सूनच्या आगमनाबरोबरच तशी पुष्पोत्सवाची सुरुवात होते.
फुलझाडाचे प्रामुख्याने गवतवर्गीय, झुडूप,वेली आणि झाडे असे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. कारवीचा अपवाद वगळता येथे गवतफुलांची संख्या मोठी आहे. दाटीवाटीने उगवलेली वा-यावर डोलणारी गवतफुले पाहिली की, आपले मनही नकळत 'गवत फुला रे गुवत फुला...' म्हणू लागते. काही फुले सुंदर, मोहक, सौंदर्यवान नववधूसारखी ! काही एकदम चिमुकली नाजुकशी म्हणजे १.५ मिलीमीटरची तर काही अगदी टपोरी २५० मिलीमीटर आकाराची. वर्षभरात फुलणा-या फुलांत पांढ-या रंगाच्या फुलांचा भरणा सर्वाधिक असतो. त्याखालोखाल गुलाबी, निळा, पिवळा, लाल, हिरवा या रंगांचा क्रमांक लागतो.
नवरात्रोत्सवाचे आणि फुलोत्सवाचे अतूट नाते आहे.अगदी वर्षानुवर्षांचे. सह्याद्रीत सर्व ऋतुंमध्ये फुलणा-या रानफुलांची संख्या पाचशेच्या घरात आहे. परंतु याचा बहर पीक पॉईंटला असतो तो सप्टेंबर - ऑक्टोंबरमध्ये. सध्या अनेकविध फुले फुललेली असली तरीसगळ्यात जास्त भाव खातेय ती पिवळी सोनकी!
सोनकीच्या इटुकल्या-पिटुकल्या फुलांच्या फुललेल्या पुष्पमळ्यांनी पर्वतपठारे पीतवर्णी दिसताहेत. तिला सोबत आहे ती रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी - नभाळी, धालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी कुसुंबी... आणखी कितीतरी फुलांची! मुळातच हरिश्चंद्रगडाचा हा परिसर म्हणजे सृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्नच जणू! शेकडो प्रकारच्या वृक्ष-लतांची साथसोबत या भागाला लाभली आहे. युगानुयुगांची.
येथील नवलाई स्थळविशेष गूढरम्यता, नीरव शांतता, पावित्र्य आजवर अनेकांनी न्याहाळले आहे. विविधांगांनी. मात्र 'माउंटन ऑफ फ्लावर्स' ही या सह्यापर्वताची ओळख नव्यानेच होते आहे. सभोवतीच्या गिरीशिखारांप्रमाणेच ही इवलाली रानफुले निसर्ग प्रेमींना साद घालताहेत. मग कधी येताय?

Friday, August 7, 2015

जात्यावरच्या ओव्या, भूपाळया गेल्या कुठे?..

आमची आजी अगदी पहाटे उठायची. कोंबडा आरवला की तिची पहाट व्हायची. ‘आजीच्या जवळ घडयाळ कसले आहे. चमत्कारिक मात्र आम्हाला ते कळले होते.
villege jateआमची आजी अगदी पहाटे उठायची. कोंबडा आरवला की तिची पहाट व्हायची. ‘आजीच्या जवळ घडयाळ कसले आहे. चमत्कारिक मात्र आम्हाला ते कळले होते. पहाटे उठून आजी ‘वळयत’ जाते मांडायची पायलीभर नाचणे तासाभरात दळून संपवायची.
पहाटेची निरव शांतता, जात्याची मंजुळ घरघर यात आजीच्या कंठातून उमललेल्या सुमधुर ओव्यांचा मिलाफ हवाहवासा वाटायचा! आजीच्या ओव्या आमच्या घराच्या प्रत्येक अवयवाला परिचयाच्या आहेत. आजीच्या ओव्यांचे आमच्या घरावर संस्कार झाले आहेत.
पहिली माझी ओवी गं पहाटेच्या वेळेला
राम या देवाला .. राम या देवाला
दुसरी माजी ओवी गं यशोदेच्या कान्हाला
कृष्ण या देवाला.. कृष्ण या देवाला
तिसरी माझी ओवी गं.. पंढरपूर तीर्थाला
विठ्ठल देवाला.. विठ्ठल देवाला
संत जनेच्या मदतीला विठ्ठल धावला होता. असं सांगितलं जातं. आमची आजी या ओव्या देवांच्या चरणी अर्पण करायची. त्या मनमुक्त म्हणायची. दळता दळतानाच स्वत:लाच हरवायची.  तिची देवावरील श्रद्धा भाव प्रेम तिच्या ओवीत आणि दळतानाच्या समर्पणात दडले होते.
आमच्या आजीने श्वासाच्या अंतापर्यंत जाते ओढले पण ती कधी थकल्याचे जाणवले नाही. किंवा दळण्यासाठी कधी कुरकुरही केली नाही. याचे श्रेय कोकणच्या निसर्गाला आहे. अशा प्रकारचे निरामय आरोग्य कोकणच्या माणसाला लाभले आहे. कोकणच्या नंदनवनात नांदणारे हेच ते तेजस्वी चैतन्य जे प्रत्येक माणसाच्या हृदयात नांदते आहे. हा चैतन्यरूपी विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयात वास करतो आहे. पण हा खरा देव आम्हाला कधी कळलाच नाही. म्हणूनच एकेकाळी तुकाराम महाराज आंतरिक म्हणाले..
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन
विसरोनी गेले ख-या देवा
कोकणात नांदणारा निसर्गरूपी देव आपला खरा देव आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही सगळी पंचतत्त्वे, आपल्या देशात नांदतात, आपला देहत्व मुळी परमेश्वर स्वरूपी चैतन्याचा आविष्कार आहे. म्हणूनच निसर्गाच्या प्रत्येक नियमाला आपण बांधील आहोत. त्यांच्याशी आपलं अतुट नातं आहे. निसर्गाच्या नियमांशी आपण सुसंगत वागलेच पाहिजे. या निसर्गाच्या नियमांशी आपले वाडवडील सुसंगत वागले. म्हणूनच या निसर्ग देवतेने त्यांना आमच्या आजीसारखे निरामय आरोग्य बहाल केले. आमच्या आजोबांनाही निरामय असे दीर्घायुष्य लाभले.
आमचे आजोबा वारकरी होते. गळयात तुळशीमाला धारण केली होती. केशरी गंधाचा टिळा कपाळी लावीत. आजोबा प्रात:काळी लवकर उठायचे ‘उठा उठा सक ळीक वाचे स्मरावा गजमुख’ हे गजाननाचे स्मरण प्रात:काळच्या मांगल्याला भारून टाकायचे. आजोबांच्या या भूपाळया संस्कार रूपे आम्हालाही अवगत आहेत.
पहाटेच्या आजीच्या ओव्या आणि आजोबांच्या भूपाळया. पहाटे कोंबडा आरवल्यापासून उजाडेपर्यंत काम करतानाही भगवंताचे स्मरण माणसाच्या हृदयातील ईश्वरतेचा विकास आहे. त्याच्या प्रक्षेपणाचा प्रकाश आहे! ही दिव्यत्वाची प्रभा आहे.
आपल्या संचीतात पुण्याईचा साठा करणारे हे पुण्यधन आहे! हे दिव्यत्व हे पुण्यधन तुम्हाला आम्हाला सगळय़ांना या निसर्ग देवतेने अगदी सहज बहाल केले आहे. निसर्गाच्या या वरदानाचा आपण सदुपयोग करू या. सूर्यनारायण एकदा या भूतळावर अवतरला की चैतन्याचे सगुण साकार आविष्कार या भूतलावर चराचरात लवथवताना दिसतात.
पाखरांचा किलबिलाट काय सांगतो आपल्याला? .. काय सांगत असतात ही पाखरे अनाकलणीय भाषेतून?.. कुठे लपून बसलीय ती सुरेल तालात चिवचिवणारी नाजुक मैना? ..ही खारूताई आपल्या मिशा पुसत सकाळी सकाळीच काय कुरतडते आहे आणि कसली धावपळ चालली आहे तिची? गाय हंबरते आहे गोठयातून आणि ते पाहा तिचे वासरू शेपूट उंचावून उंडरते आहे.. बाबानी या वासराला मोकळे सोडले वाटते.. आता बाबा गाईच्या दुधाची गरम गरम धार काढतील.. अजूनही गाय हंबरते आहे..
वासरू तिच्या कासेला ढुशी देणार.. तेव्हाच ती पान्हा सोडणार.. हा हवाहवासा घुंगरांचा कर्णमधुर आवाज.. नक्कीच आबानी बैलगाडी जुंपली. देवळातल्या घंटानादाने परिसर भारून गेलाय. विठ्ठलाच्या देवळात सकाळची आरती सुरू झाली.. आरतीचा आवाज कृष्णा काकांचा आहे. गुरे वासरे आता माळावर चरतायत.. गुराखी काळया खडकावर घोंगडी अंथरून बसलाय, कोवळया रूपेरी किरणात..
पोरीबाळी नदीवरून भरले हांडे घेऊन रमत गमत घराकडे परतल्यात. प्रात:काळच्या रूपेरी किरणांचा सडा अंगणभर पसरून आला त्याने आपले हातपाय सर्वदूर पसरलेत.. झाडांच्या पानांतून झिरपणारी रूपेरी सिताचवरी झाडाखाली नाचते आहे. उबदार नाजुक सुकुमार वा-याची झुळुक मनाला सुखावते आहे. सारेच वास्तव्य बोलके आणि मंगलमय मनाला पावित्र्याच्या मंदिरात घेऊन जाणारे.. सदैव हवेहवेसे वाटणारे!

Wednesday, March 4, 2015

खंडूशेणफड   दांडगे हे अंध जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका व पारसशाहू राजा येथील राहणारे वृद्ध आपली पत्नी कौसाबाई शेण फड हिला   आपली आधाराची काठी बनवून गावोगावी फिरून भिक मागून आपली उपजीविका चालवत आहे . दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात चितळ वेढा गावात ग्रामस्थांच्या भेटीला ते येत असतात . अंध व अपंगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. त्यामुळे समाजाच्या मूळ प्रवाहात अपंग वंचित राहतात.मात्र येथील ग्रामस्थ आपले संस्कार जपत या अंध खंडू व त्याच्या पत्नीला नातेवाईक समजून गोड जेवण देऊन त्यांचा पाहुणचार करतात . गेली एक तपापासून या गावाच्या भेटीला मजल दरमजल करीत ते येतात .
दृष्टी ही आपल्याला मिळालेली आतापर्यंतची सर्वात सुंदर व मौल्यवान भेट आहे. ज्या निसर्गात आपण लहानाचे-मोठे होतो त्या निसर्गाचे गहिरे रंग व विविध छटा, आपल्या आवडत्या व्यक्तींचे चेहरे व त्या चेहर्‍यांवरचं फुललेलं हास्य, दवात भिजलेली पहाट, मावळताना आजूबाजूच्या मखमली आभाळावर केशरी रंग सांडून गेलेला सूर्य, गाणारे पक्षी, रात्रीच्या गडद साम्राज्यात अवतरलेली अतिशय धीट अशी चंद्राची कोर, बेभान झालेला पाऊस, खवळलेला समुद्र, हिरव्यागार डोंगरांधून वाहणारे मोतीदार झरे, व या निसर्गसृष्टीला हिरवा श्वास देणारी झाडे या सर्व गोष्टीचं हृदयात चिरंतन जतन करण्यासाठी व आयुष्यात असे अनुभवलेले बहारदार क्षण व आठवणी अजरामर करून टाकण्यासाठी दृष्टीची नितांत गरज असते. आयुष्य हे जर गाणं असेल, तर दृष्टी हा त्या गाण्याचा ताल आहे, ठेका आहे, ज्यांच्याशिवाय हे गाणं अतिशय उत्तम गायकाने गायलं असून सुध्दा बेचव व बेरंगी ठरू शकतं. काही व्यक्तींना ही भेट देण्यात निसर्गच कमी पडतो, तर काहींना ही शक्ती गंभीर अपघातामुळे, इजेमुळे किंवा आजारामुळे गमवावी लागते. आयुष्यामधील प्रत्येक क्षण ही त्यांच्यासाठी एक लढाई असते, ज्यात त्यांना स्वतःचा प्रतिस्पर्धी बघण्याची सुध्दा संधी मिळत नाही. लहानपणी आंधळी-कोशिंबीर खेळताना, जी दहा मिनीटे आपण इतरांना पकडण्यासाठी केविलवाणी खटपट करतो, हेच त्यांच्यासाठीअख्ख आयुष्य असतं. आपण त्यांच्या दुःखाची खोली मोजू शकतच नाही, हे खरं असलं तरी अशा अनेक व्यक्ती व संख्या आहेत ज्या त्यांना हरप्रकारची मदत करण्यासाठी, व त्यांच्या आतला प्रकाश पुन्हा उजवण्यासाठी कार्यरत आहेत.तेच कार्य आध्यत्मिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे चितळ वेढा गाव करीत आहे मारुती अर्जुन आरोटे ,  सरपंच सागर आरोटे , सेवानिवृत्त शिक्षक उमाजी भा गवत गुरुजी ,रामनाथ आरोटे ,व ग्रामस्थ कार्य करतात . खंडू ला मुले  सांभाळत नाही मात्र कौसाबाई  त्यांची चांगली काळजी घेतात . दारिद्र्य रेषा खाली कार्ड नसल्याने कोणतीच सवलतत्यांना  मिळत  नाही घरी शेतीवाडी आहे,  पण मुले  करतात त्याचा या दोन वृद्धाना फायदा नाही . त्यामुळे  मिळेल ती भिक पदरात पाडून आपले गुजराण करणारे खंडू व कौसाबाई आलिया भोगासी आसवे सादर म्हणून खुश आहे  
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला अर्पण केलेल्या संविधानात प्रत्येक व्यक्तीला अन्न, पाणी, निवारा या गोष्टीला घटनात्मक महत्व दिले आहे. त्याला अनुसरुन राज्यकर्ते कामही करतात. घटनेचा उदार दृष्टीकोन ठेऊन सामाजिक कल्याणाच्या योजनेचा विस्तार करुन विविध लोकपयोगी योजना राबविल्या जातात.