Friday, August 7, 2020

राणभाजी

*कळसुबाई हरिश्चंद्रगड,रतनगड परिसरातील रानभाज्या*
 पावसाळ्यात पाऊस पडला की रोहीणीच्या येळेला मातीतुन कितीकं रानवेलींच जीवन उमलुन वर येते.
काही झाडाझुडपांची तर काही वेलींची पानं, फुलं,खोड, मुळ, देठ, कोंब खाले जाते.
आणि ह्या सगळा आपलेली नैसर्गिकपणे आणि कोणत्याही खताशिवाय आणि बी पेरावे लागत नसल्याने किंवा कोणतीही मेहनत करावी लागत नाही.
उदा-चाईचा देट,चाईचामोहर,करटुली,गोमेटी,गुळवेल,आंबटवेल,कुरडू,तेराआळवड,टाकळ्याची पानं दिव्याची भाजी,बडद्याची भाजी,कोळुचीभाजी,फांदेची भाजी भोकरीच्या पानांची भाजी शिवाय कवळ्या बोखांची भाजी,लोतीची भाजी,घायपाताच्या फुलांची भाजी,बहाव्याच्या फुलांची भाजी,आघाड्याच्या पानांची भाजी,आणवा,करंजकंदाची भाजी,पंधाचेकंद,सुरणकंद,कवदरची भाजी,खरपुडी,सायरीच्या सायरधोड्याची भाजी,वाघाटीची भाजी,कच्च्या आणि कवळ्या आळवांचीभाजी,(कच्या करवंदाची चवदार कढी,चटणी,कच्च्या करवंदांचे लोणचं जंगली आणि गावरान आंब्याचे लोणचं,भोकरीच्या कवळ्या पानांचे मुटके,फळांची भाजी,मोहट्यांच्या फळांची भाजी,मोहाच्या फुलांची खीर,पुरणात हलकासा वापर) चिलाचीभाजी,काटमाठाची,तांदुळणेची,कोंबडेचीभाजी(अशा फक्त रानभाज्यांची यादी 100पेक्षा जास्त होईल)या रानभाज्यावर कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही किंवा खत औषध लागत नाही.हे आपल्याला नैसर्गिक रित्या रानावनात शेताच्या बांधावर तीनही ऋतुत मिळत असल्याने यासचं सेंद्रीय शेती असे म्हणता येईल.
बऱ्याच ठिकाणी काही मान्यवर(शेतीतज्ञ)प्रश्न विचारतात की तुम्ही आजिबातही खत औषध वापरत नाही हे खरे आहे काय? तेव्हा ममताबाई किंवा आम्ही महिला हसत हसत सांगतो की करवंदाच्या जाळी किंवा मोहाच्या,भोकराच्या झाडाला कस खत घालणार ते तर जंगलात आपोआपच वाडते.आणि पुढे सांगाव लागत की "जर तुम्ही किंवा आम्ही या रानमेव्याची विशेषता जंगली रानवेलींची,रानकंदांची छेडछाड केली किंवा त्यांच्या बिया लावण्याचा प्रयत्न केला तर त्या रुजणार नाहीत आणि रुजल्यानंतर रासायनिकखत दिले तर त्या अपेक्षित उत्पन्न देणार नाहीत.ते जंगलात वाढतात त्यांना जंगलातच वाढू द्या,म्हणुन आमी आदिवासी लोकं ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक असेल तेवडेच घेतो फार तर एखाद्या वेलीची ठराविक वेळी आणि ठराविक काळातच भाजी खाल्ली जाते,तीही एकदोन वेळसच.
जसे-बडदा,दिवा ही भाजी कोवळी पानं असतांनाच खाल्ली जाते.टाकळा(तरोटा)ही भाजी उगवल्यानंतर आट दिवसाच्या आतच खाण्याजोगी असते.तसेच चाईचा देट पानावर येण्या अगोदरच खाण्या योग्य असतो.
 जंगलात ठराविक काळात मिळणाऱ्या रानभाज्यांचे कंदवर्गीय,वेलवर्गीय,झुडुपवर्गीय,झाडवर्गीय,फळवर्गीय असे प्रकार आहेत.
रानातील सगळ्याच बिनखताच्या रानभाज्या अगुदर पाण्यात शिजवून(उमवून)घेतल्या जातात नंतर पिळुन भाजी करतात.कारण ह्या बहुतेक रानभाज्या पचनास जड असतात.ह्या रानभाज्या खुरासणेच्या थोडेश्या तेलातही चवदार लागतात.
आमच्या जेवनात अजूनही खुरासण्याच्या/शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला जातो.
वाढत्या शहरीकरणामुळं रानातील हा रानमेवा अतिदुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे,म्हणुनच या रानमेव्याची/रानभाज्यांची चव चाखण्या बरोबरच त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही स्वतःपासुन सुरुवात केली आहे.आम्ही कळसुबाई परिसरातील महीलांनी बायफसंस्थेच्या सहकार्याने परसबागेची चळवळ सुरु केली आहे.त्या परसबागेची दखल बायफसंस्थेने घेऊन परसबागेच्या चळवळीतील महिलांचे काम राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे.
माझ्या सासुबाईं व ममताबाई भांगरे ह्यांचे बालपण माहेर,सासर ग्रामिण भागात बाडगीच्या माची परिसरातील निसर्ग संपन्न आणिआदिवासी बहुल भागात राहिल्याने येथील निसर्गातील वनसंपदेची अचूक माहिती सांगतात.
भविष्यात पुढील पिढीला ह्या रानमेव्याची विसरपडू नये यासाठी आम्ही सासू सुना जुजबी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
जय राघोजी
जुजबी शब्दांकन -सौ.जिजाबाई मधुकर भांगरे.
रानभाज्या संकलक-सौ. ममताबाई भांगरे 
देवगाव ता.अकोले जि अहमदनगर.सशांताराम बापू काळे

Tuesday, August 4, 2020

बापू एक संघर्षमय जीवन

संघर्षातून यशस्वीतेकडे वाटचाल करणारा अवलिया-  शांताराम काळे

काही व्यक्ती संघर्ष करण्यासाठीच जन्म घेतात की काय ? असा प्रश्न  कधी कधी निर्माण होतो असे असले तरी काही व्यक्ती जिद्द,चिकाटी,परिश्रम व सतत उपक्रमशील राहून यशस्वी होतांनाही दिसतात.असेच एक व्यक्तिमत्व तालुक्यातील आदिवासी भागात राजूर सारख्या गावात आपला संघर्षमय प्रवास सुरु करुन उंच शिखराकडे वाटचाल करीत आहे.त्या आवलीयाचे नाव आहे शांताराम उर्फ बापू काळे होय..
         प्राथमिक,माध्यमिकशिक्षण राजूर येथे सर्वोदय विद्या मंदिर येथे पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अकोले सारख्या ठिकाणी पदवीचे शिक्षण कष्ट करून पूर्ण केले.पाव बटर विकणे,वृत्तपत्र विकणे,आठवडे बाजारात किराणा मालाचा पाल लावून विक्री करणे ,फोटो स्टुडिओ,मंडप स्पीकरचा व्यवसाय,फळे विक्री असे  छोटे मोठे न लाजता व्यवसाय करून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.1987  या वर्षांपासून विमा विकास अधिकारी उत्तमराव जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली विमा प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले.
        1987 पासून पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करून गावकरी,सार्वमत,लोकसत्ता ,सकाळ,
महाराष्ट्र टाइम्स व पुन्हा सकाळ अशा नामांकित वृत्तपत्रातून पत्रकार म्हणून काम केले.व करीत आहे. विविध क्षेत्रातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली.उपेक्षित,
वंचितांचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम श्री.काळे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले. प्रामुख्याने  आदिवासी भागातील  अशिक्षितपणा , भौगोलिक परिस्थिती , आरोग्याचे प्रश्न दळणवळणाचे प्रश्न , उदरनिर्वाहाचे प्रश्न  अशा अनेक प्रश्नांना  लेखणीतील ताकदीने  सोडविले.आर्थिक परिस्थितीमुळे  शिक्षणापासून  वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना  यथोचित न्याय , सामाजिक प्रतिष्ठा,  शैक्षणिक सुविधा  मिळवून देण्याचा पुरेपूर यशस्वी प्रयत्न केला. लेखणीच्या माध्यमातून  अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या मांडून  त्यांना  त्यांच्या जीवनात  सक्षमपणे  उभे केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थाने पत्रकार समाजाचा आरसा असतो.पत्रकारितेतील आपले कर्तव्य पार पाडून सामाजिक भान जोपासणारे, नगर जिल्ह्यातील अकोले - राजूर येथील शांताराम काळे यांनी विविध सामाजीक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन आपली सामाजीक  जबाबदारी पार पाडत आहे.  एक पत्रकार, एक समाज सेवक म्हणून त्यांनी महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्काराने त्यांना माजीमंत्री चंद्रकांतदादा पाटील,माजीमंत्री एकनाथराव खडसे, एबीपी माझाचे संपादक राजीवजी खांडेकर यांनी सन्मानित केले आहे.तसेच तिळवण तेली समाजानेही त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले.
      आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वरील श्रद्धा व विश्वास  असल्याने त्यांच्याच नावाने  1992 साली 
श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेची स्थापना करून गेली 30 वर्षे संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत.शाळा सुरु करण्यासाठी स्वतःची जागा,इमारत नसल्याने सहकारी गोडाऊन,म्हशींच्या गोठ्यात  मुलींची शाळा सुरू केली. परंतु अनधिकृत शाळा सुरू केल्याप्रकरणी सदर मुलींची शाळा शासनाने बंद केली.या निर्णयाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मुलींसाठी शाळेची गरज मा.न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने मा.उच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली. मवेशी येथेही माध्यमिक विद्यालय सुरू केले,त्याच्या मान्यतेसाठीही मा.उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. आज राजूर येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  व मवेशी येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय सुरू झाले. व आज स्वतःच्या दिमाखदार इमारतीमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या संस्थेच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा व विज्ञान प्रदर्शनात नैपुण्य मिळविले.कालांतराने इंग्लिश मीडियम स्कुल बंद करण्याचा कटू निर्णयही घ्यावा लागला. असा शैक्षणिक विस्तार करून आपले शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. आदिवासी भागातील उपक्रमशील शाळा करण्यासाठी  रात्रंदिवस ध्यास घेऊन  विविध  अधिकारी, उद्योजक ,प्रतिभावान  महिला यांची व्याख्याने आयोजित करून  विद्यार्थ्यांमध्ये  सकारात्मक प्रेरणा  भरण्याचे काम  अविरत चालू आहे .दरवर्षी 1000 विद्यार्थी शिक्षण घेत असून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक पालक योजनेतून त्यांना शालेय साहित्य,गणवेश व जेवण देण्याचे काम करतात. विद्यार्थी मार्कवंत  होण्याबरोबरच गुणवंत होतीलच या पद्धतीने शाळेचा आराखडा तयार करण्यावर भर असतो.
सामाजिक कार्यात विशेष योगदान असणाऱ्या व मैलाचे दगड ठरलेल्या या व्यक्तिमत्वांचा संस्थेच्या मार्फत दरवर्षी समज "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरव केला जातो.यामुळे कार्य करणाऱ्यांना ऊर्जा मिळते. विद्यार्थी व समाजाला निश्चितच प्रेरणा मिळते . एका पिढीचा  सत्कार्याचा वसा  पुढच्या पिढीला  समजून तो संक्रमित केला जातो. स्वर्गीय अपर्णाताई रामतीर्थकर ,पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ अनिल सहस्रबुद्धे ,प्रा. प्रकाश टाकळकर ,गिरीशजी कुलकर्णी, निसर्ग संगोपीनी हेमलताताई पिचड अशा अनेक मान्यवरांना त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे गौरविण्यात आले आहे.
       कुरकूटवाडी ते त्र्यंम्बकेश्वर पायी दिंडी त्यांचेकडे एक तपापासून (१२वर्षे)येत असून त्यांना भोजन,निवास, व्यवस्था ते करतात असे असले तरी एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि  बापूंच्या मागे प्राचार्या सौ मंजुषा वहिनी अविरत व खंबीर पणे त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत ,अनेक संकटे आली  मात्र बापू डगमगले नाही त्याचे कारण त्यांच्या सौभाग्यवती होय .सामाजिक बांधलकीतून हे कुटुंब काम करते. दोन मुले इंजिनीअर पदवीधर असून त्यांना कन्या रत्न नसले तरी शाळेतील गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा गणवेश खर्च करतात,त्यांच्या या कार्यास सलाम.
       तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्या माध्यमातून ही गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळवून दिली. राजूर तेली समाजाचे ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. अकोले तालुका तेली समाज सल्लागार,अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व माजी सचिव, संगमनेर अकोले पत्रकार संघ सदस्य,नगर जिल्हा पत्रकार संघ सदस्य,राजूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अशा  विविध पदांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडीत आहे.  
    नगर जिल्ह्यातील समाजातील अग्रगण्य व्यक्तीमत्व असून समाजहित जपणारे   पत्रकार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील एक समाजसेवक, शिक्षण पंढरीचे वारकरी ,अन्यायाविरुद्ध  वाचा फोडणारा हक्काचा  माणूस, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, वाळवंटातही बाग फुलविण्याचे स्वप्न पाहणारे सकारात्मक व्यक्तिमत्व, विधायक कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व, विद्यार्थी हितासाठी नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणून बापूंनी आपली ओळख  निर्माण केली आहे. समाजहितासाठी "कुसुमादपी कोमलानी "तर अन्यायाविरुद्ध "वज्रादपी कठोराणि" या भूमिकेत बापूंनी स्वतःला ढाळून घेतले आहे.
     माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात.
काही चांगले, काही वाईट काही ,कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. 
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले तुम्ही एक..!
म्हणूनच  आपणास
 वाढदिवसानिमित्त  आपुलकीच्या हार्दिक शुभेच्छा !