Saturday, March 1, 2014

एकाच वेळेला शंभर हलग्या वाजवत त्याचे जंगी स्वागत होणार आहे. अख्खे गाव त्याच्या स्वागतासाठी आतुरलेले आहे

Shantaram Kale kaleshantaramlaxman@gmail.com

8:05 PM (2 minutes ago)

to shantaram, shantaram
आजपर्यंत तो दुसऱ्यांच्या स्वागतासाठी हलगी वाजवायचा. आता प्रथमच त्याच्या स्वागतासाठी हलगीचे सूर निनादणार आहेत. एकाच वेळेला शंभर हलग्या वाजवत त्याचे जंगी स्वागत होणार आहे. अख्खे गाव त्याच्या स्वागतासाठी आतुरलेले आहे. त्याला गावी जायचे वेध लागले आहेत. दि. २ मार्चला ही प्रतीक्षा संपणार आहे!
ही गोष्ट आहे, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या व सध्या चर्चेत असलेल्या 'फँड्री' चित्रपटातील नायक जब्याची भूमिका साकारणाऱ्या सोमनाथ अवघडे या तरुण कलाकाराची आणि त्याच्या केम गावाची. २ मार्चला केम (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे सोमनाथचा हृदयकौतुक सोहळा आयोजित केला आहे. 'फँड्री' या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारलेले प्रा. संजय चौधरी एका कार्यक्रमानिमित्ताने अकोले महाविद्यालयात आले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे हे चौधरी सरांचे विद्यार्थी. जेऊर (ता. करमाळा) येथील महाविद्यालयात चौधरी सरांच्या हाताखालीच मंजुळे यांनी तीन वर्षे कलेचे धडे गिरविले.
केम हे सोलापूर जिल्ह्य़ाच्या करमाळा तालुक्यातील एक लहानसे खेडेगाव. गावातील सोमनाथ अवघडे हा हलगी वाजवणारा तरुण मंजुळे यांच्या नजरेस पडला आणि फँड्रीच्या नायकाचा त्यांचा शोध तेथेच संपला. आधी आढेवेढे घेणाऱ्या सोमनाथला चित्रपटात काम करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. मात्र एकदा हो म्हटल्यानंतर त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले व दिग्दर्शकाचा विश्वास सार्थ ठरवला. चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले. त्यातील सोमनाथची भूमिकाही गाजली. चित्रपटाबरोबरच त्याचेही कोडकौतुक झाले. अनेक पारितोषिके मिळाली. उपेक्षित समाजातील परंपरेने हलगी वाजविणारा एक मुलगा साऱ्या जगभर जेथेजेथे मराठी माणूस आहे, तेथे पोहोचला. सोमनाथचा पडद्यावरचा वावर पाहून त्याचे गाव सुखावले. त्याचे होणारे कौतुक ऐकून आनंदले. गावाचा तो अभिमानिबदू ठरला. गावाचे नाव मोठे करणाऱ्या सोमनाथचा गावाने दोन मार्च रोजी सत्कार आयोजित केला आहे. त्याच दिवशी गावाची यात्राही आहे. सोमनाथ सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरतो आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो प्रथमच गावी येत आहे. आपल्या या लाडक्या लेकाचे कौतुक करण्यासाठी गाव अधीर झाले आहे. गावात सध्या त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प्रा. चौधरी यांनी दिली.
सोमनाथचे कुटुंब तसे सामान्य कष्टकरी कुटुंब. पिढीजात हलगीवादनाची त्यांची परंपरा. सोमनाथची आई शेतात मोलमजुरी करते. नववीत शिकणाऱ्या सोमनाथकडे गावाचे तसे कधी लक्ष गेले नव्हते. पण फँड्रीतील भूमिकेमुळे रातोरात सोमनाथ 'हिरो' झाला. त्याने गावाची मान उंचावल्याची गावकऱ्यांची भावना आहे. सोमनाथ उत्कृष्ट हलगीवादक आहे. अजय-अतुल या जोडगोळीने संगीतबद्ध केलेल्या थीम साँगमध्ये सोमनाथनेच हलगी वाजवली असल्याचे प्रा. चौधरी यांनी आवर्जून सांगितले.

No comments:

Post a Comment