Monday, March 10, 2014

घर्षातून साकारले जीवन - मोलकरीण ते प्राध्यापिका

‘मिळून सार्‍याजणी’च्या दौंडच्या प्रतिनिधी प्रा. अरुणा मोरे यांचं हे निःशब्द करणारं मनोगत. घरची गरिबी, बालपणापासून केलेले कष्ट, झेललेले अवमान आणि अखेरीस प्राध्यापक व्हायचं पूर्णत्वाला गेलेलं स्वप्न. (हा लेख तुम्ही वाचेपर्यंत त्यांना डॉक्टरेटही मिळालेली असेल!) आपल्या या मैत्रिणीचं मनापासून कौतुक.
अंतोनिओ ग्रामची या इटालियन इतिहासकाराने आमच्या इतिहासात एक नवी संकल्पना आणली. पूर्वी शूर, पराक्रमी वीर राजे-रजवाडे यांच्या कथा यांचाच इतिहास असे. परंतु वंचितांचा इतिहास ही नवी संज्ञा त्याने मांडली. हा दृष्टिकोन समोर ठेवून आयुष्याच्या पन्नास वर्षाचे सिंहावलोकन केले असता गतकाळापासून प्राध्यापकी पेशात येईपर्यंतचा स्वजीवनाचा इतिहास पाहिला असता दुर्लक्षित, उपेक्षित, गरिबीने सोसाव्या लागणार्‍या अपमान व अवहेलनेची माझी कथा म्हणजे संघर्षातून साकारलेल्या मोलकरीण पासून प्राध्यापिकेपर्यंतच्या जीवनाची वाटचाल आहे. या वाटेत अनेक खाचखळगे लागले. रक्तबंबाळ होईपर्यंतच्या ठेचा लागल्या, पण उठून सारे बळ पंखात एकवटून उडण्याचे मात्र थांबवले नाही. काही वेळा पंख छाटण्याचाही प्रयत्न झाला. पण स्वप्न! प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणे कधी थांबवले नाही. उलट ते साकारण्यासाठीच प्रयत्न केले.
माणसाला जे हवं असतं ते आयतं मिळालं तर त्याची किंमत नसते. परंतु संघर्ष, परिश्रम करून कष्टाने ते मिळवले तर त्याचे मोल अनमोल असते. शिक्षक किंवा प्राध्यापक होण्याची माझी आंतरिक उर्मी होती. त्यासाठी जीवनात अत्यंत कष्टमय, खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. खरं तर आजही माझ्या अवतीभवतीच्या समाजात माझ्यापेक्षा खडतर जीवनात जगत वाटचाल करणारी असंख्य माणसे आहेत याची मला कल्पना आहे. पण आज छोट्या गोष्टींवरून पटकन निराश होणार्‍या शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरावा म्हणून हा लेख प्रपंच. मी काही मोठी विचारवंत, साहित्यिक नाही. एक सामान्य कुटुंबातली सामान्य स्त्री आहे. परंतु सामान्यातील एका जिद्दीची ही कथा आहे.
मी माहेरची अरूणा घारे. माहेर पुण्यातले. सदाशिव पेठेतील देशपांडे वाड्यातले. माझ्या लहानपणी माझ्या कुटुंबात तीन भाऊ, दोन बहिणी, आई-वडील व मी अशी एकूण आठ माणसे होतो. घरी अठरा विश्वं दारिद्य्र! सणासुदीलासुद्धा कधी लवकर नवा कपडा मिळायचा नाही. कायम जुन्या बाजारातून आणलेले कपडेच वापरावे लागत. प्रत्येकाला नवीन कपडे घेण्यातइतकी आई-वडिलांची परिस्थिती नव्हतीच. वडील प्रेसमध्ये कामाला १९६० साली अवघा ६० रु. पगार होता. ओव्हरटाईम केला तर २० ते ३० रु. वाढत असत. वडिलांच्या जिवावर खाणारी तोंडे जास्त व कमाई कमी त्यामुळे कायमच आर्थिक अडचण असायची. तशातच मी पाचवी, सहावीत असतानाच माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने झाली. वडिलांनी प्रेसमधून कर्ज काढून लग्ने केली. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे माझी आई मुक्ताबाई जवळपासच्या अनेक बंगल्यात जाऊन धुण्याभांड्याची कामे करी. ती म्हणे, ‘आम्ही शिकलेले नसल्याने हे काम करतो. पण तुम्ही तरी शिका. मोठे व्हा.’ असा आई सतत उपदेश करायची. आई बरोबर मी, माझा धाकटा भाऊ व मधला भाऊही आईच्या धुण्याभांड्याच्या कामात मदत करत असायचो. बंगल्यातले जिने झाडणे, झाडांना पाणी घालणे, आईला भांडी विसळू लागणे, कपडे पिळणे ही कामे आईबरोबर आम्ही भावंडे करत असू.
मी मुलगी असल्याने मला स्वतंत्र कामे आईने लावून दिली होती. चौथीत असतानाच सकाळी ८ वाजता चहा पिऊन, असेल तर नाही तर तसेच एस. पी. कॉलेजजवळील पटवर्धन खजिना विहिरीजवळील भाटवडेकर यांची भांडी घासून सकाळी ९ ते १० पर्यंत भिकारदास मारुतीजवळील मेहेंदळे यांचे घरकाम करून तेथून भरभर चालत किंवा काही वेळा पळतच १०.३० पर्यंत घरी यायचे. कामावरून आई आली असली तर तिने आणलेले कामवाल्यांनी दिलेले खायचे. किंवा रात्रीचे शिळेपाके खाऊन, कधी नुसतीच आमटी पिऊन तर एकेक वेळा उपाशीही मी शाळेत जात असे. उपाशी राहायची वेळ आली तर अलकाताई किंवा नवी पेठेत राहणारी मोठी अक्कामावशी (ताराबाई ढमाले) हे माझं व आम्हा भावंडांचं एकच आश्रयस्थान असे. पण रोज रोज मात्र मावशीकडे जायला नको वाटे. कारण तिलाही काकांचा धाक होताच. काका म्हणायचे फाटलेल्या आभाळाला कितीही शिवलं आणि कितीही दिलं तरी कमीच असतं. तरीही मावशी चोरून मदत करायची. संक्रांत व नागपंचमीला मला नवीन स्कर्ट, ब्लाऊजचे, फ्रॉकचे कापड आणायला ती अजिबात विसरायची नाही. माझ्या लग्न झालेल्या बहिणींचे माहेरपणही तीच करत असे.
१ ली ते ७ वी नारायण पेठेतील अनाथ हिंदू महिलाश्रमम शाळेत मी जात होते. आमच्या देशपांडे वाड्यातील बरीच मुले तिथे जायची. आमच्यासारख्या गरिबांना परवडणारी अशी एवढी एकच खाजगी शाळा त्या काळात होती. तिथे नाममात्र फी होती. पण ती द्यायलाही आईवडिलांना जमत नसे. त्यामुळे फीच्या मोबदल्यात मधल्या सुट्टीत बाईंच्या चहाच्या कपबश्या, चहाची भांडी मी विसळून ठेवत असे. माझ्याबरोबरीच्या मुली खेळत असताना आपण मात्र काम करायचे याचे मनातून फार वाईट वाटून मी कष्टी व उदास होत असे. अशावेळी आईचे शब् आठवायचे- तुझ्या बहिणी शिकल्या नाहीत म्हणून आम्ही त्यांची लग्ने करून दिली. तू शीक! मोठी हो! मास्तरीण बन! या शब्दांनी पुन्हा मनाला उभारी यायची.
शाळेत जाताना अंगावर धुणी-भांडी करून ओला झालेला फ्रॉक अथवा स्कर्ट-ब्लाऊज असायचा. गणवेश नसल्याने मुख्याध्यापिका ओरडायच्या, पण त्या परिस्थिती जाणून होत्या व माझा शाळेत सतत पहिला नंबर असल्याने व शिक्षणाची माझी तळमळ पाहून त्या शांत व्हायच्या. याच शाळेतील शिंगणापूरकर, देशपांडे व दाते या तीन शिक्षकांना माझे खूप कौतुक असे. विशेषतः शिगणापूरकर या बाईंना माझ्याविषयी खूप प्रेम होते. वर्गासमोर माझ्या कष्ट करून शाळेत येण्याबद्दल त्या नेहमी कौतुकाने बोलत. एकदा शाळेतल्या वर्गामधील एका मुलीचा फाऊंटन पेन हरविला. आम्ही दोघी शेजारी बसत असल्याने व मी गरीब असल्याने मीच तो घेतला असावा असा तिने माझ्यावर आरोप ठेवला. आईने शाळेत येऊन माझी मुलगी असं करणार नाही याची ग्वाही दिली. पण त्या मुलीच्या पालकांचे समाधान होईना. शेवटी कामावरून पैसे आणून तो मी भरून दिला व नंतर दोन-तीन दिवसांनी तो पेन तिच्याच दप्तरात सापडला. पण या घटनेचे वळ मात्र कायमचे माझ्या मनावर उमटले. गरिबी ही सर्वांची मेव्हणी असते, हेच हा प्रसंग सांगून गेला.
आठवीनंतर मंडईतील आदर्श विद्यालयात मी शिक्षण घेतले. ८ वी ते ११वी या काळातही १२ वाजता शाळेत जाण्यापूर्वी तीन घरची धुणीभांडी करून जावे लागे. डबा तर कधी नसायचाच. मधल्या सुट्टीत मुली डबा खायला लागल्या की मी घरचा अभ्यास पूर्ण करत बसत असे. पोटात प्रचंड भूक असे. पण रोज डबा नेणे शक्य नसे. डबा कधी नेलाच तर शिळी चपाती व मसाला तेल कालवून किंवा नुसती साखर कधीतरी मिळायची. त्या डब्याची मैत्रिणींमध्ये वाटावाटी करायलाही लाज वाटे. त्यापेक्षा डबा न नेलेला बरे असं वाटायचं. संध्याकाळी ६ वाजता घरी आल्यावर प्रचंड भूक लागलेली असायची. पण कधी कधी दुपारचे काहीही शिल्लक नसे. अशा वेळी डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहत; नको ही गरिबी असं वाटायचं. देवाने आपल्याला श्रीमंत घरात जन्माला का घातले नाही? असाही विचार यायचा. ११ वी फर्स्टक्लास मिळाला तर पेढे घ्यायलाही पैसे नव्हते. पुढं कॉलेजला जावं असं मनातून वाटायला लागलं. पण वडील म्हणाले, ‘पुरे आता शिक्षण. कॉलेजला बिलेजला काही जायचं नाही. कॉलेजला गेल्यावर पोरी बिघडतात.’ आपलं शिक्षिकेचं स्वप्न अपुरंच राहणार असं वाटायला लागलं. दोन दिवस नीट जेवले नाही. रडून रडून डोळे लाल झालेले. आईने मग वडिलांची कशीबशी समजूत घातली. कॉलेजला मी फक्त अभ्यासच करीन, चांगली वागेन. कॉलेजचा खर्च शिकवण्या घेऊन पूर्ण करीन असं सगळं सांगितल्यावर वडील कसेबसे कॉलेजला पाठवायला तयार झाले. लहानपणी पटवर्धनांची भांडी घासायला जाताना रोजी एस. पी. कॉलेजवरून जावे लागायचे. त्यावेळी असं वाटायचं मोठेपणी आपल्याला या कॉलेजात यायला मिळेल का? आणि एस. पी. कॉलेजला ऍडमिशन घेतल्यावर ही इच्छा पूर्ण झाली. कॉलेजहून ११ वाजता आल्यावर नवी पेठेतील बंगल्यातील दोन कामे करावी लागत. कॉलेजच्या मुली बघतील का? आपल्याला हसतील, आपली चेष्टा करतील याची भीती वाटायची. त्यामुळे कुणाला काहीही मी संागत नसे. कॉलेजमध्ये गेल्यावरही आई जुनी पातळे कामावरून आणत असे. त्यांच्यावर काळा किंवा पांढरा ब्लाऊज घालून किंवा जमले तर ब्लाऊज मी शिवून घेई व कॉलेजला जाई. वडिलांना सलवार कुर्ता आवडत नसे. त्यामुळे साडीच नेसावी लागे. इतिहास स्पेशल हा विषय घेऊन मी एस. पी. महाविद्यालयातून १९७९ ला बी. ए. झाले. कॉलेजातील माझ्या इतिहासाच्या प्राध्यापिका कविता नरवणे यांना माझ्या घरची सर्व परिस्थिती माहीत होती. त्यांनी मला नेहमी चांगला अभ्यास करण्यास योग्य ते प्रोत्साहन दिले. याच कॉलेजमध्ये नीलिमा कुलकर्णी, संजीवनी देशपांडे व वुसुधा घारे यांच्यासारख्या जिवाला जीव देणार्‍या जिवाभावाच्या मैत्रिणी मला भेटल्या. नीलिमा व संजू तर अनेकदा आर्थिक मदतही करत. कॉलेजच्या काळात एस. वाय.ला असताना मी १९७८ला राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संपात मोबदला कर्मचारी म्हणून एक महिनाभर काम केले व प्रथमच ६०० रु. एवढी भरघोस रक्कम माझ्या हातात आली. त्या कमाईचा मला केवढा आनंद झाला म्हणून सांगू? खूप दिवसांची घड्याळ घेण्याची इच्छा मी त्यामुळे पूर्ण करू शकले. भीतभीतच २०० रु.चे घड्याळ घेऊन उरलेले पैसे मी घरात देऊन टाकले.
बी. ए. झाल्यावर पुन्हा घरात वडिलांनी लग्नाच्या गोष्टी सुरू केल्या. मी म्हटले लग्न ठरेपर्यंत शिकते. यावेळी मोठा भाऊ रमेश व मैत्रिणी संजीवनी व वसुधा यांच्यामुळेच मी पुणे विद्यापीठात इतिहास विभागात ऍडमिशन घेतली. इथेच माझ्या जीवनात खरी दिशा मिळाली व त्याचे श्रेय माझे मार्गदर्शक इतिहासातील प्रपाठक कै. डॉ. अ. म. देशपांडे यांनाच द्यायला पाहिजे. सरांचे लेक्चर म्हणजे खर्‍या अर्थाने जीवनशिक्षण होते. सरांमुळेच जयकर लायब्ररीत कमवा व शिका योजनेत मी काम करू लागले. घरी आल्यावर ट्यूशन, फॉर्मच्या घड्या घालणे, गठ्ठे बांधणे, ते डोक्यावरून प्रेसला पोचविणे ही कामेही करावी लागत. शिकायचं असेल तर हे करावेच लागेल. आल्या खाण्यापुरते तरी कमवा असा सतत आईचा सल्ला असे. वडील तर नापास झाले की शिकायचे नाही हे ब्रीदवाक्य सतत ठसवीत. त्यामुळे शिक्षिका व्हायचं असेल तर नापास होऊन चालणार नाही. पडेल ते कष्ट व कोणत्याही परिस्थितीत उपाशी पोटी का होईना, पण उच्च शिक्षण घ्यायचे ही मनीषा मी बाळगून होते.
एम. ए. करत असताना कधी कधी बसच्या पासलाही पैसे नसायचे कारण या वेळेपर्यंत मोठा भाऊ लग्न करून स्वतंत्र राहू लागला होता. तो आमची जबाबदारी स्वीकारत नव्हता. मधल्या भावाचेही लग्न झालेले. मधल्या भावाची नोकरी फिरतीची व तुटपुंज्या पगाराची. त्यातच वडील सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना मिळालेला पैसा त्यांच्या दुखण्यावर (औषधोपचारावर) खर्च झाला होता. आईच्या हातात काहीच शिल्लक नव्हते. आर्थिक चणचण तर वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत पाचवीलाच पुजलेली होती. मधल्या भावाच्या पगारावर त्याची बायको, आई-वडील, मी आणि धाकटा भाऊ कसेबसे भागवत होतो. धाकट्याचेही शिक्षण चालू होते. मधल्या भावावर आपले ओझे पडू नये म्हणून मी व आई जास्तीत जास्त काम करत होतो. त्याच्या कष्टाळू पत्नीचीही त्याला साथ होती.
याच वेळी एम. ए. ला असताना वडिलांनी नको म्हटले तरी लग्न ठरवले. पण पुढे नीट चौकशी केल्यावर मुलगा कमी शिकलेला व नोकरीला नसल्याचे कळल्याने हे लग्न मोडले. परंतु ठरलेले लग्न मोडले म्हटल्यावर नातेवाईक व आजूबाजूंचे लोक चर्चा करू लागले. काहीही दोष नसताना लोकांची ही मानसिकता पाहून खूप निराशा यायला लागली. जीव द्यावासा वाटायचा. पण आत्महत्या हा भेकडवणाचा मार्ग आहे. जीवनाशी संघर्ष केलाच पाहिजे हेही दिवस जातील अशी माझी समजूत माझी एस. पी. कॉलेजपासून बरोबर असलेली मैत्रीण नीलिमा कुलकर्णी काढायची. या काळात देशपांडेसर व नीलिमाने खूप मोठा मानसिक आधार दिला.
एम. ए. झाल्यावर सरांनी मला लेक्चररशिपसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. तू वर्गात सहज शिकवू शकशील असा आत्मविश्वास सरांनीच निर्माण केला. आणि मग सुरुवात झाली नोकरीसाठी वणवण भटकण्याची. यापूर्वीही टायपिस्ट, क्लार्कच्या नोकरीसाठी मी शेकडो अर्ज केलेले होते पण वशिला नसल्याने आणि मलाही अशा कारकुनाच्या नोकरीत फारसा रस नसल्याने तसेच शिक्षक वा प्राध्यापक व्हायचे या आकांक्षेने भारल्याने मला कधीही पूर्ण वेळ नोकरी मिळाली नाही. शिक्षण हे माझे पहिले उद्दिष्ट होते. ते करून मला नोकरी हवी होती व तशी मला कधीच मिळाली नाही.
लेक्चररशिपसाठी प्रथम नाशिक, मग जळगाव नंतर बारामती या तीन शहरात मी नामांकित संस्थांच्या कॉलेजमध्ये मुलाखती दिल्या, पण केवळ गुणवत्ता असून चालत नाही. संस्थेला आर्थिक मदत, वशिला याही गोष्टी नोकरीत महत्त्वाच्या असतात हे हळूहळू लक्षात यायला लागले. कधी कधी रंग-रूप नसल्यानेही इंटरव्ह्यू चांगला होऊनही इतरांचेच सिलेक्शन व्हायचे. हे सर्व पाहून आपण धुणी-भांडी करत इथवर आलो. पण आपल्याला लेक्चररशिप कधीच मिळणार नाही का? आपण एवढे शिक्षण तरी का घेतले? त्याचा उपयोग काय? या विचारांनी मन अस्वस्थ व बेचैन व्हायचे. तर इकडे नातेवाईक, पोरीचे वय वाढत चाललंय. आपल्या मराठा समाजात एवढी मोठी मुलगी बिनलग्नाची ठेवतात का? आई-वडिलांना झोपा तरी कशा लागतात? तीन मुलं असून आता मुलीच्या कमाईवर खाणार का? वगैरे टोचून बोलत असत. आणि तो शुभदिन उजाडला. Walk to Interview या नावाची नायगाव एज्युकेशन सोसायटीची १९८२ला सकाळमध्ये जाहिरात आली होती. दौंडला नव्यानेच स्थापन होणार्‍या कॉलेजसाठी प्राचार्य, तासिका तत्त्वावर, पार्टटाईम, फुलटाईम असे प्राध्यापक नेमायचे होते. इतिहासाची जागा तासिका तत्त्वावर होती. तिसर्‍यांदा माझा इंटरव्ह्यू घेणार्‍या डॉ. के. एम. चिटणीसांनी यापूर्वी गुणवत्तेवर माझे दोनदा सिलेक्शन केले होते. आताही मला इंटरव्ह्यूला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इथे मात्र सरांच्या सिलेक्शनला संस्थेनेही शिक्कामोर्तब केले व लेक्चररशिपची नोकरी मला मिळाली. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत भाग्याचा क्षण होता. महिन्याला पगार होता अवघा १४० रु. त्यातले ३६ रु. रेल्वेच्या पासालाच जात. आठवड्यातून चार दिवस दौंडला शिकवायला जावे लागे. या काळात मी एम. फिल पूर्ण केले. दरम्यान घरच्या परिस्थितीने व भावांवर, आईवर (दौंडला नोकरी लागल्यावर वडिलांच्या मृत्यूचेही दुःख पचवावे लागले) आर्थिक बोजा पडू नये म्हणून हुंडा न घेणार्‍या मुलाशीच मी लग्न केले. संस्थाध्यक्ष माधवराव पवार यांना मी आत्तापर्यंत केलेला संघर्ष माहीत झाला. कोणताही वशिला नसताना, पैसे न भरता नोकरी मिळाली व प्राध्यापिका होण्याचे माझे स्वप्न साकार झाले.
लग्न झाल्यावर मी पतीला घेऊन दौंडलाच स्थायिक झाले. त्यांना खाजगी नोकरी सोडायला लावून त्यांच्या आवडीच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांना करियर करावे म्हणून त्यांना आर्थिक व मानसिक पाठबळ दिले. आज दौंडमध्ये गेली सोळा वर्षे एका प्रतिथयश संपादक म्हणून ‘साप्ताहिक दौंड तालुका बातमीदार’ हे साप्ताहिक ते चालवत आहेत.
आज कर्तृत्वाच्या, प्रामाणिकपणाच्या, धडाडीने काम करण्याच्या वृत्तीने पुक्टो संघटनेची कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आहे. दौंड शिक्षण सेवक पतसंस्थेचे अध्यक्षपद दहा वर्षे माझ्याकडे होते. पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळावर दोनदा निवडून गेले. अभ्यासू वृत्तीमुळे प्रथम ते तृतीय कला वर्गासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार सहा क्रमिक पुस्तकांचे सहलेखकांबरोबर मी लेखन केले आहे. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या कार्यकारी मंडळावर दोनदा निवड झाली.
हा ‘अहं’ किंवा ‘स्व’चा गौरव नाही.
तर प्राध्यापक शिक्षक होण्याच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत, पतीची प्रेरणा, आईवडिलांचा आशीर्वाद, प्राचार्य तु. ह. दाते यांचे प्रोत्साहन, माझे कॉलेजचे सहकारी प्राचार्य ढेकणे, प्रा. शरद पवार, प्रा. एस. के. पोळ, प्रा. संजय व सुषमा इंगळे या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मी इथवर पोचले. मणिभाई देसाई, सामाजिक शैक्षणिक पुरस्कार, प्रियदर्शिनी इंदिरा पुरस्कार, लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार व रोटरी क्लब इंटरनॅशनलचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार अशा सर्व पुरस्कारांनी सन्मानित होऊनही सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून रोटरी क्लब, अस्मिता मंच या संघटनांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात मी सहभागी होते.
विद्या बाळ आणि गीताली वि. मं. यांच्यामुळे मी ‘मिळून सार्‍याजणी’ची दौंड तालुक्याची प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. त्यांच्या प्रेरणेनेच विद्यार्थिनींसाठी, दौंडमधील महिलांसाठी नवविचार तसेच स्त्रीवादाची जाणीव निर्माण करण्यासाठी महिलांच्या आत्मभान जागृतीचे कार्य मी करत आहे. कॉलेजमध्ये व अस्मिता मंचमध्ये स्त्रीवादी विचारवंत तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर विदुषींना आणण्याचे काम मिळून सार्‍याजणींच्या माध्यमातून मला शक्य झाले. माझ्या या वाटचालीत पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका विद्युत भागवत, शर्मिला रेगे, अनघा तांबे यांचेही मला सतत मार्गदर्शन झाले. त्यांनी सतत मला प्रेरणा व प्रोत्साहन दिले.
पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील डॉ. राजा दीक्षित, डॉ. रेखा रानडे, डॉ. सुमित्रा कुलकर्णी यांनीही या वाटचालीत प्राध्यापकी पेशात माझ्याकडून वेळोवेळी ज्या काही चुका झाल्या त्या मला दाखवून देऊन माझी कानउघाडणी करण्याचेही काम त्यांनी केले. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकले.
तसेच पुक्टो संघटनेचे कै. डॉ. अरूण दीक्षित यांनी मला सतत प्रोत्साहन दिले. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनीही सतत कौतुकाची थाप माझ्या पाठीवर दिली. डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. रोमनाथ रोडे या इतिहासकारांनी वेळोवेळी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केल्यामुळेच माझे पीएचडी. प्रबंधाचे काम पूर्ण होऊ शकले. डॉ. धनसिंग जगताप व डॉ. मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाशिवाय संशोधनाचे काम अपूर्णच राहिले असते. त्यांच्यामुळेच माझे संशोधन पूर्णत्वास गेले.
मोलकरीण ते प्राध्यापिका या संघर्षमय जीवनाला कष्टाची जोड आहे. कॉलेजच्या जीवनापर्यंत अनवाणी पायाने केलेल्या प्रवासाची साथ आहे. गरिबीमुळे केला जाणारा अपमान, उपहासाची झालर आहे. पण स्वाभिमान, अस्मिता, संकटाला धैर्याने सामोरे जाणे या बळावरच आणि गुरूमाई व मुक्तानंद बाबांच्या आशीर्वादाने व कृपेनेच मोलकरणीची प्राध्यापिका झाली हे निश्चितच!
‘का वेदनेतून जन्म होतो साधनेचा?’ या मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील प्रश्नांचे उत्तरच जणू मला या प्रवासाने मिळाले.
-----
प्रा. अरूणा मोरे
इतिहास विभाग प्रमुख,
दौंड कॉलेज, दौंड, जि. पुणे

No comments:

Post a Comment