Sunday, November 29, 2020

कर्तव्यभावनेचा प्रवास*

*ब्लॉग*
*कर्तव्यभावनेचा प्रवास*

*चांगले शिक्षक हेच शिक्षण संस्थाचे भूषण असते. कारण ते जे काही पेरणार असतात आणि त्यातून समाजासाठी जे काही उगवणार असते त्यावर शिक्षण संस्थाचा ब्रॅंड ठरलेला असतो. मात्र दुर्दैवाने वर्तमानात शिक्षणांच्या होणा-या जाहिराती पाहिल्या, की शिक्षणातून काय हरवत चालले आहे हे सहजपण लक्षात येते. शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...*

*कर्तव्यभावनेचा प्रवास*

Anant Patil
Published on : 
30 Nov, 2020 , 11:15 am

परवा सहजपणे वर्तमानपत्रातून आलेली एका शाळेची जाहिरात हाती पडली..शाळेचे मैदान,उंच इमारती,शाळा व वर्गात सी.सी.टी.व्हीची उपलब्धता, जी.पी.एस.ट्रॅकिंगसह बससेवा,संगणक प्रयोगशाळेची उपलब्धता असं काही जाहिरातीत लिहिलेले होते. यात शाळा म्हणून समाजाने निर्माण केलेल्या या संस्थेकडून जे काही अपेक्षित केले आहे त्या अपेक्षांबददल तर काहिही नोंदविलेले नव्हते.

शिक्षणातून माणूस घडवायचा असतो. उत्तम नागरिक निर्माण करायचे असतात. समाजासाठी उत्तम साहित्यिक, कलावंत, अधिकारी ,कामगार, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, क्रीडापटू , शिक्षक, डॉक्टर, व्यावसाय़िक हवे असतात त्याची निर्मिती हेही शिक्षणाचे उद्दीष्ट असते. त्यासाठी शिक्षणात काय असायला हवे.. त्या दृष्टीने शाळेने केलेले प्रयत्न महत्वपूर्ण असतात मात्र मुळ ध्येयालाच फाटा देत केवळ देखाव्याचा उल्लेख. विद्यार्थी घडविण्यासाठी होणारे प्रयत्न, त्यासाठीची प्रक्रिया नमूद नाही.

शाळांची उंची आता केवळ उंच उंच इमारती आणि भौतिक सुविधांनी मोजली जाणार असेल ,तर समाजाची उंची हरवत चालली आहे का ? असा प्रश्न पडतो. इमर्सन नावांचा विचारवंत लिहितो जेव्हा छोटया माणंसाच्या सावल्या मोठया पडू लागतात तेव्हा समाजाचा -हास जवळ आला आहे असे समजावे. त्या प्रमाणे जेव्हा मोठया व समाज घडविणा-या संस्थांना आपल्या ध्येय आणि उद्दीष्टाशिवाय प्रवाहपतित होऊन जाहिराती करू लागतात आणि दर्शनीय असलेल्या संस्था जेव्हा प्रदर्शिय ठरू लागतात तेव्हा समाजावे समाजाचा प्रवास उलटया दिशेने सुरू झाला आहे.

खरेतर उत्तमतेची कधीच जाहिरात करावी लागत नाही. अनुभव हीच सिध्दी असते. शिक्षण ही सामाजिक संस्था आहे. तीच्याव्दारे माणूस निर्माण होत असतो. प्रत्येक बालक हा भिन्न आहे. त्याचा आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक स्तर भिन्न आहे. त्यामुळे त्याच्या जडणघडणीकरीता पुन्हा वेगळे प्रयत्न असतात. बालकांला जाणून, समजून शिक्षण सुरू असते. त्यासाठी निश्चित अशी एकेरी आणि तीच तीच प्रकिया असत नाही. शिक्षणात गुणवत्तेचे मनुष्यबळ महत्वाचे असते. ते मनुष्यबळ किती परिणामकारक व प्रभावी काम करते त्यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे मुलांवर प्रभाव पडत असतो.अशी अभ्यासू माणंस आणि मूळ ध्येयाने काम करणारी माणंस कधीच जाहिरातीवर भर देत नाही.

जाहिरात खर्‍या गुणवत्तेसाठी करावी लागतच नाही. गुणवत्ता ही दर्शनिय असते ती कधीच प्रदर्शनिय असत नाही. शिक्षण,शिक्षक आणि शाळा समाजासाठी नेहमीच दर्शनीय राहिल्या आहेत. शेकडो वर्षानंतर समाजाच्या मुखात नालंदा, तक्षशीला, जग्गादाला, सोमपूर, ओदान्तपूर ही विद्यापीठे येतात. कारण तेथील शिक्षण प्रक्रिया व तेथील गुणवत्तेची माणंस हिच तेथील ओळख बनली आहे.आज अशी माणस हरवत चालली आहे.

माणस हरवली की ध्येयाचा प्रवास थांबतो. मग गुणवत्तेची पाऊलवाट हरवली जाते आणि मग ध्येयहिन पाऊलवाटेचा प्रवास अधोरेखित करण्यासाठी यंत्राची मदत घ्यावी लागते. माणंसाची उंची गमावणे झाली , की इमारतीच्या उंची महत्वाची वाटू लागते. जेव्हा आपण ज्या मार्गाने जाण्यासाठीचा रस्ता निवडला आहे तो मनापासून निवडला असेल तर त्यावर अंतकरणापासून प्रेम असते.त्यामुळे तो मार्ग कठिण असला तरी आणि समाजामान्य नसला तरी चालणे घडते आणि समाधान व य़शाचे शिखर सहज पादाक्रांत करता येते. ते चालत राहाणे घडत राहाते.

आपण जेव्हा त्यावरती प्रेम करीत राहातो तेव्हा तो मार्ग प्रसिध्दीचा आहे की नाही ? यशाचा आहे की नाही ? याचा विचार केला जात नाही.आपणाला जेव्हा प्रसिध्दीस यावे असे वाटते, प्रसिध्दीसाठी काही करावे वाटते, यशासाठी काही पण करण्याची वृती निर्माण होते तेव्हा हिणपणाचे व मूर्खपणाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.कृष्णमूर्ती यांनी हे केलेले विधान माणंसाला आपली मूल्य दर्शविण्यासाठी मदत करणारे ठरते. काही करून आपण प्रसिध्दीच्या झोतात राहाण्याचा प्रयत्न म्हणजे मूर्खपणाच आहे.

आपण केलेले काम हे देखील प्रदर्शन करण्याची वृत्तीला काय म्हणावे.. ? अनेकदा झोतात राहाणे..आणि समाजात चमकत राहाण्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे केवळ आणि केवळ मूर्खपणाचे लक्षण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आणि संस्था आपण जे काही काम करतो आहोत, ज्या दिशेने प्रवास सुरू ठेवण्याच्या प्रयत्न अपेक्षित असतो त्या दिशेने प्रवास करणे शक्य नाही किवा त्या कामाबददल तळमळ नसते. तेव्हा प्रसिध्दीच्या खोटया मार्गाने स्वतःचे नसलेले वैभव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असतो.

शिक्षणाने केवळ यशावर प्रेम करायला शिकवायचे नसते..पण सध्या तर आपण य़शाचा ध्यास घेऊन चालत आहोत.पण आपण जे काही करीत आहोत त्यावरती प्रेम करायला वर्तमानातील शिक्षण शिकवत नाही.आपण जे काही करतो त्यापेक्षा आपल्याला अंतिम प्रयत्नानंतर मिळणा-या य़शावरती अधिक प्रेम असते. त्यामुळे करावयाच्या कष्टावरती प्रेम करणे राहून जाते आणि मग तो मार्ग न चालताही खोटया प्रसिध्दीच्या दिशेने प्रवास करावा लागतो.जे माझे नाही ते हरवले की आपल्याला अशा खोटया प्रतिष्ठेसाठी लढावे लागते.आपल्याला आपल्या कर्तव्यापेक्षा त्या कर्तव्याच्या फळाचेच आकर्षण अधिक वाटू लागते.

शिक्षण म्हणजे कर्तव्यभावनेचा प्रवास आहे.राष्ट्र व समाज निर्मितीचे काम आहे.येथे झोकून काम अपेक्षित आहे.स्वतःला गाढून घेणे असते.येथे तर चांगल्या कामाची जाहिरात नसते , तर विद्यार्थ्यांच्या हदयावर कोरणे असते.उत्तम व अभ्यासपूर्ण अध्यापनाने शिक्षकाला वर्तमानातील देखाव्यात स्थान मिळणार नाही , पण ते शिक्षक विद्यार्थ्यांच्या हदयावरती जीवनभर कोरले गेलेले असतात. एक शिक्षक अंत्यत प्रभावी काम करीत होते.

शिक्षण हाच त्यांचा ध्यास होता.त्यांचा सारा प्रवास म्हणजे एका दिशेचा शोध होता..माणूस निर्मितीचा ध्यास होता..अंखड प्रवास संशोधन, उत्तम अभ्यासात त्यांनी गुंतून घेतले होते. पण त्यांना कधीच प्रसिध्दी मिळाली नाही.त्याची त्यांना खंतही नव्हती.ते कधी पुरस्काराच्या आणि प्रसारमाध्यमांच्या पानावर चमकले नाहीत. केवल कर्तव्याची भावना आणि जबाबदारीची जाणीव त्यांना होती. मात्र जेव्हा अंगी काही नसलेले आणि देखावे करणारी माणंस मात्र चमकत होती..त्यांची त्यांना अधूनमधून खंत वाटायची.

एक दिवस त्यांनी ठरविले चांगले काम करून आपल्याला समाजात स्थान नसेल तर वाईट काम करूया आणि माध्यमांच्या पानांवर स्थान मिळूया. ..म्हणून ते बायकोची अनुमती घेऊन घराच्या बाहेर पडले. जिल्हयाच्या ठिकाणी जातात . तेथे पोलिस स्टेशन गाठतात..कोणतीही भिडभाड न ठेवता सरळ स्थानकात गेले आणि समोर बसलेल्या साहेबांच्या श्रीमुखात भडकावली..साहेब तात्काळ उभे राहिले. गुरूजींना वाकून नमस्कार करीत त्यांनी शिपायला कॉपी आणण्यास सांगितले. तेव्हा साहेब म्हणाले “ गुरूजी तुम्ही पेरलेले संस्कार हा जीवनाचा ठेवा आहे.तुम्ही जे पेरले ते उगवले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. पण गुरूजी तुमचे संस्कार कधीच विसरणार नाहीत ”.

गुरूजीनी कॉपी घेतली आणि निराश मनाने बाहेर पडले. पुढे आता काय करायचे असा विचार सुरू होता...अखेर काही करून प्रसिध्दी हवी होती. त्यामुळे प्रसिध्दीसाठी त्यांनी रस्त्यांने जाणा-या एका मुलीचा हात पकडला...आणि त्या पुढे जाणा-या मुलीने मागे वळून पाहिले..तर आपले गुरूजी..भर रस्त्यात तीने वाकून नमस्कार केला..आणि ती म्हणाली “ गुरूजी आजच जिल्हयाची जिल्हाधिकारी म्हणून रूजू होण्यासाठी आले आहे. तत्पूर्वी शहर फिरून पाहावे म्हणून पायी फिरत होते..आले तेव्हाच तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. मी तुम्हाला भेटण्यासाठी गावी येणार होते. पण देवाने माझी विनंती ऐकली आणि तुम्हालाच माझे पर्यत पाठविले. आता माझ्या सोबत घरी चला..”

गुरूजी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानावरती आले..जिल्हाधिकारी बाईंनी गुरूजींना स्वतःच्या हातांने तयार केलेले जेवन जेऊ घातले आणि लाल दिव्याच्या गाडीत घरी पोहचविले.घरी आलेल्यानंतर बायकोने विचारले मग काय मिळाली का प्रसिध्दी.. ? तर गुरूजी निराश मनाने म्हणाले, “ नाही..मी वाईट करूनही त्यातून चांगलेच उगवले ” तेव्हा बायको म्हणाली “ चांगले गुरूजी हे प्रसिध्दीसाठी माध्यमांच्या पानापानावर नसतात , तर ते विद्यार्थ्यांच्या हदयावर असतात.चांगले शिक्षक जोवर विद्यार्थी जीवंत असतात तोवर ते जीवंत असतात ”.

चांगल्या शिक्षकांसाठी शाळा, महाविद्यालय ओळखली जात होती. चांगले शिक्षक हेच शिक्षण संस्थाचे भूषण असते. कारण ते जे काही पेरणार असतात आणि त्यातून समाजासाठी जे काही उगवणार असते त्यावर शिक्षण संस्थाचा ब्रॅंड ठरलेला असतो. मात्र दुर्दैवाने वर्तमानात शिक्षणांच्या होणा-या जाहिराती पाहिल्या, की शिक्षणातून काय हरवत चालले आहे हे सहजपण लक्षात येते.

शाळा,महाविद्यालयात चांगल्या शिक्षकांच्या जागा या भौतिक सुविधा कधीच घेऊ शकणार नाहीत..पण माणंस जेव्हा हददपार होत जातील तेव्हा आपण बरेच काही गमवलेले असेल..शाळा म्हणजे जीवंत माणंस आणि त्यांची नैतिकतेची पाऊलवाट चालणे असते.केवळ सिमेंटची जंगले आणि डांबरी रस्त्यांनी सजलेले आणि विचाराचा गंध नसलेली हिरवळ म्हणजे शिक्षण नाही हे लक्षात घ्यायला हवे.

प्रामाणिकपणे पेरणी करणारे शिक्षक..मूल्यांची धारणा जपणारी माणंस आणि समाज व राष्ट्रासाठी आपला प्रवास सुरू ठेवणारी माणंस..आत्मसन्मान जोपासणारी आणि ध्येयासाठी चालत राहाणारी माणंस म्हणजे शाळा असते..अन्यथा शाळेची “ शाळा ” करणारी माणंस वाढू लागली , की शाळांना जाहिरातीची गरज भासू लागते आणि तीही मुक्या भिंतीची आणि शिक्षणाशिवाय उरलेल्या सुविधांची...समाजाने ठरवायला हवे आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे..

*-संदीप वाकचौरे*

(लेखक शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक आहे.)

आजच्या महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीमध्ये Sujata Patil यांचा "शाळा उघडली तरीही... " हा लेख प्रसिद्ध झाला आहे. वेळ काढून नक्की वाचा.

आजच्या महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीमध्ये Sujata Patil यांचा "शाळा उघडली तरीही... " 
हा लेख प्रसिद्ध झाला आहे. वेळ काढून नक्की वाचा.

शाळा उघडली तरीही...  

करोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरित्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला . या एवढ्याश्या विषाणूनी आधुनिक विज्ञानालाही संभ्रमात पाडलं. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. या संकटाने शिक्षण क्षेत्राला तर समूळ  हादरा बसला. 
मार्च महिन्यापासून शाळा बंद झाल्या आणि वर्गातल्या प्रत्यक्ष शिक्षणाला पर्याय म्हणून ऑनलाइन/ डिजिटल शिक्षणाचा पर्याय पुढे आला. काही शिक्षक थोड्याफार प्रमाणात शालेय अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल कन्टेन्ट चा वापर यापूर्वी करत होते. पण सगळीच प्रक्रिया ऑनलाईन झाल्यावर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं याचं प्रशिक्षण शिक्षकांना नाही आणि ऑनलाईन शिक्षण कसं घ्यायचं याचं तंत्र विद्यार्थ्यांना माहिती नाही , अशा परिस्थितीत हे शिक्षण सुरू झालं .ऑनलाइन शिक्षणाचे काही थोडे फायदे आणि असंख्य तोटे यावर अनेक चर्चा झाल्या आहेतच हे ऑनलाईन शिक्षण फार कमी विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता आलं ही वस्तुस्थिती आहे. या काळात वृत्तवाहिन्या ,वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या ऐकायला वाचायला मिळाल्या होत्या........
तेरा वर्षांचा मुलगा भाजी विकून मोबाईल घेण्यासाठी पैसे साठवतो आहे.
शाळेचा अभ्यास करण्यासाठी मोबाईल नाही म्हणून शाळकरी मुलीची आत्महत्या.
आईने मंगळसूत्र विकून मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन घेतला.
अभ्यासाला मोबाईल दिला नाही म्हणून दोन भावंडांमध्ये मारामारी..
...... या आहेत गेल्या चार- सहा महिन्यातल्या काही मन विषण्ण करणाऱ्या बातम्या.
  बारा-तेरा वर्षाच्या मुलाला ,मुलीला जर स्वतःच्या शिक्षणासाठी मोबाईल घेण्यासाठी अशी कामं करावी लागत असतील तर ती कौतुकाची गोष्ट नक्कीच नाही. तो आपल्या व्यवस्थेचा पराभव आहे ,ती बालमजुरी आहे. ज्या व्यवस्थेने सगळ्या मुलांकडे स्मार्टफोन असतीलच असं गृहीत धरलं त्या व्यवस्थेची ती चूक आहे .त्या एका मोबाईल फोन नसल्याची व्यथा काही कोवळ्या जीवांचा बळी घेऊन गेली हे तर अजुन वेदनादायी. 
  मुलांच्या शरीर आणि मनावर मोबाईल व संगणकाच्या अतिवापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात ,मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवायला हवा, अशा चर्चा सात- आठ महिने आधीपर्यंत चालू होत्या. आणि मग अचानक शाळाच ऑनलाईन भरायला लागली. शिशुवर्गातल्या मुलांची सुद्धा तीन-चार तास ऑनलाईन शाळा सुरू झाली .मोठ्या वर्गातल्या मुलांची पाच-सहा तास ऑनलाईन शाळा. मुलांचा वयोगट, त्यांचा एकाग्रतेचा कालावधी (अटेंशन स्पॅन), त्यांची मानसिकता या सगळ्याचा फार कमी विचार या प्रक्रियेत केला गेला आहे. शिक्षकांपुढे सुद्धा असंख्य अडचणी आहेत. वर्गात समोरासमोर शिकवण्याची, संवाद साधण्याची सवय असलेले शिक्षक या नव्या माध्यमाला सरावलेले नाहीत. त्यामुळे त्यांचीही तारांबळ उडाली.मग मुलांच्या सोबत या ऑनलाईन वर्गाना उपस्थिती लावणाऱ्या अतिउत्साही पालकांनी शिक्षकांवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक शिक्षकांचंही मनोधैर्य खच्ची झालं.
मुळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ही संवादी प्रक्रिया आहे .शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया, विद्यार्थ्यांचा आपापसातील संवाद यातून शिक्षण घडते. वर्गात समोर असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात ,चेहऱ्यावर दिसणाऱ्या प्रतिक्रियांवरून त्यांना शिकवत असलेल्या विषयाचं किती आकलन होत आहे ; ते शिक्षकाला समजत असतं .त्यावरुन कोणता मुद्दा पुन्हा समजावून सांगण्याची गरज आहे, कुठे मुलांना पूर्ण समजले आहे, कुठे थांबण्याची गरज आहे हे शिक्षकांना कळत असते ."प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्ती आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते" ,हे शिक्षणशास्त्रातील महत्त्वाचं तत्त्व आहे.  ऑनलाइन शिक्षणात तेच तत्त्व बाजूला पडतं. सगळ्यांना एकाच तराजूत मोजताना एकाच गतीने शिकवणं चालू राहतं .शिक्षण किती चालू आहे,  खरं तर चालू आहे का याचा पत्ताच लागत नाही.
या ऑनलाईन पद्धतीने शिकवलेले समजत नाही, शंका ,समस्या विचारायला अवकाशच नसतो ही तक्रार अनेक मुले करतात .जी मुले त्या ऑनलाइन शिकवण्याच्या वेगाने जाऊ शकत नाहीत त्यांच्या मनात शिकण्याबद्दल नावड किंवा न्यूनगंड तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुलांच्या सतत ऑनलाईन असण्यातील धोक्यांबद्दल जगभरातले मानसशास्त्रज्ञ ,शिक्षणअभ्यासक बालरोगतज्ज्ञ अत्यंत गंभीरपणे विचार करीत आहेत, त्यातले धोके मांडत आहेत. इंटरनेटवरचा मुलांचा वावर आणि त्यातले धोके हा अनेक समाज अभ्यासकांच्या चिंतेचा विषय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणारी मुलांची फसवणूक, त्यांना दमदाटी करून करवून घेतली जाणारी गैरकृत्ये,लैंगिक अत्याचार या सगळ्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्याचे भयंकर परिणाम मुलांना पालकांना आणि समाजाला भोगावे लागतील. अश्या अनुभवांना सामोरं जावं लागलं तर त्याचे मुलांवर होणारे भावनिक , मानसिक परिणाम त्यांचं आयुष्य उध्वस्त करणारे असू शकतात.
मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीन कडे सतत बघून डोळे दुखणे ,लहान वयातच चष्मा लागणे, चंचलता,मानसिक, शारीरिक अस्थैर्य, सतत एकाच जागी बसून राहणं, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे स्थूलता ,ग्रहणशक्ती कमी होणे असे कितीतरी दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. मुलांचं आपापसात खेळणे ,भांडणे ,एकत्र डबा खाणे,  एकत्र नव्या गोष्टी शिकणे, शाळेतले विविध उपक्रम, शिक्षकांशी गप्पा या त्यांच्या भावविश्वातील  खास गोष्टी आहेत आणि त्या त्यांना मिळायलाच हव्यात.
अर्थात हे सगळं ज्यांना ऑनलाईन शिक्षण आणि त्यासाठीच्या सुविधा परवडतात त्यांच्यासाठी आहे. करोनाच्या या भयंकर काळात लाखो कुटुंबं देशोधडीला लागली आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या, कामधंदे बंद झाले आहेत. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ,अशावेळी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठीच्या सुविधा आई-वडील कुठून आणणार ? 
ज्या मुलांना या सगळ्या अद्ययावत सुविधा मिळत आहेत,  ती मुले शिकत  राहणार, पुढे जाणार . ही वंचित गोरगरीब मुलं मात्र मागे पडत राहणार. म्हणजे या ऑनलाईन शिक्षणामुळे आधीच अस्तित्वात असलेली सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक दरी अजून रूंदावत जाणार .आहे रे आणि नाही रे मधला भेद आणखी तीव्र होत जाणार. एक अजून नवीन ' वर्गव्यवस्था' निर्माण होणार ! "सर्वांसाठी समान शिक्षण" या शिक्षण हक्क कायद्यातील महत्त्वाच्या तत्वाची ही पायमल्ली आहे. 
आणि अगदी नेमकं हेच वास्तव आता ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्यावर समोर येते आहे .बराच विचारविनिमय होऊन, या निर्णयावर उलटसुलट चर्चा होऊन अखेर 23 नोव्हेंबरला शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या.  सगळ्या शाळा सुरू झालेल्या नाहीतच .काही शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत.
खरंतर करोनाचे संकट अजूनही पूर्णपणे नष्ट झालेले नाही. आपण सगळेच लस येण्याच्या प्रतिक्षेत आहोत .अशा वेळी शाळा सुरू करण्याची घाई करू नये ,असे अनेक पालक शिक्षक यांना वाटते आहे .त्यात गैर काहीच नाही . कारण दुर्दैवाने काही दुर्घटना झालीच तर त्याचे परिणाम शेवटी शाळा व्यवस्थापन , मुख्याध्यापक , शिक्षक यांना भोगावे लागतील. 
तरीही आम्ही 23 तारखेपासून शाळा सुरू केली. नववी, दहावीचे वर्ग सुरू झाले. धोका आहेच याची कल्पना आहे, पण सध्या तरी परिस्थिती नॉर्मल आहे, त्याचा फायदा करून घ्यावा असं आम्हा सर्व शिक्षकांचं मत आहे. धोका शाळा सुरू न करण्यात पण आहे. नववी, दहावी मधली काही मुलं या काळात दुकानांमध्ये कामाला लागली. मुलांना आणि पालकांना या पैश्यांची चटक लागली तर मुलं परत शाळेकडे वळणं अवघड होईल. आमच्या शाळेतल्या दोन मुलींचं शिक्षण पालक थांबवतील की काय अशी भीती आहे. एका मुलीला वृद्ध आजोबांची देखभाल करायला गावी पाठवून दिलंय. दुसरी एक दहावी मधली अतिशय हुशार, चुणचुणीत मुलगी . तिला शाळेत पाठवायला तिची आई टाळाटाळ करतेय हे लक्षात येत होतं. तिची आई वह्या,पुस्तकांना पैसे नाहीत ही सबब सांगतेय , पण  तिला शाळेकडून वह्या पुस्तकं देऊ हे सांगूनही सुरुवातीला त्या मुलीला शाळेत पाठवलं नाही. आणि ही परिस्थिती देशात सार्वत्रिक असणार आहे. सध्या तरी हा धोका निवडायचा की तो धोका निवडायचा हाच गहन पेच आहे !
शाळा सुरू झाल्यावर जेव्हा या मुलांशी प्रत्यक्ष संवाद व्हायला लागला तेव्हा या काळात मुलांनी काय काय सोसले ते कळते आहे.  ज्या मुलीला आई शाळेत पाठवत नव्हती ,ती  मुलगी शिक्षकांच्या प्रयत्नांनी शाळेत यायला लागली. ती सांगत होती,  "मॅडम , माझी आई शाळेत पाठवतच नव्हती. या सगळ्या मुली पहिल्या दिवशी शाळेत आल्या ना तेव्हा मी खूप रडले. वाटलं माझं शिक्षण संपलं आता .आई म्हणत होती आता काय चार महिने राहिलेत ,आता कशाला जायचं शाळेत?  कालपासून शाळेत यायला लागले ना, तर फार आनंद वाटतोय. 
किती काय काय साठलेलं आहे मुलांच्या मनात , त्यांना अजुन ते पूर्ण व्यक्त सुद्धा करता येत नाहीये! 
"घरी खूप प्रॉब्लेम झाले मॅडम, पप्पांचं काम बंद झालं .खायचे-प्यायचे वांधे झाले होते."
"बाबांना कर्ज काढावं लागलं,  अजूनही काम सुरू झालं नाहीये त्यामुळे कर्ज फेडता येत नाही".
"घरात पैसे नव्हतं .आई वडील खूप चिडचिड करायचे .सारखे' पैसे नाहीत, पैसे नाहीत' हाच विषय असायचा.
"सगळ्या वस्तू खूप महाग मिळायच्या काही परवडायचं नाही".
"रेशन दुकानातून, काही संस्थांकडून धान्य वगैरे मिळालं, पण आपण आणतो ते वेगळेच वाटतं ना, मॅडम?"
"मला तर सारखी भीती वाटायची आता शाळा कधी सुरू होतील की नाही?"
"आधी शाळेत अभ्यासाकडे लक्ष नाही द्यायचो मी ,पण आता कळलं की अभ्यास करायला पाहिजे"
"शाळेची खुप आठवण यायची, मॅडम" 
"आमच्याकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे काहीच अभ्यास कळायचा नाही ,मग वाटायचं आम्ही गरीब आहोत म्हणून आता आम्हाला शिक्षणच मिळणार नाही का? " 
हे सगळं ऐकताना कित्येकदा आवंढा गिळावा लागला. तोंडावर मास्क असल्याचा अजून एक फायदा कळला !  या आमच्या मुलांना शाळा सुरू झाली याचा मनापासून आनंद झाला आहे आणि असा आनंद अनेक मुलांना झाला असणार याची खात्री आहे. 
अर्थात शाळा सुरू करताना मनात प्रचंड धास्ती आहे. मुलांची सुरक्षितता, शिक्षकांचे स्वतःचे तब्येतीचे प्रश्न आहेतच.करोनाच्या येऊ घातलेल्या  दुसऱ्या लाटेचा धोका आहेच, त्यात शासनाने स्थानिक व्यवस्थापन ,मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी ढकलून दिली आहे.
यानिमित्ताने आपल्या शिक्षण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी लक्षात आल्या आहेत आणि सगळी शिक्षण व्यवस्था नव्याने उभी करून त्यात लवचिकता आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवली आहे.
सध्यातरी लवकरात लवकर करोना प्रतिबंधक लस यावी आणि प्रत्येक विद्यार्थी ,शिक्षकांपर्यंत ती पोहोचून पुन्हा शाळा निर्धोकपणे सुरू व्हाव्यात  ही सदिच्छा व्यक्त करण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही. 
........सुजाता पाटील.

Monday, November 9, 2020

आदिवासी बहुल क्षेत्रात विकासाची सक्षम पाउले ! : हेमलताताई पिचड यांची वेगळी ओळख .

💥 आदिवासी बहुल क्षेत्रात विकासाची सक्षम पाउले !  : हेमलताताई पिचड यांची वेगळी ओळख .
    ------------------------------------ 🌾🌾

    🗒 अकोले, ता.९: 

   गावखेड्यातील परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या पूज्य महात्मा गांधींनी भारतातील ग्रामीण भागाच्या उत्थानावर अधिक भर दिला होता हे आपण जाणतोच . तथापि आदिवासी बहुल दुर्गम ग्रामीण भाग सातत्याने दुर्लक्षित राहिला . अनेक सुधारकांसह स्री शक्तीने खेड्यातील सुधारणांच्या वाटेवर मोलाची कामगिरी स्वातंत्र्योत्तर काळात केल्याचे दिसेल . अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका देखील अग्रणी राहिला आहे . 

     आदिवासी , उपेक्षित , महिला यांना आधार देतानाच शिक्षण ,आरोग्य,पर्यावरण,वृक्ष लागवड,वृक्ष संवर्धन , ग्रामविकास, बचत गट, गाव दत्तक योजना, आदर्श गाव , आदर्श सरपंच असे विविध उपक्रम प्रत्यक्षात आणून माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या सुविद्य पत्नी सौ . हेमलता ताई  पिचड सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत . या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना कृषी मित्र पुरस्कार व इतर सामाजिक संस्थांनी आजतागायत  २४ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .  तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील संस्थेने मदर तेरेसा अवार्ड पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .

    सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी महिलांकरिता  मार्गदर्शनाची गरज ओळखून महिलांचे समुपदेशन महत्वाचे मानून आदिवासी समाजात व विशेषतः महिलांध्ये रुढ असलेली केवळ ' चूल व मूल ' ही मर्यादित जाणीव न ठेवता याबाबतीत परिवर्तन घडविण्यासाठी सौ .हेमलता पिचड यांनी भरीव काम केले . समाज व्यसनाने ग्रासला असून त्याला व्यसन मुक्त करण्यासाठी दारूबंदीची चळवळ त्यांनी उभारली . पंधरा हजार लोकवस्तीचे राजूर गाव दारू मुक्त करतानाच इतर १४० गावांत दारू बंदीचा ठराव करून इतिहास घडविला आहे , तर पर्यावरण टिकून  राहण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन गावागावात पोहचवून ' झाडे लावा झाडे जगवा ' हा कृतीशील मंत्र तालुक्यात पोहचवून कोल्हार घोटी रस्त्यावर सुमारे चाळीस हजार वृक्ष लागवड करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष साखळी तयार केली .

     तालुक्यात कुपोषण होऊ नये म्हणून  महिला ,बालक ,वृध्द यांच्यासाठी आरोग्य शिबिरे  भरवून आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे .  गेली नऊ वर्षे राजूर गावच्या आदर्श सरपंच म्हणून कार्य करताना रस्ते,पाणी योजना,शेतीला पाणी,वीज यांचे योग्य नियोजन करून कार्य केल्याने दिल्ली येथे राज्यपाल यांचे हस्ते त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार प्राप्त झाला .तर प.पू.गगनगिरी महाराज यांना गुरूस्थानी मानून त्यांच्या नावे सामाजिक संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत गगनगिरी हॉस्पिटल सुरु केले .   राजूर परिसरातील  मंदिरांना आर्थिक मदत देऊन अध्यात्मिक कार्य केले राजूर येथे ह .भ .प . ढोक महाराज यांचे मार्फत रामायण कथेचे आयोजन केले या कार्यक्रमासाठी लाखो भाविक उपस्थित होते .रंधा फॉल येथील घोरपडा देवी मंदिराचा जीर्णोद्धार,श्री स्वामी समर्थ मंदिर,श्री अगस्ती मंदिर,सोमनाथ देवस्थान,रतनवाडी अमृतेश्वर मंदिर,वाल्मिकी आश्रम,यांचे नियोजन करून राजूर येथील देवस्थानचे जीर्णोद्धार,स्वामी गगनगिरी महाराज या मंदिरांसह  गेली ३०वर्षांपासून श्री दत्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ते करतात .

      एकलव्य एज्युकेशन संस्थे मार्फत आदिवासी मुलामुलींना संगणक शिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत . मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र मुलींची शाळा ,आश्रमशाळा निर्मिती केली . २०११ ला राजूर गावच्या बिनविरोध सरपंच झाल्या  त्या वेळी राजूर गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होता .महिलांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असे . पाण्याची टंचाई असल्यामुळे राजूर गावात मुली देण्यास कुणी धजावत नव्हते , मात्र माजी मंत्री मधुकर पिचड यांनी पाणी योजनेसाठी भरीव निधी देऊन या योजनेचा जीर्णोद्धार झाला आहे .  नवीन मोटारी पाईप लाईन याचे नियोजन झाले आणि गावाला रोज पाणी मिळू लागले . एक कोटी वीज बिलाची रक्कम उभारून ती भरून दरवेळेस वीज बिलामुळे पाणी योजना बंद पाडण्याचे संकट दूर केले . राजूर गावचे रस्ते,गटारी,ग्राम सचिवालय,वीज इत्यादी प्रश्न त्यांच्या कार्यकाळात सुटले ,राजूर गावच्या विकासाबरोबर गोंदूशी गाव दत्तक घेऊन या गावात पिण्याच्या पाणी बरोबरच शेतीला पाणी ,मिळण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च करून बंधारा बांधून पाणी अडविले . त्यातून गावाला नळाद्वारे पाणी मिळालेच परंतु ज्या शेतात भात सोडून आदिवासी शेतकरी पीक घेत नव्हते त्या शेतात आज भाजीपाला , ऊस बांधावर फळबाग उभी राहिली आहे .आरोग्य वीज आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.,गाव हागणदारी मुक्त झाल्याने निर्मल ग्राम पुरस्कार गावाला मिळाला आहे .त्यामुळे सामाजिक कामाची दखल घेऊन मुंबई,दिल्ली,नाशिक,नगर,पुणे ,राजूर येथील सामाजिक संस्थांनी त्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले .

     आदिवासी भागातील दूध धंदा वाढवून आदिवासी महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून बचत गटांची स्थापना केली तारामती महिला दूध संस्था स्थापन करून महिलांना दुभती जनावरे उपलब्ध करून देऊन हे दूध अमृत सागर दूध संस्थे मार्फत मुंबईला पाठवून त्यातून महिलांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले .स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठान ,राजूर ग्राम पंचायत, भारतीय महिला मानवाधिकार महिला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद तसेच गगनगिरी महाराज यांच्या त्या निस्सीम भाविक असून तालुक्यात त्यांनी शिक्षण ,आरोग्य,ग्रामविकास,अध्यत्मिक केंद्र,व्यासांमुकती चलवळ उभारून महिलांना आधार देण्याचे काम केले त्यांच्या या कामाला लोक मान्यता मिळाली दारूबंदीसाठी मंत्रालय, उच्च न्यायालय ,जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलिस यांचेकडे पाठपुरावा करून राजूर येथे सात दुकाने बंद करून कायमस्वरूपी दारूबंदी केली ,चाळीस हजार वृक्ष लागवड व.सवार्धन केले महिलांच्या आरोग्यासाठी व कुपोषण दूर होण्यासाठी आरोग्य केंद्र स्थापन केले तर सरपंच पदाच्या माध्यमातून गाव विकासात सहभाग घेऊन आदर्श गाव संकल्प योजना यशस्वी केल्याने त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवर घेऊन '  हुज हू ' इन अमेरिका या बुक्स मध्ये दखल घेण्यात आली . दिल्ली येथे माजी राज्यपाल शिवराज पाटील यांच्या हस्ते आदर्श सरपंच म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला .कृषी मित्र म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार दिला , व्य सन मुक्तीचा पुरस्कार एक ना २४पुरस्कार त्यांना मिळाले व नुकताच मदर तेरेसा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे .

    माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासाची कामे करताना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सूत्राचा अवलंब करून  ७५ वर्षे असलेल्या वयात त्या तरुणांना लाजवेल अशा प्रकारे   सकारात्मक कामाचा प्रवास करीत आहेत .
     विकासाच्या वैविध्यपूर्ण वाटा सौ . हेमलता ताई पिचड यांनी राजूरसह अकोले तालुक्यातील दुर्गम वाड्यापाड्यां पर्यंत पोचविल्या आहेत . विशेषतः व्यसनमुक्ती आणि संस्कार केंद्रांच्या रुपात ही जागृतीची सक्षम पावले तोलामोलाच्या रुपात पडलीत . 
    ------------------------------------------ 

   🍂🍂🍂