आजच्या महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीमध्ये Sujata Patil यांचा "शाळा उघडली तरीही... "
हा लेख प्रसिद्ध झाला आहे. वेळ काढून नक्की वाचा.
शाळा उघडली तरीही...
करोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरित्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला . या एवढ्याश्या विषाणूनी आधुनिक विज्ञानालाही संभ्रमात पाडलं. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. या संकटाने शिक्षण क्षेत्राला तर समूळ हादरा बसला.
मार्च महिन्यापासून शाळा बंद झाल्या आणि वर्गातल्या प्रत्यक्ष शिक्षणाला पर्याय म्हणून ऑनलाइन/ डिजिटल शिक्षणाचा पर्याय पुढे आला. काही शिक्षक थोड्याफार प्रमाणात शालेय अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल कन्टेन्ट चा वापर यापूर्वी करत होते. पण सगळीच प्रक्रिया ऑनलाईन झाल्यावर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं याचं प्रशिक्षण शिक्षकांना नाही आणि ऑनलाईन शिक्षण कसं घ्यायचं याचं तंत्र विद्यार्थ्यांना माहिती नाही , अशा परिस्थितीत हे शिक्षण सुरू झालं .ऑनलाइन शिक्षणाचे काही थोडे फायदे आणि असंख्य तोटे यावर अनेक चर्चा झाल्या आहेतच हे ऑनलाईन शिक्षण फार कमी विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता आलं ही वस्तुस्थिती आहे. या काळात वृत्तवाहिन्या ,वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या ऐकायला वाचायला मिळाल्या होत्या........
तेरा वर्षांचा मुलगा भाजी विकून मोबाईल घेण्यासाठी पैसे साठवतो आहे.
शाळेचा अभ्यास करण्यासाठी मोबाईल नाही म्हणून शाळकरी मुलीची आत्महत्या.
आईने मंगळसूत्र विकून मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन घेतला.
अभ्यासाला मोबाईल दिला नाही म्हणून दोन भावंडांमध्ये मारामारी..
...... या आहेत गेल्या चार- सहा महिन्यातल्या काही मन विषण्ण करणाऱ्या बातम्या.
बारा-तेरा वर्षाच्या मुलाला ,मुलीला जर स्वतःच्या शिक्षणासाठी मोबाईल घेण्यासाठी अशी कामं करावी लागत असतील तर ती कौतुकाची गोष्ट नक्कीच नाही. तो आपल्या व्यवस्थेचा पराभव आहे ,ती बालमजुरी आहे. ज्या व्यवस्थेने सगळ्या मुलांकडे स्मार्टफोन असतीलच असं गृहीत धरलं त्या व्यवस्थेची ती चूक आहे .त्या एका मोबाईल फोन नसल्याची व्यथा काही कोवळ्या जीवांचा बळी घेऊन गेली हे तर अजुन वेदनादायी.
मुलांच्या शरीर आणि मनावर मोबाईल व संगणकाच्या अतिवापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात ,मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवायला हवा, अशा चर्चा सात- आठ महिने आधीपर्यंत चालू होत्या. आणि मग अचानक शाळाच ऑनलाईन भरायला लागली. शिशुवर्गातल्या मुलांची सुद्धा तीन-चार तास ऑनलाईन शाळा सुरू झाली .मोठ्या वर्गातल्या मुलांची पाच-सहा तास ऑनलाईन शाळा. मुलांचा वयोगट, त्यांचा एकाग्रतेचा कालावधी (अटेंशन स्पॅन), त्यांची मानसिकता या सगळ्याचा फार कमी विचार या प्रक्रियेत केला गेला आहे. शिक्षकांपुढे सुद्धा असंख्य अडचणी आहेत. वर्गात समोरासमोर शिकवण्याची, संवाद साधण्याची सवय असलेले शिक्षक या नव्या माध्यमाला सरावलेले नाहीत. त्यामुळे त्यांचीही तारांबळ उडाली.मग मुलांच्या सोबत या ऑनलाईन वर्गाना उपस्थिती लावणाऱ्या अतिउत्साही पालकांनी शिक्षकांवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक शिक्षकांचंही मनोधैर्य खच्ची झालं.
मुळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ही संवादी प्रक्रिया आहे .शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया, विद्यार्थ्यांचा आपापसातील संवाद यातून शिक्षण घडते. वर्गात समोर असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात ,चेहऱ्यावर दिसणाऱ्या प्रतिक्रियांवरून त्यांना शिकवत असलेल्या विषयाचं किती आकलन होत आहे ; ते शिक्षकाला समजत असतं .त्यावरुन कोणता मुद्दा पुन्हा समजावून सांगण्याची गरज आहे, कुठे मुलांना पूर्ण समजले आहे, कुठे थांबण्याची गरज आहे हे शिक्षकांना कळत असते ."प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्ती आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते" ,हे शिक्षणशास्त्रातील महत्त्वाचं तत्त्व आहे. ऑनलाइन शिक्षणात तेच तत्त्व बाजूला पडतं. सगळ्यांना एकाच तराजूत मोजताना एकाच गतीने शिकवणं चालू राहतं .शिक्षण किती चालू आहे, खरं तर चालू आहे का याचा पत्ताच लागत नाही.
या ऑनलाईन पद्धतीने शिकवलेले समजत नाही, शंका ,समस्या विचारायला अवकाशच नसतो ही तक्रार अनेक मुले करतात .जी मुले त्या ऑनलाइन शिकवण्याच्या वेगाने जाऊ शकत नाहीत त्यांच्या मनात शिकण्याबद्दल नावड किंवा न्यूनगंड तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुलांच्या सतत ऑनलाईन असण्यातील धोक्यांबद्दल जगभरातले मानसशास्त्रज्ञ ,शिक्षणअभ्यासक बालरोगतज्ज्ञ अत्यंत गंभीरपणे विचार करीत आहेत, त्यातले धोके मांडत आहेत. इंटरनेटवरचा मुलांचा वावर आणि त्यातले धोके हा अनेक समाज अभ्यासकांच्या चिंतेचा विषय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणारी मुलांची फसवणूक, त्यांना दमदाटी करून करवून घेतली जाणारी गैरकृत्ये,लैंगिक अत्याचार या सगळ्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्याचे भयंकर परिणाम मुलांना पालकांना आणि समाजाला भोगावे लागतील. अश्या अनुभवांना सामोरं जावं लागलं तर त्याचे मुलांवर होणारे भावनिक , मानसिक परिणाम त्यांचं आयुष्य उध्वस्त करणारे असू शकतात.
मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीन कडे सतत बघून डोळे दुखणे ,लहान वयातच चष्मा लागणे, चंचलता,मानसिक, शारीरिक अस्थैर्य, सतत एकाच जागी बसून राहणं, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे स्थूलता ,ग्रहणशक्ती कमी होणे असे कितीतरी दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. मुलांचं आपापसात खेळणे ,भांडणे ,एकत्र डबा खाणे, एकत्र नव्या गोष्टी शिकणे, शाळेतले विविध उपक्रम, शिक्षकांशी गप्पा या त्यांच्या भावविश्वातील खास गोष्टी आहेत आणि त्या त्यांना मिळायलाच हव्यात.
अर्थात हे सगळं ज्यांना ऑनलाईन शिक्षण आणि त्यासाठीच्या सुविधा परवडतात त्यांच्यासाठी आहे. करोनाच्या या भयंकर काळात लाखो कुटुंबं देशोधडीला लागली आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या, कामधंदे बंद झाले आहेत. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ,अशावेळी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठीच्या सुविधा आई-वडील कुठून आणणार ?
ज्या मुलांना या सगळ्या अद्ययावत सुविधा मिळत आहेत, ती मुले शिकत राहणार, पुढे जाणार . ही वंचित गोरगरीब मुलं मात्र मागे पडत राहणार. म्हणजे या ऑनलाईन शिक्षणामुळे आधीच अस्तित्वात असलेली सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक दरी अजून रूंदावत जाणार .आहे रे आणि नाही रे मधला भेद आणखी तीव्र होत जाणार. एक अजून नवीन ' वर्गव्यवस्था' निर्माण होणार ! "सर्वांसाठी समान शिक्षण" या शिक्षण हक्क कायद्यातील महत्त्वाच्या तत्वाची ही पायमल्ली आहे.
आणि अगदी नेमकं हेच वास्तव आता ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्यावर समोर येते आहे .बराच विचारविनिमय होऊन, या निर्णयावर उलटसुलट चर्चा होऊन अखेर 23 नोव्हेंबरला शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या. सगळ्या शाळा सुरू झालेल्या नाहीतच .काही शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत.
खरंतर करोनाचे संकट अजूनही पूर्णपणे नष्ट झालेले नाही. आपण सगळेच लस येण्याच्या प्रतिक्षेत आहोत .अशा वेळी शाळा सुरू करण्याची घाई करू नये ,असे अनेक पालक शिक्षक यांना वाटते आहे .त्यात गैर काहीच नाही . कारण दुर्दैवाने काही दुर्घटना झालीच तर त्याचे परिणाम शेवटी शाळा व्यवस्थापन , मुख्याध्यापक , शिक्षक यांना भोगावे लागतील.
तरीही आम्ही 23 तारखेपासून शाळा सुरू केली. नववी, दहावीचे वर्ग सुरू झाले. धोका आहेच याची कल्पना आहे, पण सध्या तरी परिस्थिती नॉर्मल आहे, त्याचा फायदा करून घ्यावा असं आम्हा सर्व शिक्षकांचं मत आहे. धोका शाळा सुरू न करण्यात पण आहे. नववी, दहावी मधली काही मुलं या काळात दुकानांमध्ये कामाला लागली. मुलांना आणि पालकांना या पैश्यांची चटक लागली तर मुलं परत शाळेकडे वळणं अवघड होईल. आमच्या शाळेतल्या दोन मुलींचं शिक्षण पालक थांबवतील की काय अशी भीती आहे. एका मुलीला वृद्ध आजोबांची देखभाल करायला गावी पाठवून दिलंय. दुसरी एक दहावी मधली अतिशय हुशार, चुणचुणीत मुलगी . तिला शाळेत पाठवायला तिची आई टाळाटाळ करतेय हे लक्षात येत होतं. तिची आई वह्या,पुस्तकांना पैसे नाहीत ही सबब सांगतेय , पण तिला शाळेकडून वह्या पुस्तकं देऊ हे सांगूनही सुरुवातीला त्या मुलीला शाळेत पाठवलं नाही. आणि ही परिस्थिती देशात सार्वत्रिक असणार आहे. सध्या तरी हा धोका निवडायचा की तो धोका निवडायचा हाच गहन पेच आहे !
शाळा सुरू झाल्यावर जेव्हा या मुलांशी प्रत्यक्ष संवाद व्हायला लागला तेव्हा या काळात मुलांनी काय काय सोसले ते कळते आहे. ज्या मुलीला आई शाळेत पाठवत नव्हती ,ती मुलगी शिक्षकांच्या प्रयत्नांनी शाळेत यायला लागली. ती सांगत होती, "मॅडम , माझी आई शाळेत पाठवतच नव्हती. या सगळ्या मुली पहिल्या दिवशी शाळेत आल्या ना तेव्हा मी खूप रडले. वाटलं माझं शिक्षण संपलं आता .आई म्हणत होती आता काय चार महिने राहिलेत ,आता कशाला जायचं शाळेत? कालपासून शाळेत यायला लागले ना, तर फार आनंद वाटतोय.
किती काय काय साठलेलं आहे मुलांच्या मनात , त्यांना अजुन ते पूर्ण व्यक्त सुद्धा करता येत नाहीये!
"घरी खूप प्रॉब्लेम झाले मॅडम, पप्पांचं काम बंद झालं .खायचे-प्यायचे वांधे झाले होते."
"बाबांना कर्ज काढावं लागलं, अजूनही काम सुरू झालं नाहीये त्यामुळे कर्ज फेडता येत नाही".
"घरात पैसे नव्हतं .आई वडील खूप चिडचिड करायचे .सारखे' पैसे नाहीत, पैसे नाहीत' हाच विषय असायचा.
"सगळ्या वस्तू खूप महाग मिळायच्या काही परवडायचं नाही".
"रेशन दुकानातून, काही संस्थांकडून धान्य वगैरे मिळालं, पण आपण आणतो ते वेगळेच वाटतं ना, मॅडम?"
"मला तर सारखी भीती वाटायची आता शाळा कधी सुरू होतील की नाही?"
"आधी शाळेत अभ्यासाकडे लक्ष नाही द्यायचो मी ,पण आता कळलं की अभ्यास करायला पाहिजे"
"शाळेची खुप आठवण यायची, मॅडम"
"आमच्याकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे काहीच अभ्यास कळायचा नाही ,मग वाटायचं आम्ही गरीब आहोत म्हणून आता आम्हाला शिक्षणच मिळणार नाही का? "
हे सगळं ऐकताना कित्येकदा आवंढा गिळावा लागला. तोंडावर मास्क असल्याचा अजून एक फायदा कळला ! या आमच्या मुलांना शाळा सुरू झाली याचा मनापासून आनंद झाला आहे आणि असा आनंद अनेक मुलांना झाला असणार याची खात्री आहे.
अर्थात शाळा सुरू करताना मनात प्रचंड धास्ती आहे. मुलांची सुरक्षितता, शिक्षकांचे स्वतःचे तब्येतीचे प्रश्न आहेतच.करोनाच्या येऊ घातलेल्या दुसऱ्या लाटेचा धोका आहेच, त्यात शासनाने स्थानिक व्यवस्थापन ,मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी ढकलून दिली आहे.
यानिमित्ताने आपल्या शिक्षण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी लक्षात आल्या आहेत आणि सगळी शिक्षण व्यवस्था नव्याने उभी करून त्यात लवचिकता आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवली आहे.
सध्यातरी लवकरात लवकर करोना प्रतिबंधक लस यावी आणि प्रत्येक विद्यार्थी ,शिक्षकांपर्यंत ती पोहोचून पुन्हा शाळा निर्धोकपणे सुरू व्हाव्यात ही सदिच्छा व्यक्त करण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही.
........सुजाता पाटील.
No comments:
Post a Comment