Tuesday, May 12, 2020

लग्नाचा वाढदिवस एक निमित्त

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ३० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून वश्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे  मनात  उर्मी असणारे शांताराम बापू काळे व त्यांच्या सुविध्य पत्नी प्राचार्या सौ . मंजुषा काळे यांचा आज लग्नाचा २८ वा वाढदिवस आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक , अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला  प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत  श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ५० कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप  व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .  कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे . तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वाहिनी सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत  बापूना  गेली २८ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास  नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने लग्न वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...  त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ...
🙏🙏🙏 सोमनाथ बनसोडे सर

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवरा बायकोचे नाते काही जगावेगळेच असते, त्या नात्यात दोन अनोळखी जीवांचे मिलन असते, दोघे भिन्न अश्या वातावरणातून आलेले असतांना, एकमेकांना समजून घेण्याची, आयुष्यभर एकत्र राहण्याची परमेश्वराने बांधलेली ती गाठ असते. आपले हक्काचे घर सोडून मुलगी जेंव्हा पत्नी बनून सासरच्या घरी येते त्यावेळी ती आपले सर्व आयुष्य पतीच्या चांगल्या आयुष्यासाठी समर्पित करते. तिला माहेरचे सर्व सुख पतीच्या घरी मिळावे अशी तिची अपेक्षा असते,
तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे,
हे आता मला खरं वाटायला लागलं आहे..
मी न बोलताच तुला सगळं समजतं,
तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते,
याचे मला नेहमीच कौतुक वाटते..
तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे,
तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे..
तू इतकी कसं काय सांभाळते?
तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते,
चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते..
तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे !!

पतीला वाढदिवसाच्या मराठीतून शुभेच्छा

पत्नी घराचा पाया तर पती घरचे छत असते. घरासाठी प्रत्येक जबाबदारी पती चोखपणे निभावत असतो. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्या सुखदुःखाची जाणीव ठेवणारा, घरच्या कलहात आपली बाजू सांभाळून घेणारा असा जोडीदार मिळाला तर त्यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही.
तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !


Download Image

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना | Happy Birthday Ajoba

ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घराला विशेष असे घरपण येते. आजी आजोबा आणि नातवंडामध्ये तीन पिढ्यांचे अतूट नाते दडलेले असते.
आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच,
पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात.
तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी
आजही मुख पाठ आहेत.
जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत.
तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे,
हेच ईश्वराकडे मागणे आहे
तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा…
आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!


Download Image

मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा

आई वडील आपल्या मुलांसाठी अतोनात कष्ट घेतात. मुलांमध्ये ते आपले भविष्य बघतात. स्वतःच्या इच्छा मारून मुलांच्या आवडी जपण्याचा प्रयत्न करतात, आपली मुले मोठी व्हावी खूप शिकावी, त्यांनी मोठे यश मिळवावे यातच त्यांचे समाधान दडलेले असते. अश्याच विचारांच्या बाबांची आपल्या मुलीसाठी वाढदिवसाची शुभेच्छा इथे व्यक्त होते.
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

Monday, April 20, 2020

गर्याबरोबर माशीही चावली गेलीय हे समजलो तेंव्हा बराच उशीर झाला होता

बर्याच दिवसानी बा माझ्याकडं आला व्हता ,कारण व्हतं पाहुण्यांचं पाहुणे वाट चूकून माझ्याकड आल्याने त्यांना इकडंच बोलावलं तसे वरचेवर ये जा चालू आसते पण सगळी बच्चे कंपनी जून्या घरी राहात आसल्याने त्यांना इकडे करमत नाही .पाहुणे गेल्यावर थोडावेळ गप्पा झाल्या .त्यानींच विषय काढला कि चंभारवळात मोहर आहे जायचा का काढायला मी एका पायावर तयार झालो बर्याच दिवसात मोहर खाल्ली नव्हती मी हातात ताट घेऊन तयार झालो. मी येतोय खरी पन मी हात नय लावनार ही पहिली आट त्यांनी घातली .मोहर खायला मिळतीय याचंच आप्रुप .तुम्ही फक्त जागा दाखवा मी पूढंचं सगळं बघतो.आसं ठसक्यात सांगून मोकळा झालो .वडीलांनी माझ्याकडे फक्त बघीतले आणी हासले .ते का हासले हे कोडं मला सुटलं नाही तशी गरजही वाटली नाही. घे कूर्हाड आणं चल .चंभारओहळात जाऊन थांब मी आलोच.पुढच्या पाचंच मिनटांत मी जागेवर पोहचलो .काही वेळातचं वडील आले .वाटाच्या बाजूला चं बोंडार्याच्या खोडात मोहर होती .वडील खोडाजवळ पाच मिनिटे शांत ऊभे राहिले माश्यांची ये जा निट निरखून घेतली .मग तोंडावर पडलेला पाचोळा बाजूला केला .कानोसा घेतला आणी माझ्याकड बघीतले .मी तयारीतचं होतो .मला सर्व सुचना देऊन ते बाजूला झाले. धावसा बारीक आसल्याने हात घूसत नव्हता .खोड फोडावच लागनार व्हतं मी वडलांकडे बघीतले त्यांनी आनुमती दिली .मग काय खोडावर जोरात कुर्हाडीचा घाव घातला. तश्या माश्या भनभनत बाहेर आल्या.आता काही खरं नाय मी बाजूच्या गवताचा चूडा केला आणि धावशात कोंबला .मि माचीस ची काडी वडनार तसा वडलांनी माझ्या दंडाला धरून बाजूला ओढला .काय करतोस हे तू ,मध पन काढायची आन् माश्या पन पेटवायच्या हा कंचा न्याय .आहो पन त्या चावतील ना मी केवीलवाना प्रयत्न केला .काय व्हत नाय तेनी माशा चावल्यावर मानसा मरत नसत्यात .हो बाजू आणं ती ताट हातात धर मी गपगुमान हातात ताट घेवून बसलो. त्यांनी खोडाला कान लावला आंदाज घेतला आणि हळू्वार फूंकर मारली जादू केल्यागत माशा बाजूला झाल्या. पहिला गरा माझ्याकडे दिला आणि सांगीतले कि म्हसोबा, कोटम्या,मावल्या आन् गारूड्याला निवद उडव .मी इकडे तिकडे बघीतला, वडील खोडात हात घालून कानोसा घेत होते हिच संधी साधून सगळा गरा दाताखली दाबला .दोनदा तिनदा चावल्यावर चवीत फरक पडला गर्याबरोबर माशीही चावली गेलीय हे समजलो तेंव्हा बराच उशीर झाला होता .माशी मरतानाही तिचं काम चोख बजाऊन गेली होती .जिभेला डंक मारला होता जीभीची आग व्हायला लागली ,तोंडातला बोकना थूकून टाकला .आवघड जागेचा दुखना आन् जावई डाक्टर .दाखवता सोय नाही आन् सांगताही सोय नाही. आशी गत झाली .काय झाला रं कयाला चुळबूळ लावलेय वडलांनी ताटात मधाचा पोळा ठेवत विचारले .कूठ काय ,काहीच नय मी चाचरत बोललो .यी आता इकडं आन् पोळी काढ माश्या बाजूला झाल्याती ते बाजूला सरकत बोलले .मी त्यांच्या हातात ताट देवून पुढं सरसावलो .जीभ दाताखाली घसरणे चालूच होते .सगळा ध्यान जिभीकड लागला व्हता .पण सांगताही येत नव्हते. तसाच खोडात हात घालून अंदाज घेवू लागलो .वडलांनी करवंदीची पाच पाना तोडली .मी सुध्दा ते काय करतात ते बघू लागलो .त्यांनी पाच निवद तयार केले थोडी थोडी मध चारी दिशांना उडवली बा म्हसोबा, कोटम्या,गारुडीराया,मावलीआयांनो घ्या तुमचा निवद. काही चुकला माकला तर संभाळून घ्या .आजून काहीतरी पुटपुटत डोळे बंद केले.मी मात्र बघतच राहीलो किती हि निसर्गाशी एकरुपता .मला हे जमेल का .ऐ आरं आटंप झावळा पडला घरी जाया टाईम व्हयील .मी माझ्याच तंद्रीतून बाहेर आलो. मी चार पोळी काढली आसतील पन् दोन्ही हात गिरबाडून मोकळा झालो होतो .वडील खाऊ कि गिळू आसे बघत होते .मी त वरून तपेला ओळखला आन् बाजूला झालो .त्यांनी आलगद दोन पोळी काढली .निघ आता पोळी संपली घी गठूडा बांधून .ते धावशावर दगड ठेवत बोलले .आहो पन मह्या हाताला तर तीन पोळी लागली होती मी जागेवरून न उठताचं बोललो.तुह्या बापाचीच आहे सगळी ,उदया ह्या जित्राबाला खायला नको .माझ्याकडे न बघताच त्यांनी घरचा रस्ता धरला .आहो पन मला सांगा ना एक पोळा का ठेवला ते मी ताट सावरीत त्यांच्या मागं निघालो.आरं येड्या आपन पोळी काढून घेतली आता त्यांना तिथं रह्याचा कि नय हे त्यांची मेन माशी ठरवील .उद्या बर्याच माशा नवीन जागा शोधाया जातील .एखादी जागा पसंत झाली की सगळा बिर्हाड तिकडं जाईल .ह्या धावपळीत माशा फुलांवर जानार नाहीत .म्हणून त्यांची उद्याची सोय .आन् जागा चांगल आसल तर एक एक मोहर नय जात.तिडचं राहातेय. मी मान हालवली .कधी एकदाचा घरी जातोय आन् आरशात बघतोय आशी आवस्था झाली होती .मी पळतचं घरी आलो पायरीवर गठूडा ठेवला आन् घरात घूसलो .आरशासमोर उभा राहून कुठं सुक लागलाय ते चाचपून बघत होतो.हासण्याचा आवाज आला म्हणून मागं वळालो तर माझी सौ जोरजोरात हासत होती .काही सांगायच्या आत ,काय झालंय ते तिला कळालं होतं .ती फक्त हासत होती आणि मी कय करू आन् काय नको हे मला समजत नव्हतं.तेवढ्यात वडीलही आले .त्यांच्या लगेच लक्षात आले नाही पन जेंव्हा लक्षात आले तेंव्हा मात्र शिव्यांची लाखोली वाहिली .मी मात्र गूपचूप ऐकून घेतले.आता मात्र जीभ चांगलीच सुजली होती.मी बोलायचो एक आणि दुसर्याच्या ऐकायला जायचे भलतेच.आरं मी तुला निवद दाखवायला सांगितला आन् तू लगेच आळं वळाया भिडलाय मग आसं व्हनारचं वडील समजावनिच्या स्वरात बोलत होते .मी सगळ्या देवांची माफी मागितली इथून पुढं आसं व्हणार नाय याची काळजी घेईन .एक डाव माफ करा आसं म्हणून पाचपावलीना पाया पडलो. आवडीचा रस्सा आसुनही फक्त भातावरच वेळ मारून नेली .रात्री बराच वेळ विचार करत होतो शाळेत न जाताही माझा बाप हे सर्व कुठं शिकला आसलं मी एवढा शिकूनही आडानीचं राहिलो .आज मला त्यांच्यासारखं निसर्गाशी एकरूप होता येईल काय .त्यांनी मानलेल्या निसर्ग देवतेवर मी त्यांच्याइतका विश्वास ठेविल काय .सगळ्यात शेवटी एकचं उत्तर आलं ते म्हणजे ""होय "" होय ते करावचं लागेल .
                      *रघु बो-हाडे

Wednesday, March 25, 2020

करोनाला नाकरण्यासाठी आज आपण घरात बसून आरोग्यची गुढी उभारून आलेल्या संकटावर मत करू या 0



अकोले (शांताराम काळे ), ता . २५:सध्या कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे ते रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युध्य पातळीवर प्रयत्न करीत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणाला  २१ दिवस घरात बसण्याचे आव्हान केले आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन करोनाला नाकरण्यासाठी आज आपण घरात बसून आरोग्यची गुढी उभारून आलेल्या संकटावर मत करू या मी घरातच आहे तुम्हीही घरातच राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी काढले ते पत्रकारांशी बोलत   होते . आज गुढीपाडवायच्या दिवशी त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत गुढी उभारून तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी , ग्रामसेवक , सरपंच , ओलीस यांच्याशी संपर्क साधून तालुक्याच्या बाबत आढावा घेतला यावेळी त्यांच्यासम वेत  सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे , उपसभापती दत्तात्रय देशमुख , सरपंच गणपत देशमुख उपस्थित होते प्रसंगी बोलताना ते म्हणाले कोरोना विरुद्ध लढाई हि प्रशासनापूर्ती मर्यदित राहिली नसून हि लढाई नागरिकांनी उत्स्फूर्त पणे स्वीकारली आहे . आरोग्य , महसूल व पोलीस खाते आपल्याला मोलाची साथ करीत आहेत काही जागृत नागरिक पत्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक परिस्थिती प्रशासनाच्या लक्ष्यात आणून देत आहे . मात्र त्याला काही लोक अपवाद  आहे लातो के  भूत बातोसे नाही मानते त्याप्रमाणे त्यांच्यावर पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे . तालुक्यातील तहसीलदार , पोलीस अधिकारी , आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका काम करीत आहे त्यांना मदत व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर किमान २१ दिवस घराबाहेर पडू नये , तुमच्या गावात पुणे मुंबई व इतर भागातून तुमचे नातेवाईक अथवा नोकरीनिमित्त बाहेर गेलेले येत असतील तर त्यांची नोंद आरोग्य विभागाकडे करून त्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश द्या ते तुमच्या सर्वांच्या हिताचे राहील असा सल्लाही पिचड यांनी दिला .काही  ठिकाणी  गर्दी हटायला तयार नाही.लोक प्रशासन, पोलिसांसोबत वाद घालतांना दिसत आहेत.जणू काही ते आपले शत्रू आहेत. अजूनही लोकांना कोरोनाचे गांभीर्य कळालेले दिसत नाही. आपल्या घरीच रहाणे सर्वांसाठी किती सुरक्षित आहे हे कधी लक्षात येणार आमच्या !!! अजूनही वेळ गेलेली नाही.प्रशासनाला सहकार्य करा.नाहीतर कोणत्याही क्षणी कोरोना आपल्या घराच्या दरवाज्यावर येऊन टकटक करेल... पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. सावध व्हा. अनावश्यक  रस्तावर येऊच नका.आपला जीव आणि आपलं कुटुंब आपणच सुरक्षित ठेवा.आरोग्याची गुढी उभारून कोरोनाला पराभूत करा पाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. सोबत फोटो 

Monday, March 23, 2020

संतोष चा जिद्द व चिकाटी मुले चहावाला ते पीएसआय प्रवास

टपरीचालक ते पोलीस उपनिरीक्षक.....

जिद्द  संयम आणि चिकाटी जर आपल्या जवळ असेल तर आपण यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुर गावाजवळ एका वाडीत राहणारा मुलगा ज्याचं नाव आहे संतोष वाळु देशमुख. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आई आणि वडील दोघेही शेतमजूर ,कुटुंब चालविण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण वाळू देशमुखांना दोन एकर कोरडवाहू शेती,दोन-चार पोती भात पिकणार यावर संपूर्ण घर चालवायचं.हा संघर्ष संतोष जवळून पाहत होता.दोन मुलं आणि एक मुलगी या सगळ्यांचा सांभाळ करायचा असेल तर कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. संतोष लहानपणापासून तसा हुशार पण परिस्थितीपुढे हतबल झालेला.त्याचे प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण राजुर येथे झाले .अर्थशास्त्र या विषयातून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले नंतर मित्रांच्या आर्थिक मदतीने तो पुण्याला पुढील शिक्षणासाठी गेला तेथे प्रा.डॉ.सुरेश देशमुख यांच्या मदतीने त्याला एस. पी .कॉलेजमध्ये एम.ए.साठी प्रवेश मिळाला संतोषला राहण्याची सोय तेथे नव्हती. खूप प्रयत्न करून तो  मित्राच्या रूमवर राहू लागला .परत तो गावी आला त्याने पान टपरीवर काम करायला सुरुवात केली. याच काळात अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून कृष्ण प्रकाश यांनी कार्यभार हाती घेतला होता.संतोष कृष्णप्रकाश यांच्या पोलीस खात्यातील कार्यावर खूप खुश झाला व त्याने असे ठरवले की आपण खूप अभ्यास करून पोलीस खात्यातच नोकरी करावी  म्हणून तो पुन्हा पुण्याला गेला तेथे त्यानेअभ्यास करायला सुरुवात केली .आपण आयुष्यात काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने त्यांने प्रचंड मेहनत केली .त्याला जाणीव होती की आपले आई-वडील आपल्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.आई तर असवल्या डोंगरावरून गवताचा भारा घेऊन राजूरच्या बाजारात विकायला येते  तो एक भारा अवघ्या ५० ते ६० रुपयाला विकला जातो.६० रुपये मिळवण्यासाठी ती माऊली ७ किलोमीटर पायपीट करते तर वडील भल्या पहाटे उठून त्याच डोंगरावर शेळ्या वळा यला जातात .संतोषने आई वडिलांचा हा संघर्ष जवळून पाहिला होता प्रशांत भांगरे या संतोषच्या मित्राने पुण्यात येऊन एमपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात कर असा सल्ला दिला यातूनच सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत संतोष सातत्याने अभ्यास करत राहिला सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांचा सहवास मिळाल्यामुळे व प्रचंड आत्मविश्वास व कठोर परिश्रम यामुळे संतोष २०१८ च्या एमपीएससी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक झाला .अनुसूचित जमाती(एस.टी)मध्ये तो राज्यात ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.काहीतरी वेगळं करून दाखवण्याची त्याची इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. तो पास झाल्याची बातमी गावी समजली त्याही दिवशी त्याची आई  गवताचा भारा घेऊन गावात विकायला आली होती.त्याच वेळेस तेथे असलेल्या लोकांनी म्हटले की "बाई आता तरी गवताचा भारा वाहन बंद कर" कारण तुझा मुलगा साहेब झालाय!  हे ऐकताच त्या माऊलीच्या डोळ्यात खळकन पाणी  आलं. मी केलेल्या कष्टाचं चीज झालं असे एक वाक्य तिच्या तोंडून बाहेर पडल. संतोषचे आज सर्वत्र कौतुक होत आहे एका छोट्याशा वाडीतला संतोष पोलीस उपनिरीक्षक झाल्याचा आनंद सर्वांना होताना दिसतो आहे. गरिबीवर मात करत ,परिश्रमाची कास धरत आपण उत्तम यश मिळवू शकतो असे संतोष आवर्जून सांगतो आहे.संतोषला भविष्यात गावात वाचनालय व स्पर्धापरीक्षा केंद्र सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.तसेच संतोषला  Dy.sp  व्हायचय.संतोष  तुझ्या जिद्दीला सलाम व तुझ्या पुढील वाटचालीस आभाळभरून शुभेच्छा.....
संतोष तुझे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
-------------------------------

Wednesday, March 18, 2020

हरीसचंद्र गड एक अविस्मरणीय

भटक्यांची पंढरी: हरिश्चंद्रगड...

      एकेकाळी अतिशय दुर्गम व लोकवस्तीपासून दूर असलेल्या हरिश्चंद्र गडाने महायोगी संत चांगदेवापासून निसर्गवेड्या मिलिंद गुणाजीपर्यंत अनेक दुर्गवेड्यांना, हौशी पर्यटकांना मोहित केले आहे. वनस्पतीशास्राचे अभ्यासक, भूगर्भशास्रवेत्ते, भाषा अभ्यासक, धाडसी  गिर्यारोहक, विरक्त योगी आणि सामान्य श्रद्धाळू असे कितीतरी जण या गडाच्या प्रेमात पडले.पाचव्या शतकातील त्रेकुटक  व कलचुरी राज घराण्याच्या कारकीर्दीपासून हा गड इतिहासप्रसिद्ध आहे. स्कंद, अग्नी व मत्स्य पुराणात याचा उल्लेख आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात मे १८१८ मध्ये इंग्रजी सैन्यातील एक अधिकारी कर्नल मार्किनटोशच्या फौजेने हा गड काबीज केला. इतर किल्यांप्रमाणे या किल्ल्याच्याही अवघड वाटा, पाण्याची टाकी, तटबंदी त्याने उध्वस्त केली. मात्र हरिश्चंद्रेश्वराचे देखणे मंदिर व लेण्यांना त्याने धक्का लावला नाही. गेल्या काही वर्षात ऊन, वारा, पाऊस या बाह्य कारकानी मात्र या प्राचीन वास्तूच्या वैभवास सुरुंग लावले आहेत. या मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण  अशी आहे. कळसापर्यंत ५५ ते ६० फुट उंचीच्या मंदिराच्या भिंतीवर पाय-यांवर अतिशय आकर्षक व शैलदार कोरीव काम केलेले आहे. सभामंडपाच्या गाभा-यात जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, या मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त करण्यासाठी प्राकाराची भिंत बांधलेली आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन ऐसपैस गुहा आहेत. यातील एका प्रशस्त गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. शेजारील गुहेत विठ्ठल - रुख्मिणीची मूर्ती वारकरी सांप्रदायाच्या संदर्भाने मनात कुतूहल निर्माण करते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. भिंतीशेजारून एक प्रवाह उत्तरेकडे उताराच्या दिशेने वाहत जातो. या प्रवाहालाच संत चांगदेवानी 'मंगळगंगा' म्हटले आहे. या प्रवाहावर पुलासारखे बांधकाम असून तेथूनच पूर्वेकडून मंदिरात प्रवेशता येते. या वास्तुवैभवाला बह्याकारकांची  जणू दृष्ट लागली असून, कालौघात प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची मोठी पडझड झाली आहे. यातील काही दगड मंगळगंगेच्या वेगवान प्रवाहाबरोबर घरंगळत लांबवर गेले आहेत.
       मंदिराच्या उत्तरेला घारापुरीच्या लेण्याची आठवण करून देणारी एक भव्य गुंफा आहे. हेच ते केदारेश्वराचे लेणे. गुहेत चौथ-यावर भव्य शिवलिंग आहे. त्याच्या चारही बाजूला बाराही महिने थंडगार पाणी असते. चौथ-याच्या चारही कोप-यावर छतापासून कोरलेले खांब असले तरी त्यापैकी तीन पूर्णपणे तुटले आहे. त्यांचा अर्धवट भाग लोंबकळत आहे. लेण्याच्या दर्शनी बाजूच्या कोरलेल्या खांबांपैकी तीन खांबावर अस्पष्ट शिलालेख दिसतात.
         मंदिराच्या पूर्वेला हेमाडपंथी वापी म्हणजेच सप्ततीर्थ (सर्वतीर्थ ) आहे. या प्रशस्त तीर्थकुंडात डिसेंबरअखेरपर्यंत पाणी असते. कुंडांच्या दक्षिणेला १४ देवळयांमध्ये १४ विष्णुमूर्ती विराजमान होत्या. देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. येथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तीर्थकुंडासमोर एक छोटेखानी मंदिर असून, काशीतीर्थ नावाने ते ओळखले जाते. मंदिरासमोर एक अपूर्ण शिल्प आहे. त्याचा अर्थबोध होत नाही. या मंदिराचीदेखील मोठी पडझड झाली आहे.
        तारामती शिखराच्या उत्तरेला पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी १० व्या किंवा ११ व्या शतकातील असावीत. या समूहातील दुसरे लेणे आकाराने सर्वात मोठे आहे. तिसरी गुंफा अपूर्ण अवस्थेत आहे. या गुफेचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती आहे. मूर्तीचे बरकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबरावस्थेतील गणेशमूर्ती अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. समोरच्या  गणेश मंदिरातील मूर्तीदेखील दिगंबरावस्थेत आहे.
         गडावर इतिहासाची साक्ष देणारे एकूण आठ शिलालेख आहेत. विशेष बाब म्हणजे विदेशी संशोधकांनी सर्वप्रथम या लेखांकडे लक्ष वेधले. जेम्स फर्गुसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांनी प्रथम यावर टिपणे तयार केली. गो. नी. दांडेकर, रा.चिं. ढेरे, वि.भी.कोलते, म.रा.जोशी, आनंद पाळंदे, राजेश्वर गोस्वामी आदींनी शिलालेखांचे वाचन केले. योगी चांगदेव आपल्या शिष्यगणांसह येथे वास्तव्यास होते. त्यांनी तत्त्वसार या ग्रंथाची रचना येथेच केली. या ग्रंथाच्या शेवटी एका ओवीत शके १२३४ ला हरिश्चंद्र गडावर ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. काळाच्या ओघात शिलालेखांचा हा पुरावा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. प्राचीन काळात हा गड धर्मपीठ म्हणून मान्यता  पावलेला होता असे सांगितले जाते. त्याच्या वैभवाच्या खाणाखुणा जागोजाग विखुरलेल्या आहेत. बाह्यकारकांच्या सततच्या तुफानी हल्ल्यामुळे वस्तूवैभवाला अलीकडच्या काळात ओहोटी लागली असून, आता तर ते नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे. या वस्तूंच्या जतनासाठी व संरक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
      पुरातन वस्तू शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराची व येथील लेण्यांची व इतर वास्तुरचनांची सध्या मोठी पडझड झाली आहे. गुफांमधील कोरीव लेणी सप्ततीर्थ, काशीतीर्थ व केदारेश्वराचे लेणे यांचे जतन व संरक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न नजीकच्या काळात झाले नाही तर हे प्राचीनतम वैभव नष्ट होऊन केवळ भग्न अवशेष तेवढे शिल्लक राहतील. अशी सद्यस्थिती आहे. इतिहासाची साक्ष देणारे येथील शिलालेखही सध्या आपले अस्तित्वच हरवून बसल्यात जमा आहेत. योगी चांगदेवांच्या तपोभूमीला असा बाह्यकारकांनी सुरुंग लावला आहे. तर पुरातत्त्व  विभाग हा सारा प्रकार संवेदनशीलता हरवून पाहत  आहे.
        
 गडावरील कातळ शिल्पे...
हरिश्चंद्र गडावरील सर्व भूरूपे म्हणजे निसर्गनिर्मित भव्य शिल्पेच आहेत. सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील रौद्र भीषण तरीही मोहक असणारा कोकणकडा, गडाच्या माथ्यावरील बालेकिल्ला, तारामती शिखराच्या पश्चिमेकडील उतारावर एकावर एक रचल्यासारख्या शिळा दिसतात. सकृतदर्शनी  ही कुणाची तरी रिकामपणाची कामगिरी वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. उन,वारा,पाऊस यासारख्या बाह्यकारकामुळे झालेल्या झीजेचा तो परिणाम असून, भौगोलिक भाषेत झाला " टॉर " असे म्हणतात.
       दख्खनचे पठार ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकापासून निर्माण झाले. लाव्हा रसापासून सह्याद्रीची पर्वताची निर्मिती झाली.  साडेतेरा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातून उफाळून  आलेला हा लाव्हा पृष्ठभागावर क्षितीज समांतर पसरून दख्खनच्या पठाराचा जन्म झाला, असे मानले जाते. उन, वारा, पाऊस यामुळे त्याची झिज होत राहिली आणि त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. निसर्गनिर्मित अशी अनेक शिल्पे गडावर पाहायला मिळतात.
     सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील कोकणकडा वर्षानुवर्षे धाडसी गिर्यारोहकांना साद घालत आहे. भ्रंश रेषेच्या एका बाजूची ( पश्चिमेची) भूमी खाली सरकल्याने कड्यासारखा अत्यंत तीव्र उतार तयार झाला. सुमारे २००० फूट खोलीचा हा सरळसोट उतार हे तर कोकणकड्याचे रौद्र भीषण तरीही मोहक वाटणारे रूप. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत अनेक कोकणकडे आहेत. पण येथील अंतर्वक्र नालाकृती कोकणकड्याची सर कोणत्याच कड्याला येणार नाही. कितीतरी वेळ बघत बसले तरी मान तृप्त होत नाही. या कड्याचे सौंदर्य, मोहकता न्याहाळताना अनामिक भितीने अंगावर काटा येतो. तरीही भयमिश्रित कुतूहलाने येथे येणारा प्रत्येकजण त्याचे ते रौद्र रूप पुन्हा पुन्हा पाहतच बसतो. डोळ्यांत साठवण्याची धडपड करतो. येथील पावसाळ्यातील  धुक्याचा अनुभव तर केवळ स्वप्नवतच म्हणावा लागेल.  काळजात धडकी भरविणा-या या कड्यालाही काही धाडसी गिर्यारोहकांनी अनेकदा नमविले आहे. अरविंद बर्वे नामक मुंबईकर निसर्गवेड्या तरुणाने तर स्वतःला या कड्यावरून खाली झोकून देऊन आपली इहलोकी जीवनयात्रा संपविली. गडावरच्या पाण्याची व्यवस्था नष्ट करतानाच बालेकिल्ल्यालाही या गोष्टीची झळ बसली तशीच ती कोकणकड्यालाही बसली. मार्कीन्टोश नामक ब्रिटीश सेनाधिका-याने कड्यावरच्या खोबनीची पुरती नासधूस केली.
इंद्रवज्राचा देखावा

पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे अर्धवर्तुळाकार इंद्रधनू आपण कितीतरी वेळेस पाहिले असेल! पण हेच इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! काय मज्जा येईल नाही? होय! हा अत्यंत दुर्मिळ योग पुन्हा एकदा  हरिश्चंद्रगडावर जुळून आला होता... संगमनेर येथील डॉ. नितीन बस्ते, तुषार शेवाळे आणि  इतर दुर्गयात्री हा निसर्गाचा अनुपम सोहळा 'याची देही याची डोळा' पाहून  पुरते हरखून गेले। होय, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर पुन्हा एकदा दिसले होते अत्यंत देखणे आणि दुर्मिळ 'इंद्रवज्र' !

या  इंद्र्वज्राची आपल्याकडे म्हणजे सह्याद्री परिसरात  पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटीश अधिकाऱ्याने। तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! यावेळी घोड्यावरून रपेट मारीत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला  समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेचजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.

नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर याची नोंद आपल्याला आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवलेय की, AcompanAccompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colours. The foking or Glory of  Buddha as seen from mount O in West Chaina tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes , description would seem to show.  या वर्तुळाची त्रिज्या ५० ते ६० फुट होती. इंद्र्वज्राचे वैशिष्ट्यच असे की, जो हे दृश्य पाहातो; तो स्वत:लाच त्यात पाहातो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मधात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनूष्याचे तेजोवलय कडेला जाताना मात्र फिकट होत जाते.

इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारिक आविष्कार! त्यासाठी भौगोलिक स्थितीही तशी असायला हवी. म्हणजे कशी? तर दिवस पावसाळ्याचे असावेत। वेळ सकाळची असावी. हलका पाऊस पडत असावा आणि गडाच्या पश्चिमेकडच्या त्या अक्राळविक्राळ कोकणकड्याकडून (पश्चिम दिशेकडून) दाट धुके असलेले ढग यायला हवेत. उगवत्या सूर्यनारायणाची कोवळी किरणे दरीतून वर झेपावणा-या ढगांवर पडली की, पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या ढगांवर दिसू लागते. कड्याच्या दिशेने आपण तोंड करून उभे राहिलो की, निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. याच वेळी गडाच्या पाठारावर मात्र धुके नसेल पाहिजे. ते केवळ कड्यापर्यंत असावे. त्यामुळे अशी स्थिती जुळून येणे दुर्मिळ असते. आली तरी ते पाहायला मिळणे... हा सारा नशिबाचा, योगायोगाचा भाग. मुळात हे 'इंद्रवज्र' आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक दुर्गयात्री त्यासाठी मोठी प्रतीक्षा करीत असतात. डॉ. बस्ते आणि तुषार शेवाळे यांना हे अद्भुतरम्य दृश्य पाहण्याचे भाग्य लाभले.

साईक्सनंतर इतक्या वर्षांनी २०११ मधल्या मे महिन्यात कोणी तरी हे इंद्रवज्र पाहिलेय आणि ते कॅमे-यात बंद केलेय... हे पाहताना ते निसर्गवेडे आनंदाने अक्षरशः नाचू लागले... ‘रानवाटा’चे स्वप्नील पवार आणि इतर दुर्गयात्री सोबत होते. एका भौगोलिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले. असा हा इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी दर वर्षी निसर्गवेडे येथी कड्यावर डेरा टाकतात. पण ब-याचदा हे सारे काही जुळून येत नाही. मुळातच हरीश्चंद्रगड निसर्ग सौंदर्याने नटलेला. जैव-वैविध्याच्याबाबत तर देशभरातील उल्लेखनीय ठिकाणांपैकी एक असलेला. सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत; परंतु इथल्या कड्याला तोड नाही, म्हणजे यासम हाच असा..! येथील निसर्ग सौंदर्याचा मानबिंदूच जणू...! येथे पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडाने हा अलौकिक देखावा दाखवला आहे..!


बालेकिल्ला

          हरिश्चंद्रगडाच्या दक्षिण  माथ्यावर तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला व्होल्कॅनिक प्लगसारखी [ म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख] रचना दिसते. लाव्हा रस बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे हा भूभाग बाजूच्या भूभागापेक्षा उंच होतो. तोच हरिश्चंद्राचा बालेकिल्ला होय. येथून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरव, कुलंग,अलंग,मदन असा उत्तरेकडील तर माळशेज घाट, भैरव, नानाचा अंगठा. जीवधनपर्यंतचा दक्षिण पश्चिमेकडील मुलुख दृष्टीक्षेपात येतो. बालेकिल्ल्यावर जाण्यास खास असा रस्ता नाही. मस्त रान तुडवत रस्ता शोधत जाणे हाच एक मार्ग.
तारामतीच्या शिखरावरील  टॉर
       हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या दक्षिणेकडील शिखर म्हणजे तारामती शिखर. या शिखराची समुद्र सापतीपासुंची उंची ४७७२ फुट इतकी आहे. या शिखराच्या दक्षिणेला तीव्र उताराचा कडा आहे. या शिखराच्या धारेवरून पश्चिम बाजूला एकमेकांवर मुद्दामहूनच रचून ठेवल्यासारख्या ब-याच शीळा पाहायला मिळतात. [म्हणजे गाडग्या - मडक्याच्या उतरंडी प्रमाणे ] प्रथमदर्शनी एखाद्या रिकामटेकड्या गुराख्याची ती कामगिरी असावी असे वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नसून ऊन, वारा आणि धो- धो कोसळणा-या पावसाच्या क्रियेमुळे यातील मृदू खडकाची प्रचंड झीज होऊन त्यांचे विदारण झाले आणि कठीण खडक एकमेकांवर रचून ठेवल्याप्रमाणे दिसू लागले. भौगोलिक भाषेत याला tor  असे म्हणतात. या माथ्याचे हे अत्यंत दुर्मिळ असे वैशिष्ट्य. येथेच विविधरंगी स्फटिके व खनिजेही आढळून येतात.
मात्र धोपट मार्ग सोडल्याखेरीज येथील भू-शिल्पे तुम्हाला दिसणार नाहीत. याच्या पश्चिमेला एकांटी मोठ्या दिमाखात उभे असलेले तुलनेने कमी उंचीचे शिखर म्हणजे रोहीदासाचे शिखर. तसा पुराणकाळातील हरिश्चंद्र राजा, तारामती व रोहिदास यांचा या शिखारांशी अर्थाअर्थी काही एक संबंध नसल्याचे अभ्यासक सांगतात.
रेड बोलची कपार
     पाचनई गावातून गडाची चढण चढताना अंगावर येणा-या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांचा दोन थरांच्या मध्ये लाल हिरवी राख सापडते. यालाच भौगोलिक भाषेत 'रेड बोल' म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले. मोठमोठ्या भेगा पडल्या. भ्रंश झाले. त्यानंतर या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. या नैसर्गिक घटना एवढ्यावरच थांबत नाहीत. सोसाट्याचा वारा, धो- धो कोसळणारा पाऊस त्यावर तुटून पडला. उन्हाचा आणि थंडीचाही त्यावर परीणाम होऊ लागला. त्यामुळे सतत क्षरण कार्य होताच राहिले. मुळचे  भू-आकार पुन्हा बदलू लागले. काही पर्वतांची उंची कमी होऊ लागली आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहांनी द-या खोल होत गेल्या. एकूण झीजेच्या ९०% झीज येथील पाऊसाने केली असून, त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली.

गड परिसरातील जैवविविधता  

भौगोलिक व नैसर्गिक अनुकूलतेमुळे हरिश्चंद्र गडाच्या परिसरात जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. जैविक विविधतेच्या बाबतीत तर हरिश्चंद्राचे जंगल देशातील अतिशय समृद्ध ठिकाणांपैकी एक समजले जाते. असंख्य प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सरपटणारे प्राणी या सगळ्यांचेच येथे वैपुल्य आहे. याशिवाय गडावर स्वयंचलित वाहने जाण्याची सोय नसल्याने मानवी हस्तक्षेपापासूनही हा परिसर पुष्कळ सुरक्षित आहे.
           हरिश्चंद्र गडावरील वैशिष्ट्यपूर्ण चढ - उतार विस्तीर्ण पठार, जैवविविधतेसाठी पोषक तापमान भरपूर पर्जन्यमान व जमीन यामुळे हा प्रदेश अनेक दुर्मिळ वनस्पतींचे माहेर घर बनला आहे. गडाच्या माथ्यावर उत्तराभिमुख उतारावर अशा सदाहरित जंगलाचा हिरवाजर्द पट्टा दिसतो. आणि पठारावर असंख्य अल्पजीवी वनस्पती आढळतात. त्या पावसाळ्यात सजीव होतात. येथे सुमारे  ५००० मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळतो. पावसाळा सुरु झाला की एरवी भकास वाटणारी येथील पठारे हिरव्या चैतन्याने बहरतात. राजतेरडे, रानतीळ, रानकांडे, रान लसूण, सोनकी, पालेचीराईत ,डायसोफिलीया, सायप्रस, शेराला अशा असंख्य अल्पजीवी वनस्पती सर्वत्र डोकाऊ लागतात. अवघ्या पंधरवड्यात त्यांना फुलेही येऊ लागतात. जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, तांबड्या, गुलाबी, अशा विविधरंगी रंगछटांनी सगळे पठार नटून जाते. जुलै ते ऑक्टोबर या काळात तर या पठारावर फुलोत्सव सुरु असतो.
           हरिशचंद्र गडाच्या परिसरात जांभूळ,  रामेठा, बामणी, दिंडा, सुरुंगी, फापती, करवंद आंबा, पळस, फणस, शाल्मली, हिरडा, पळसवेल, पांढरी, आदि वृक्ष आढळतात. वृक्षांची उंची कमी असते. सरळ उंच फांद्यांऐवजी वाकड्या तिकड्या आणि एकमेकांमध्ये गेलेल्या असतात. घनदाट वृक्षांवर चढलेल्या राक्षसी वेली आणि खाली दाट उंच गवत, हे येथील जंगलाचे ठळक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी या लाकडांचा उपयोग नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उपयुक्त नसल्याने जंगल तोडीचे प्रमाण फारच कमी आहे. मात्र जैविकदृष्ट्या या वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
         सह्याद्रीच्या माथ्यावर १००० ते १२०० मीटर उंचीवर कारवी ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आढळते. हरिश्चंद्र गडाच्या चहू बाजूंनी तिचे विपुल अस्तित्व आहे. दर सात वर्षांनी जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरणारी ही वनस्पती फुललेल्या काळात पाहणे, ही अपूर्व आनंद देणारी घटना असते. डोंगर उतारावरील मातीचे संधारण करण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम या कारवीने केले आहे. याशिवाय तीव्र चढणीच्या अवघड पायवाटेने चढत असताना गिरीभ्रमण करणा-यांनाही कारवीचा मोठा आधार असतोच. अन्यथा डोंगर उतारावरील खोल दरीकडे पाहून अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहिले नसते. कोणत्याही रस्त्याने गडावर जाताना कारवीची भेट होतेच. सात वर्षांनी एकदा फुलते. फुले येऊन गेल्यावर कारवी मरते. पुढील वर्षी नव्या करावीच जन्म होतो. मात्र सात वर्षातून एकदा येणारा कारवीचा फुलोत्सव  निसर्गप्रेमींनी आवश्य पाहावा.
           या जंगलांनी अनेक जाती - प्रजातींना आश्रय दिला आहे. महाजैविक विविधता लाभलेल्या सह्याद्रीच्या पट्टयात ज्या थोड्या ठिकाणी सदाहरित जंगले टिकून राहिली आहेत. त्यापैकी हरिश्चंद्रगड हे खूपच आदर्श ठिकाण असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तारामती शिखराच्या उत्तर उतारावरील विस्तीर्ण पठारावर मोठी झाडी, झुडपे कमी असली तरी असंख्य अल्पजीवी वनस्पतींचे वसतीस्थान तेथे असते अनेक अभ्यासकांनी याविषयीचा अभ्यास आणि सर्वेक्षण केले आहे. एरवी उन्हाळ्यात वाळलेल्या गावतामुळे आणि दिवसादेखील तालात गाणा-या रातकिड्यांच्या आवाजाने भकास वाटणारे हे निर्जन पठार पावसाळ्यात मात्र चैतन्याने न्हावून निघते. पिवळी सोनकी फुलल्यावर तर सारे पठार पीतवर्णी शालू पांघरते. कळलावी, चित्रक, देवनाळ, शतावरी, पांढरी यांसारख्या दुर्मिळ औषधी वनस्पतींचा येथे आढळ आहे.
        हरिश्चंद्रगडाचा परिसर कळसुबाई अभयारण्यात कोल्हे, रानडुकरे, तरस, भेकर, खेकड, ससे, बिबटे, रानमांजर, साळींदर, व भीमाशंकर अभयारण्य ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते शेकरू या परिसरात मुबलक प्रमाणात आढळते. मात्र अलीकडच्या काळात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
       गरुड ससाणे, खंड्या, बुलबुल, पर्वत कस्तूर, सुतार, मोर, तित्तर, पारव, घार, सुभग या पक्ष्याचाही येथील परिसरात वावर असतो. सरपटणा-या प्राण्यांमध्ये नाग, फुरसे, घोणस, मण्यार या जातीचे अतिशय विषारी साप या भागात आढळतात. याशिवाय इतर विषारी- बिनविषारी सापांचेही वास्तव्य असतेच.
        अवाजवी मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित अंतरावर असल्याने हा परिसर आपली जैविक विविधता व विपुलता ब-यापैकी टिकवून आहे. मात्र काही हौशी पर्यटकांच्या, गिर्यारोहकांच्या बेजबाबदार व चंगळवादी प्रवृत्तीमुळे होणारी हानी टाळण्याच्या दृष्टीने निसर्गाचा हा अमुल्य ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने  प्रयत्न करण्याची आवश्यकता  आहे.

गडावर पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढतच आहे. ३१ डिसेंबर ला तर येथे जत्रेचे स्वरूप येत आहे. येथील नितांत सुंदर निसर्ग निवांतपणा पर्यटकांना खुणावतो भावतो हे खरच परंतु येथील इतिहास भूगोल तसेच अध्यात्मिक सांस्कृतिक वारसा याबाबत यातील बहुतांश जण अनभिज्ञच दिसून येतात आजवर हरिश्चंद्रगड व परिसरावर प्रकाशझोत टाकणारे विविधरंगी संशोधन झालेले असले ते अपूर्णच वाटते. येथील प्राणी सृष्टी व भूगर्भाशास्त्राबाबतच्या संशोधनास पुरेसा वाव आहे.
     येथील शिलालेखांकडे सर्वप्रथम विदेशी संशोधकांनी लक्ष वेधले. याचा उल्लेख १८८४ च्या नगर जिल्ह्याच्या ग्याझेटीअरमध्ये आढळतो. त्यात जेम्स फर्ग्युसन जेम्स बर्जेस सिंक्लेअर यांचा समावेश होता. प्रत्यक्ष शिलालेख वाचण्याचे काम वि. भि. कोलते रा. चि. ढेरे या देशी संशोधकांनी केले. याशिवाय म.रा. जोशी, आनंद पाळंदे, गो,नी,दांडेकर, राजेश्वर गोस्वामी, मिलिंद बोकील आदींनी या दूरस्थ गडाला भेट देऊन इतिहास भाषा व आध्यात्मिकदृष्ट्या अभ्यासात भर घालण्याचे काम केले. या खेरीज यात्रा पर्वात ज्ञानदेवादी भांदेदेखील येथे येऊन गेल्याचा उल्लेख एका लेखात आढळतो. तसे असेल तर गोनीदांच्या भाषेत तो लेख सुवर्णाक्षरांनीच माद्विण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
      तत्कालीन ब्रिटीश अधिकाऱ्यांचेही हा गड आकर्षण बिंदू ठरल्याचे उपलब्ध कागदपत्रे व नोंदीवरून दिसून येते साईक्सं नावाच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने तर येथे बांधकामही केले होते. आजही त्याचे अवशेष येथे पाहायला मिळते. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चरीत्रातही ते ठाण्याचे उपजिल्हाधिकारी असताना (सन १९२९) येथे आल्याचा उल्लेख आढळतो. गडावरच त्यांना थडी वाजून आल्याने ढोली करून त्यांना खाली नेण्यात आल्याचा मजकूर चरित्रात आहे.
      सुमारे ८०० ते १००० वर्षापूर्वीच्या शिलालेखांवरून योगी चांगदेवांचे वास्तव्य येथे होतेच याखेरीज कितीतरी योगी सिद्धसाधक येथे येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. शैव, वैष्णव तसेच शाक्त संप्रदायाचे अवशेषही येथे सापडतात.
     येथील वनस्पती सृष्टीचे संशोधन ब्रिटीश काळापासून सुरसु झाले आहे. १९०८ सालात तत्कालीन मुंबई इलाख्याचे (बॉम्बे प्रेसिडेन्सी ) वान्स्प्तीशास्रज्ञ डॉ. कुक यांनी येथील झाड - झाडोऱ्याचा अभ्यास केला. १९६९ मध्ये पुणे येथील वनस्पती संरक्षणालयातील डॉ.बिलोरी व डॉ. हेमाद्री या दुकलीन येथील ३३० जातींच्या वनस्पतींची नोंद्केली आहे. याच विभागातील डॉ. सिंग व डॉ. प्रधान यांनी १९९० मध्ये गडाला भेट देऊन अभ्यास केला. तर अलीकडच्या काळात संगमनेर येथील संशोधक प्रा. डॉ. मोहन वामन यांनी येथील वनस्पती सृष्टीचा तपशीलवार अभ्यास केला असून येथील वनस्पतीसृष्टीचे आजवरचे हे सर्वात महत्वाचे संशोधन मानले जाते. वैशिष्ट्यांनुसार विश्लेषण करणाऱ्या डॉ. वामन यांनी ६२९ वनस्पतींची नोंद केली आहे. यात देशभरातूनच नामशेष होण्याच्या मार्गावरील ८० औषधी वनस्पतींचे अस्तित्व त्यांनी शोधून काढले आहे. तर १६ प्रकारच्या ऑर्कीड जातीच्या वनस्पती त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
      भीमाशंकर अभयारण्य ज्या शेकरू जातीच्या खारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. ती शेकरू येथील तोलार खिंड परिसरात बऱ्यापैकी संखेने दिसून येते. इतरही विविध प्राण्यांचे वसतीस्थान येथे आहे. असे असले तरी येथील प्राणीसृष्टीवर मात्र हवा तेवढा अभ्यास झालेला दिसत नाही. याचप्रमाणे येथील भूगर्भ शास्राच्या अभ्यासालादेखील बराच वाव असल्याचे दिसून येते. येथील निरनिराळ्या रंगांचे खडक संशोधकांना का खुणावत नाहीत असाही प्रश्न वाटेवरून जाताना पडल्याखेरीज राहत नाही. 
       गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे, पाचनई, लव्हाळी, कुमशेत, खिरेश्वर येथील आदिवासींचे गडाशी भावनिक नाते जुळलेले आहे. मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने हे लोक दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जाऊन हरिश्चंद्रेश्वराला अभिषेक घालतात. अर्थातच गडाच्या इतर वैशिष्ट्यानबाबत. हे अनभिज्ञच असावेत.
       मानवी हस्तक्षेपापासून पुष्कळ दूर असल्याने शेकडो वर्षापूर्वी जसा होता तसाच हरिश्चंद्रगड आजही आहे. बह्याकारकांच्या आक्रमणाला तोंड देत आजही तो ताठ मानेने उभा आहे. त्याला यापुढेही तसेच राहू द्यावे .........हीच अनेकांची अपेक्षा आहे.

भाऊसाहेब चासकर,
अकोले