भटक्यांची पंढरी: हरिश्चंद्रगड...
एकेकाळी अतिशय दुर्गम व लोकवस्तीपासून दूर असलेल्या हरिश्चंद्र गडाने महायोगी संत चांगदेवापासून निसर्गवेड्या मिलिंद गुणाजीपर्यंत अनेक दुर्गवेड्यांना, हौशी पर्यटकांना मोहित केले आहे. वनस्पतीशास्राचे अभ्यासक, भूगर्भशास्रवेत्ते, भाषा अभ्यासक, धाडसी गिर्यारोहक, विरक्त योगी आणि सामान्य श्रद्धाळू असे कितीतरी जण या गडाच्या प्रेमात पडले.पाचव्या शतकातील त्रेकुटक व कलचुरी राज घराण्याच्या कारकीर्दीपासून हा गड इतिहासप्रसिद्ध आहे. स्कंद, अग्नी व मत्स्य पुराणात याचा उल्लेख आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात मे १८१८ मध्ये इंग्रजी सैन्यातील एक अधिकारी कर्नल मार्किनटोशच्या फौजेने हा गड काबीज केला. इतर किल्यांप्रमाणे या किल्ल्याच्याही अवघड वाटा, पाण्याची टाकी, तटबंदी त्याने उध्वस्त केली. मात्र हरिश्चंद्रेश्वराचे देखणे मंदिर व लेण्यांना त्याने धक्का लावला नाही. गेल्या काही वर्षात ऊन, वारा, पाऊस या बाह्य कारकानी मात्र या प्राचीन वास्तूच्या वैभवास सुरुंग लावले आहेत. या मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. कळसापर्यंत ५५ ते ६० फुट उंचीच्या मंदिराच्या भिंतीवर पाय-यांवर अतिशय आकर्षक व शैलदार कोरीव काम केलेले आहे. सभामंडपाच्या गाभा-यात जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, या मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त करण्यासाठी प्राकाराची भिंत बांधलेली आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन ऐसपैस गुहा आहेत. यातील एका प्रशस्त गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. शेजारील गुहेत विठ्ठल - रुख्मिणीची मूर्ती वारकरी सांप्रदायाच्या संदर्भाने मनात कुतूहल निर्माण करते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. भिंतीशेजारून एक प्रवाह उत्तरेकडे उताराच्या दिशेने वाहत जातो. या प्रवाहालाच संत चांगदेवानी 'मंगळगंगा' म्हटले आहे. या प्रवाहावर पुलासारखे बांधकाम असून तेथूनच पूर्वेकडून मंदिरात प्रवेशता येते. या वास्तुवैभवाला बह्याकारकांची जणू दृष्ट लागली असून, कालौघात प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची मोठी पडझड झाली आहे. यातील काही दगड मंगळगंगेच्या वेगवान प्रवाहाबरोबर घरंगळत लांबवर गेले आहेत.
मंदिराच्या उत्तरेला घारापुरीच्या लेण्याची आठवण करून देणारी एक भव्य गुंफा आहे. हेच ते केदारेश्वराचे लेणे. गुहेत चौथ-यावर भव्य शिवलिंग आहे. त्याच्या चारही बाजूला बाराही महिने थंडगार पाणी असते. चौथ-याच्या चारही कोप-यावर छतापासून कोरलेले खांब असले तरी त्यापैकी तीन पूर्णपणे तुटले आहे. त्यांचा अर्धवट भाग लोंबकळत आहे. लेण्याच्या दर्शनी बाजूच्या कोरलेल्या खांबांपैकी तीन खांबावर अस्पष्ट शिलालेख दिसतात.
मंदिराच्या पूर्वेला हेमाडपंथी वापी म्हणजेच सप्ततीर्थ (सर्वतीर्थ ) आहे. या प्रशस्त तीर्थकुंडात डिसेंबरअखेरपर्यंत पाणी असते. कुंडांच्या दक्षिणेला १४ देवळयांमध्ये १४ विष्णुमूर्ती विराजमान होत्या. देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. येथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तीर्थकुंडासमोर एक छोटेखानी मंदिर असून, काशीतीर्थ नावाने ते ओळखले जाते. मंदिरासमोर एक अपूर्ण शिल्प आहे. त्याचा अर्थबोध होत नाही. या मंदिराचीदेखील मोठी पडझड झाली आहे.
तारामती शिखराच्या उत्तरेला पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी १० व्या किंवा ११ व्या शतकातील असावीत. या समूहातील दुसरे लेणे आकाराने सर्वात मोठे आहे. तिसरी गुंफा अपूर्ण अवस्थेत आहे. या गुफेचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती आहे. मूर्तीचे बरकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबरावस्थेतील गणेशमूर्ती अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. समोरच्या गणेश मंदिरातील मूर्तीदेखील दिगंबरावस्थेत आहे.
गडावर इतिहासाची साक्ष देणारे एकूण आठ शिलालेख आहेत. विशेष बाब म्हणजे विदेशी संशोधकांनी सर्वप्रथम या लेखांकडे लक्ष वेधले. जेम्स फर्गुसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांनी प्रथम यावर टिपणे तयार केली. गो. नी. दांडेकर, रा.चिं. ढेरे, वि.भी.कोलते, म.रा.जोशी, आनंद पाळंदे, राजेश्वर गोस्वामी आदींनी शिलालेखांचे वाचन केले. योगी चांगदेव आपल्या शिष्यगणांसह येथे वास्तव्यास होते. त्यांनी तत्त्वसार या ग्रंथाची रचना येथेच केली. या ग्रंथाच्या शेवटी एका ओवीत शके १२३४ ला हरिश्चंद्र गडावर ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. काळाच्या ओघात शिलालेखांचा हा पुरावा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. प्राचीन काळात हा गड धर्मपीठ म्हणून मान्यता पावलेला होता असे सांगितले जाते. त्याच्या वैभवाच्या खाणाखुणा जागोजाग विखुरलेल्या आहेत. बाह्यकारकांच्या सततच्या तुफानी हल्ल्यामुळे वस्तूवैभवाला अलीकडच्या काळात ओहोटी लागली असून, आता तर ते नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे. या वस्तूंच्या जतनासाठी व संरक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
पुरातन वस्तू शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराची व येथील लेण्यांची व इतर वास्तुरचनांची सध्या मोठी पडझड झाली आहे. गुफांमधील कोरीव लेणी सप्ततीर्थ, काशीतीर्थ व केदारेश्वराचे लेणे यांचे जतन व संरक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न नजीकच्या काळात झाले नाही तर हे प्राचीनतम वैभव नष्ट होऊन केवळ भग्न अवशेष तेवढे शिल्लक राहतील. अशी सद्यस्थिती आहे. इतिहासाची साक्ष देणारे येथील शिलालेखही सध्या आपले अस्तित्वच हरवून बसल्यात जमा आहेत. योगी चांगदेवांच्या तपोभूमीला असा बाह्यकारकांनी सुरुंग लावला आहे. तर पुरातत्त्व विभाग हा सारा प्रकार संवेदनशीलता हरवून पाहत आहे.
गडावरील कातळ शिल्पे...
हरिश्चंद्र गडावरील सर्व भूरूपे म्हणजे निसर्गनिर्मित भव्य शिल्पेच आहेत. सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील रौद्र भीषण तरीही मोहक असणारा कोकणकडा, गडाच्या माथ्यावरील बालेकिल्ला, तारामती शिखराच्या पश्चिमेकडील उतारावर एकावर एक रचल्यासारख्या शिळा दिसतात. सकृतदर्शनी ही कुणाची तरी रिकामपणाची कामगिरी वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. उन,वारा,पाऊस यासारख्या बाह्यकारकामुळे झालेल्या झीजेचा तो परिणाम असून, भौगोलिक भाषेत झाला " टॉर " असे म्हणतात.
दख्खनचे पठार ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकापासून निर्माण झाले. लाव्हा रसापासून सह्याद्रीची पर्वताची निर्मिती झाली. साडेतेरा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातून उफाळून आलेला हा लाव्हा पृष्ठभागावर क्षितीज समांतर पसरून दख्खनच्या पठाराचा जन्म झाला, असे मानले जाते. उन, वारा, पाऊस यामुळे त्याची झिज होत राहिली आणि त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. निसर्गनिर्मित अशी अनेक शिल्पे गडावर पाहायला मिळतात.
सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील कोकणकडा वर्षानुवर्षे धाडसी गिर्यारोहकांना साद घालत आहे. भ्रंश रेषेच्या एका बाजूची ( पश्चिमेची) भूमी खाली सरकल्याने कड्यासारखा अत्यंत तीव्र उतार तयार झाला. सुमारे २००० फूट खोलीचा हा सरळसोट उतार हे तर कोकणकड्याचे रौद्र भीषण तरीही मोहक वाटणारे रूप. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत अनेक कोकणकडे आहेत. पण येथील अंतर्वक्र नालाकृती कोकणकड्याची सर कोणत्याच कड्याला येणार नाही. कितीतरी वेळ बघत बसले तरी मान तृप्त होत नाही. या कड्याचे सौंदर्य, मोहकता न्याहाळताना अनामिक भितीने अंगावर काटा येतो. तरीही भयमिश्रित कुतूहलाने येथे येणारा प्रत्येकजण त्याचे ते रौद्र रूप पुन्हा पुन्हा पाहतच बसतो. डोळ्यांत साठवण्याची धडपड करतो. येथील पावसाळ्यातील धुक्याचा अनुभव तर केवळ स्वप्नवतच म्हणावा लागेल. काळजात धडकी भरविणा-या या कड्यालाही काही धाडसी गिर्यारोहकांनी अनेकदा नमविले आहे. अरविंद बर्वे नामक मुंबईकर निसर्गवेड्या तरुणाने तर स्वतःला या कड्यावरून खाली झोकून देऊन आपली इहलोकी जीवनयात्रा संपविली. गडावरच्या पाण्याची व्यवस्था नष्ट करतानाच बालेकिल्ल्यालाही या गोष्टीची झळ बसली तशीच ती कोकणकड्यालाही बसली. मार्कीन्टोश नामक ब्रिटीश सेनाधिका-याने कड्यावरच्या खोबनीची पुरती नासधूस केली.
इंद्रवज्राचा देखावा
पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे अर्धवर्तुळाकार इंद्रधनू आपण कितीतरी वेळेस पाहिले असेल! पण हेच इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! काय मज्जा येईल नाही? होय! हा अत्यंत दुर्मिळ योग पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडावर जुळून आला होता... संगमनेर येथील डॉ. नितीन बस्ते, तुषार शेवाळे आणि इतर दुर्गयात्री हा निसर्गाचा अनुपम सोहळा 'याची देही याची डोळा' पाहून पुरते हरखून गेले। होय, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर पुन्हा एकदा दिसले होते अत्यंत देखणे आणि दुर्मिळ 'इंद्रवज्र' !
या इंद्र्वज्राची आपल्याकडे म्हणजे सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटीश अधिकाऱ्याने। तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! यावेळी घोड्यावरून रपेट मारीत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेचजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.
नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर याची नोंद आपल्याला आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवलेय की, AcompanAccompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colours. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chaina tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes , description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या ५० ते ६० फुट होती. इंद्र्वज्राचे वैशिष्ट्यच असे की, जो हे दृश्य पाहातो; तो स्वत:लाच त्यात पाहातो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मधात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनूष्याचे तेजोवलय कडेला जाताना मात्र फिकट होत जाते.
इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारिक आविष्कार! त्यासाठी भौगोलिक स्थितीही तशी असायला हवी. म्हणजे कशी? तर दिवस पावसाळ्याचे असावेत। वेळ सकाळची असावी. हलका पाऊस पडत असावा आणि गडाच्या पश्चिमेकडच्या त्या अक्राळविक्राळ कोकणकड्याकडून (पश्चिम दिशेकडून) दाट धुके असलेले ढग यायला हवेत. उगवत्या सूर्यनारायणाची कोवळी किरणे दरीतून वर झेपावणा-या ढगांवर पडली की, पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या ढगांवर दिसू लागते. कड्याच्या दिशेने आपण तोंड करून उभे राहिलो की, निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. याच वेळी गडाच्या पाठारावर मात्र धुके नसेल पाहिजे. ते केवळ कड्यापर्यंत असावे. त्यामुळे अशी स्थिती जुळून येणे दुर्मिळ असते. आली तरी ते पाहायला मिळणे... हा सारा नशिबाचा, योगायोगाचा भाग. मुळात हे 'इंद्रवज्र' आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक दुर्गयात्री त्यासाठी मोठी प्रतीक्षा करीत असतात. डॉ. बस्ते आणि तुषार शेवाळे यांना हे अद्भुतरम्य दृश्य पाहण्याचे भाग्य लाभले.
साईक्सनंतर इतक्या वर्षांनी २०११ मधल्या मे महिन्यात कोणी तरी हे इंद्रवज्र पाहिलेय आणि ते कॅमे-यात बंद केलेय... हे पाहताना ते निसर्गवेडे आनंदाने अक्षरशः नाचू लागले... ‘रानवाटा’चे स्वप्नील पवार आणि इतर दुर्गयात्री सोबत होते. एका भौगोलिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले. असा हा इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी दर वर्षी निसर्गवेडे येथी कड्यावर डेरा टाकतात. पण ब-याचदा हे सारे काही जुळून येत नाही. मुळातच हरीश्चंद्रगड निसर्ग सौंदर्याने नटलेला. जैव-वैविध्याच्याबाबत तर देशभरातील उल्लेखनीय ठिकाणांपैकी एक असलेला. सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत; परंतु इथल्या कड्याला तोड नाही, म्हणजे यासम हाच असा..! येथील निसर्ग सौंदर्याचा मानबिंदूच जणू...! येथे पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडाने हा अलौकिक देखावा दाखवला आहे..!
बालेकिल्ला
हरिश्चंद्रगडाच्या दक्षिण माथ्यावर तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला व्होल्कॅनिक प्लगसारखी [ म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख] रचना दिसते. लाव्हा रस बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे हा भूभाग बाजूच्या भूभागापेक्षा उंच होतो. तोच हरिश्चंद्राचा बालेकिल्ला होय. येथून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरव, कुलंग,अलंग,मदन असा उत्तरेकडील तर माळशेज घाट, भैरव, नानाचा अंगठा. जीवधनपर्यंतचा दक्षिण पश्चिमेकडील मुलुख दृष्टीक्षेपात येतो. बालेकिल्ल्यावर जाण्यास खास असा रस्ता नाही. मस्त रान तुडवत रस्ता शोधत जाणे हाच एक मार्ग.
तारामतीच्या शिखरावरील टॉर
हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या दक्षिणेकडील शिखर म्हणजे तारामती शिखर. या शिखराची समुद्र सापतीपासुंची उंची ४७७२ फुट इतकी आहे. या शिखराच्या दक्षिणेला तीव्र उताराचा कडा आहे. या शिखराच्या धारेवरून पश्चिम बाजूला एकमेकांवर मुद्दामहूनच रचून ठेवल्यासारख्या ब-याच शीळा पाहायला मिळतात. [म्हणजे गाडग्या - मडक्याच्या उतरंडी प्रमाणे ] प्रथमदर्शनी एखाद्या रिकामटेकड्या गुराख्याची ती कामगिरी असावी असे वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नसून ऊन, वारा आणि धो- धो कोसळणा-या पावसाच्या क्रियेमुळे यातील मृदू खडकाची प्रचंड झीज होऊन त्यांचे विदारण झाले आणि कठीण खडक एकमेकांवर रचून ठेवल्याप्रमाणे दिसू लागले. भौगोलिक भाषेत याला tor असे म्हणतात. या माथ्याचे हे अत्यंत दुर्मिळ असे वैशिष्ट्य. येथेच विविधरंगी स्फटिके व खनिजेही आढळून येतात.
मात्र धोपट मार्ग सोडल्याखेरीज येथील भू-शिल्पे तुम्हाला दिसणार नाहीत. याच्या पश्चिमेला एकांटी मोठ्या दिमाखात उभे असलेले तुलनेने कमी उंचीचे शिखर म्हणजे रोहीदासाचे शिखर. तसा पुराणकाळातील हरिश्चंद्र राजा, तारामती व रोहिदास यांचा या शिखारांशी अर्थाअर्थी काही एक संबंध नसल्याचे अभ्यासक सांगतात.
रेड बोलची कपार
पाचनई गावातून गडाची चढण चढताना अंगावर येणा-या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांचा दोन थरांच्या मध्ये लाल हिरवी राख सापडते. यालाच भौगोलिक भाषेत 'रेड बोल' म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले. मोठमोठ्या भेगा पडल्या. भ्रंश झाले. त्यानंतर या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. या नैसर्गिक घटना एवढ्यावरच थांबत नाहीत. सोसाट्याचा वारा, धो- धो कोसळणारा पाऊस त्यावर तुटून पडला. उन्हाचा आणि थंडीचाही त्यावर परीणाम होऊ लागला. त्यामुळे सतत क्षरण कार्य होताच राहिले. मुळचे भू-आकार पुन्हा बदलू लागले. काही पर्वतांची उंची कमी होऊ लागली आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहांनी द-या खोल होत गेल्या. एकूण झीजेच्या ९०% झीज येथील पाऊसाने केली असून, त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली.
गड परिसरातील जैवविविधता
भौगोलिक व नैसर्गिक अनुकूलतेमुळे हरिश्चंद्र गडाच्या परिसरात जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. जैविक विविधतेच्या बाबतीत तर हरिश्चंद्राचे जंगल देशातील अतिशय समृद्ध ठिकाणांपैकी एक समजले जाते. असंख्य प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सरपटणारे प्राणी या सगळ्यांचेच येथे वैपुल्य आहे. याशिवाय गडावर स्वयंचलित वाहने जाण्याची सोय नसल्याने मानवी हस्तक्षेपापासूनही हा परिसर पुष्कळ सुरक्षित आहे.
हरिश्चंद्र गडावरील वैशिष्ट्यपूर्ण चढ - उतार विस्तीर्ण पठार, जैवविविधतेसाठी पोषक तापमान भरपूर पर्जन्यमान व जमीन यामुळे हा प्रदेश अनेक दुर्मिळ वनस्पतींचे माहेर घर बनला आहे. गडाच्या माथ्यावर उत्तराभिमुख उतारावर अशा सदाहरित जंगलाचा हिरवाजर्द पट्टा दिसतो. आणि पठारावर असंख्य अल्पजीवी वनस्पती आढळतात. त्या पावसाळ्यात सजीव होतात. येथे सुमारे ५००० मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळतो. पावसाळा सुरु झाला की एरवी भकास वाटणारी येथील पठारे हिरव्या चैतन्याने बहरतात. राजतेरडे, रानतीळ, रानकांडे, रान लसूण, सोनकी, पालेचीराईत ,डायसोफिलीया, सायप्रस, शेराला अशा असंख्य अल्पजीवी वनस्पती सर्वत्र डोकाऊ लागतात. अवघ्या पंधरवड्यात त्यांना फुलेही येऊ लागतात. जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, तांबड्या, गुलाबी, अशा विविधरंगी रंगछटांनी सगळे पठार नटून जाते. जुलै ते ऑक्टोबर या काळात तर या पठारावर फुलोत्सव सुरु असतो.
हरिशचंद्र गडाच्या परिसरात जांभूळ, रामेठा, बामणी, दिंडा, सुरुंगी, फापती, करवंद आंबा, पळस, फणस, शाल्मली, हिरडा, पळसवेल, पांढरी, आदि वृक्ष आढळतात. वृक्षांची उंची कमी असते. सरळ उंच फांद्यांऐवजी वाकड्या तिकड्या आणि एकमेकांमध्ये गेलेल्या असतात. घनदाट वृक्षांवर चढलेल्या राक्षसी वेली आणि खाली दाट उंच गवत, हे येथील जंगलाचे ठळक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी या लाकडांचा उपयोग नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उपयुक्त नसल्याने जंगल तोडीचे प्रमाण फारच कमी आहे. मात्र जैविकदृष्ट्या या वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सह्याद्रीच्या माथ्यावर १००० ते १२०० मीटर उंचीवर कारवी ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आढळते. हरिश्चंद्र गडाच्या चहू बाजूंनी तिचे विपुल अस्तित्व आहे. दर सात वर्षांनी जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरणारी ही वनस्पती फुललेल्या काळात पाहणे, ही अपूर्व आनंद देणारी घटना असते. डोंगर उतारावरील मातीचे संधारण करण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम या कारवीने केले आहे. याशिवाय तीव्र चढणीच्या अवघड पायवाटेने चढत असताना गिरीभ्रमण करणा-यांनाही कारवीचा मोठा आधार असतोच. अन्यथा डोंगर उतारावरील खोल दरीकडे पाहून अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहिले नसते. कोणत्याही रस्त्याने गडावर जाताना कारवीची भेट होतेच. सात वर्षांनी एकदा फुलते. फुले येऊन गेल्यावर कारवी मरते. पुढील वर्षी नव्या करावीच जन्म होतो. मात्र सात वर्षातून एकदा येणारा कारवीचा फुलोत्सव निसर्गप्रेमींनी आवश्य पाहावा.
या जंगलांनी अनेक जाती - प्रजातींना आश्रय दिला आहे. महाजैविक विविधता लाभलेल्या सह्याद्रीच्या पट्टयात ज्या थोड्या ठिकाणी सदाहरित जंगले टिकून राहिली आहेत. त्यापैकी हरिश्चंद्रगड हे खूपच आदर्श ठिकाण असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तारामती शिखराच्या उत्तर उतारावरील विस्तीर्ण पठारावर मोठी झाडी, झुडपे कमी असली तरी असंख्य अल्पजीवी वनस्पतींचे वसतीस्थान तेथे असते अनेक अभ्यासकांनी याविषयीचा अभ्यास आणि सर्वेक्षण केले आहे. एरवी उन्हाळ्यात वाळलेल्या गावतामुळे आणि दिवसादेखील तालात गाणा-या रातकिड्यांच्या आवाजाने भकास वाटणारे हे निर्जन पठार पावसाळ्यात मात्र चैतन्याने न्हावून निघते. पिवळी सोनकी फुलल्यावर तर सारे पठार पीतवर्णी शालू पांघरते. कळलावी, चित्रक, देवनाळ, शतावरी, पांढरी यांसारख्या दुर्मिळ औषधी वनस्पतींचा येथे आढळ आहे.
हरिश्चंद्रगडाचा परिसर कळसुबाई अभयारण्यात कोल्हे, रानडुकरे, तरस, भेकर, खेकड, ससे, बिबटे, रानमांजर, साळींदर, व भीमाशंकर अभयारण्य ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते शेकरू या परिसरात मुबलक प्रमाणात आढळते. मात्र अलीकडच्या काळात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
गरुड ससाणे, खंड्या, बुलबुल, पर्वत कस्तूर, सुतार, मोर, तित्तर, पारव, घार, सुभग या पक्ष्याचाही येथील परिसरात वावर असतो. सरपटणा-या प्राण्यांमध्ये नाग, फुरसे, घोणस, मण्यार या जातीचे अतिशय विषारी साप या भागात आढळतात. याशिवाय इतर विषारी- बिनविषारी सापांचेही वास्तव्य असतेच.
अवाजवी मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित अंतरावर असल्याने हा परिसर आपली जैविक विविधता व विपुलता ब-यापैकी टिकवून आहे. मात्र काही हौशी पर्यटकांच्या, गिर्यारोहकांच्या बेजबाबदार व चंगळवादी प्रवृत्तीमुळे होणारी हानी टाळण्याच्या दृष्टीने निसर्गाचा हा अमुल्य ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
गडावर पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढतच आहे. ३१ डिसेंबर ला तर येथे जत्रेचे स्वरूप येत आहे. येथील नितांत सुंदर निसर्ग निवांतपणा पर्यटकांना खुणावतो भावतो हे खरच परंतु येथील इतिहास भूगोल तसेच अध्यात्मिक सांस्कृतिक वारसा याबाबत यातील बहुतांश जण अनभिज्ञच दिसून येतात आजवर हरिश्चंद्रगड व परिसरावर प्रकाशझोत टाकणारे विविधरंगी संशोधन झालेले असले ते अपूर्णच वाटते. येथील प्राणी सृष्टी व भूगर्भाशास्त्राबाबतच्या संशोधनास पुरेसा वाव आहे.
येथील शिलालेखांकडे सर्वप्रथम विदेशी संशोधकांनी लक्ष वेधले. याचा उल्लेख १८८४ च्या नगर जिल्ह्याच्या ग्याझेटीअरमध्ये आढळतो. त्यात जेम्स फर्ग्युसन जेम्स बर्जेस सिंक्लेअर यांचा समावेश होता. प्रत्यक्ष शिलालेख वाचण्याचे काम वि. भि. कोलते रा. चि. ढेरे या देशी संशोधकांनी केले. याशिवाय म.रा. जोशी, आनंद पाळंदे, गो,नी,दांडेकर, राजेश्वर गोस्वामी, मिलिंद बोकील आदींनी या दूरस्थ गडाला भेट देऊन इतिहास भाषा व आध्यात्मिकदृष्ट्या अभ्यासात भर घालण्याचे काम केले. या खेरीज यात्रा पर्वात ज्ञानदेवादी भांदेदेखील येथे येऊन गेल्याचा उल्लेख एका लेखात आढळतो. तसे असेल तर गोनीदांच्या भाषेत तो लेख सुवर्णाक्षरांनीच माद्विण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
तत्कालीन ब्रिटीश अधिकाऱ्यांचेही हा गड आकर्षण बिंदू ठरल्याचे उपलब्ध कागदपत्रे व नोंदीवरून दिसून येते साईक्सं नावाच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने तर येथे बांधकामही केले होते. आजही त्याचे अवशेष येथे पाहायला मिळते. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चरीत्रातही ते ठाण्याचे उपजिल्हाधिकारी असताना (सन १९२९) येथे आल्याचा उल्लेख आढळतो. गडावरच त्यांना थडी वाजून आल्याने ढोली करून त्यांना खाली नेण्यात आल्याचा मजकूर चरित्रात आहे.
सुमारे ८०० ते १००० वर्षापूर्वीच्या शिलालेखांवरून योगी चांगदेवांचे वास्तव्य येथे होतेच याखेरीज कितीतरी योगी सिद्धसाधक येथे येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. शैव, वैष्णव तसेच शाक्त संप्रदायाचे अवशेषही येथे सापडतात.
येथील वनस्पती सृष्टीचे संशोधन ब्रिटीश काळापासून सुरसु झाले आहे. १९०८ सालात तत्कालीन मुंबई इलाख्याचे (बॉम्बे प्रेसिडेन्सी ) वान्स्प्तीशास्रज्ञ डॉ. कुक यांनी येथील झाड - झाडोऱ्याचा अभ्यास केला. १९६९ मध्ये पुणे येथील वनस्पती संरक्षणालयातील डॉ.बिलोरी व डॉ. हेमाद्री या दुकलीन येथील ३३० जातींच्या वनस्पतींची नोंद्केली आहे. याच विभागातील डॉ. सिंग व डॉ. प्रधान यांनी १९९० मध्ये गडाला भेट देऊन अभ्यास केला. तर अलीकडच्या काळात संगमनेर येथील संशोधक प्रा. डॉ. मोहन वामन यांनी येथील वनस्पती सृष्टीचा तपशीलवार अभ्यास केला असून येथील वनस्पतीसृष्टीचे आजवरचे हे सर्वात महत्वाचे संशोधन मानले जाते. वैशिष्ट्यांनुसार विश्लेषण करणाऱ्या डॉ. वामन यांनी ६२९ वनस्पतींची नोंद केली आहे. यात देशभरातूनच नामशेष होण्याच्या मार्गावरील ८० औषधी वनस्पतींचे अस्तित्व त्यांनी शोधून काढले आहे. तर १६ प्रकारच्या ऑर्कीड जातीच्या वनस्पती त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
भीमाशंकर अभयारण्य ज्या शेकरू जातीच्या खारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. ती शेकरू येथील तोलार खिंड परिसरात बऱ्यापैकी संखेने दिसून येते. इतरही विविध प्राण्यांचे वसतीस्थान येथे आहे. असे असले तरी येथील प्राणीसृष्टीवर मात्र हवा तेवढा अभ्यास झालेला दिसत नाही. याचप्रमाणे येथील भूगर्भ शास्राच्या अभ्यासालादेखील बराच वाव असल्याचे दिसून येते. येथील निरनिराळ्या रंगांचे खडक संशोधकांना का खुणावत नाहीत असाही प्रश्न वाटेवरून जाताना पडल्याखेरीज राहत नाही.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे, पाचनई, लव्हाळी, कुमशेत, खिरेश्वर येथील आदिवासींचे गडाशी भावनिक नाते जुळलेले आहे. मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने हे लोक दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जाऊन हरिश्चंद्रेश्वराला अभिषेक घालतात. अर्थातच गडाच्या इतर वैशिष्ट्यानबाबत. हे अनभिज्ञच असावेत.
मानवी हस्तक्षेपापासून पुष्कळ दूर असल्याने शेकडो वर्षापूर्वी जसा होता तसाच हरिश्चंद्रगड आजही आहे. बह्याकारकांच्या आक्रमणाला तोंड देत आजही तो ताठ मानेने उभा आहे. त्याला यापुढेही तसेच राहू द्यावे .........हीच अनेकांची अपेक्षा आहे.
भाऊसाहेब चासकर,
अकोले
No comments:
Post a Comment