अलंग, मदन व कुलंग भटकंती
हिरवी धुंदी लेवून न्हाली
डोंगरातील वाट,
गडदुर्गांच्या भटकंतीतून
अनुभवा सह्याद्रीचा थाट !!!
कोणत्या ठिकाणाचे भाग्य केव्हा उजळेल, हे सांगता येत नाही. कधी कोणाचा कुठे जाण्याचा बेत आखला जाईल याचाहि ट्रेकर्सच्या बाबतीत काही नेम नसतो.. चार चाकी नसलं तरी दुचाकी वाहनातून छोट्या-मोठ्या सहलींना जाणं खूप जणांना अप्रूप वाटतं. पण नेहमीच्या ठिकाणांपेक्षा जरा वेगळे आणि इतरांना अपरिचित ठिकाणी जाणे काही जातिवंत भटक्यांना नेहमीच खुणावत असतं. यातून विशाल नाईकवाडी, सुरेश भालेराव, विठ्ठल गोरे व मी राजू ठोकळ असा चौघांचा अचानक बेत ठरला आणि सह्याद्रीतील अकोले तालुक्याच्या कुशीतील दुर्गत्रिकुट अलंग, मदन व कुलंग (AMK) सर करण्याचा निर्णय झाला. गडांवर जाणे फारच जिकीरीचे काम आहे असे ऐकले असल्याने सोबत गाईड म्हणून एकनाथ खडके यांना घाटघर (ता.अकोले) येथून सोबत घेतले. सोबत ट्रेकिंगसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य, तीन दिवस पुरेल इतके खाद्य पदार्थ आठवणीने घेतले होते.
दुपारच्या उन्हात आम्ही अलंग गडाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. रस्त्याने सह्याद्रीच्या कुशीतील विविध वृक्ष नजरेस पडत होते. चालण्याचा वेग काही नाविन्यपूर्ण वृक्षांजवळ कमी होत होता. पण अधिक वेळ थांबणे उचित ठरणारे नसल्याने आम्ही तसेच आमचा चालण्याचा वेग वाढवत होतो. काही अंतर चालल्यानंतर पाठीवरील बि-हाड जरा जड वाटायला लागले होते. परंतु सर्वच गरजेच्या वस्तू असल्याने तो भार आम्ही गडाच्या माथ्याकडे पाहत सहन करत होतो. मध्येच गाईड परिसरातील वृक्ष, प्राणी, गावे आदींची माहिती करून देत होतो. सर्व माहिती आम्ही मनात साठवत व काही निरीक्षण करत सह्याद्रीच्या प्रेमात रमत-गमत चालत होतो. सूर्य जसजसा मावळतीकडे सरकत होता तसतसे आम्ही अधिक वेगाने आमची पावले गडाच्या दिशेने टाकत होतो. कारण अलंग गडावर जाण्यासाठी एक सहा-सात फुटांचा कातळकडा (Rock patch) आम्हाला पार करायचा होता. शेवटी आम्ही काहीसा अंधारातच परंतु अधिक सावधगिरीने हा टप्पा पार केला. यात विशालचा अधिक कस लागला. परंतु काहीसा धीर दिल्याने त्यानेही हा टप्पा अलगद पार केला. हा टप्पा पार करत असताना रात्रीच्या स्वयंपाकासाठी वाळलेली लाकडे गोळा करत आम्ही पुढे सरकू लागलो. वाटेत एक दरवाजा लागला परंतु अंधार अधिक असल्याने आम्हाला येथे अधिक निरीक्षण करण्यास संधी मिळाली नाही. येथून पुढचा प्रवास आम्हाला अधिक सावधरीतीने पार करायचा होता कारण उजव्या बाजूला नजर पोहोचणार नाही इतके गगनभेदी कातळकडे तर डाव्या बाजूला हृदयाची स्पंदने धडधड करायला लावणारी खोल दरी होती आणि त्यात सोबतीला अंधार होता. चालताना चुकून पायाखालचा दगड जर सरकला तर तोल जावून दरीत कोसळण्याची भीती यामुळे काहीसे सावध आम्हीं एकमेकाला सुचना करत पुढे सरकत होतो. हातातील विजेरीच्या साहाय्याने आजूबाजूला काही किल्ल्याचे अवशेष आहेत का याचाही शोध मात्र आमच्या नजरेला स्वस्थ बसू देत नव्हता. काही अंतर पार केल्यानंतर दगडातील काही कोरीव गुहा अंधारातच न्याहाळत आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी रात्री काहीशा उशिराने आम्ही गडावरील एका गुहेत मुक्कामासाठी पोहचलो. पाठीवरील ओझे हलके झाल्याने त्या काळ्याकुट्ट अंधारात आम्ही गुहेची रचना, कोरीव काम, गुहेतील पाण्याची सोय आदींचे निरीक्षण केले. गडावरील हि सर्वात मोठी राहण्यासाठी योग्य असणारी गुहा आहे.
दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. किल्ले भटकंती करताना सूर्योदय पाहणे हा आमचा खास छंद असल्याने आम्ही त्याचा मनसोक्त आनंद घेतला. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. यातील काही टाक्यांमध्ये बाराही महिने पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. मंदिराजवळ एक शिलालेख आपणास दिसतो. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसत असल्याने मनात एक वेगळा आनंद आम्ही साठवत होतो. पूर्वेला कळसूबाई, औंढाचा किल्ला, पट्टाकिल्ला, बितनगड, उत्तरेला हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर वातावरण स्वच्छ असल्याने सहज नजरेत पडत होता. किल्ल्याचा माथा फिरून झाल्यानंतर मदन किल्ल्याकडे जायचे असल्याने आम्ही परत मुक्कामाच्या ठिकाणी येवून आमचे साहित्य आवरले....पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या व पुढील प्रवासास सुरुवात केली.
अलंग गडावरील सपाटीची वाट संपल्यानंतर उताराची आणि काहीशी अवघड कातळात कोरलेल्या पाय-यांची वाट लागली. समोरच खाली खोल दरी दिसत असल्याने एक-एक पायरी उतरणे जरा अवघड वाटत होते. पाठीवर ब्याग असल्याने उतरताना मागे लागून पुढे तोल जाण्याचा धोका अधिक होता. त्यामुळे प्रत्येकजण अगदी जीव मुठीत धरून खाली उतरत होता. आम्ही या पाय-या उतरून एका लहान गुहेपर्यंत आलो. येथून पुढे जाण्याचा मार्ग दिसत नव्हता. येथून पुढच्या पाय-या इंग्रजांनी सुरुंग लावून तोडल्या असल्याचे एकनाथ खडके यांनी सांगितले आणि एकच तिडीक आमच्या मस्तकात गेली. परंतु मनातील आग सावरत आम्ही ५० फुटांचे प्रस्तरारोहण करण्यास सज्ज झालो होतो. गाईडने रोप व त्यासाठी आवश्यक असणारी इतर सर्व तयारी पूर्ण केली होती. तसेच काही सूचनाही आम्हाला देत होता. काहींची प्रस्तरारोहणाची पहिलीच वेळ असल्याने अगोदर कोण जाणार याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच विशाल नाईकवाडी सर्वात प्रथम खाली आला. त्याचा प्रवास बघून इतरांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे सुरक्षितपणे सर्वांनी तो कातळकडा पार केला. या पुढे कातळात काही पाय-या लागल्या. त्यांची रचना स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यानंतरच्या गुहेत काही जणांच्या राहण्याची सोय होवू शकेल इतकी जागा दिसली.
अलंगगडाची उतरण संपल्यानंतर गडाच्या मध्यावधी भागातून अगदीच उंच कातळकड्यांच्या जवळून मदन गडाचा रस्ता आम्ही कारवीच्या झाडांमधून शोधत पुढे सरकत होतो. रस्त्यात अनेक कडे कोसळलेले अन काही कोसळण्याच्या अवस्थेत दिसले.....मन अगदीच धस्स होत होते. सह्याद्रीचा हा अनमोल खजिना असा उपेक्षित असल्याने मनावरचे दडपण अधिक वाढत होते. काही अंतर पार केल्यानंतर मदन गडावर जाणा-या कातळातील पाय-यांनी लक्ष वेधले. मग मनात चलबिचल सुरु झाली कधी एकदाचा त्या पाय-या स्वताच्या हातांनी स्पर्श करतो....स्वताच्या श्वासाने पाय-यांचा सुगंध अनुभवतो.....स्वताच्या मनाने येथील इतिहास जाणतो.
अगदीच समोर दिसणारा मदन गड पण प्रत्यक्ष पोहचण्यास आमची काही प्रमाणात दमछाक होत होती. कातळातील सुबक पाय-या वादळ, वारा, ऊन, पाऊस झेलत आजही प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. या पाय-या पाहून झालेला आनंद मनात साठवत पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा इंग्रजांनी अगदीच कुत्सितपणे सुरुंग लावून पाय-या उडवून दिल्याने तयार झालेला सुमारे ५० फुटांचा कातळकडा नजरेस पडला. मदन गडाच्या माथ्यावर जायचे असेल तर या कड्यावर प्रस्तरारोहण करावे लागते. त्याशिवाय गडावर जाणारी दुसरी वाट नाही. येथील प्रस्तरारोहण केल्यानंतर आम्ही गडाच्या माथ्यावर कातळातील काही पाय-या चढून पोहचलो आणि जणू काही स्वर्गात आल्याचा अत्यानंद झाला. गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी शिल्लक राहत असावे असे वाटते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसत होता. मदनगडावरून अलंग, कुलंग, छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई, डांग्या सुळका, हरिहर, त्रिबंकगड हे किल्ले आम्हा सर्वांचे लक्ष्य वेधत होते. दूर अंतरावरून दिसणारे मदनगडावरील नेढ मात्र गडावरून दिसत नव्हते. गडावर अधिक वेळ न वाया घालवता आम्ही गडावरील टाक्यांतील पाणी पिऊन परतीच्या प्रवासाला लागलो. मदनगडाचा अवघड कातळकडा व दगडी पाय-या उतरल्यानंतर आम्ही कुलंग गडाच्या दिशेने आमचा प्रवास सुरु केला.
दुपारचा आकाशात तळपणारा आणि दोन दिवस पाठीवरील ओझे घेवून चालत असल्याने येथून पुढचा कडेकपारीतून जाणारा रस्ता पार करत असताना अधिक जिकीरीचे वाटत होते. त्यात वाट घसरणारी असल्याने अधिक सावधगिरी बाळगावी लागत होती. मदन ते कुलंग असे अंतर खूप होते आणि आमच्याकडे वेळ कमी होता. सूर्यास्त होण्याच्या अगोदर आम्हाला कुलंग गडाच्या माथ्यावर पोहोचणे आवश्यक आहे अशा सुचना गाईडने दिल्या होत्या. त्यामुळे अधिक इतरत्र कुठे न थांबता आम्ही सभोवतालचा निसर्ग न्याहाळत अंतर पार करत होतो. शेवटी सूर्य मावळतीकडे कलला होता. सभोवताली अंधार पसरला होता आणि आम्ही कुलंग गडाच्या पाय-या चढायला सुरुवात केली होती. या गडावर कातळात कोरलेल्या पाय-यांची संख्या इतर दोघांच्या तुलनेत अधिक आहे. त्यात या पाय-या चढत असताना अगदीच कड्याच्या काठालगत पाय ठेवून जावे लागत असल्याने खूप मोठी खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागत होती. पुढे आल्यानंतर गडावरील दुस-या क्रमांकाचा दरवाजा आजही चांगल्या अवस्थ्येत असल्याने मनाला खूप बरे वाटले. काळाकुट्ट अंधार पडायच्या आत आम्ही गडावरील पाण्याच्या टाक्यांजवळ पोहचलो. टाक्यांतील पाणी पिऊन सर्व थकवा कुठे गायब झाला आणि मन कसे प्रसन्न झाले हे क्षणार्धात आम्हाला कळले नाही. या प्रसन्न मनाने आम्ही गडावरील गुहेत मुक्कामासाठी पोहचलो. गडावर कातळकड्यांमध्ये दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य असल्याने आम्ही निवांतपणे तेथे विसावलो.
सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा सर्वजण कुलंग गडावरून सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. सूर्याच्या दर्शनाने संपूर्ण भटकंती सफल झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होते. यानंतर सर्वांनी गडावरील अवशेष पाहाण्यास सुरुवात केली. कुलंगचा दुसर्या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे. गुहे जवळ थोडे पुढे पाण्याची २-३ टाकी आहेत. यातील पहिल्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही टाकी बर्यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटले. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर गेलो. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन झाले.
कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी आल्यानंतर पाण्याचे प्राचीन काळातील नियोजन किती उत्कृष्ट होते याची जाणीव झाली. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. कुलंगवरील एका घळीपाशी आल्यानंतर घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळाला. या घळीत वरील बाजूने येणार्या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसला. या बांधार्याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडण्याची व्यवस्था केलेली आहे. दुर्दैवाने हे गोमुख तुटलेले दिसल्याने माझ्या मनाला खोलवर तडा गेला. कुलंग गडावरून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होत होते. दूरवर कळसूबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसत होते. पश्चिमेकडे रतनगड व बाजूचा खुट्याचा सुळका पाहून तीन दिवसांत सह्याद्री आम्हास प्रसन्न झाल्याचा आनंद होत होता.
अलंग, मदन व कुलंगच्या भटकंतीत आम्हाला सह्याद्रीच्या अनोख्या रूपाचे दर्शन झाले. तसेच बऱ्याचश्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आपणच सह्याद्रीची योग्य ती निगा राखली तर येणाऱ्या काळातही इतरांना त्याचे हे रूप अनुभवता येईल. सह्याद्रीने आपल्याला भरभरून दिलेले आहेच पण आता मात्र त्याचं काहीतरी देणं लागतो ही भावना लक्षात घेण्यासारखी आहे. आपापल्या परीने आपण जमेल तेवढं सह्याद्रीला आणि येथील निसर्गसौंदर्याला जपायला हवं....का कोण जाणे तुम्हाली बघून इतरही प्रेरित होतील आणि परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
|
Friday, March 6, 2020
अलंग, मदन व कुलंग भटकंती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment