Monday, April 25, 2011



निर्दयी मातेने टाकून दिलेल्या मुलास ‘ममत्वा’मुळे जीवदान!Bookmark and SharePrintE-mail
राजूर, २४ एप्रिल/वार्ताहर
माता न तू वैरिणी, तसेच देव तारी त्याला कोण मारी ही सर्वपरिचित म्हण आहे. या म्हणींचा प्रत्यय आज येथे लहान बाळाबाबत आला. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एक-दीड महिन्याच्या या बालकाला त्याची निर्दयी माता येथील विठ्ठल मंदिराच्या पायरीवर ठेवून निघून गेली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यावर पत्रकार शांताराम काळे व मंदिर ट्रस्टने या बाबत राजूर पोलिसांत खबर दिली. ग्रामीण रूग्णालयात आजच प्रसुती झालेल्या सहृदयी दोन महिलांनी आपले दूध दिल्याने या मुलास जीवदान मिळाले. नगरच्या स्नेहालय संस्थेकडे बाळास सुपूर्द करण्यात आले.
पहाटेच्या वेळी अंधाराचा फायदा घेत एका महिलेने शालीमध्ये गुंडाळून या मुलास मंदिराच्या पायरीवर ठेवून ती निघून गेली. गौरवर्ण, गोल चेहरा असलेले हे मूल सकाळी मंदिरात काकडआरतीस आलेल्या जगन्नाथ शिंदे यांनी पाहिले. त्यांनी मंदिराचे ट्रस्टी विद्याधर कवडे, भीमाशंकर कवडे यांना कळविले. त्यांनी पत्रकार शांताराम काळे यांच्या लक्षात ही बाब आणली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दूरध्वनी करून माहिती दिली. राजूर पोलिसांनी या मुलास ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
भूक लागल्याने हे मूल रडू लागले. रूग्णालयात दोन महिलांची प्रसुती झाली. त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी आपले दूध पेल्यात काढून दिले. महिला कॉन्स्टेबल मीरा दांगडे यांनी चमच्याने ते मुलास पाजले. त्यानंतर हे मूल शांत झाले. जन्मदाती वैरी झाली. परक्यांनी मातेचे ममत्व दाखविले आणि खाकी वर्दीतूनही मायेची उब मिळाल्याने हे मूल शांत झाले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले. नगरच्या स्नेहालय संस्थेशी राजूर पोलीस व पत्रकारांनी संपर्क साधला. स्नेहालयने गाडी पाठवून मुलाच्या संगोपनाची व पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली व मुलास नगरला घेऊन गेले. काही वेळाने गावातील दोन जोडपी या मुलास दत्तक घेण्यास आली होती. मात्र, तोपर्यंत मूल नगरला रवाना झाले होते. पोलीस त्या निर्दयी महिलेचा शोध करीत आहेत.

1 comment: