Monday, April 25, 2011


राजूर, २५ एप्रिल/वार्ताहर
सध्याच्या शिक्षण पद्धतीतील उणिवांवर नेमकेपणाने बोट ठेवत, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ामुळे (२००५) यावर मात करणे कसे शक्य आहे, यावर मर्मग्राही भाष्य करीत वेतानासाठी नव्हे तर आनंदासाठी काम करण्याचा संदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक नंद कुमार यांनी दिला.
येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान व दादासाहेब रूपवते फाऊंडेशन यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन राजूर येथील एम. एन. देशमुख महाविद्यालयात केले होते. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी शिक्षकांशी संवाद साधला.
नंद कु मार यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न उपस्थित केले. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. बाहेरून तज्ज्ञ बोलावण्याची गरज नाही, तर प्रत्येक शिक्षक तज्ज्ञ बनू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने एखादा विषय निवडावा. त्याचा खोल अभ्यास करावा. व्यासंग वाढवावा. सकारात्मक विचार करावा. प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाचा स्त्रोत असतो. त्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांकडे पाहावे. हाच ज्ञानरचनावादाचा पाया आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई चौहान यांनी शिक्षण व बाल हक्क यावर मार्गदर्शन केले. बालकांच्या हक्कांची जपणूक करण्यावर त्यांनी भर दिला. राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वरिष्ठ सल्लागार गीता महाशब्दे यांनी कृतीशीलतेतून गणित शिकवणे कसे सोपे व सुलभ होते याचे प्रात्यक्षिकच सहभागी शिक्षकांकडून करून घेतले.
प्रा. शाहीर तुळशीराम जाधव यांनी गिते सादर केली. समिक्षा संध्या मिलिंद यांनी मुलींचे शिक्षण या विषयावर एकपात्री नाटिका सादर केली. उद्घाटनाच्या सत्रात बोलताना बहुजन शिक्षक संघाचे विश्वस्त प्रेमानंद रूपवते यांनी शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी कार्यशाळा, शिबिरे यांची गरज असल्याचे सांगितले. अकोले तालुका शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत आभाळे, प्राचार्य टी. एन. कानवडे यांचीही भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर, उपशिक्षणाधिकारी उमेश डोंगरे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांनी कार्यशाळेस भेट दिली.
उत्कर्षां रूपवते, भाऊसाहेब चासकर, भाऊसाहेब कासार, अनिल पवार, अरूण जाधव, दत्तात्रय शेळके, नितीन नेहे, बाळासाहेब शेळके, भाऊसाहेब हासे, राजकमल नवले, अनुराधा नेहे, प्रकाश पारखे, मंजुषा काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.    

1 comment: