स्थळ होते राजूर गावातील अँड़ मनोहरराव नानासाहेब देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय. राजूर हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. तसं कुठं लांब नाही. मुंबईच्या जवळ असलेल्या शहापूर, घोटी वगैरे रस्त्याने अहमदनगरमध्ये प्रवेश करायचा. राजूरला पोहोचायला साधारण ३ तास लागतात. रस्ता त्यातल्या त्यात बरा आहे. राजूर हे दहा हजार वस्तीचे गाव. अकोले तालुक्यातील मोठी बाजारपेठ, शिवाय मोठे शिक्षण केंद्र. या गावात अँड़ मनोहरराव नानासाहेब देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय असून सर्व शाखांमधून साडेतेराशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास आम्ही पाच मित्र मुंबईतून गेलो होतो. मी होतोच. माझे मित्र ज्येष्ठ साहित्यिक व प्राध्यापक प्रवीण दवणे होते. सुप्रसिद्ध अंतर्गत सजावट तज्ज्ञ व ज्येष्ठ स्तंभलेखक दिलीप प्रधान होते. त्यांच्याच आग्रहामुळे मी हे निमंत्रण स्वीकारलेले होते. त्यांच्यासोबत आम्हा दोघांचे मित्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सिने समिक्षक अशोक राणे हेही होते. शिवाय मुलुंड जिमखान्याचे सचिव अँड़ प्रद्युम्न मोकाशी आणि मुलुंडचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे हेसुद्धा आमच्याबरोबर होते. मुलुंडचे ख्यातनाम वकील अँड़ मनोहर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा दौरा होता. गेल्या आठवड्यात बुधवार व गुरुवार असा दोन दिवस आम्ही राजूर परिसरात प्रवास केला. पायी फिरून आम्ही महाविद्यालय व परिसर पाहिला. महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेले लहानमोठे अनेक उपक्रम आम्ही पाहिले. तेथे काम करणार्या, रहाणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आम्ही भेटलो. त्यांच्याशी बोललो. गप्पा मारल्या. संस्थेने, महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा, त्यातील अडचणी इत्यादींबद्दल त्यांच्याकडे विचारपूस केली. माहिती करून घेतली. प्रत्यक्ष प्राचार्य टी. एन. कानवडे, त्यांचे सहकारी, काही ग्रामस्थही स्वत: आमच्याबरोबर फिरले. त्यांनी महाविद्यालय व परिसरातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी-विद्यार्थिनींशी भेट घडवून आणली. अगदी अगत्यपूर्वक, आस्थापूर्वक. 'सत्य-निकेतन' या संस्थेतर्फे हे महाविद्यालय चालविले जाते. 'सवरेदय योजना' म्हणून ओळखल्या जाणार्या विकास प्रकल्पातून ही संस्था उदयास आली. १९५0 पासून तिने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या परंतु प्रत्यक्षात अहमदनगरच्या वायव्य दिशेला असलेल्या अकोले तालुक्यातील दीनदुबळ्या आदिवासी बांधवांचा सर्वांगिण विकास व्हावा या एकमेव उद्देशाने ही संस्था स्थापन केली गेली. आदिवासी, डोंगराळ, अतिदुर्गम भागात राहणार्या आदिवासी बंधुभगिनींना शाश्वत रोजगार उपलब्ध करून त्याद्वारे शोषणमुक्त एकात्मिक समाजाची उभारणी हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट. परंतु शिक्षणाशिवाय पुढची प्रगती करणे अशक्य असल्याचे ध्यानी येताच संस्थेने शैक्षणिक कार्याला प्राधान्य दिले. यातूनच राजूर येथे महाविद्यालय सुरू केले. हे वर्ष होते १९९३-९४. सुरुवातीला सवरेदय मंदिराच्या इमारतीतच महाविद्यालय सुरू केले गेले. अडचणी अनंत होत्या. म्हणतात ना धावत्याला शक्ती येई आणि मार्ग साप.डे तसे या संस्थेचे झाले. कालांतराने याच भागातले एक भूमिपुत्र मुंबई निवासी अँड़ मनोहरराव नानासाहेब देशमुख यांची भेट झाली. शिक्षणापासून सर्वतोपरी वंचित असणार्या आणि सर्वच दृष्टीने मागास राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या या महाविद्यालयाला आपण सहाय्य केले पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले आणि मग त्यांनी या महाविद्यालयावर अगदी आवश्यकतेनुसार देणग्यांचा वर्षावच केला. त्यांच्या या उदार देणग्यातूनच भव्य व अतिशय आकर्षक अशी इमारत उभी राहिली. दुसरे एक दाते प्रकाशशेठ शहा यांच्या मदतीने ग्रंथालयाची इमारत साकारली. विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मदतीने मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या इमारती, विज्ञान भवन, विविध विषयाच्या प्रयोग शाळा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली संपर्क यंत्रणा, अभ्यागत निवास, कुस्त्यांचा आखाडा, इनडोअर स्टेडियम अशा इमारती एकामागून एक उभ्या राहत गेल्या. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या सायफन, कँटिन, सौरऊर्जा, पवनऊर्जा प्रकल्प, काँक्रीट ब्लॉक प्रकल्प, 'कमवा व शिका'अंतर्गत भाजीपाला लागवड, गांडुळ खत प्रकल्प असे उपक्रम उभे राहिले. अगदी गेल्या वर्षी उभा राहिला निसर्गाच्या कोंदणात कोहिनूर हिर्यासारखा चमकणारा 'जलतरण तलाव'. इथले दृश्य दृष्ट लागावे असे आहे. मराठी, हिंदी, सिनेमाच्या शूटिंगला उपयोगी पडावे असे! या महाविद्यालयाच्या एकूणच कामाची आणि प्रगतीची दखल घेऊन पुणे विद्यापीठाने 'उत्कृष्ट महाविद्यालय' असा किताब या महाविद्यालयाला बहाल केला आहे. आम्हा मुंबईतून गेलेल्या पाहुण्यांना या महाविद्यालयाची ही कर्तबगारी तशी फारशी माहीत नव्हती. परंतु आम्ही तेथे जे काही पाहिले, ऐकले, अनुभवले त्यावरून हे महाराष्ट्रातील एक चांगले महाविद्यालय असावे असं आमच्यापैकी प्रत्येकालाच वाटले. कारण त्यानंतर झालेल्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात आम्ही सगळ्यांनीच हातचे काही न राखून ठेवता महाविद्यालयाचे तसेच त्याला हे भव्य वैभव प्राप्त करून देणार्या प्राचार्य, प्राध्यापक, सेवक वर्ग, देणगीदार आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी या सर्वांचे कौतुक केले. मला तर वाटते की, हे महाविद्यालय पुणे विद्यापीठ क्षेत्रातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाचे महाविद्यालय असावे. महाविद्यालय म्हणजे केवळ भव्य-दिव्य आणि सुंदर इमारत नव्हे! इमारतीतून वावरणारे प्राध्यापक कोणाला आणि कसे शिक्षण देतात आणि तेथील सेवक कुणाची व किती जीव ओतून कशी सेवा करतात ही गोष्ट महत्त्वाची. त्याहीपेक्षा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी कोणत्या समाजातून कसे आले हेसुद्धा महत्त्वाचे. ९२/९५ टक्के गुण मिळवणार्या उच्चस्तरीय पालकांच्या मुलांनाच प्रवेश देऊन शंभर टक्के निकाल लावणारी महाविद्यालये मुंबई-पुण्यात अनेक आहेत. परंतु मुळात ज्यांच्या अनेक पिढय़ांना शिक्षणाच्या झरोक्याचेही दर्शन न झालेल्या उपाशीपोटी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणून त्यांना सर्वार्थाने उभे करणे ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. राजूरचे हे महाविद्यालय सुमारे पन्नास-साठ दुर्गम खेड्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आणून अशा प्रकारे उभे करत आहे. त्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते वर्षानुवर्षे खेड्यापाड्यात पायपीट करून लोकांची समजूत घालून विद्यार्थी मिळवित आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा आर्थिक भार त्यांच्या आर्थिकदृष्ट्या कफल्लक पालकांवर पडू नये यासाठी अहोरात्र धडपडत आहेत. कारण पालकांच्या दृष्टीने मुला-मुलींना शाळेत, महाविद्यालयात घालणे ही एकप्रकारची चैन आहे व ही चैन त्यांना परवडणारी नाही. अशा या धडपडीतूनच गेल्या आठ-दहा वर्षांत शेकडो आदिवासी मुलं शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन जीवनाची पुढची वाटचाल करण्यासाठी येथून बाहेर पडली आहेत. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटवत आहेत. ही गोष्ट खरोखरच अभिमानाची आहे. ही एक प्रकारची क्रांतीच आहे आणि ती इथे घडत आहे. अर्थात ही क्रांती एका दिवसात घडलेली नाही. त्यासाठी या भागातील ग्रामस्थांनी, अनेक कार्यकर्त्यांनी घाम गाळला आहे आणि रक्तही आटवले आहे. अशा प्रकारे मोलाचे योगदान देणार्यांत आघाडीवर आहेत ते या महाविद्यालयाचे प्राचार्य टी. एन. कानव.डे कानवडे पती-पत्नींने संस्थेच्या कार्याला अक्षरश: वाहूनच घेतले आहे. दिवसाचे २४ तास, महिन्याचे ३0 दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस महाविद्यालय व त्यातील विद्यार्थी यांचाच विचार. त्यासाठी ते कॉलेजजवळ आणि परिसरातच राहतात. त्यामुळे एखादे बांधकाम सुरू असताना प्रा. कानवडे पहाटे तीन वाजता उठून पाणी मारताना दिसले तर कोणाला आश्चर्य वाटत नाही. रस्त्यातून चालताना वाटेत पडलेले शेण उचलून ते त्यांनी झाडाच्या मुळापाशी ठेवले तर कोणी बुचकाळ्यात पडत नाही. विद्यार्थ्यांकडे ते मोठय़ा मायेने बघतात. वागवतात. घडवतात. त्यांना अँड़ मनोहर देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आश्रयदाते म्हणून लाभले आहेत. महाविद्यालयासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही मागू ते देशमुखसाहेब देतील अशी प्रा. कानवडे व त्यांच्या सहकार्यांना खात्री आहे, तर दुसरीकडे आपण दिलेल्या देणगीतील प्रत्येक पैशाचा निश्चितपणे सदुपयोग होणार यावर देशमुख कुटुंबीयांचा कमालीचा विश्वास! इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांची ही दोन दैवते आहेत. आपल्या या दैवतांच्या खांद्यावर मोठय़ा विश्वासाने मान ठेवून ही मुले मोठय़ा उत्साहाने राजूरच्या शैक्षणिक गंगोत्रीत डुबत आहेत. या मुलांपैकी अनेक मुले उद्या राज्यपातळीवर, देशपातळीवर निरनिराळय़ा क्षेत्रांत चमकतील आणि स्वत:च्या आईवडिलांबरोबरच, या महाविद्यालयाचे व राजूरचे नाव उज्ज्वल करतील, यात काही शंका नाही. |
Sunday, March 3, 2013
rajur colledge
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment