Thursday, May 14, 2020

ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शाळांना उन्हाळ्याच्या सुट्टीला जोडून सुट्टी मिळाली आहे. विद्यार्थ्याबरोबर पालक देखील घरीच आहेत. त्यामुळे कधी नाही इतके कुटुंब एकत्रित अधिक काळ दिसू लागले आहे; पण या काळात स्नेहबंध वृध्दींगत होण्याऐवजी सर्वांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय होणार याची चिंता अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून विविध मार्गाने पर्याय शोधून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील याचा विचार सुरू आहे. सुट्टीतील अभ्यासासाठी समाज माध्यमांवर स्वतंत्र गट सुरू झाले आहेत. त्या गटावर अभ्यासासाठी देखील स्पर्धा आहे. त्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना शाळा परवडली; पण हा अभ्यासाचा महापूर नको अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सध्याच्या सुट्टीत घर या शाळा झाल्या आहेत. त्यामुळे घरात सुट्टीच्या काळात मिळणारा आनंद गमावला जातो आहे का ? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.
सध्या सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो आहे. त्यातच शासनानी प्राथमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापनाशिवाय पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना आनंद आहे आणि पालक मात्र त्या निर्णयावर नाराज आहेत. मुलांसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. नवे काय शिकतो आहोत असा प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो आणि पालकांना मार्क किती मिळाले हे महत्त्वाचे असते. विद्यार्थी सर्व विषयात पारंगत असायला हवा. त्यातही त्याला पैकीच्या पैकी मार्क हवेत या पालकांच्या हव्यासापायी विद्यार्थ्यांचा सुट्टीत देखील आनंद हरवला आहे.
या सुट्टीत बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी सध्या समाज माध्यमांवर अभ्यास, स्वयंअभ्यास आणि स्वाध्यायाचा महापूर दाटला आहे. रोज किमान चार-पाचशे लिंक, व्हिडीओ, स्वाध्यायाच्या पीडीएफ उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी सतत मोबाइलच्या भोवती रमत आहेत. पालकही विद्यार्थ्यांना अभ्यास आहे म्हणून मोबाइलचा वापर करण्यास, हाताळण्यास मुक्तपणे हाताळणी करण्यास अनुमती देत आहेत. मोबाइलच्या अतिरिक्त वापराने त्याचा विपरित परिणाम म्हणून मुलांचे डोळे आळशी बनू पाहतील. असे अनेक नेत्र तज्ज्ञांचे मत आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाचा लॉकडाऊन उठल्यानंतर नेत्रविकाराला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे. जगभरात विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करून साधारण किती वेळ मोबाइल स्क्रीन विद्यार्थ्यांना हाताळू द्यावा या संदर्भात काही मर्यादा असल्याचे सांगण्यात येते. अर्थात ही वेळ अगदी दहा मिनिटांपासून 30 मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना हाताळू द्यावे. काही अभ्यासकांच्या मते दहा वर्षापर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती मोबाइलच देऊ नयेत. अर्थात सातत्याने मोबाइलचा वापर झाल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर आणि मनावर देखील त्याचा परिणाम होईल यात शंका नाही. अगदी मोठी माणसे देखील मोबाइलच्या आहारी गेल्यावर त्यांच्यावर परिणाम झाल्याच्या अऩेक घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे आजारी पडलेल्या रूग्णावरती उपचार करण्यासाठी स्वतंत्र दवाखाने उघडावे लागतील अशा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याच्या नादात पालक मुलांचे आजारपण विकत तर घेत नाहीत ना? अशी शंका उपस्थित होते.
त्याचवेळी हा येणारा अभ्यास खरंच विद्यार्थ्यांना आऩंद देणारा आहे का? विद्यार्थ्यांचा वयोगट, सध्याची मानसिकता आणि विद्यार्थ्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्याची भाषा याचा विचार करून केलेला असतो का..? त्यात आऩंदाचा भाग किती असतो? एखादा भाग समजावून देण्यासाठी विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव लक्षात घ्यावा लागतो. येथे प्रत्येक विद्यार्थ्याचा अनुभव भिन्न असणार आहे. तर काही घटक विद्यार्थी शिकलेला नसेल, शिक्षकांनी त्यांना तो घटक कदाचित शिकविलेला नसेल. त्याचा विचार केलेला असतो का? अनेकदा स्वाध्याय, किंवा ध्वनिचित्रफीत विकसित करताना अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोन त्यात असायला हवा असतो. तो या प्रत्येक ध्वनिचित्रफितीत असेलच असे दिसत नाही. त्यात एखादा घटक शिकताना, त्याचे विश्लेषण, अध्ययन अऩुभव जाणून घेताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. वर्गात प्रश्न निर्माण झाला तर शिक्षक मदतीला असतात. तेथे दुहेरी आंतरक्रिया होत असते. मात्र या आंतरक्रियेने एखादा घटक जितका चांगला परिणाम करतो तितका परिणाम एकेरीक्रियेने साध्य होणार आहे का ? याचा विचार करण्याची नितांत गरज आहे.
खरेतर अशा सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रित अभ्यासापेक्षा, शाळेतील अभ्यासक्रमास मदत करणारे व विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत करणारे, स्वतःचे विश्व समृध्द करण्यासाठी मदतीचा हात देणार्‍या गोष्टी घडायला हव्या आहेत. सर्वच गोष्टी औपचारिक शिक्षणाच्या प्रक्रियेतून साध्य होत नाही. त्यामुळे त्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी पूरक ठरणारे कार्यक्रम घराच्या, परिसराच्या वातावरणात जाणीवपूर्वक विकसित करायला हवेत. खरेतर आता असणारी सुट्टी मुलांना शिकण्यास खूप मदत करणारी आहे. एकतर इतर वेळी विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी पालकांना असतेच असे नाही. आज सुदैवाने दोघांनाही सुट्टी आहे. त्यामुळे संवादासाठीची संधी अधिक आहे. या निमित्ताने होणार्‍या गप्पा, संवाद, गोष्टी, घरातील अऩुभव, अवतीभोवतीचे निरीक्षण त्या संदर्भातील विचाराचे आदानप्रदान या गोष्टी खूप शिकून जाणार्‍या असतात. त्या आज घडायला हव्या असतात. घरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी चर्चा, पूर्वीचे अनुभवाची मांडणी, त्या संदर्भात घेतली जाणारी काळजी या बाबत विद्यार्थ्यांना भूतकाळ उलगडण्यास मदत होणार आहेच. त्याच प्रमाणे भविष्य देखील जाणण्यासाठीचा प्रवास शक्य होईल. या संवादातून अनेक नवनवीन गोष्टी जाणणे होईल. त्याच बरोबर नवनवीन शब्द, बोलीतील शब्द कळणार आहेत. मनात पडणारे प्रश्न सहजतने सुटणार आहे. त्यातून भाषिक आतंरक्रिया होईल. अनेक भाषिक कौशल्याबरोबर परिसर अभ्यास देखील पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर अवांतर वाचन होण्यासाठी मदत होईल. खऱेतर हा काळ अवांतर वाचनासाठी खूप महत्त्वाचा ठऱणार आहे. वाचनाची सवय लावावी लागते. त्यासाठी गोडी निर्माण करावी लागते. त्यासाठी घरातच पेरणी व्हावी लागते. या काळात घरातील मोठी माणंस पुस्तके हाती घेऊन वाचू लागतील तर विद्यार्थी देखील वाचू लागतील. या काळात मुलांना वाचनाची गोडी लागली, तर त्यांच्या भविष्याचा मार्ग अधिक मोकळा होणार आहे. एका अर्थांने पाठ्यपुस्तकातील घटकांचे आकलन होण्यास मदत करणारा हा प्रयत्न असेल. परवा एका विद्यार्थ्यांने सांगितले, की मी बोक्या सातबंडे आणि फास्टर फेणे ही मालिका पूर्ण केली आहे. सुट्टीचा या भाग कितीतरी महत्त्वाचा आहेच. हे वाचन करतांना त्या पुस्तकातील माहिती लिहिणे, त्यात काय काय आहे? त्यातील काय आवडले, का आवडले या संदर्भाने विचार प्रकट करणे व्हायला हवे. त्या लेखन सरावातून दैनंदिन लेखनाची अभिरूची तयार होईल. स्वतःची मते प्रकट करण्यास निश्चित मदत होणार आहे. एका अर्थांने शिक्षणाची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टाची साध्यता करण्यासाठीच या काळाचा उपयोग व्हायला हवा. खरेतर विद्यार्थ्यांना सुट्टी असते याचा अर्थ शिकणे नसते असे नाही. ज्या गोष्टी पाठ्यपुस्तकातून साध्य करता येणे शक्य नसते. किंबहुना अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी शाळाबाह्य उपक्रम, कृती, प्रयोग, प्रात्यक्षिकांची गरज असते. ते सर्व सुट्टीतून साध्य होत असतात. अनेकदा शाळेत चित्र काढण्यास, कविता करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्या करीता लागणारी संधी या सुट्टीत मिळाली आहे. अनेक मुले-मुली उत्तम चित्र रेखाटन आणि रंगभरणाचा सराव करीत असल्याचे चित्र दिसत आहेत. ही कौशल्य जीवनभर आनंद देत असतात. किंबहुना जगण्यासाठी या कला शक्ती प्रदान करत असतात. त्या अर्थांने सुट्टी आहे आणि शिक्षण सुरू आहे.
खरेतर पालकांनी बालकांना केवळ पैसा दिला म्हणजे बालकाचा विकास होईल असे नाही. बालकांच्या विकासाकरीता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वेळ देणे. एका अर्थाने हा वेळ मुलांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठीची पायाभरणी आहे. या वेळेने विद्यार्थ्याच्या विकासाला आकार मिळणार आहे. वेळेने नात्याची वीण अधिक घट्ट होणार आहे. त्यातून होणारा संवाद हा सुजाण पालकत्वाला जन्म देणारा ठऱणार आहे. मूल समजावून घेण्यास या काळात अधिक मदत होईल. खरेतर आपण मुलांकडून किती अपेक्षा ठेवतो.. त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने खरच प्रवास होणार आहे का ? मुलांची अभिरूची जाणून त्याला योग्य दिशेने घेऊन जाता येईल. एका अर्थाना पालक म्हणून आपण सांगू तेच मुलांनी केले पाहिजे या अपेक्षा या संवादाने कमी होऊ शकतील. त्यामुळे मुलांच्या बहरण्यासाठीचे आकाश मोकळे होईल. अपेक्षांना मर्यादा घातल्या गेल्याने मानसिक स्वास्थ टिकविण्याचा प्रवास या निमित्ताने सुरू करता येईल. एका अर्थांने सुजाण पालकत्वाची रूजवण या निमित्ताने होण्यास मदत होणार आहे. घर ही उत्तम शाळा असते. घरात ज्या गोष्टी मिळतात त्या मुलांना आयुष्यभर पुरतात. त्यात प्रेम आणि शांती, संस्कार या गोष्टीसाठी घर हवे असते. आज घरी एकाचवेळी सर्वजण उपलब्ध आहेत आणि प्रत्येक बालकांला प्रेमात ओतप्रोत भरून चिंब होता येणार आहे. इतरवेळी सर्वांच्याच प्रेमाचा हक्कदार होता येईल असे होत नाही. आज ते घडेल.. मूल प्रेमाने चिंब झाले तर ते कधीच माघारी फिरत नाही. त्याला घरात शांतता देखील अनुभवता यायला हवी असते. त्या शांततेकरीता प्रत्येक माणूस स्वतःचे एक छोटेसे घरकुल निर्माण करते. ते काही खाणे आणि झोपण्यापुरता विचाराने बांधले जात नाही..या सर्वांसोबत तेथील शांतता बरेच काही शिकून जात असते. संस्कार हा बडबडीने होत नाही. तर जे दिसते त्यानुसार मूल विचार करते आणि त्यानुसार जगण्याचा मार्ग अनुसरत असते. घरातील संस्कार जीवनभर पुरतात असे म्हणतात त्याचे कारण तेच आहे. घरात दारात येणार्‍यांसाठी सन्मान असेल…तर तो प्रवास मूल पुढे चालू ठेवते. संस्कार हे घरातील विचारांने आणि दर्शनाने पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात.. त्यामुळे सुट्टीचा विचार नव काही पेरणीचा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
सुट्टीमुळे मुलाला अवतीभोवतीचे जग समजून घेणे सोपे होईल आणि पालकांना मूल समजून घेणे शक्य होईल. यातून उद्याच्या भविष्यासाठीचा हा प्रवास आऩंदाच्या दिशेने सुरू होईल हे नाकारता येणार नाही. शिक्षणाचा अर्थही या निमित्ताने जाणता येणार आहे. शिक्षणाच्या बंदिस्त कल्पनेतून बाहेर पडून विकासाची दिशा घेऊन पुढचा प्रवास सुरू करता येईल. आपले जगणे हेच शिक्षण आहे. त्या जगण्याच्या प्रत्येक पाऊलवाटेने प्रवास सुरू ठेवताना शिक्षणाची अनेक उद्दिष्टे आणि कौशल्याच्या दिशेने प्रवास घडत असतो. गरज असते फक्त समजून घेण्याची. त्यामुळे सुट्टी म्हणजे शिक्षण मुक्त असे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाची चिंता न करता विद्यार्थ्यांना अनुभव घेऊ देणे या पलीकडे कोणतेच शिक्षण जीवनाला उभारी देऊ शकणार नाही.

No comments:

Post a Comment