Tuesday, January 27, 2026
श्रमप्रतिष्ठेचा खरा उत्सव
श्रमप्रतिष्ठेचा खरा उत्सव
प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ ध्वज, भाषणे आणि औपचारिकता नव्हे; तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार होय. त्या मूल्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे मूल्य म्हणजे श्रमप्रतिष्ठा. अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सफाई कामगार महिला नंदा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या मूल्याला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला आहे.
समाजात आजही श्रम करणाऱ्या घटकांकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. स्वच्छता कामगारांचे योगदान रोज अनुभवत असूनही त्यांचा सन्मान करण्याची मानसिकता अद्याप विकसित झालेली नाही, ही खंत आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य सफाई कामगार महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा करणे, ही केवळ शालेय कृती नसून सामाजिक परिवर्तनाची ठिणगी आहे.
“काम लहान-मोठे नसते, माणूस मोठा असतो” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचे कार्य या उपक्रमातून घडले. भविष्यातील डॉक्टर, अधिकारी, अभियंते घडणाऱ्या या वर्गखोल्यांमध्ये जर आजच श्रमाचे महत्त्व रुजले, तर उद्याचा समाज अधिक समतावादी व संवेदनशील बनेल.
श्रमिकांच्या सन्मानातून राष्ट्राची ताकद वाढते. स्वच्छता कामगार हे समाजाचे मूक आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टांवरच आरोग्य, स्वच्छता व शिस्त टिकून आहे. अशा हातांनी राष्ट्रध्वज फडकवला जाणे, हा खऱ्या अर्थाने प्रजासत्ताकाचा विजय आहे.
अकोलेतील हा उपक्रम इतर शाळा, संस्था व प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरावा, हीच अपेक्षा. कारण श्रमाचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा सन्मान होय.
कोट - मी साधी सफाई कामगार राजूर मधील पहाटे ५वाजता उठून साफ सफाई केली साडी बदलली व बरोबर सात वाजता राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विधालायत हजर होऊन माझे हस्ते ध्वजवंदन झाले .माझ्या श्रमाची प्रतिष्ठा मला पाहायला मिळाली दोन तप कष्ट करून मला दिलेला सन्मान मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही पंतप्रधान यांनी श्रमाला प्रतिष्ठा देऊन स्वच्छतेचा संदेश दिला ते काम मी अविरत सुरू ठेवेन,नंदाबाई पवार (सफाई कामगार)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment