Tuesday, January 27, 2026
सफाई कामगार महिला नंदाबाई च्या हस्ते ध्वजारोहण
अकोले,ता.२६:सर्वसामान्य सफाई कर्मचारी असून सुद्धा ध्वजारोहणाचा सन्मान दिला याचा मला आनंद होत आहे. कष्टातून पुढे आलेल्यांचा सन्मान केला जातो असे प्रतिपादन नंदा पवार यांनी श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण प्रसंगी केले.यावेळी संस्थेचे सचिव बापू काळे ,अभिशेठ नवाळी, रामशेठ पन्हाळे ,डॉ. बाबासाहेब गोडगे ,रमाकांत डेरे , ऋषिकेश काळे ,कोरडे साहेब ,गजानन घाटकर,प्रियंका नवाळी, वर्षाताई शेलार,श्रीराम पन्हाळे,लहानु परबत उपस्थित होते.
राजुर ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार असणाऱ्या श्रीमती नंदा पवार यांच्या हस्ते उच्च माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण करण्यात आले तर माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण अभिशेठ नवाळी यांच्या हस्ते करण्यात आले. नंदा पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे आम्ही पाईक असल्याचे सांगितले. कचरा करणारे गावकरी असले तरी स्वच्छता करणारे आम्ही स्वच्छता दूत आहोत. आमच्या कामामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाही याचे आम्हाला समाधान मिळते.अशा सामान्य स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मला जो सन्मान दिला त्याचा खूप आनंद आहे. आयुष्यभर केलेल्या कामाचे चीज झाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण करणाऱ्या अभिशेठ नवाळी यांनी
प्रजासत्ताक दिन हा आनंदाचा क्षण आहे. या विद्यालयाने सर्व सामान्यांचा विचार करून ध्वजारोहणाला बोलावले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. कष्टातून पुढे आलेल्यांचा सन्मान केला.तुमच्यासारखा विद्यार्थी असताना पाव लाद्या विकून, घरोघरी गॅस टाक्या पोहोच करून माझे कुटुंब चालवायचो. तुम्ही आदर्श समोर ठेवा,आपले ध्येय निश्चित करा तरच तुमचे स्वप्न साकार होईल. भविष्यात नोकरी लागेल याची शाश्वती नाही,त्यामुळे आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून मार्गक्रमन करा. यासाठी मेहनत महत्त्वाची आहे.विश्वास ,इनामदार ,चिकाटी असेल तरच पुढे जाल. गरिबांच्या मुलांना पुढे नेणारे हे विद्यालय आहे ,विज्ञान प्रदर्शनातून राज्य पातळीवर निवड झालेला सिद्धेश हंगेकर तुमच्या समोर आदर्श आहे .आई,वडील,गुरुजन यांच्या आदर करा त्यांची जाणीव ठेवली तर नक्कीच यशाच्या पायरीकडे जाल असे सांगितले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव बापू काळे यांनी आज आपण श्रमिकाच्या हस्ते ध्वजारोहण केले ही गौरवाची बाब आहे. विद्यार्थ्यांसमोर श्रमप्रतिष्ठेचे समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा मूल्य नक्की रुजेल. समाज उपयोगी काम करा. प्रत्येक क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वाची आहे. यासाठी विद्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी केंद्र सुरू केले जाईल त्यातून मोठे अधिकारी व्हा व भारताचे प्रजासत्ताक मजबूत करा असे त्यांनी सांगितले. यावेळी ऋषिकेश काळे, रमाकांत डेरे, श्रीराम पन्हाळे, प्रवीण देठे यांनीही मनोगते व्यक्त केली.
असद शेख, अभिनव भांगरे, शिवप्रसाद पंडित,मानसी खाडे या विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केली. देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.त्यानंतर अतिथी, पालक व ग्रामस्थांसमोर संगीत कवायत अतिशय सुंदर व तालबद्ध पद्धतीने सादर करण्यात आली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटातून जिल्ह्यात प्रथम आलेल्या सिद्धेश हंगेकर व प्रयोगशाळा कर्मचारी गटातून जिल्ह्यात प्रथम आलेल्या श्रीनिवास मुळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दिव्यांग सिद्धेश हंगेकरच्या राज्यस्तरीय सहभागासाठी मान्यवरांनी आर्थिक स्वरूपात मदत दिली तसेच विद्यार्थ्यांनीही खाऊच्या पैशातून सिद्धार्थला सहकार्य केले. यानंतर विद्यार्थ्यांना अभिशेठ नवाळी, राजुर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या बिस्किट व चॉकलेटच्या खाऊचे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी तर आभार तानाजी फापाळे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment