Thursday, February 19, 2026
शिवरायांची चरणधूळ मस्तकावर धारण केलेला विश्रामगड!
शिवरायांची चरणधूळ मस्तकावर धारण केलेला विश्रामगड!
— भाऊसाहेब चासकर
महाराष्ट्राला जसे विपुल दुर्गवैभव लाभले आहे, तसेच वैभव अकोले तालुक्यालाही लाभलेले दिसते. तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून सह्याद्रीची मुख्य डोंगररांग उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते. नाशिक जिल्ह्यातील आडगड-औंढा या दुर्गद्वयीसह विश्रामगड, बितनगड, महांकाळ डोंगर, अलंग, मदन, कुलंग, रतनगड, पाबरगड, भैरवगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, कुंजीरगड अशी राकट आणि बेलाग दुर्गांची मालिका येथे उभी आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरही याच दुर्गमालिकेत विराजमान आहे.
या सर्व गडांमध्ये पट्टा उर्फ विश्रामगड अधिक भाग्यवान ठरतो. कारण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या गडाला लाभला आहे. महाराजांच्या वास्तव्याने ही भूमी पावन आणि इतिहासाने समृद्ध झाली.
नगर-नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर ताठ उभा असलेला हा गड आजही दिमाखात इतिहासाची साक्ष देतो. गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. पट्टेवाडीमार्गे जाणारी पूर्वेकडील वाट सर्वात सोपी मानली जाते. टाकेद-म्हैसवळण घाटातून कोकणवाडीमार्गे दक्षिणेकडून जाणारी वाट तुलनेने अवघड आहे, तर भगूर-देवळालीकडून निनवी-गिरवाडीमार्गे जाणारा तिसरा मार्ग अधिक खडतर आणि दमवणारा आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे १३९२ मीटर उंचीवर असलेल्या या गडाची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. आकाशातून पाहिल्यास पंख पसरलेल्या गरुडासारखा त्याचा आकार दिसतो. स्वराज्याची उत्तरेकडील सरहद्द म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित होते.
गडावर प्रवेश करताना कातळात कोरलेल्या गुहा, लक्ष्मण महाराजांची समाधी, थंडगार पाण्याचे झरे आणि भक्कम त्र्यंबक दरवाजा इतिहासाची साक्ष देताना दिसतात. भगवती देवीचे मंदिर, कातळात कोरलेली पाण्याची टाकी आणि अक्षय तृतीयेची यात्रा या गडाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवतात. गडावर तब्बल तीस पाण्याच्या टाक्या असून विस्तीर्ण पठारावरून चारही दिशांचा मुलुख नजरेत सामावतो.
सन १६७९ मधील ऐतिहासिक प्रसंगामुळे विश्रामगडाचे महत्त्व अधिक वाढते. दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात जालन्याची लूट करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडाकडे निघाले असताना मुघल सरदार रणमस्तखान त्यांच्या मागावर होता. संगमनेर परिसरात तुंबळ युद्ध झाले. युद्धस्थितीत बहिर्जी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराज निवडक घोडेस्वारांसह मध्यरात्री पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले आणि २१ नोव्हेंबर १६७९ रोजी गडावर पोहोचले.
दक्षिण मोहिमेच्या दगदगीमुळे महाराजांची तब्येत खालावली होती. येथील थंड हवामान, शांत परिसर आणि आदिवासी महादेव कोळ्यांच्या पहाऱ्यात महाराजांना विश्रांती लाभली. जवळपास सतरादिवस वास्तव्य केल्यानंतर गडावरून निघताना राजांनीच या किल्ल्याला ‘विश्रामगड’ असे नाव दिल्याची परंपरा सांगितली जाते. पुढे बाजीराव पेशव्यांचेही काही काळ येथे वास्तव्य होते.
२०१२ साली महाराजांच्या आगमनास ३३३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गडावर पुतळा उभारण्यात आला. २१ नोव्हेंबर हा दिवस ‘शिवपदस्पर्श दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवजयंतीनिमित्तही मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी येथे येतात.
आज गडकोटांकडे पाहण्यातील उदासीनता चिंताजनक आहे. भग्नावस्थेतील राजवाडा जतनाची मागणी करतो आहे. गडांचे संवर्धन म्हणजे इतिहासाचे संरक्षण होय. केवळ जयजयकार नव्हे, तर इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमानातील प्रश्नांना उत्तर शोधणे ही खरी शिवभक्ती आहे.
ढाल-तलवारीचा अभिमान असावा, भगवे झेंडेही अभिमानाने फडकावेत; परंतु आजच्या काळाला शांतता, विचार आणि कृतीची गरज आहे. तरुणांनी गडवाटा तुडवत इतिहास जाणून घ्यावा, त्यातून भविष्य घडवावे. स्मरणरंजनात न रमाता इतिहासातून शिकणे हीच शिवरायांना खरी अभिवंदना ठरेल.
– भाऊसाहेब चासकर, अकोले (नगर)(सदस्य – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व राज्य शालेय शिक्षण विभाग विचार गट)मो. ९४२२८५५१५१ | bhauchaskar@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment