Tuesday, February 24, 2026
हरिश्चंद्रगड... फोटो - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर
हरिश्चंद्रगड...
फोटो - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर
अगदी तोंडांत फेस यायची पाळी आली, तेव्हां त्या पायांखालच्या अन् चढावरून उताराला लागतांच हरिश्चन्द्रेश्वराच्या देवळाचा कळस डोकावला. शपथपूर्वक सांगतों, मीं अक्षरश: तोंडांत दोन बोटं खुपसली! इतक्या दूर, रहाटत्या जगापासून इतक्या अन्तर्भागांत, अशा गच्च रानांत हैं इतकं वैभवशाली बांधकाम कुणी केलं आहे, असं कुणी जर आम्हांसमोर भविष्य वर्तवलं असतं, तर आम्ही त्याला वेड्यांत काढलं असतं!
अदमासें पन्नास फूट उंचीचं, काळ्या पाषाणाचं मंदिर आम्हांला खुणावीत उभं होतं!
वेडावून जाऊन खुळ्यापिश्यासारखे धांवतच निघालों. मंदिराच्या बाहेर बांधलेली प्राकाराची देवडी ओलांडून रावळाच्या चौबाजूंना असलेल्या खोदीव गुहामंदिरांच्या समोर उतरलों, अन् कुतूहलांत बुडून, विस्मयचकित दृष्टीनं तें सगळं न्याहाळू लागलों. इतकं कुतूहल, कीं प्राण शोधूं पाहात असलेली तहानही आम्ही क्षणभर विसरून गेलों! आमचंच कांहीं एवढं नवल नव्हे, तर ज्या साहेबानं गेल्या शतकांत मुंबई राज्याचं गॅजेटिअर लिहिलं, तो देखील या मन्दिराला 'अद्भुत पद्धतीनं बांधलेलं' म्हणाला होता!
देऊळ हेच गडावरलं एकटं नवल नव्हे...
- 'दुर्गदर्शन'. (१९७० साली किर्लोस्कर मासिकात गोनीदांनी हरिश्चंद्रगडावर लिहिलेल्या लेखातून)
महाराष्ट्रांत इतके किल्ले !
त्यांपैकीं कुण्या एका गिरिदुर्गावर या मंदिरासारखं मंदिर नाहीं ! मंदिरांतील हरिश्चन्द्रेश्वराची पूजा चारी दिशांनीं आंत जाऊन करतां येते. मंदिराच्या प्राकारांत शिरण्यापूर्वी मंगळगंगेवर बांधलेला छोटासा सेतु ओलांडावा लागतो.
मंदिराच्या तीन बाजूंस - खरं तर दोनच बाजूंस, डावीकडे आणि पाठीमागे खडकांत कोरलेल्या ओवऱ्या आहेत. पैकीं मागच्या उजवीकडील ओवरींत आम्ही उतरलों.
देऊळ किती वर्षांपूर्वी बांधलेलं ?
कांहीं कुठं उल्लेख नाहीं. शिलालेख आहेत, ते सातशे वर्षांपूर्वीचे. वणवणा चहूं दिशा भटकत होतों. केदारेश्वराच्या लेण्यांत गेलों. तिथल्या गारथंड पाण्यांत उतरून शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घातली.
- गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर. ('दुर्गभ्रमणगाथा')
हरिश्चंद्रगड आज जरा जास्तच प्रसिद्ध झाला आहे, पण पाच दशकांपूर्वी गो.नी.दाण्डेकरांनी हरिश्चंद्रगडावर केलेल्या भटकंती व लेखनामुळे हरिश्चंद्रगडाची ओळख महाराष्ट्रातल्या जनमानसाला झाली होती. त्यांनी १९७० साली किर्लोस्कर मासिकात हरिश्चंद्रगडावर लेख लिहिला, त्यात त्यांनी हरिश्चंद्रगडावर असलेल्या शिलालेखांविषयीही विस्ताराने लिहिलं. त्या शिलालेखांत चांगदेव, ज्ञानेश्वर, नामदेव यांच्याविषयी उल्लेख असल्याचं त्यांनी जाहीर केलं, तेव्हा रा.चिं.ढेरे, डॉ. वि.भि.कोलते, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अशा अनेक इतिहास अभ्यासकांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या 'चक्रपाणि' या ग्रंथांत म्हटलं :
'- अलिकडे प्रख्यात मराठी लेखक श्री. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हे त्यांच्या आवडीच्या भ्रमंतींत हरिश्चन्द्रगडावर गेले असतां त्यांना तेथील हरिश्चन्द्रेश्वराच्या प्राकाराच्या भिंतीवर बाहेरील डाव्या बाजूला असलेल्या लेखाचें महत्त्व जाणवलें. त्यांनीं हरिश्चन्द्रगडावरील आपल्या यात्रावर्णनपर लेखांत 'चक्रपाणि वटेश्वरः नन्दतु तस्य सुतः........' असें त्या लेखाच्या प्रारंभींच्या भागाचें वाचनही दिलें. त्यामुळे मराठी वाङ्मयाचे संशोधन करणाऱ्यांचें लक्ष हरिश्चन्द्रगडाकडे वेधलें गेलें.'
गोनीदांनी हरिश्चंद्रगडावर 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये खूप छान लिहिलेले आहे. त्यांच्यासारखा तर शक्य नाही, पण आज सोशल मीडिया, गर्दी, बाजार यापूर्वीचा हरिश्चंद्रगड एका तपापूर्वी अनुभवता आला ही भावना आणि त्या आठवणी सुखद वाटतात.
Pranav Kulkarni
#छायाचित्रकार_गोनीदा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment