Tuesday, February 24, 2026
माणसाला माणुसकीची ओळख करून देणारी माऊली संस्था आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे
माणसाला माणुसकीची ओळख करून देणारी माऊली संस्था
आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे यांच्या कार्याला भेटीतून सलाम
अकोले प्रतिनिधी : समाजाने विस्मृतीत टाकलेल्या मनोरुग्ण व निराधार महिलांना माणुसकीचा आधार देत त्यांना नवजीवन देण्याचे कार्य करणाऱ्या आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे यांच्या माऊली संस्थेला भेट देण्याचा योग लाभणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. श्रावण आणि त्यांच्या मातोश्रींची भेट हे या भेटीचे औचित्य होते.
आजच्या धावपळीच्या आणि स्वकेंद्रित जीवनशैलीत एक दांपत्य झपाटल्यासारखे कार्य करत सुमारे साडेचारशे मनोरुग्ण महिला व पन्नासहून अधिक लहान मुलांचे आई-वडील बनले आहे. समाजभान हरवलेल्या महिलांना पुन्हा समाजात उभे करण्याचे माणुसकीचे दर्शन माऊली संस्थेत अनुभवायला मिळाले.
संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास धामणे दांपत्यांनी सांगताना अनेक हृदयस्पर्शी अनुभव समोर आले. संस्थेत दाखल झालेल्या महिलांमध्ये वकील, डॉक्टर, एम.फिल. पदवीधर, शिक्षिका, कवयित्री अशा उच्चशिक्षित महिलांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक आजारामुळे भरकटलेल्या या महिलांना संस्थेने सुरक्षित आश्रय, सन्मान आणि स्वतःचे घर दिले आहे.
माऊली संस्था व्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरत आहे. येथे प्रत्येक महिला स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसते. काही महिला स्वयंपाकगृह, काही बेकरी, काही बाग-बगीचा तर काही गोशाळेची जबाबदारी सांभाळतात. श्रमातून स्वाभिमान आणि कामातून आत्मविश्वास निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे.
संस्थेत सर्वांना समान वागणूक दिली जाते. मोठा-लहान असा भेदभाव नाही. महिलांना नियमित औषधोपचार वेळेवर दिले जातात. स्वावलंबनाकडे वाटचाल करत संस्था आता स्वयंपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असून येथे वाढणारी मुलेही सक्षम भविष्य घडविण्यास सज्ज होत आहेत.
जगाची ‘माऊली’ म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख केला जातो; त्याचप्रमाणे माऊली संस्था आज अनेक मनोरुग्ण महिला व त्यांच्या मुलांची खरी माऊली ठरत आहे. संस्थेतील कार्य पाहिल्यानंतर मन नतमस्तक होते आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याची जाणीव होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)















No comments:
Post a Comment