Friday, August 7, 2020

राणभाजी

*कळसुबाई हरिश्चंद्रगड,रतनगड परिसरातील रानभाज्या*
 पावसाळ्यात पाऊस पडला की रोहीणीच्या येळेला मातीतुन कितीकं रानवेलींच जीवन उमलुन वर येते.
काही झाडाझुडपांची तर काही वेलींची पानं, फुलं,खोड, मुळ, देठ, कोंब खाले जाते.
आणि ह्या सगळा आपलेली नैसर्गिकपणे आणि कोणत्याही खताशिवाय आणि बी पेरावे लागत नसल्याने किंवा कोणतीही मेहनत करावी लागत नाही.
उदा-चाईचा देट,चाईचामोहर,करटुली,गोमेटी,गुळवेल,आंबटवेल,कुरडू,तेराआळवड,टाकळ्याची पानं दिव्याची भाजी,बडद्याची भाजी,कोळुचीभाजी,फांदेची भाजी भोकरीच्या पानांची भाजी शिवाय कवळ्या बोखांची भाजी,लोतीची भाजी,घायपाताच्या फुलांची भाजी,बहाव्याच्या फुलांची भाजी,आघाड्याच्या पानांची भाजी,आणवा,करंजकंदाची भाजी,पंधाचेकंद,सुरणकंद,कवदरची भाजी,खरपुडी,सायरीच्या सायरधोड्याची भाजी,वाघाटीची भाजी,कच्च्या आणि कवळ्या आळवांचीभाजी,(कच्या करवंदाची चवदार कढी,चटणी,कच्च्या करवंदांचे लोणचं जंगली आणि गावरान आंब्याचे लोणचं,भोकरीच्या कवळ्या पानांचे मुटके,फळांची भाजी,मोहट्यांच्या फळांची भाजी,मोहाच्या फुलांची खीर,पुरणात हलकासा वापर) चिलाचीभाजी,काटमाठाची,तांदुळणेची,कोंबडेचीभाजी(अशा फक्त रानभाज्यांची यादी 100पेक्षा जास्त होईल)या रानभाज्यावर कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही किंवा खत औषध लागत नाही.हे आपल्याला नैसर्गिक रित्या रानावनात शेताच्या बांधावर तीनही ऋतुत मिळत असल्याने यासचं सेंद्रीय शेती असे म्हणता येईल.
बऱ्याच ठिकाणी काही मान्यवर(शेतीतज्ञ)प्रश्न विचारतात की तुम्ही आजिबातही खत औषध वापरत नाही हे खरे आहे काय? तेव्हा ममताबाई किंवा आम्ही महिला हसत हसत सांगतो की करवंदाच्या जाळी किंवा मोहाच्या,भोकराच्या झाडाला कस खत घालणार ते तर जंगलात आपोआपच वाडते.आणि पुढे सांगाव लागत की "जर तुम्ही किंवा आम्ही या रानमेव्याची विशेषता जंगली रानवेलींची,रानकंदांची छेडछाड केली किंवा त्यांच्या बिया लावण्याचा प्रयत्न केला तर त्या रुजणार नाहीत आणि रुजल्यानंतर रासायनिकखत दिले तर त्या अपेक्षित उत्पन्न देणार नाहीत.ते जंगलात वाढतात त्यांना जंगलातच वाढू द्या,म्हणुन आमी आदिवासी लोकं ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक असेल तेवडेच घेतो फार तर एखाद्या वेलीची ठराविक वेळी आणि ठराविक काळातच भाजी खाल्ली जाते,तीही एकदोन वेळसच.
जसे-बडदा,दिवा ही भाजी कोवळी पानं असतांनाच खाल्ली जाते.टाकळा(तरोटा)ही भाजी उगवल्यानंतर आट दिवसाच्या आतच खाण्याजोगी असते.तसेच चाईचा देट पानावर येण्या अगोदरच खाण्या योग्य असतो.
 जंगलात ठराविक काळात मिळणाऱ्या रानभाज्यांचे कंदवर्गीय,वेलवर्गीय,झुडुपवर्गीय,झाडवर्गीय,फळवर्गीय असे प्रकार आहेत.
रानातील सगळ्याच बिनखताच्या रानभाज्या अगुदर पाण्यात शिजवून(उमवून)घेतल्या जातात नंतर पिळुन भाजी करतात.कारण ह्या बहुतेक रानभाज्या पचनास जड असतात.ह्या रानभाज्या खुरासणेच्या थोडेश्या तेलातही चवदार लागतात.
आमच्या जेवनात अजूनही खुरासण्याच्या/शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला जातो.
वाढत्या शहरीकरणामुळं रानातील हा रानमेवा अतिदुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे,म्हणुनच या रानमेव्याची/रानभाज्यांची चव चाखण्या बरोबरच त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही स्वतःपासुन सुरुवात केली आहे.आम्ही कळसुबाई परिसरातील महीलांनी बायफसंस्थेच्या सहकार्याने परसबागेची चळवळ सुरु केली आहे.त्या परसबागेची दखल बायफसंस्थेने घेऊन परसबागेच्या चळवळीतील महिलांचे काम राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे.
माझ्या सासुबाईं व ममताबाई भांगरे ह्यांचे बालपण माहेर,सासर ग्रामिण भागात बाडगीच्या माची परिसरातील निसर्ग संपन्न आणिआदिवासी बहुल भागात राहिल्याने येथील निसर्गातील वनसंपदेची अचूक माहिती सांगतात.
भविष्यात पुढील पिढीला ह्या रानमेव्याची विसरपडू नये यासाठी आम्ही सासू सुना जुजबी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
जय राघोजी
जुजबी शब्दांकन -सौ.जिजाबाई मधुकर भांगरे.
रानभाज्या संकलक-सौ. ममताबाई भांगरे 
देवगाव ता.अकोले जि अहमदनगर.सशांताराम बापू काळे

Tuesday, August 4, 2020

बापू एक संघर्षमय जीवन

संघर्षातून यशस्वीतेकडे वाटचाल करणारा अवलिया-  शांताराम काळे

काही व्यक्ती संघर्ष करण्यासाठीच जन्म घेतात की काय ? असा प्रश्न  कधी कधी निर्माण होतो असे असले तरी काही व्यक्ती जिद्द,चिकाटी,परिश्रम व सतत उपक्रमशील राहून यशस्वी होतांनाही दिसतात.असेच एक व्यक्तिमत्व तालुक्यातील आदिवासी भागात राजूर सारख्या गावात आपला संघर्षमय प्रवास सुरु करुन उंच शिखराकडे वाटचाल करीत आहे.त्या आवलीयाचे नाव आहे शांताराम उर्फ बापू काळे होय..
         प्राथमिक,माध्यमिकशिक्षण राजूर येथे सर्वोदय विद्या मंदिर येथे पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अकोले सारख्या ठिकाणी पदवीचे शिक्षण कष्ट करून पूर्ण केले.पाव बटर विकणे,वृत्तपत्र विकणे,आठवडे बाजारात किराणा मालाचा पाल लावून विक्री करणे ,फोटो स्टुडिओ,मंडप स्पीकरचा व्यवसाय,फळे विक्री असे  छोटे मोठे न लाजता व्यवसाय करून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.1987  या वर्षांपासून विमा विकास अधिकारी उत्तमराव जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली विमा प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले.
        1987 पासून पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करून गावकरी,सार्वमत,लोकसत्ता ,सकाळ,
महाराष्ट्र टाइम्स व पुन्हा सकाळ अशा नामांकित वृत्तपत्रातून पत्रकार म्हणून काम केले.व करीत आहे. विविध क्षेत्रातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली.उपेक्षित,
वंचितांचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम श्री.काळे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले. प्रामुख्याने  आदिवासी भागातील  अशिक्षितपणा , भौगोलिक परिस्थिती , आरोग्याचे प्रश्न दळणवळणाचे प्रश्न , उदरनिर्वाहाचे प्रश्न  अशा अनेक प्रश्नांना  लेखणीतील ताकदीने  सोडविले.आर्थिक परिस्थितीमुळे  शिक्षणापासून  वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना  यथोचित न्याय , सामाजिक प्रतिष्ठा,  शैक्षणिक सुविधा  मिळवून देण्याचा पुरेपूर यशस्वी प्रयत्न केला. लेखणीच्या माध्यमातून  अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या मांडून  त्यांना  त्यांच्या जीवनात  सक्षमपणे  उभे केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थाने पत्रकार समाजाचा आरसा असतो.पत्रकारितेतील आपले कर्तव्य पार पाडून सामाजिक भान जोपासणारे, नगर जिल्ह्यातील अकोले - राजूर येथील शांताराम काळे यांनी विविध सामाजीक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन आपली सामाजीक  जबाबदारी पार पाडत आहे.  एक पत्रकार, एक समाज सेवक म्हणून त्यांनी महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्काराने त्यांना माजीमंत्री चंद्रकांतदादा पाटील,माजीमंत्री एकनाथराव खडसे, एबीपी माझाचे संपादक राजीवजी खांडेकर यांनी सन्मानित केले आहे.तसेच तिळवण तेली समाजानेही त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले.
      आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वरील श्रद्धा व विश्वास  असल्याने त्यांच्याच नावाने  1992 साली 
श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेची स्थापना करून गेली 30 वर्षे संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत.शाळा सुरु करण्यासाठी स्वतःची जागा,इमारत नसल्याने सहकारी गोडाऊन,म्हशींच्या गोठ्यात  मुलींची शाळा सुरू केली. परंतु अनधिकृत शाळा सुरू केल्याप्रकरणी सदर मुलींची शाळा शासनाने बंद केली.या निर्णयाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मुलींसाठी शाळेची गरज मा.न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने मा.उच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली. मवेशी येथेही माध्यमिक विद्यालय सुरू केले,त्याच्या मान्यतेसाठीही मा.उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. आज राजूर येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  व मवेशी येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय सुरू झाले. व आज स्वतःच्या दिमाखदार इमारतीमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या संस्थेच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा व विज्ञान प्रदर्शनात नैपुण्य मिळविले.कालांतराने इंग्लिश मीडियम स्कुल बंद करण्याचा कटू निर्णयही घ्यावा लागला. असा शैक्षणिक विस्तार करून आपले शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. आदिवासी भागातील उपक्रमशील शाळा करण्यासाठी  रात्रंदिवस ध्यास घेऊन  विविध  अधिकारी, उद्योजक ,प्रतिभावान  महिला यांची व्याख्याने आयोजित करून  विद्यार्थ्यांमध्ये  सकारात्मक प्रेरणा  भरण्याचे काम  अविरत चालू आहे .दरवर्षी 1000 विद्यार्थी शिक्षण घेत असून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक पालक योजनेतून त्यांना शालेय साहित्य,गणवेश व जेवण देण्याचे काम करतात. विद्यार्थी मार्कवंत  होण्याबरोबरच गुणवंत होतीलच या पद्धतीने शाळेचा आराखडा तयार करण्यावर भर असतो.
सामाजिक कार्यात विशेष योगदान असणाऱ्या व मैलाचे दगड ठरलेल्या या व्यक्तिमत्वांचा संस्थेच्या मार्फत दरवर्षी समज "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरव केला जातो.यामुळे कार्य करणाऱ्यांना ऊर्जा मिळते. विद्यार्थी व समाजाला निश्चितच प्रेरणा मिळते . एका पिढीचा  सत्कार्याचा वसा  पुढच्या पिढीला  समजून तो संक्रमित केला जातो. स्वर्गीय अपर्णाताई रामतीर्थकर ,पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ अनिल सहस्रबुद्धे ,प्रा. प्रकाश टाकळकर ,गिरीशजी कुलकर्णी, निसर्ग संगोपीनी हेमलताताई पिचड अशा अनेक मान्यवरांना त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे गौरविण्यात आले आहे.
       कुरकूटवाडी ते त्र्यंम्बकेश्वर पायी दिंडी त्यांचेकडे एक तपापासून (१२वर्षे)येत असून त्यांना भोजन,निवास, व्यवस्था ते करतात असे असले तरी एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि  बापूंच्या मागे प्राचार्या सौ मंजुषा वहिनी अविरत व खंबीर पणे त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत ,अनेक संकटे आली  मात्र बापू डगमगले नाही त्याचे कारण त्यांच्या सौभाग्यवती होय .सामाजिक बांधलकीतून हे कुटुंब काम करते. दोन मुले इंजिनीअर पदवीधर असून त्यांना कन्या रत्न नसले तरी शाळेतील गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा गणवेश खर्च करतात,त्यांच्या या कार्यास सलाम.
       तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्या माध्यमातून ही गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळवून दिली. राजूर तेली समाजाचे ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. अकोले तालुका तेली समाज सल्लागार,अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व माजी सचिव, संगमनेर अकोले पत्रकार संघ सदस्य,नगर जिल्हा पत्रकार संघ सदस्य,राजूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अशा  विविध पदांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडीत आहे.  
    नगर जिल्ह्यातील समाजातील अग्रगण्य व्यक्तीमत्व असून समाजहित जपणारे   पत्रकार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील एक समाजसेवक, शिक्षण पंढरीचे वारकरी ,अन्यायाविरुद्ध  वाचा फोडणारा हक्काचा  माणूस, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, वाळवंटातही बाग फुलविण्याचे स्वप्न पाहणारे सकारात्मक व्यक्तिमत्व, विधायक कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व, विद्यार्थी हितासाठी नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणून बापूंनी आपली ओळख  निर्माण केली आहे. समाजहितासाठी "कुसुमादपी कोमलानी "तर अन्यायाविरुद्ध "वज्रादपी कठोराणि" या भूमिकेत बापूंनी स्वतःला ढाळून घेतले आहे.
     माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात.
काही चांगले, काही वाईट काही ,कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. 
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले तुम्ही एक..!
म्हणूनच  आपणास
 वाढदिवसानिमित्त  आपुलकीच्या हार्दिक शुभेच्छा !

Friday, July 31, 2020

मध मासी

*मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल.. हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं*

 ते सांगतात कि *मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.* अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.

 *हायब्रीड अन्न खाऊन आपल्या शाररीक क्षमतेचा विकास, मानसिक क्षमतेचा विकास होत नाही हे आता विज्ञानानं सिद्ध केले आहे.*
 मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत. आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात कारण कि *डाळींब असे झाड आहे कि याचे परागीभवन फक मधमाश्याच करू शकतात. जर मधमाश्या नसतील तर डाळिंब फुलांचे रुपांतर फळात होतच नाही कारण याची नर व मादी फुले वेगवेगळी असतात आणि मग मधमाश्या एका फुलामधील नर उचलून मादी फुलावर सोडण्याचे महत्वाचे काम करतात. आणि फक्त माधामाश्याच हे काम करू शकतात, हे आजच्या जगाला समजले आहे. मात्र *मधमाश्यांना काय आवडते हे आपण शिकत नाही, तिला पोळे करायला कुठली झाडे आवडतात, पराग व मकरंद गोळा करायला कुठली झाडे आवडतात.*

         आपल्यापैकी बहुतेकजण
 हिमालयात जातात मात्र हिमलायात मनालीच्या पायथ्याशी अनेक गावे आहेत कि जिथ अगदी २०० वर्षेपूर्वी पासून मधमाशी पालन करीत आहेत, मात्र हे कधीच पाहत नाहीत, खरतर आपल पर्यटन हे शाश्वत व ग्रामीण भागाला उर्जा देणार असले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. अर्थात मधमाशी पालन २०० वर्षपूर्वी ते पण शास्त्रीयदृष्ट्या पालन केल्याचे आढळून येते. आपल्या राहत्या घरात मधमाश्या पालन करीत आहेत आणि दरवर्षी १० किलो मध विकतात आणि ३ किलो  मध स्वतःसाठी ठेवतात. मात्र खरतर हे करण्यापाठीमागे उद्धेश परागीभवन हा असून अनेक पिके यावर अवलंबून आहेत. आणि हे सगळ त्या मधमाश्यांनी सुद्धा स्वीकारले आहे. यात ही माणस त्यांना अति थंडीत गुळाचा व साखरेचा पाक करून ठेवतात काहीजण तर गोळा केलेला मधसुद्धा ठेवतात.    

आपल्याला वाटत आपणच शेती करतो मात्र मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीव शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मदत करीत असतात. यात सर्वात आघाडीवर मधमाश्या आहेत हे विसरून चालणार नाही कारण फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असतात, त्यांच्याशिवाय दुसरे किटक हे काम करूच शकत नाहीत, अगदी डाळिंब, काकडी, सफरचंद अशी अतिशय महत्वाची फळे. आपण फक्त जगात मधमाश्या आहेत तोपर्यंतच करू शकतो हे वेळीच जगाने लक्षात घेणे गरजेचे आहे.   मधमाश्याची बदलती जीवनशैली यावर अनेक बाबी समोर येत आहेत, यात १९९० मध्ये साध मधमाश्यांच पोळ हे फक्त काटेरी झाडावर बसायची यात *साधी बाभूळ, बोर* ही झाड महत्वाची होती, मात्र आजच्या काळात हीच पोळी काटेरी झाड सोडून जांभूळ, आंबा अश्या सहज शिकार होईल अश्या झाडांवर शिवाय घरात, भिंतीवर दिसू लागली, हा अतिशय महत्वाचा बदल दिसून येत आहे.  हा बदल करण्यापाठीमागे कारण सुद्धा असेच आहे की, *आजकाल बोरी व बाभळी तोडण्याचे प्रमाण भयानक वाढत गेले आणि वास्तवात तर आता बोरी व बाभळी दुर्मिळ होत गेल्या, पर्यायाने त्यांनी आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात बदल करीत नवे पर्याय स्वीकारला केवळ माणसांच्या चुकामुळेच..*

आगी मधमाश्या तर जंगलातील उंच झाड कमी होत गेली शिवाय, नैसर्गिक पाणवठे कमी होत गेले, ज्यात या मधमाश्या सहज मातीत उतरून गाळात पाणी पिऊ शकत होत्या, आता हे पाणवठे नष्ट झालेत, यात काही वन अधिकाऱ्यांनी तर पर्यटकांना वाघ दिसावा म्हणून जंगलातील नैसर्गिक पाणवठे नष्ट केले आणि आता नवीन पाणवठे रोडलगत तयार करून वाघ दिसावा अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र यात सिमेंटच्या टाक्या बांधल्याने त्यात मधमाश्या पाणी प्यायला उतरतात आणि बुडून मरतात. असे हे व्यवस्थापन कसे जंगल वाढविणार.
यात या माश्यांनी आपला नैसर्गिक अधिवास बदलून इमारती, मंदिरे अश्या जागा निवडून लोकवस्तीत प्रवेश केला. कारण पाणी सहज मिळू लागले शिवाय उसाची रसवंती हे सुद्धा महत्वाचे आहे कारण यात त्यांना उन्हाळ्यात गोड रस मिळत असतो. 
आजकाल शिकलेल्या लोकांना मधमाशी काय करू शकते याच महत्त्व राहिलेले नाही. मात्र शेतीत अडचण आली की मग आपण सर्व पर्याय शोधत असतो. 
मी पोस्ट ग्रॅज्युएशन करताना एकजण  मित्र झाला होता,  त्याने सध्या पॉली हाऊस करून आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. अर्थात शेती घेतली त्यावेळी शेतीच्या बांधावर बोर, बाभूळ, जांभूळ, आंबा, शेवगा, भोकर, रुई अशी विविध झाड बांधावर होती. मात्र इतरांचे ऐकून सर्व झाडे तोडली आणि जास्त पाणी पिणारी नारळाची झाडे बांधावर लावली, यात शेतीची जैव विविधता झपाट्याने कमी झाली हे लक्षात आलेच नाही. 
आता खरी गंमत अशी आहे की, लॉकडाऊन मध्ये अनेक बिझी मित्र free झाले व त्यांचे फोन आले तसाच त्याचा पण फोन आला की, व तो सांगू लागला पॉली हाऊसमध्ये काकडी लावली आहे आणि खूप मोठी पिवळी फुल येत आहेत, आणि जळून जातायेत शिवाय काकडी अंगठ्या एवडीच राहतेय, काय कराव लागेल, म्हणून मी नैसर्गिक शास्वत शेतीचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की या काकडीचे परागीभवन होत नाही कारण या फुलात आत शिरून परागीभवन कोणीही करत नाही, त्यामुळे त्याचे पराग फुटत नाहीत आणि मग फुल जळून जात आहेत, मग यावर उपाय म्हणजे मधमाश्याच जगात हे काम करू शकतात, खटपट करून मधमाश्यांच्या पेट्या आणल्या  आणि त्याच रात्री दोन पेट्या पॉली हाऊसच्या तोंडाजवळ ठेवल्या. सकाळी लवकर मधमाश्यांनी आपले परागीभवनाचे काम सुरु केले. मग ७ दिवसांनी १ क्रेटऐवजी आता ६ क्रेट काकड्या तोडल्या आणि शिवाय टवटवीत माल सापडला, २० किलोची वाढ १५ पटीने उत्पन्न वाढले. याचा टक्केवारीत अर्थ काढायचा असेल तर १५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. माझा मित्र सहज म्हणाला शिक्षणात कधी अस शिकवलं जात नाही, यापुढे मात्र पर्यावरण पूरक वृक्षारोपण करणार असल्याचे स्पष्टपणे बोलून दाखविले. अगदी *शेतीच्या बांधावर बोरी, बाभळी, करंज, भोकर, उंबर, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ* अशी जैव विविधता पूरक झाडे लावणार असे कबूल केले. अनेकजण सांगतात झाडांची सावलीमुळे पिकांना फटका बसतो मात्र हे खोटं असून आपली स्थानिक झाडांच्या पानांचे खतात लवकर रुपांतर होते, शिवाय सावलीमुळे काही फरक पडत नाही, मात्र यात परदेशी निलगिरी, गुलमोहर आणि नारळ झाडे बांधावर असल्यास भूजल पातळी झपाट्याने खोलवर जाते आणि यांची पाने जमिनीवर पडल्यास जमीन नापीक होत असते. त्यामुळे *फक्त स्थानिक झाडेच* शेतीच्या बांधावर लावली पाहिजेत.   काकडीचे परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करीत असते. आणि मग काकडीचे वेलींची वाढही झपाट्याने होत असते, याचा अर्थ वेलीची वाढ जोरात होते आणि व  क्षमता वाढते ती पण कित्येक पटीने...काहीजण दिवसा कीटकनाशक फवारतात आणि मग मधमाश्या मारतात. यावर उपाय म्हणजे रात्री मधमाश्यांनी आपले परागीभवन काम थांबविले की फवारणी करावी जर गरज असेल तरच.. अगदी ज्येष्ठ निसर्गतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी नागझिरा येते सांगितले की, जंगलात अस्वले मधमाश्यांची पोळी व मध आवडीने खातात, त्याच्या भाकरी करतात त्या करताना झाडांची पाने टाकतात आणि मग त्या सर्व भाकरी गुहेत ठेवतात कारण त्यांच्या पिल्लांसाठी उपयोगी येतील, मात्र काहीवेळा या भाकरी चोरायला आदिवासी लोक येतात आणि मग अस्वले हल्ले करतात मात्र अस्वलाचा हल्ला म्हणजे जगात सर्वात वाईट चेहरा होतो, कारण त्याची एक चापट म्हणजे चेहरा विद्रुपीकरणच. मात्र एकदा त्यांनी एक अस्वल झाडावर चढत असल्याचे पहिले, ते झाडावर मधमाशी पोळे खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर गेले आणि वरून खाली पडले आणि मेले याचा अर्थ असा आहे की , त्या मध्यामाश्याच्या पोळ्यावर अनेकदा अस्वल हल्ले झाले होते आणि मग त्या पोळ्यातील राणीने आपल्यात बदल करीत झाड फांदी ऐवजी अस्वल आल्यावर फांदी सहज तुटेल अश्या फांदीवर आपले पोळे केले आणि यावर कायमस्वरूपी आगी माश्यांनी उपयायोजना केली. ज्या प्रजाती बदलायला शिकतात त्याच निसर्गात टिकतात आता वेळ आहे मानवाला बदलायची, जर आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला नाहीतर आपणसुद्धा संपणार यात शंकाच नाही, हे विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे. 
*आज कोरोना च्या रूपाने धोक्याची घंटी वाजली आहे वेळीच सुधारणा बदल नाही केला तर मानवी जीवन संपायला वेळ लागणार नाही.
 *फार छान, उपयुक्त, उद्बोधक लेख.*

Sunday, May 31, 2020

अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर

अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर 
 अकोले 2020-05-30

अकोले , ता. ३०: विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्राप्त लौकिकापलीकडे काही निराळे पैलू असतात . हे पैलू जनमानसात फारसे झोतात नसतात . अपरिचित असतात . असे काही विलक्षण , हटके पैलू नजरेस आल्यास जाणवते ते वेगळेपण . अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ मंत्रीपदाच्या दखलपात्र कार्याने चर्चेत राहिलेले मा . मधुकर पिचड हेदेखील असेच व्यक्तित्व .

राजकारण , सत्ता , आमदारकी , मंत्रीपद , कार्यकर्त्यांचा गोतावळा यापलीकडे मधुकर पिचड यांचा आगळा परिचय ठराविक परिघापलीकडे सुप्त स्वरूपात राहिला आहे , आणि तसा तो परिचय फार थोड्या लोकांना ठाऊक आहे ! असा वेगळा , पूर्णतः भिन्न पैलूंचा मागोवा याठिकाणी नजरेस आणून द्यायचा उद्देश आहे .

मा . पिचड हे , विख्यात तत्वचिंतक , स्वातंत्र्य संग्रामातील थोर सेनानी , ज्येष्ठ समाजवादी , हाडाचे शिक्षक तसेच ' साधना ' साप्ताहिकाचे माजी संपादक दिवंगत प्रा . ग . प्र . प्रधान ( प्रधान मास्तर ) यांचे लाडके विद्यार्थी ! पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रधान मास्तर पिचड यांचे शिक्षक होते . पिचड यांचे वक्तृत्व , धडाडीचे नेतृत्व गुण हेरून प्रधान यांनी स्नेह जपला ! ऐतिहासिक , चरित्रपर , तात्विक आणि चिंतनपर पुस्तकांचे वाचन हे पिचड साहेबांचे वैशिष्ट्य .

समाजकारणासह सर्वच क्षेत्री पिचड यांनी मुत्सद्देगिरी टिकवून ठेवली . माणसांची पारख तसेच सूक्ष्म अभ्यास वृत्ती त्यांच्याकडे आहे . प्रादेशिक क्षेत्राविषयी ससंदर्भ असलेला त्यांचा अभ्यास थक्क करणारा . स्मरणशक्तीची त्यांना असलेली देण ही वेगळी बाब विलक्षणच . पुरोगामी , परिवर्तनशील विचारांचा पिचड यांच्या आयुष्यावर असणारा प्रभाव मोलाचा आहे . छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहू महाराज , महात्मा जोतीराव फुले - सावित्रीमाय फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , गाडगेबाबा , क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्यासह अन्य महापुरुषांच्या विचारांचा - कार्याचा प्रभाव जसा पिचड यांच्यावर आहे तसाच कृतीशील ध्यासही त्यांना राहिला आहे .

अभ्यासक , संशोधक , साहित्यिक , कलाकार , विद्वत्ता यांविषयी पिचड यांना कायमच आदर राहिला आहे . जिद्द , धैर्य , मेहनत हे त्यांचे सद्गुण ठरलेत . शैक्षणिक क्षेत्राचा आदर ठेवणारे साहेब गुणांची कदर करणारे आहेत . प्रसंगोपात् सडेतोड बाणा , परखड स्वभावाने निर्णयक्षमतेची चुणूक दाखविणारे पिचड आदरयुक्त दबदबा टिकवून राहिले . प्रश्नांच्या चौफेर बाजू समजावून घेऊन चुकीची तडजोड न करता फैसला करायचा पिचड यांचा स्वभाव . आदिवासी , उपेक्षित वर्गातील जनतेच्या समस्यांवर पुरेपूर कागदपत्रे , आधारभूत पुरावे आणि मुळापासून संदर्भीय दुवे मिळवून सातत्यपूर्वक पाठपुरावा करणे हे पिचड यांचे वेगळे वैशिष्ट्य .

सत्य समजल्यावर वैर न करता खिलाडूपणाने परिस्थितीवर मात करणे आणि पुढे वाटचाल करणे हा आहे त्यांचा स्वभाव . क्षमाशील भाव हा कौतुकास्पद पैलू त्यांनी कायमस्वरूपी , सुरुवातीपासून जपला . सकारात्मक विचारसरणी हा आहे त्यांचा स्थायी भाव !

जन्मदिनाच्या स्नेहपूर्वक सदिच्छा ..

Saturday, May 30, 2020

गावाचा आधारवड

*गोष्ट परीसासारख्या माणसाची....*

*आहेर वसंतराव दिनकर(जादूगार,सर)प्रस्तुत-:मो-:9423387988*

*गणोऱ्या चा परीस...9423387988…*

गावचा आधारवड--: भाग-  *1*  2..3...4..5

[ *कै.पंढरीनाथ जिजाबा पा.आंबरे* ]

*अंबामातेची पवित्र नगरी अन आढळा माईचा काठ,या तीरावर वसलेलं गणोरे हे आमचं छोटंसं खेडेगाव..गावच्या चोहोबाजूंनी लाभलेलं निसर्गसौंदर्य ...गावात एकवटलेली बारा बलुतेदार जमात...पण या गावात जन्मलेली हाताच्या बोटावर मोजण्या इतकी,माणसं मात्र परिसा सारखी जगली..! आज गावची लोकसंख्या चार ते साडेचार ह्जार इतकीचं आहे*

*अज्ञान,अंधश्रद्धा आणि दारिद्र्यात पिचलेली माणसं घराघरात होती...अगदी किरकोळ गरजांसाठी संघर्षात जगणारी माणसं गणोऱ्या त एकवटलेली होती...सततचे कष्ट,मेहनत,रक्त आटेस्तोवर काम करून हि संसारात सुबत्ता येत नव्हती....पावसाच्या भरवश्यावर पेरणी करून आक्काशाकडे डोळे लावून बसलेल्या कष्टकऱ्याना तीन महिने काय खायचे याची भ्रांत असायची*

*याच अगतिकतेचा फायदा त्यावेळची सावकार मंडळी घ्यायची...पाऊस पाणी नीट पडला तर ठीक...नाहीतर याच जमिनी कर्जाच्या मुद्दल आणि व्याजापायी सावकाराच्या घशात जायच्या...!!*

*हि गोष्ट आहे १९२०-२१ या स्वातंत्र पूर्व काळातली-आंबरे जिजाबा आणि बजुबाई हे आमच्या गणोरे गावचं गरीब जोडपं*

*त्यांना चार मुलं पंढरी,तात्याबा,लक्ष्मण आणि पांडुरंग आणि एक मुलगी--बागायती जमीन एक दीड एकर....पंढरी,तात्याबा,लक्ष्मण आणि पांडुरंग या चार मुलांची  लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायका,मुलं-मुली असं संसाराचा गाडा वाढत गेला—हाताची अन तोंडाची गाठ पडणं [पोट भरणं] मुश्कील होवून बसलं....खाणारी तोंड वाढतच होती.....*

*म्हणून वडिलांणी म्हणजे जिजाबांनी आपला मोठा मुलगा पंढरी याला आमच्या गणोरे गावचा मोहन दादा त्याचे वडील -किसन दळवी यांचा चुलत भाऊ सखाराम दळवी अशा एक दूरचे नातेसंबंध त्यावेळी पुण्याला होते-त्यांच्याकडे काहीतरी कामधंदा करावा म्हणून पंढरीला पुण्याला पाठवून दिले....*

*पंढरी पिळदार आणि चांगला धडधाकट शरीरयष्टीचा...पुण्यात पंढरी ला काय काम द्यायचे..?? असां पाहुण्यांना प्रश्न पडलेला —पंढरीचे शिक्षण चौथी-पाचवी पर्यंत झालेले...पण अक्षर मात्र मोत्यासारखे सुंदर...*

*पण मोठ्ठ्या आशेने पुण्यात आलेल्या पोराला काहीतरी कामधंदा मिळवून दिला पाहिजे म्हणून पाहुण्यांनी पंढरीला एका डाळमिल वाल्याकडे डाळीचे कट्टे उचलणे,त्याच्या थप्प्या लावणे,गाडीत माल भरने,तसा तो खाली हि करणे अशी कामे मिळवून दिली...*

*”चोरी-शिंदळकीची लाज असावी कामाची कासाली लाज” हि आईनं सांगितलेली उक्ती पंढरीच्या तनामनात भरली होती,म्हणून पंढरी हे हमालीचं काम देखिल मन लावून काम करू लागला...*

*त्याचं डाळमिलमध्येचं एक सदाशिव कोंडरे नावाचा,मावळ तालुक्यातील पोरगा पंढरी बरोबर हमालीचं काम करायचा...काम करता करता त्यांची  छान मैत्री जमली होती...पण हा सदाशिव निरक्षर होता...पण त्यांची मैत्री अभेद्य होती*

*व्हायचं काय कि,कधी कधी डाळमिल वाल्या मालकाच्या गैरहजेरीत मालाची गाडी यायची मग पंढरीच त्या गाडीचे बिल बनवायचा... गाडी खाली करून घायचा..मालकाने विकलेल्या मालाची बिले अचूक करून द्यायचा...*

*मालकाने त्याची हि हुशारी पाहून एकदा जमाखर्चाची बिले पंढरीला करायला सांगितली-अगदी अचूक तयार केलेली बिले पाहून मालक आश्चर्यचकित झाला..त्यात पंढरीचे अक्षर एकदम सुंदर आणि मोत्यासारखे---या पंढरीच्या कामावर मालकाची मर्जी बसली. आणि डाळमिल वाल्या मालकाने पंढरीचे हमालीचे काम काढून घेतले व आर्थिक व्यवहाराचे काम पंढरीकडे सोपावले*

*आता पंढरीचे  अनेक व्यापाऱ्यासोबात संबध येवू लागले..अन पंढरीला या धंद्यातील गणित समजले...माल कासा खरेदी करायचा.??तो मार्केटला कसा पाठवायचा..?? येथपासून ते डाळीची स्वच्छता ...माल भरणे ...ते मालाचा तेरीज ताळेबंद या साऱ्या गोष्टी जमायला लागल्या...पंढरी या कामात पारंगत झाला..!!*

*काही वर्ष काम केल्यानंतर एके दिवशी असंच गप्पा करता करता दादांनी आपला मित्र सदाशिव याला आपण स्वतंत्र डाळीचा व्यवसाय चालू करूया का..??हि कल्पना मांडली—सदाशिवला दादांचं व्यापारातलं कौशल्य एव्हाना कळालं होतचं.त्या रात्री दोघा मित्रांनी भागीदारीत डाळीचा व्यवसाय चालू करायच ठरवलं.दादांची टेकनिकल अक्कल हुशारी आणि सदाशिवचं भांडवल असं भागीदारीत धंदा चालू केला...*

पण काही वर्षातच जोमात चाललेला हा व्यवसाय-:

*तुझ्या भागभांडवला वर हा पंढरी नफा कमावतोय अशी कुणीतरी सदाशिव ला पिन मारली आण हां धंदा मोडीत काढला....*

पण????
*पंढरी आता हार मानणारा नव्हता...इतक्या दिवसाच्या अनुभवाची शिदोरी आणि  केलेल्या बचतीच्या जोरावर पंढरीने पुण्यामध्येच एक पाच गुंठे मोकळी जागा असलेल तीन मजली घर भाड्याने घेतले....आणि स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली....*

*मोकळ्या जागेत तूर,मुग,मठ,हरबरा भिजवून वाळत टाकण्याची सोय केली आणि उर्वरित मोकळ्या जागेत हे धान्य भरडून त्यापासून डाळी तयार करण्याचं काम चालू केलं...घरच्या माणसांनी पंढरीला या कामात मदत केली अन अल्पावधीतच पंढरीचा धंदा जोमात सुरु झाला....*

*याच डाळमिलच्या धंद्याच्या जोरावर पंढरीने गनोऱ्याला गावाकडे बऱ्याचश्या शेतजमिनी खरेदी केल्या...व्यापार पण जोरात चालू होता...झालेल्या नफ्यातून गावाकडे जमिनी खरेदी चालूच होती असं करता करता पंढरीची गावाकडे गनोऱ्याला चालीस ते पन्नास एकर जमीन झाली... ...!!..धाकटा भाऊ लक्ष्मण जमीन कसू लागाला...त्याने हि भावाला साथ  देत शेती सांभाळली.!!*

*हमाली करणारा पोरगा स्वताच्या स्वकर्तृत्वावर मालदार झाला होता...आता गावाकडे आणि पुण्यात सर्वजण पंढरीला “आंबरे पाटील” म्हणू लागले....लहान भाऊ पंढरीला दादा म्हणत-ते पाहून इतर लोक हि हळूहळू पंढरीला आंबरे दादा म्हणू लागले...अशा पद्धतीने ते नंतर साऱ्या गावाचे पुणेकर/आंबरे पाटील/दादा म्हणून नावारुपास आले*

*एक दिवस दादांना पुण्यात समजल कि दातारांच्या अन काही आंबरेच्या जमिनी शेतकऱ्यांच्या अज्ञानापायी सावकाराने हडप केल्यात ...त्या रात्री दादांना निट झोप आली नाही—सलग आठवडाभर ते या विचाराने या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होते...सारा गाव मला दादा म्हणतोय,अन मी मात्र माझ्या या गावातल्या लहान भावंडाच्या जमिनी सावकाराच्या घशात जाताना ऐकतोय....*

*आणि एक दिवस दादांनी पुणं सोडण्याचा निर्णय घेतला....निव्वळ निर्णय घेवून ते थांबले नाहीत—तर आपल्या दोन पुतण्यांच्या ताब्यात डाळमिलचा धंदा सोपवून लगेच बैलगाडीने त्यांनी गावाकडची गणोऱ्याची वाट धरली....!!*

*पुण्यातील मित्र परीवाराने गावापायी स्व:ताचं वाटोळ करून घ्यायला निघाला म्हणून मुर्खात काढलं—पण दादांचा निश्चय पक्का झाला होता.....कारण पुण्यात आता त्यांना सुखाची झोप येणार नव्हती..!!*

*दादांच राहणीमान अगदी साधं होतं-दादांच्या मनावर त्यावेळी कॉग्रेसचा पगडा असल्याने,खादीचं धोतर,त्यावर खादीचाच शर्ट,डोक्याला खादिचीच टोपी,शर्ट वर घालायला कोट देखिल खादीचाच असायचा....इतके ते कॉग्रेसप्रेमी  होते*

*कोणत्याही मोठ्ठ्या कामाची सुरुवात हि अगोदर बाळपावलाने होत असते हे दादांना स्वातंत्रपूर्व काळात माहित होते...त्याचीच नांदी म्हणून------:दादांनी गावात आल्या आल्या दादांनी बालपणीचे मित्र-सवंगडी,जवळचे नातेवाईक-काही प्रेमाची माणसं यांच्या सोबत चर्चा केली..आपलं गावाला परत येण्याचं प्रयोजन सांगितल....*

*तेव्हा महाराष्ट्रात कुठ कुठ सोसायट्या सुरु होत होत्या.पण आमच्या गावातील लोकाना याबद्दल काही माहित नव्हत—दादांनी सोसायटीच महत्व समजावून सांगत,सहकरी तत्वावर हि योजना गणोऱ्यात राबवण्याचं मनावर घेतलं....स्व:ता मोठी आर्थिक झळ सोसून परिसरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत शेतकऱ्याना नाममात्र फी भरून सभासद करून घेतलं....*

*आणि पहिली सहकारी तत्वावर चालनारी सोसायटी आमच्या गणोरे गावात अस्तित्वात आली.दादांनी गावासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल....आणि येथून त्यांनी गावच्या विकास कार्याला सुरुवात केली..!! आता गरीब शेतकऱ्यांना शेती,बी-बियाणं यासाठी सावकारावर अवलंबून राहावं लागणार नव्हतं...*

*सोसायटीतून अगदी अल्प व्याजदरावर कर्ज मिळण्याची सोय दादांनी करून दिली....गावातील हातावर-मोलमजुरी करणारी श्रमिक जनता यांचेसाठी किराणा माल व धान्य मिळण्याची सोय देखिल सोसायटीतच केली....वर्षाच्या आतच सहकारी तत्वावर एक कापड दुकान देखिल गावात चालू केले.......*

*आता अन्न/वस्त्र/निवारा या लोकांच्या मुलभूत गरजा गावातल्या गावात भागू लागल्या...आणि दादांनी सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या सोसायटी ची ख्याती महाराष्ट्रात दूर दूर पसरली...*

*त्याकाळी गनोऱ्याच्या सोसायटी चा कारभार कसा चालतो हे पाहण्यासाठी व माहिती करून घेण्यासाठी एकदा मराठवाड्यातील एकशे तीस सधन-श्रीमंत शेतकरी तीन बस-गाड्या करून गणोऱ्याला आले होते..”अतिथी देवो भव:”या उक्तीप्रमाणे तेव्हा सर्वांच्या जेवणाची,चहा-पाण्याची अन मुक्कामची सोय दादांनी आपल्या गणोरे गावात केली होती...हि घटना १९५६ साली घडली..!!*

*पडत-धडपडत विकासाचं पहिलं बालपाऊल पाऊल पडल होतं...आता तोल सांभाळत सांभाळत दादांनी विकासाच्या मार्गावर चालायचं [गावाला न्यायचं]ठरवल होतं.....!!*

क्रमशः....
[पुढील भाग सलग चार दिवस ठीक एक वाजता पोस्ट केले जातील.-]

गोष्ट पॅरिस माणसाची

कंदील

[सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात दोन दिवस खेड्यात घरी जाण्याचा योग आला...सर्वजण जमले –रात्रीची जेवणं चालू होती आणि अचानक लाईट गेली—अंधारात बँटरी पण सापडेना म्हणून बाईनं पटकन चुलीवरील बत्ती पेटवली-आणि बतीच्या उजेडात जेवताना भिंतीवरील आमच्या त्या हलत्या सावल्या पाहून मी 30 वर्ष भूतकाळात गेलो..]

*गावच्या घरातील घासलेटचा दिवा*

*आहेर वसंतराव दिनकर[जादुगार सर] प्रस्तुत-:मो-:9423387988*

*चिमणी/कंदील... ...9423387988...*

*महावितरण ची वीज आमच्या गणोरे गावात पोहचली होती,पण आमच्या घरात ती येईल इतकं आमचं भाग्य नव्हतं...घरचं दारिद्र्य आमच्या पाचवीलाच पुजलेलं.. माझ्या लहानपणी आम्ही धाब्याच्या [म्हणजे मातीच्या भिंती अन त्यावर लाकडी फळ्या टाकून त्यावर टाकलेलं मातीचच छप्पर] अशा घरात रहायचो.....घरासमोर मात्र मोठ्ठं अंगण असायचं...*

*आई-वडील दोन्ही विडी कामगार....आमची शाळा पाचला सुटायची...शाळा सुटली कि,मी टोपल्यात काय आहे नाही ते पहिलं खावून घ्यायचो...अन पहिलं काम असायचं दिवा-बत्तीची तयारी करणं.....*

*दिवा म्हणजे तरी काय असायचा--:काचेची रिकामी दारूची बाटली अन तिच्या झाकणाला एक छिद्र पाडून त्यात बाटलीत तळापर्यंत जाईल इतकी मोठी सुताची किंवा कापडाची वात...!!*

*मातीच्या चुलीच्या कोपऱ्यावर थोडा उंचावर जर्मलच्या डब्यावर ठेवलेला हा दिवा,चुलीत फुंकर मारायची काळवंडलेली  पितळी फुकणी, भांडी धरायची लोखंडी सांडशी आणि डब्याशेजारी फुलछाप  काडीपेटी,लाकदाडाच्या दोन तीन सोबण्या,आणि इतर गोष्टींचा नेहमी असलेला पसारा आणि दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात कोपऱ्यात दोन पायांच्या मध्ये बरोबार अंगठ्ठ्याने काठवत दाबून धरजेवण बनवणारी आमची बाई हे चित्र आजही मनात कोरलेलं आहे*

*हा दिवा आम्हाला स्वच्छ घासून पुसून त्यात घासलेट[आत्ताच रॉकेल]टाकून वातीची कोजळी साफ करून ठेवावा लागायचा....बाई कामावरून सहा वाजेपर्यंत यायची,आण तिच्या हाताने तो दिवा लावायची......*

*गावातील बरेच जन त्या दिव्याला चिमणी म्हणायचे....का ते मला आजपर्यंत माहित नाही..अन मी पण कधी कुणाला इचारलं नाही....ह्या दिव्याला वरती अडकवयाला आम्ही त्याला एक तारेची वक्राकार कडी बनवायचो...काही घरात हि चिमणी पत्र्याच्या डब्यापासून बनवलेली असायची...*

*रातच्याला स्वयपाकाला कधी कधी चूल जाळ धरायची नाही मग माझी आई बत्तीतत्ल बुचभर रॉकेल चुलीतल्या काड्या-कुड्यावर टाकायची मग चुलीत जाळ व्हायचा....हे नेहमीच ठरलेलं असायचा------*

*शाळेत असताना सूर्यग्रहण पाहण्यासाठी –फोटोफिल्म,....किंवा वेल्डीगवाल्यांची काच हवी असायची....गावात कुणांक तरी एखादी काळी काच असायची त्यातून सूर्यग्रहण पाहण्यासाठी लाईन लागायची----यावर उपाय*

मग..?????

*आम्ही एखादी काच उपलब्ध करून ती दिव्याच्या कोजळीवरसपाट धरून घट्ट काळी करायचो...अन मग ती तयार झालेल्या काचेतून सूर्यग्रहण पाहायचो...गावच्या मित्रांच्या बुद्धीला तेव्हा तोड नव्हती...समस्येवर उपाय काढणं यात आमचा हातखंडा असायचा.*

*हा घासलेट चा दिवाही कधी कधी दगा द्यायचा.दिव्यातलं रॉकेल संपलं की सारी रात्र अंधारात काढावी लागायची.....तेव्हा हे घासलेट म्हणजे आजचं रॉकेल—टी वाय शिंदे आणि सावळेराम सखाराम दातीर यांच्याच दुकानात महिन्याकाठी पाच लिटर मिळायचं—त्यासाठी राशन कार्ड दाखवावं लागायचं...*

*चुलीच्या ठेवलेला हा दिवा,...लपकणाऱ्या दिव्याच्या उजेडात जेवण बनवणारी आमची बाई—आणि तेन्दुच्या पानाच्या विड्या वळणारा माझा बाप  हे चित्र आजही स्पष्ट दिसतंय....या चिमणीच्या भडभडत्या लपकत्या  उजेडात आमच्या आय्यांच्या सावल्या भिंतीवर नेहमी लहान-मोठ्ठ्या व्हायच्या त्यामुळे आईची उंची नेमकी किती..???..हे आम्हाला शेवटपर्यंत कळालचं नाही....*

*या चिमणीच्या भडभडत्या लपकत्या उजेडात सर्वांची जेवणं व्हायची....सर्व सावल्यां भिंतीवर एकमेकात मिसळून जायच्या--नंतर हाच दिवा आम्हाला अभ्यासासाठी उजेडाची साथ करायचा...*

*शाळा सुटल्यावर गावपट्टीत खेळताना किंवा एखाद्याच्या बांधावरून जाताना काही जण गुरे राखण करून घरी येताना कुठतरी पायात काटा मोडायचा...मग हातच्या मधल्या बोटाने तोंडातून थुंकी घेवून ती जागा साफ करायची व मग हा  पायात खुडलेला काटा या चिमणीच्या उजेडात तासनतास काढत बसायचा उद्योग चालायचा...*

*एखाद्या छोट्या डब्यावर ती चिमणी ठेवून आम्ही अभ्यास करायचो,,,,,,डब्यावर दिवा ठेवला कि, डब्याच्या बाहेर कडेन बरोबर एक गोल काळी सावली तयार व्हायची---त्याच्या बाहेर आमची अभ्यासाची वह्या/पुस्तकं असायची...!!*

*रानातील ,वस्तीवरील लोकांकडे पण घराघरात हि चिमणी/बत्ती  असायचीच....पण गोठ्यातील जनावरांना वाऱ्या-वावधानात ,पावसात चारा-पाणी करण्यासाठी किंवा गाईची धार काढण्यासाठी उजेड म्हणून या चिमणीचा वापर करणे धोक्याचे असायचे...एकदा वस्तीवरील एका शिंदे च्या माणसाकडून कडून जनावरांना वैरण काढताना दिवा खाली पडला अन उभी व्हळई धगधत पेटली...*

*यावर उपाय म्हणून आमच्या गुरुवारच्या बाजारात कंदील यायला लागले....चिमणी प्रमाणेच कंदिलात पण वात घालावी लागायची...त्यात पण रॉकेल घालायचं हे आमच्यासाठी त्यावेळी मोठं काम असायचं... या कंदिलाला बाहेरून काच असल्यामुळे वार्‍या-पावसात या कंदिलाचा उजेड जाण्याची किंवा कंदील विझण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे या कंदिलाचा उपयोग अशा वार्‍या-पावसात मोठ्याप्रमाणात केला जायचा*

*आमचा मात्र कितीतरी दिवस अभ्यास चिमणीच्या उजेडात चालू होता....बाप त्याचं काम उरकलं कि झोपायचा ---माझा अभ्यास चालूच राहायचा...मग बाप माझ्या आईला म्हणायचा-:*

*”दिव्याची वात थोडी कमी कर गं...मला झोप येत नाहीये...”*

 *मग बाई दिव्याची वात थोडी कमी करायची....*

मग मी बाईला म्हणायचो-:

*”दिव्याची वात थोडी मोठी कर गं,मला वाचता येत नाहीये...””*

*बाई पुन्हा दिव्याची वात थोडी मोठी करायची....*

बाप पुन्हा म्हणायचा----

*”दिव्याची वात थोडी कमी कर गं...मला झोप येत नाहीये...”*

*मग बाई दिव्याची वात थोडी कमी करायची....*

..मग मी पुन्हा म्हणायचो –

*”दिव्याची वात थोडी मोठी कर गं,मला वाचता येत नाहीये...”*

 *बाई पुन्हा दिव्याची वात थोडी मोठी करायची....*

*आमची बाई रात्रभर दिव्याची वात “खाली-वर.....वर-खाली” असं करत राहायची आमच्या दोघांच्या मध्ये ती त्या दिव्यासारखी जळत राहयची*
--- भाग-2 ---
*अंगणात बसून अभ्यास करायचा तर तिथे चिमणीचा उपयोग नसायचा....वाऱ्याच्या थोड्याशा झुळुकीने हि हि बत्ती/चिमणी विझायाची...पुन्हा पुन्हा पेटवायला लागायची--- यावर उपाय म्हणून माझ्या बापाने मग गुरुवारच्या बाजारातून एक कंदील विकत आणला..*

*कंदिलाची काच पुसणे हा तसा मोठा अवघड प्रकार.....रात्रभर कंदील जळत असल्याने---काचेवर त्या ज्योतीमुळे  काळी कोजळी जमायची....ती काचेच्या आत कापड घालून पुसून स्वच्छ करावी लागायची....अशा वेळी बऱ्याच वेळा हात कापला जायचा...कापलेला भाग तसाच तोंडात घालून रक्त पिवून काच पुसण्याचं आमचं कसब दिवसेंदिवस वाढत गेलं....आणि काच लख्ख होवू लागली......!!*

*हा कंदील बऱ्याच वेळा मित्रांकडे अभ्यासाला जायला उपयोगी पडायचा...रात्रीच्या वार्‍यात कंदील विझत नसायचा... कंदिलाच्या सभोवताली बसून आम्ही मित्र अभ्यास करायचो...अभ्यास करताना या कंदिलाची एक गोष्ट आमच्या लक्षात आली कि--:*

*कंदिलाच्या जेवढं जवळ जाऊ तेवढी माझी सावली सावली मोठी व्हायची.....आणि  जेवढे लांब जाऊ तेवढी माझी सावली लहान व्हायची.....कंदिलाच्या प्रकाशात हा खेळ बराच वेळ चालायचा....*

*हातात एक काठी आणि कंदील घेऊन गावातील/मळ्यातील लोक रात्री शेतावर,खळ्यात धान्याचं राखण करण्यासाठी जायचे.....घरापासून जवळच असलेल्या शेतात माळा राखण्यासाठीही गावातील बरेच जण कंदिलाचा उपयोग करत...*

*खतोड्याच्या मळ्यातील सुभा ....धाम्बोडी फाट्यावरील काही लोक इतरांच्या शेतात/मळ्यात शेळ्यां,मेंढ्यांचा तळ ठोकायचे,तेव्हा या शाळकऱ्याच्या घरून रात्री कंदिलाच्या उजेडात तळापर्यंत भाकरी यायच्या....कंदिलाच्या प्रकाशात वाटचाल करत तळावर जेवण्याचे दिवसही आता सरलेले आहेत*

*त्या काळी गणोऱ्यात रात्रीच्या वेळी खळवाडी वर पिच्चर असायचे---“एक गाव बारा भानगडी...सांगत्ये ऐका...चोरीचा मामला...सुशीला....आई कुणा म्हणू मी..??...थांब लक्ष्मी कुंकू लावते....” अशा पिच्चरच्या दवंडी गावात रानावनात पोहोचायच्या...मग रात्रीची जेवण लवकर उरकून हि मंडळी----:*

*-----:मळ्यातून,खतोडवाडी,.शिंदेवाडी,..पाटावरून ...पिंपळगावमधून बैलगाडीने लोक पिच्चर पाहण्यासाठी येत....बैलगाडीतून प्रवास करताना हमखास उपयोगी पडणारा हा कंदील,दोन बैलांच्या मध्ये जो जू असायचा त्याला अडकवलेला असायचा..... चांदण्या रात्रीच्या त्या प्रवासात खळंम खुळम्म असा बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाजात तो कंदील हि मागे पुढे हलायचा....*

*त्या हलत्या उजेडात रात्रीच्या वेळी रस्ता दाखवण्याचं काम तो कंदील इमाने इतबारे करायचा.... कंदील अंधाऱ्या रात्री मार्ग दाखवणारा सर्वांचा सोबती होता*

*आता आमच्या गनोऱ्यात...वाडीवस्तीवर...शेतात..मळ्यात...महावितरणची वीज पोहचलीय......*

पण...???????

*गावच्या भूमीत,अन घरच्या अंगणात या चिमणी आणि कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत करत कुणी गायक, राजकारणी, समाजकारणी, पोलिस, चित्रकार, जादुगार,सैनिक,उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि उच्च पदावर गेले..... ग्रामीण भागातील आमच्या आनंदी पर्वातील हा कंदील अडगळीला गेला....*

*त्याची काच केव्हाच फुटून पडली...काही वर्षांनी दिवाळीची स्वच्छता करताना काच नसलेला हा कंदील तुम्हाला माळ्यावर/अडगळीत सापडेल----तेव्हा आमच्या जमान्यात हा एक ‘”कंदील”’ होता असं आपल्या लेकराबाळांना सांगावं लागेल*

[पोष्ट वाचून तुम्हाला तुमच्या बालपनाचा काचेचा ,पत्र्याच्या डब्याचा दिवा समोर दिसाया लागल्यास,किंवा तसा काही फील मिळाल्यास हि पोष्ट आपल्या मित्रपरिवार आणि इतर काही  ग्रुपवर जरूर फोरवर्ड करावी..व इतरांनाही लॉकडाऊन च्या काळात आपल्या बालपणातील दिव्याची आठवण देवून बालपणाचा आनंद मिळवून द्यावा..]

तुमचाच
शब्दांकनकर्ता -:
*आहेर वसंतराव दिनकर*
*जादुगार सर*
*अकोले,अहमदनगर*
*मो-:9423387988*