Saturday, December 29, 2012

आदिवासींची होळी

सातपुड्याच्या बलाढ्य पर्वतरांगेने वेढलेल्या बिलगावातल्या (ता.धडगाव, जि.नंदुरबार) माळावर भलीमोठी होळी रचली आहे. दोन थाळ्याचा मोठमोठमोठ्याने गजर सुरु होतो. डफ- डमरू अन खंजिरी या चर्मवाद्यांच्या साथीला पायात बांधलेले चाळ, कमरेला गुंडाळलेल्या घुंगरमाळाच्या आवाजातून निर्माण होणा-या नादमधूर संगीताच्या तालावर पारंपरिक वेशभूषा केलेले आणि मुखवटे घातलेले आदिवासी होळीभोवती फेर धरून बेभान होऊन नाचताहेत......
बुंध्या आणि बाव्यांनी नाचताना आकार घेतलेल्या वर्तुळाच्या आत राई, घोडीवाला, निस्क्या आणि उग्रवण्या व व-हाडी यांच्यातले युद्ध रंगले आहे! सातपुडाच्या अजस्र पर्वतरांगांच्या कुशीतल्या द-याखो-यातील रानवाटा तुडवित तेथे जमलेल्या शेकडो आदिवासींसह देश-परदेशातून आलेले पाहुणे आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेचा हा चित्तवेधक आविष्कार ' याची देही याची डोळा... ' अनुभवताहेत.....
नर्मदा खो-यातील आदिवासींमधील पावरी, बिलाली, तडवी, पाडवी, वसावे या जमाती मूर्तीपूजा मानत नाहीत. त्यामुळे त्यामागुन येणारे कर्मकांड आणि इतर थेरांना येथील आदिवासींच्या जीवनात काडीचेही स्थान नाही. मात्र असे असले तरी त्यांचे भरण - पोषण करणा-या निसर्गाविषयी त्यांच्या अंतःकरणात नेहमीच कृतज्ञेचा भाव असतो. कोणत्याही अदृश्य शक्तींवर विश्वास न ठेवणारे आदिवासी बांधव निसर्ग देवतेची मनोभावाने उपासना करतात. येथील श्रद्धाळू आदिवासींच्या जीवनात अग्नीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. निसर्गदेवतेचे आपत्य आणि पंच महाभूतांपैकी एक असलेल्या अग्निविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होळीच्या दिवशी सारे आदिवासी आबालवृद्धांसह एकत्र जमतात. अतिशय उत्साही वातावरणात साजरा होणारा हा केवळ एक सण उरत नाही तर आदिवासी लोककला आणि संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडविणारा तो सांस्कृतिक उत्सवच होतो.
येथील आदिवासी मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असलेल्या या उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. आपल्याकडे मोठ्या धामधुमीत साजरे होणारे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे त्यांच्या गावी नाहीत. देवदिवाळीसारखा एखादा - दुसरा सण असतो. परंतु होळीच्या सणाचे आदिवासींच्या जीवनात आगळेच महत्त्व आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आदिवासी लोक अतिशय आनंदभराने हा सण साजरा करतात. मूर्तिपूजेचे थोतांड आणि कर्मकांडाला थारा न देणा-या आदिवासी जमातींच्या काही श्रद्धा आणि परंपरा मात्र होळी उत्सवात जरूर गुंफल्या आहेत.
वर्षभरात कोणी आजारी झाले एखादा बाका प्रसंग आला की, कुटुंबातील मुखिया [प्रमुख] अग्नीला साक्षी ठेवून नवस करतो. नवसाची फेड करण्यासाठी म्हणून कुटुंबातील लहान मोठा पुरुष पारंपरिक वेशभूषा करून उत्सवात सामील होतात. एखाद्या थोरल्या माळावर मोठी होळी रचली जाते. जंगलाचे राजे असलेल्या आदिवासींचे त्यांचे भरण-पोषण करणा-या जंगलावर भारी प्रेम असते. होळीसाठी निर्दयीपणाने ते वृक्षांची कत्तल करीत नाहीत. वाळलेल्या झाडांची तसेच निरुपयोगी लाकडे होळीला आणली जातात. अत्यंत पवित्र झाडाचे स्थान असलेल्या उंचच उंच बांबूची काठी होळीच्या मध्यभागी उभी करतात.
डोंगर कपारीतल्या वाड्या-पाड्यांवरून ढोलवाले नाचाणा-यांचे जत्थेच्या जत्थे तेथे दाखल होतात. एका जत्थ्यात २५ पासून ५० जणांचा समावेश असतो. प्रत्येक जत्थ्यातील पात्रे सारखीच असतात. परंतु त्यांची वेशभूषा आणि सजावट अत्यंत देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. तिला एक आदिवासी संस्कृतीचा अस्सल बाज असतो.
बुंध्या, बावा, निस्क्या, उग्रवण्या, राई आणि घोडीवाला ही या पथकातील प्रमुख पात्र. राईच लग्न घोडीवाल्याशी ठरलेलं असतं. लग्नाला जमलेली व-हाडी मंडळी आनंदाने नाचत असतात. परंतु निस्क्या या खलनायकी पात्राला हे लग्न मान्य नसतं. म्हणून तो या लग्नात सारखी विघ्न आणीत असतो. राई आणि तिला साथ देणारी व-हाडी मंडळी यातून मार्ग काढीत पुढे जात राहतात. या टिचभर कथानाकाभोवती हा नृत्य-संगीताचा आविष्कार फिरत राहतो. राईची भूमिका पुरूषच करतात. नृत्य पथकांत स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी अनेक तरूण मुली आपापल्या परीने विशिष्ट पद्धतीने होळीभोवती फेर धरून नाचत राहतात.
राईच्या लग्नात निस्क्याचं विघ्न आणि त्यामुळे त्यांच्यात युद्ध सुरु असताना संख्येने जास्त असलेले व-हाडी मंडळीतील बुंध्या आणि बावाभोवती गोल रिंगण करून नाचत राहतात. सर्व बुंध्यांनी डोक्यावर मोरपिसांची छानदार टोपी घातलेली असते. कमरेभोवती गुंडाळलेल्या पटकु-यावर घुंगरमाळा बांधलेल्या असतात.त्यचा नादमधुर आवाज सुरु असतो. हातात डफ, डमरू व खंजीरीसारखे चर्मवाद्य अथवा बासरी (पवा) असते. सर्वांगावर विविध रंगांचे गोल चितारलेले असतात. तर बावांनी बांबूपासून तयार केलेल्या उंच टोपीला रंगीबेरंगी कागदांनी सजविलेले असते. कमरेभोवती भोपळे गुंडाळलेले असतात. आणि गळ्यात रुद्राक्ष आणि इतर मोठ्या मण्यांच्या माळा घातलेल्या असतात. अष्टगंधांच्या रेषांनी सारे अंग रंगविलेले असते. निस्क्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या हातात तलवारी धनुष्यबाण भाला यासारखी आयुध असतात. हा नाच चालू असताना उग्रवण्या हे पात्र प्रेक्षकांकडून कलेचं मोल वसूल करण्यात गुंतलेले असते.
निस्क्या उग्रवण्या, राई घोडीवाला या पात्रांनी अत्यंत देखणे मुखवटे घातलेले असतात. बावा आणि बुंध्या नाचताना कमरेला असे झटके देतात की त्यातून कमरेभोवती गुंडाळलेल्या घुंगरमाळा आणि भोपळ्यामधील बियांचा नादमधुर आवाज ऐकायला येतो पात्रांची वेशभूषा त्यांची सजावट आणि अत्यंत वेगवान हालचालीसह देहभान विसरून नाचणारे आदिवासी त्याला ढोल,थाळ्या तसेच इतर वाद्यांची मिळालेली साथ त्यामुळे स्थानिक बायाबापडे आणि लहान पोरासोरांसह हा उत्सव अनुभवण्यासाठी मुद्दामहून आलेले लाओ जिओ (इटली ) ब्रॅडमन (लंडन ) यांच्यासारखे परदेशी पाहुणे तसेच प्रांतीय अस्मितेची जोखड बाजूला सारून विविध राज्यांतून आलेले स्त्रिया पुरुषदेखील या उत्सवात सामील होऊन आदिवासींच्या साथीने ताल धरतात, नाचू लागतात. शेकडोंच्या संख्येने जमलेले लोक विस्मयचकित मुद्रेने लोकनृत्य संगीताचा आनंद लुटत असतात. सर्व वाद्यामध्ये ढोलावर आदिवासींचे विशेष प्रेम जडलेले आहे. ते इतकं की ढोल वाजू लागला की, आदिवासींच्या जणू अंगात येतं मागच्या महिन्यात एका गावात 'तारे जमीन पर ' हा हिंदी सिनेमा आणला होता. सिनेमा सुरु असताना कुठेतरी ढोल वाजू लागला. एकेक करीत सारी तरणी पोर तिकडे नाचायला गेली, असे हे त्याचे वेडे ढोलप्रेम ! मनोरंजनाची कृत्रिम साधनं येथील आदिवासींपर्यंत अजून पोचलेली नाहीत. परंतु त्यापुढे जाउन 'इको फ्रेंडली' पद्धतीनं जगणा-या आदिवासींना ही कृत्रिम साधनं भुरळ घालू पाहत नाहीत, हेही वास्तव हटकून सामोरं येतं. त्यातूनच होळीसारख्या उत्सवाच म्हणा किंवा त्यांच्या ढोलप्रेमाचं त्यांच्या जीवनातील महत्त्वदेखील अधोरेखित होतं.
रात्री १० वाजता नृत्योत्सवास सुरुवात झालेली असते. पहाटे होळी ढणाढणा पेट घेते, तेव्हा तर या उत्सवाचा क्लायम्याक्स होतो! पथकातील सारेजण अंगात वारं संचारल्यागत नाचू लागतात. रात्रभर नाचाल्यामुळे थकवा आल्याचा लवलेश कुठ दिसत नाही. प्रत्येक पथकाचं आपलं वेगळं रिंगण. ते रिंगण भले अन ते भले ! बेभान होऊन नाचणा-यांच्या अंगातून घामाच्या सहस्त्रधारा पाझरत राहतात. परंतु मोहाच्या फुलांच्या रसाची 'झिंग' अजूनही उतरलेली नसते!
सकाळी सूर्योदयाच्या साक्षीने या नृत्योत्सवाची अखेर होते. रात्रभर ढोल बडविल्याने ना ढोलकऱ-यांची बोटं दुखू येतात.... ना नाचणा-यांचे पाय थकतात. ना पाहणा-यांचे कान, डोळे तृप्त होतात. आगळावेगळा सांस्कृतिक उत्सव पाहायला मिळाल्याचा आनंद पाहुण्यांच्या चेह-यावर विलसत असतो. जागरणामुळं येणारा थकवा, कंटाळा कुठल्या कुठे पळून गेलेला असतो.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर या लोककलाकारांच्या कलेला दाद देतात. प्रत्येक ढोलाक-याला पुढे बोलावून पाहुणे मंडळीच्या हस्ते त्यांचा सत्कार करून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. कला- संस्क्रूतीच्या जपवणुकीबरोबरच न्याय हक्कांसाठी लढत राहण्याचे आवाहन आणि निर्धार मेधाताई व्यक्त करतात. 'झिंदाबाद ', ' लढेंगे, जितेंगे...!' च्या घोषणा सातपुड्याच्या पर्वतरांगेत घुमतात. जमलेले आदिवासी आता डोंगर कपा-यात वसलेल्या वाड्या-पाड्यांच्या दिशेने चालू लागतात. काही मैलांची पायपीट करून द-याखो-या तुडवत त्यांना त्यांच्या घरट्याकडे पोचायचे असते...

भंडारदर्‍यातील धारानृत्य!

माहेराला आल्यागत मोसमी पाऊस आता भंडारदरा परिसरात रमला आहे. अवघ्या सृष्टीशी त्याचे गुज सुरु आहे. चैतन्याचा दाता असलेल्या पावसाने बघता बघता सृष्टीचे अवघे रुपडेच बदलून टाकले आहे. माणसाच्या चित्तवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची सळसळ सगळीकडे जाणवू लागली आहे. कळसुबाई-हरिश्चंद्रगड यासह सह्यगिरीतील लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे अनेकविध जलरंगांच्या छटांमध्ये न्हाऊन निघत आहेत. चिंब चिंब पावसाने रान आबादानी झाले आहे.
नेहमीपेक्षा यंदा पाऊस तसा अगदी वेळेवर दाखल झाला. तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून तो जसजसा घाटघर-कळसूबाईच्या दिशेने सरकायला लागला, तसा येथला निसर्ग चैतन्याने मोहरून गेला आहे. टपो-या बानी ओघळणारा पाऊस, धुक्यात हरवलेल्या पर्वत-शिखरांवरून झेपावणारे सहस्रावधी प्रपात, लालसर विटकरी पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे. पठारांवर दाटीवाटीने उगवलेले बारीक -बारीक हिरवे-पोपटी गावात, भन्नाट रानवारा आणि जोडीला मस्त गारवा... निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भंडारदरा परिसरात असे हे परिपूर्ण निसर्गचित्र अवतीर्ण झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील रुक्ष वातावरण कुठल्या कुठे पळून गेलेय.
भंडारद-याच्या पावसाला मुळातच एक नाद आहे. लय आहे. सूर आहे... म्हणूनच त्याचे येणे अनेकांच्या दृष्टीने आनंदाचे गाणे होऊन जाते. त्याच्या येण्याची वाट अनेकजण आतुरतेने पाहत असतात. त्याच्या येण्याबरोबर येथे जलोत्सव सुरु होतो.
या अनोख्या धारानृत्याचा मनमुराद आनंद लुटताना सारे सारे विसरून जातात... चिंब भिजतात.... स्वताला विसरतात. असा हा ऋतू हिरवा... ऋतू बरवा... आता आपल्याला पावसाळी रानभूल घालतो आहे. खुणावतो आहे...

पट्टागड उर्फ विश्रामगड

नगर-नासिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातल्या पट्ट्याचीवाडी जवळ हा गड आहे. सन १६७९मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. इतिहासकारांनी केलेल्या नोंदीप्रमाणे १५ नोव्हेंबर रोजी महाराजांनी ही लूट केली. सोने-नाणे, जडजवाहिर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. गोदावरी नदीच्या दक्षिण काठाने महाराज चालले होते.
नाणेघाट मार्गे कल्याणवरून रायगड जाण्याचे नियोजन होते. दरम्यान, महाराज सोने-नाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. तीन बाजूंनी शत्रू सैन्याने महाराजांना घेरले होते. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. महाराजांबरोबर असलेल्या आठ हजार पैकी चार हजार सैन्य कामी आले. त्यातच खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर येवून धडकली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनिती निश्चित करण्यात आली.
राजांच्या गुप्तहेरखात्याचा प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईक यांच्यासारख्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे सुखरूप रवाना झाले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी नगर-नासिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणाऱ्या या पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर 'विश्रामगड' असे पडले. गडावरील महाराजांच्या आगमनास या वर्षी(नोव्हेंबर २०१२ मध्ये) ३३३ वर्षे पूर्ण झाली. येथे १७ दिवस विश्रांती घेऊन पुढे राजे कल्याण मार्गे रायगडावर पोहोचले. नुकताच यानिमित्ताने शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींनी 'शिवपदस्पर्शदिन' साजरा केला. दर वर्षी २२ नोव्हेंबर रोजी गडावर हा दिवस साजरा करण्याचे ठरले आहे.
पट्टा किल्ला एका अर्थाने स्वराज्याचीदेखील सरहद्द होती. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची १३९२ मीटर (४५६६ फूट) आहे. एकूणच प्राचीन किल्ले आणि वास्तू यांच्याकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन आणि दुर्लक्ष यामुळे किल्ल्यावरील राजवाडा आता शेवटच्या काही घटका मोजतो आहे. ऐन वेळी बाका प्रसंग उद्भवल्यास शत्रूला गुंगारा देण्यास किल्ल्यावर चोरदरवाजा आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. अकोले या तालुक्याच्या गावापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पट्टेवाडी गाव आहे. पूर्व दिशेला असलेल्या या गावातून जाणारी अवघ्या २५० मीटरची ही वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे. नासिक जिल्ह्यातील रामायण काळातील जटायू पक्ष्याच्या मंदिरासाठी आणि सर्व तीर्थ यासाठी प्रसिद्ध असलेल्या टाकेदकडून (ता.इगतपुरी) म्हैसवळण घाटातून येणाऱ्या रस्त्यावरून आल्यास कोकणेवाडी गावातून गडाच्या दक्षिण दिशेने दुसरी वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. पण तुलनेने ही वाट अवघड आहे. जवळपास ६०० ते ७०० मीटरच्या आसपास ही अंतर आहे. तिसरा रस्ता नासिकमधील भगूर-देवळालीकडून येतो. निन्वी-गिरवाडीकडून येणारा हा रस्ता औंढ्या आणि पट्टा किल्ल्याच्या मधून वर जातो. ही वाट अधिक खडतर आहे. गडावर लक्ष्मण महाराजांची समाधी आहे. सध्या किल्ल्यावर भगवती देवीच्या मंदिराचे बांधकाम सुरु आहे. भगवती देवीचे गडावर मंदिर आहे. अक्षया तृतीयेच्या दिवशी गडावर भगवती देवीची यात्रा भरते. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात.

कथा भंडारदरा धरणाच्या निर्मितीची!

शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला... अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे. निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले ते असे.... उत्तर
रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. त्याच्या निर्मितीपासून आजवरची वाटचालही मोठी रंजक राहिली आहे. .....
दुष्काळी भागास पाणी देण्याच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२ च्या सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्या्च्या गरजेवर भर दिला होता. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९ मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधा-यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी (ता. अकोले ) येथे मातीचे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला. सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला तो एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. पाण्याखाली बुडालेली एकूण जमीन होती २२ हजार ९०० एकर. जमिनीच्या संपादनासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी - कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला गेला. धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित करण्यात आल्या. हळूहळू जसजसे धरणाचे काम पुढे जाऊ लागले. तसा भंडारद-याचा शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा मुलभूत सोयी सुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे केवढे कुतूहल वाटत होते.
भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. थोडे थिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मो-या असून,त्या अनुक्रमे ७० फुट, १२० फुट, १७० फुट व २२० फुट अशा अंतरावर आहे. या मो-यांचे अर्धा फुट जाडीचे व्यास ३ फुट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. ७१.२८ मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे.
जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये. ६५० फुट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा आला. शिखर स्वामिनी कळसुबाई अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे - नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यागिरीच्या डोंगरद-यांच्या कुशीत विसावली होती. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पडलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते.
या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले.साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड - उजाड जागेवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. साखर कारखाने उभे राहिले. उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. पण सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या भिंतीला तडे गेले. काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. तंत्रज्ञानी जीव धोक्यात घालून अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले.

कमिटेड वॉटर विरुद्धचा लढा

पुढे निसर्गाचा लहरीपणा वाढत गेला. खालच्या भागातील बारमाही पिके फुलवणारे प्रवरेचे वाहून जाणारे पाणी संगमनेर -अकोलेकरांच्या नजराणा खुणावू लागले. यातूनच ८० च्या दशकात 'कमिटेड वॉटर' विरुद्धचा लढा संगमनेर - अकोलेकरांनी खांद्याला खांदा लाऊन लढविला. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. १९८४ मध्ये भंडारद-याच्या पाण्याचे फेरवाटप झाले. संगमनेर - अकोल्याला हक्काचे पाणी मिळाले. मात्र त्यातच पुढील पाणी संघर्षाचीही बीजे पेरली गेली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कमिटेड वॉटरविरुद्ध सुरु झालेला लढा पाण्याचे फेरवाटप या नंतर पुढे पाणी तापू लागलं. १९९० च्या दशकानंतर तर भंडारद-याचे पाणी हा लाभक्षेत्रात संघर्षाचा मुद्दा म्हणून समोर आला. पाण्याची उधळपट्टी, आवर्तनांचा कालावधी, पाण्यातील भ्रष्टाचार यातून मोर्चे, धरणे, आंदोलने, घेराव यातून काही जणांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यास सुरुवात केली. भंडारदरा धरणाची सध्याची साठवण क्षमता आहे ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट. मात्र नाशिक येथील अभियांत्रिकी संशोधन संस्थेने ( मेरी) उपहारग्रहाद्वारे साठवण क्षमता व गाळ सर्वेक्षणाबाबतचा अभ्यास केला. यात अभ्यासात धरणाच्या साठवण क्षमतेत सुमारे सव्वाचारशे दशलक्ष घनफुटाने वाढ झाल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला. त्यावरून निर्माण झालेले वादळ मात्र पेल्यातीलच ठरले. परंतु या धरणात गाळ साचलेला नाही, असे अभ्यासकांचे ठाम मत आहे.
धरणाची उंची वाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला. पाणलोट क्षेत्रातील आदिवासींनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. आमदार मधुकर पिचड यांनी आपले राजकीय वजन पणाला लावले. पुढे प्रस्ताव स्थगित ठेवण्याची ग्वाही मिळाली. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थतेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यानच्या काळात भांडरद-याच्या पाण्याचा उपयोग शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मर्यादित न राहता वीजनिर्मितीसाठीही होऊ लागला. भंडारदरा -१ आणि कोदणी येथील दोन जलविद्युत प्रकल्पातून ४४ मेगावाट वीज निर्माण केली जाते. धरण परिसराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विकास करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे.भंडारद-याचा निळाशार, अथांग पसरलेला जलाशय म्हणजे साक्षात चैतन्याचा अविष्कार असतो. अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याची चवही न्यारीच आहे. या पाण्यानं लाभक्षेत्रात समृद्धीची बेटे फुलविली असली तरी पाणलोट क्षेत्रातील दैन्य अजूनही आहे तसेच आहे.
तें बाकी काहीही असो. कोणत्याही दिवसातल्या म्हणजे बारा महिन्यातील कधीही पर्यटनासाठी हा परिसर नितांत सुंदर असाच आहे, यात मात्र कोणताही वाद नाही. येथील भेट आपल्याला निश्चित आनंद देते. आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न करते.

आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे

परकीय सत्तेशी प्राणपणाने लढणा-या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. राघोजी भांगरे हा या परंपरेतील एक भक्कम, ताकदवान, धाडसी बंडखोर नेता होता. पेशवाई बुडाल्यानंतर (१८१८) इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाटमाथे राखण्याचे अधिकार काढून घेतले. किल्ल्याच्या शिलेदा-या काढल्या. बुरुज नष्ट केले. वतनदा-या काढल्या. पगार कमी केले. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. त्यातच पुढे १८२८ मध्ये शेतसाराही वाढविण्यात आला. शेतसारा वसुलीमुळे गोरगरीब आदिवासींना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाची वसुली करताना सावकार मनमानी करू लागले. कर्जाच्या मोबदल्यात जमिनी बळकावू लागले. दांडगाई करू लागले. त्यामुळे लोक भयंकर चिडले. त्यातूनच सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली. बंडखोर नेत्यांनी या बंडाचे नेतृत्त्व केले.
अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून नगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली (१८३०). यातून महादेव कोळी बंडखोरांत दहशत पसरेल असे इंग्रजांना वाटत होते. रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यांमुळे राघोजी भयंकर चिडला. नोकरीला लाथ मारून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु झाला. १८३८ मध्ये रतनगड आणि सनगर किल्ल्याच्या परिसरात त्याने मोठे बंड उभारले. कॅप्टन मार्किनटोशने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, द-या, घाटरस्ते, जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर नमले नाहीत. उलट बंडाने व्यापक आणि उग्र रूप धरण केले. इंग्रजांनी कुमक वाढविली. गावे लुटली. मार्ग रोखून धरले. ८० जणांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापुजी मारला गेला. पुढे राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने त्या काळी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले.
ठाणे ग्याझेटियर्सच्या जुन्या आवृत्तीत 'ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले' असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठीकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी त्यांच्या आईचे निर्दयीपणे हाल केले. त्यामुळे चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व नाशिकमध्ये इंग्रजांना सळो को पळो करून सोडले. हाती लागलेल्या प्रत्येक सावकाराचे नाक कापले. राघोजीच्या भयाने सावकार गाव सोडून पळाले, असा उल्लेख अहमदनगरच्या ग्याझेटियर्समध्ये सापडतो. साता-याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे जे व्यापक प्रयत्न चालले होते. त्याच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे समाजावर पकड ठेवणे व छळ करणा-या सावकारांना धडा शिकविणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करीत असे.
राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरु झाले. नोव्हेंबर १८४४ ते मार्च १८४५ या काळात राघोजीचे बंड शिगेला पोचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने स्वतःच 'आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत,' अशी भूमिका जाहीर केली होती. स्त्रीयांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रामाणिक नीतीमत्ता याला धर्मिकपणाची जोड त्याने दिली. महादेवावर त्याची अपार श्रद्धा व भक्ती होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पंढरपूर येथे बंडांच्या काळात तो दर्शनाला गेला होता. त्याच्या गळ्यात वाघाची कातडी असलेल्या पिशवीत दोन चांदीचे ताईत असत. त्याच्या बंडाला ईश्वरी संरक्षण आणि आशीर्वाद असल्याची त्याची स्वतःची धारणा होती.
देवजी हा त्याचा प्रमुख सल्लागार आणि अध्यात्मिक गुरुदेखील होता. मे १८४५ मध्ये गोळी लागून देवाजी ठार झाला. त्यामुळे मात्र राघोजी खचला असावा. त्याने आपला रस्ता बदलला. नंतरच्या काळात तर गोसाव्याच्या वेशात तो तीर्थयात्रा करू लागला. विठ्ठलाच्या दर्शनाला त्याने दिंडीतून जायचे ठरविले. ईश्वरी शक्तीची तलवार, चांदीचे ताईत आणि लांब केस याची साथ त्याने आयुष्यभर कधीही सोडली. २ जानेवारी १८४८ या दिवशी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता राघोजीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्याला आणले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या निधड्या छातीच्या शूर वीराचे वकील पत्र घ्यायला कोणीही पुढे आले नाही. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मांडली जाताच एकतर्फी सुनावणी झाली! राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली. राघोजी खरा वीर पुरुष होता. बंडाच्या तीन पिढ्यांचा त्याला इतिहास होता. अभिजनवादी इतिहासकारांचे या क्रांतीकारकाच्या लढ्याकडे काहीसे दुर्लक्षच झाले. ' फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या,' असे त्याने न्यायाधीशांना सांगितले. ते न ऐकता सरकारने बंडाचा झेंडा फडकवणा-या या शूर वीराला २ मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात फासावर चढविण्यात आले. अकोले [जि.अहमदनगर] तालुक्याच्या या भूमिपुत्राच्या बंडाने पुढच्या काळातील क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच अकोले तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक चळवळीमध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो.
[ हा लेख लिहिताना ठाणे व अहमदनगर जिल्ह्याचे ग्याझेट व 'सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी' हे पुस्तक संदर्भासाठी वापरले आहे. यातील मजकूर हा काही प्रमाण नाही, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.]