आदिवासींची होळी
सातपुड्याच्या बलाढ्य पर्वतरांगेने वेढलेल्या बिलगावातल्या (ता.धडगाव, जि.नंदुरबार) माळावर भलीमोठी होळी रचली आहे. दोन थाळ्याचा मोठमोठमोठ्याने गजर सुरु होतो. डफ- डमरू अन खंजिरी या चर्मवाद्यांच्या साथीला पायात बांधलेले चाळ, कमरेला गुंडाळलेल्या घुंगरमाळाच्या आवाजातून निर्माण होणा-या नादमधूर संगीताच्या तालावर पारंपरिक वेशभूषा केलेले आणि मुखवटे घातलेले आदिवासी होळीभोवती फेर धरून बेभान होऊन नाचताहेत......
बुंध्या आणि बाव्यांनी नाचताना आकार घेतलेल्या वर्तुळाच्या आत राई, घोडीवाला, निस्क्या आणि उग्रवण्या व व-हाडी यांच्यातले युद्ध रंगले आहे! सातपुडाच्या अजस्र पर्वतरांगांच्या कुशीतल्या द-याखो-यातील रानवाटा तुडवित तेथे जमलेल्या शेकडो आदिवासींसह देश-परदेशातून आलेले पाहुणे आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेचा हा चित्तवेधक आविष्कार ' याची देही याची डोळा... ' अनुभवताहेत.....
नर्मदा खो-यातील आदिवासींमधील पावरी, बिलाली, तडवी, पाडवी, वसावे या जमाती मूर्तीपूजा मानत नाहीत. त्यामुळे त्यामागुन येणारे कर्मकांड आणि इतर थेरांना येथील आदिवासींच्या जीवनात काडीचेही स्थान नाही. मात्र असे असले तरी त्यांचे भरण - पोषण करणा-या निसर्गाविषयी त्यांच्या अंतःकरणात नेहमीच कृतज्ञेचा भाव असतो. कोणत्याही अदृश्य शक्तींवर विश्वास न ठेवणारे आदिवासी बांधव निसर्ग देवतेची मनोभावाने उपासना करतात. येथील श्रद्धाळू आदिवासींच्या जीवनात अग्नीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. निसर्गदेवतेचे आपत्य आणि पंच महाभूतांपैकी एक असलेल्या अग्निविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होळीच्या दिवशी सारे आदिवासी आबालवृद्धांसह एकत्र जमतात. अतिशय उत्साही वातावरणात साजरा होणारा हा केवळ एक सण उरत नाही तर आदिवासी लोककला आणि संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडविणारा तो सांस्कृतिक उत्सवच होतो.
येथील आदिवासी मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असलेल्या या उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. आपल्याकडे मोठ्या धामधुमीत साजरे होणारे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे त्यांच्या गावी नाहीत. देवदिवाळीसारखा एखादा - दुसरा सण असतो. परंतु होळीच्या सणाचे आदिवासींच्या जीवनात आगळेच महत्त्व आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आदिवासी लोक अतिशय आनंदभराने हा सण साजरा करतात. मूर्तिपूजेचे थोतांड आणि कर्मकांडाला थारा न देणा-या आदिवासी जमातींच्या काही श्रद्धा आणि परंपरा मात्र होळी उत्सवात जरूर गुंफल्या आहेत.
वर्षभरात कोणी आजारी झाले एखादा बाका प्रसंग आला की, कुटुंबातील मुखिया [प्रमुख] अग्नीला साक्षी ठेवून नवस करतो. नवसाची फेड करण्यासाठी म्हणून कुटुंबातील लहान मोठा पुरुष पारंपरिक वेशभूषा करून उत्सवात सामील होतात. एखाद्या थोरल्या माळावर मोठी होळी रचली जाते. जंगलाचे राजे असलेल्या आदिवासींचे त्यांचे भरण-पोषण करणा-या जंगलावर भारी प्रेम असते. होळीसाठी निर्दयीपणाने ते वृक्षांची कत्तल करीत नाहीत. वाळलेल्या झाडांची तसेच निरुपयोगी लाकडे होळीला आणली जातात. अत्यंत पवित्र झाडाचे स्थान असलेल्या उंचच उंच बांबूची काठी होळीच्या मध्यभागी उभी करतात.
डोंगर कपारीतल्या वाड्या-पाड्यांवरून ढोलवाले नाचाणा-यांचे जत्थेच्या जत्थे तेथे दाखल होतात. एका जत्थ्यात २५ पासून ५० जणांचा समावेश असतो. प्रत्येक जत्थ्यातील पात्रे सारखीच असतात. परंतु त्यांची वेशभूषा आणि सजावट अत्यंत देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. तिला एक आदिवासी संस्कृतीचा अस्सल बाज असतो.
बुंध्या, बावा, निस्क्या, उग्रवण्या, राई आणि घोडीवाला ही या पथकातील प्रमुख पात्र. राईच लग्न घोडीवाल्याशी ठरलेलं असतं. लग्नाला जमलेली व-हाडी मंडळी आनंदाने नाचत असतात. परंतु निस्क्या या खलनायकी पात्राला हे लग्न मान्य नसतं. म्हणून तो या लग्नात सारखी विघ्न आणीत असतो. राई आणि तिला साथ देणारी व-हाडी मंडळी यातून मार्ग काढीत पुढे जात राहतात. या टिचभर कथानाकाभोवती हा नृत्य-संगीताचा आविष्कार फिरत राहतो. राईची भूमिका पुरूषच करतात. नृत्य पथकांत स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी अनेक तरूण मुली आपापल्या परीने विशिष्ट पद्धतीने होळीभोवती फेर धरून नाचत राहतात.
राईच्या लग्नात निस्क्याचं विघ्न आणि त्यामुळे त्यांच्यात युद्ध सुरु असताना संख्येने जास्त असलेले व-हाडी मंडळीतील बुंध्या आणि बावाभोवती गोल रिंगण करून नाचत राहतात. सर्व बुंध्यांनी डोक्यावर मोरपिसांची छानदार टोपी घातलेली असते. कमरेभोवती गुंडाळलेल्या पटकु-यावर घुंगरमाळा बांधलेल्या असतात.त्यचा नादमधुर आवाज सुरु असतो. हातात डफ, डमरू व खंजीरीसारखे चर्मवाद्य अथवा बासरी (पवा) असते. सर्वांगावर विविध रंगांचे गोल चितारलेले असतात. तर बावांनी बांबूपासून तयार केलेल्या उंच टोपीला रंगीबेरंगी कागदांनी सजविलेले असते. कमरेभोवती भोपळे गुंडाळलेले असतात. आणि गळ्यात रुद्राक्ष आणि इतर मोठ्या मण्यांच्या माळा घातलेल्या असतात. अष्टगंधांच्या रेषांनी सारे अंग रंगविलेले असते. निस्क्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या हातात तलवारी धनुष्यबाण भाला यासारखी आयुध असतात. हा नाच चालू असताना उग्रवण्या हे पात्र प्रेक्षकांकडून कलेचं मोल वसूल करण्यात गुंतलेले असते.
निस्क्या उग्रवण्या, राई घोडीवाला या पात्रांनी अत्यंत देखणे मुखवटे घातलेले असतात. बावा आणि बुंध्या नाचताना कमरेला असे झटके देतात की त्यातून कमरेभोवती गुंडाळलेल्या घुंगरमाळा आणि भोपळ्यामधील बियांचा नादमधुर आवाज ऐकायला येतो पात्रांची वेशभूषा त्यांची सजावट आणि अत्यंत वेगवान हालचालीसह देहभान विसरून नाचणारे आदिवासी त्याला ढोल,थाळ्या तसेच इतर वाद्यांची मिळालेली साथ त्यामुळे स्थानिक बायाबापडे आणि लहान पोरासोरांसह हा उत्सव अनुभवण्यासाठी मुद्दामहून आलेले लाओ जिओ (इटली ) ब्रॅडमन (लंडन ) यांच्यासारखे परदेशी पाहुणे तसेच प्रांतीय अस्मितेची जोखड बाजूला सारून विविध राज्यांतून आलेले स्त्रिया पुरुषदेखील या उत्सवात सामील होऊन आदिवासींच्या साथीने ताल धरतात, नाचू लागतात. शेकडोंच्या संख्येने जमलेले लोक विस्मयचकित मुद्रेने लोकनृत्य संगीताचा आनंद लुटत असतात. सर्व वाद्यामध्ये ढोलावर आदिवासींचे विशेष प्रेम जडलेले आहे. ते इतकं की ढोल वाजू लागला की, आदिवासींच्या जणू अंगात येतं मागच्या महिन्यात एका गावात 'तारे जमीन पर ' हा हिंदी सिनेमा आणला होता. सिनेमा सुरु असताना कुठेतरी ढोल वाजू लागला. एकेक करीत सारी तरणी पोर तिकडे नाचायला गेली, असे हे त्याचे वेडे ढोलप्रेम ! मनोरंजनाची कृत्रिम साधनं येथील आदिवासींपर्यंत अजून पोचलेली नाहीत. परंतु त्यापुढे जाउन 'इको फ्रेंडली' पद्धतीनं जगणा-या आदिवासींना ही कृत्रिम साधनं भुरळ घालू पाहत नाहीत, हेही वास्तव हटकून सामोरं येतं. त्यातूनच होळीसारख्या उत्सवाच म्हणा किंवा त्यांच्या ढोलप्रेमाचं त्यांच्या जीवनातील महत्त्वदेखील अधोरेखित होतं.
रात्री १० वाजता नृत्योत्सवास सुरुवात झालेली असते. पहाटे होळी ढणाढणा पेट घेते, तेव्हा तर या उत्सवाचा क्लायम्याक्स होतो! पथकातील सारेजण अंगात वारं संचारल्यागत नाचू लागतात. रात्रभर नाचाल्यामुळे थकवा आल्याचा लवलेश कुठ दिसत नाही. प्रत्येक पथकाचं आपलं वेगळं रिंगण. ते रिंगण भले अन ते भले ! बेभान होऊन नाचणा-यांच्या अंगातून घामाच्या सहस्त्रधारा पाझरत राहतात. परंतु मोहाच्या फुलांच्या रसाची 'झिंग' अजूनही उतरलेली नसते!
सकाळी सूर्योदयाच्या साक्षीने या नृत्योत्सवाची अखेर होते. रात्रभर ढोल बडविल्याने ना ढोलकऱ-यांची बोटं दुखू येतात.... ना नाचणा-यांचे पाय थकतात. ना पाहणा-यांचे कान, डोळे तृप्त होतात. आगळावेगळा सांस्कृतिक उत्सव पाहायला मिळाल्याचा आनंद पाहुण्यांच्या चेह-यावर विलसत असतो. जागरणामुळं येणारा थकवा, कंटाळा कुठल्या कुठे पळून गेलेला असतो.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर या लोककलाकारांच्या कलेला दाद देतात. प्रत्येक ढोलाक-याला पुढे बोलावून पाहुणे मंडळीच्या हस्ते त्यांचा सत्कार करून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. कला- संस्क्रूतीच्या जपवणुकीबरोबरच न्याय हक्कांसाठी लढत राहण्याचे आवाहन आणि निर्धार मेधाताई व्यक्त करतात. 'झिंदाबाद ', ' लढेंगे, जितेंगे...!' च्या घोषणा सातपुड्याच्या पर्वतरांगेत घुमतात. जमलेले आदिवासी आता डोंगर कपा-यात वसलेल्या वाड्या-पाड्यांच्या दिशेने चालू लागतात. काही मैलांची पायपीट करून द-याखो-या तुडवत त्यांना त्यांच्या घरट्याकडे पोचायचे असते...
No comments:
Post a Comment