पट्टागड उर्फ विश्रामगड
नगर-नासिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातल्या पट्ट्याचीवाडी जवळ हा गड आहे. सन १६७९मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. इतिहासकारांनी केलेल्या नोंदीप्रमाणे १५ नोव्हेंबर रोजी महाराजांनी ही लूट केली. सोने-नाणे, जडजवाहिर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. गोदावरी नदीच्या दक्षिण काठाने महाराज चालले होते.
नाणेघाट मार्गे कल्याणवरून रायगड जाण्याचे नियोजन होते. दरम्यान, महाराज सोने-नाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. तीन बाजूंनी शत्रू सैन्याने महाराजांना घेरले होते. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. महाराजांबरोबर असलेल्या आठ हजार पैकी चार हजार सैन्य कामी आले. त्यातच खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर येवून धडकली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनिती निश्चित करण्यात आली.
राजांच्या गुप्तहेरखात्याचा प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईक यांच्यासारख्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे सुखरूप रवाना झाले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी नगर-नासिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणाऱ्या या पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर 'विश्रामगड' असे पडले. गडावरील महाराजांच्या आगमनास या वर्षी(नोव्हेंबर २०१२ मध्ये) ३३३ वर्षे पूर्ण झाली. येथे १७ दिवस विश्रांती घेऊन पुढे राजे कल्याण मार्गे रायगडावर पोहोचले. नुकताच यानिमित्ताने शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींनी 'शिवपदस्पर्शदिन' साजरा केला. दर वर्षी २२ नोव्हेंबर रोजी गडावर हा दिवस साजरा करण्याचे ठरले आहे.
पट्टा किल्ला एका अर्थाने स्वराज्याचीदेखील सरहद्द होती. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची १३९२ मीटर (४५६६ फूट) आहे. एकूणच प्राचीन किल्ले आणि वास्तू यांच्याकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन आणि दुर्लक्ष यामुळे किल्ल्यावरील राजवाडा आता शेवटच्या काही घटका मोजतो आहे. ऐन वेळी बाका प्रसंग उद्भवल्यास शत्रूला गुंगारा देण्यास किल्ल्यावर चोरदरवाजा आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. अकोले या तालुक्याच्या गावापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पट्टेवाडी गाव आहे. पूर्व दिशेला असलेल्या या गावातून जाणारी अवघ्या २५० मीटरची ही वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे. नासिक जिल्ह्यातील रामायण काळातील जटायू पक्ष्याच्या मंदिरासाठी आणि सर्व तीर्थ यासाठी प्रसिद्ध असलेल्या टाकेदकडून (ता.इगतपुरी) म्हैसवळण घाटातून येणाऱ्या रस्त्यावरून आल्यास कोकणेवाडी गावातून गडाच्या दक्षिण दिशेने दुसरी वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. पण तुलनेने ही वाट अवघड आहे. जवळपास ६०० ते ७०० मीटरच्या आसपास ही अंतर आहे. तिसरा रस्ता नासिकमधील भगूर-देवळालीकडून येतो. निन्वी-गिरवाडीकडून येणारा हा रस्ता औंढ्या आणि पट्टा किल्ल्याच्या मधून वर जातो. ही वाट अधिक खडतर आहे. गडावर लक्ष्मण महाराजांची समाधी आहे. सध्या किल्ल्यावर भगवती देवीच्या मंदिराचे बांधकाम सुरु आहे. भगवती देवीचे गडावर मंदिर आहे. अक्षया तृतीयेच्या दिवशी गडावर भगवती देवीची यात्रा भरते. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात.
No comments:
Post a Comment