Tuesday, July 26, 2011







कोकणचा शेजार लाभलेल्या नगर जिल्हय़ातील अकोले तालुक्याला अभिजात निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. डोंगरमाथे, पर्वत शिखरे, कडय़ाकपारी आणि दऱ्याखोऱ्यांनी नटलेला हा प्रदेश निसर्गाच्या वैविध्याने अधिकच समृद्ध बनला आहे. शिखर स्वामिनी कळसूबाई, वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाचा वारसा सांगणारा हरिश्चंद्रगड, ज्ञात-अज्ञात इतिहासाचे साक्षीदार असणारे रतनगड, अलंगगड, कुलंगगड, मदनगड यांसारखे बेलाग गडकिल्ले प्राचीनतम वास्तुवैभवाची साक्ष देणारी टाहाकारी, अमृतेश्वरासारखी मंदिरे, घाटघरचा प्रसिद्ध कोकणकडा, साम्रदची अनोखी सांदण आणि असे बरेच काही! सहय़ाद्रीच्या निसर्गसंपन्न डोंगररांगाचे कोंदण लाभलेला भंडारदरा धरणाचा जलाशय हा येथील निसर्गसौंदर्याचा मानिबदू. प्रत्येक ऋतूत निसर्गाच्या बदलणाऱ्या रंगछटा येथे पाहायला मिळतात. पण घाटघर, भंडारदऱ्याचे खरे निसर्गवैभव पाहायला मिळते ते वर्षां ऋतूतच!
भंडारदरा हे पूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित होते. मात्र आता त्याची ही ओळख पुसली गेली असून पावसाळी पर्यटन केंद्र म्हणून ते ओळखले जाऊ लागले आहे. सहय़ाद्रीच्या डोंगररांगावर पाऊस कोसळू लागला की पाहता पाहता घाटघर, भंडारदऱ्याचा सारा परिसर कात टाकतो  आणि चैतन्यदायी बनतो. गच्च भरून आलेले आभाळ, त्यातून टपोऱ्या थेंबांनी ओघळणाऱ्या जलधारा, हिरवा शालू परिधान केलेल्या डोंगररांगा, पर्वतशिखरांवरून कोसळणारे दुधाळ धबधबे, पाझरणारे डोंगर, जागोजागी खळाखळ वाहात असणारे ओहोळ, ओढे, नाले, तुडुंब भरून भातखाचरे, ओसंडून वाहणारे तलाव, धुक्यात हरवलेले घाटघर, सर्वत्र भरून राहिलेली नीरव शांतता आणि ओल्या निसर्गाचा अनोखा गंध! पावसाळय़ातील भंडारदऱ्याचे वातावरण अनुभवले की आपणही जणूकाही या वातावरणात विरघळून जातो.
मुंबई-पुण्यापासून भंडारदरा प्रत्येकी सुमारे पावणेदोनशे कि.मी. अंतरावर आहे. मुंबईवरून कसारा घोटी मार्गे तर पुण्यावरून संगमनेर अकोले मार्गे भंडारदऱ्याला पोहोचता येते. भंडारदरा जलाशयाच्या काठावर मूतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर आदी नऊ आदिवासी खेडी वसलेली आहेत. एका बाजूला निळाशार जलाशय, तर दुसऱ्या बाजूला आभाळाशी स्पर्धा करणारी उचंच उंच डोंगररांग आणि यातील हिरव्यागर्द वृक्षराजीतून जाणारी वळणावळणाची वाट, भंडारदरा भोवतीच्या सुमारे ५० कि.मी. लांबीच्या या रिंगरोडच्या वाटेने केलेला प्रवास हा निसर्ग पर्यटनाचा एक रोमांचकारी अनुभव देऊन जातो.
पावसाळय़ात चिंब भिजलेल्या भंडारदरा धरणाच्या िभतीचे रूपही असेच मनोवेधक असते. धरण भरले की धरणाच्या सांडव्यावरून जलाशयाच्या पाण्याच्या लाटा सांडव्याच्या भिंतीवरून बाहेर झेपावत असतात. हे दृश्य पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव आहे. भंडारदऱ्याच्या सर्वात वरच्या मोरीतून पाणी सोडले जाते तेव्हा निर्माण होणारा अम्ब्रेला फॉल हादेखील विलक्षण आहे. रोरावत कोसळणाऱ्या या धबधब्याचे तुषार अंगावर झेलत चिंब होण्याचा रोमांचकारी अनुभव निराळाच आनंद देऊन जातो.  पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे दरवर्षी भंडारदऱ्याला भेट देणारे निसर्गपंढरीचे अनेक वारकरी आहेत. मात्र प्रत्येक पावसाळय़ात त्यांना भंडारदऱ्याच्या सौंदर्याची नित्यनवी अनुभूती मिळत असते.
निसर्गात फिरल्याने माणसाच्या चित्तवृत्ती उल्लसित होतात, मात्र माणसे कधी आपले भान हरवून बसतात आणि नको त्या दुर्घटना घडतात. कधी अति उत्साहामुळे, कधी निष्काळजीपणामुळे, कधी बेफिकीर वृत्तीतून, तर कधी बेधुंद बनल्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना या परिसराला नवीन नाहीत.  मग कधी पाचपन्नास पर्यटक रंधा धबधब्याजवळ प्रवरेच्या पुरात रात्रभर अडकून बसतात, तर कधी पाय घसरल्यामुळे तर कधी पाण्यात डुंबताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे कोणाला जलसमाधी मिळते, तर कोणी वाहून जाते. ते ठिकाण कधी भंडारदरा धरण असते, कधी घाटघरचा जलाशय असतो, तर कधी रंधा धबधबा!  दरवर्षी चारदोन बळी अशा अतिउत्साहामुळे जातच असतात.
भंडारदऱ्याला येणारे बहुसंख्य पर्यटक भंडारदऱ्याचा निसर्ग अनुभवण्यासाठी, पावसात भिजण्यासाठी, धबधब्याखाली चिंब होण्यासाठी येत असले तरी खास दारू पिण्यासाठी म्हणून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही मोठे आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, तरुणांचे प्रमाण त्यात सर्वाधिक आहे. उघडय़ावर कोठेही बसून मद्यपान करणे, बेभान वेगाने गाडय़ा चालविणे, गाडय़ा कोठेही उभ्या करून कर्कश गाणी लावून त्यावर नाचणे, हातात दारूची बाटली घेत उघडय़ा अंगाने धबधब्याखाली बसणे, असा रंगाचा बेरंग करणारे बेताल वर्तन सध्या इथे वाढू लागले आहे. १५ ऑगस्ट म्हणजे तर जणू अशा पर्यटकांचा खास दिवस! पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी त्या दिवशी भंडारदऱ्यात लोटतात. धरणाच्या सांडव्याजवळ, रंधा धबधब्याजवळ अशा काही ठिकाणी वाहतुकीची हमखास कोंडी त्या दिवशी ठरलेली असते. पर्यटकांच्या बेफाम वर्तनाला त्या दिवशी ऊत येतो. याची कल्पना नसणाऱ्या पर्यटकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो.
पर्यावरणाची होणारी हानी ही चिंतनीय बाब आहे. पर्यटक येऊन गेल्यानंतर परिसरात प्लॅस्टिकच्या बाटल्या, पाण्याच्या व दारूच्या बाटल्या, जागोजागी फेकून दिलेल्या आढळतात. भंडारदऱ्याच्या पर्यटनावर पडणारी नशेबाजांची काळी छाया वेळीच दूर करण्याची गरज आहे. भंडारदऱ्यात पोलीस ठाणे नाही, मात्र किमान शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी पावसाळय़ात फिरते पोलीस पथक तैनात करणे शक्य आहे. तसेच कळसूबाईच्या पायथ्याशी बारी गावाजवळ पोलीस चौकी उभारण्याची गरज आहे. मागे काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी पर्यटन पोलीस ही संकल्पना राबविण्याचा मनोदय व्यक्त केला होता. गृहरक्षक दलाच्या धर्तीवर सर्वच पर्यटनस्थळी किमान पावसाळय़ात अशी पर्यटन पोलीस पथके तैनात करणे गरजेचे बनले आहे. स्थानिक तरुणांना योग्य ते प्रशिक्षण देऊन यात सहभागी करून घेता येईल.
गतवर्षी राजूरच्या महिला कार्यकर्त्यांनी तरुण आणि पोलिसांच्या सहकार्याने मद्यपींना चांगलाच दणका दिला होता. १५ ऑगस्टच्या दिवशी राजूरवरून भंडारदऱ्याला जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली आणि सुमारे ५०० दारूच्या बाटल्या जप्त करून फोडून टाकण्यात आल्या.  सर्वच ठिकाणी अशी जागृती झाली तर या समस्येचा मुकाबला करणे शक्य आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यटनस्थळी प्लॅस्टिकच्या वस्तू नेण्यासही बंदी घालण्याची गरज आहे. त्याशिवाय दारूबंदी विरोधात जागृती करणारे फलकही लावता येऊ शकतील.

1 comment: