आंबोली : पर्यटन बदनामीच्या दिशेने |
अभिमन्यू लोंढे पर्यटन जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नावारुपाला आलेल्या सिंधुदुर्गमध्ये आंबोली आमि अन्यत्र पावसाळी पर्यटन आता भरास आले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून इथे वाढू लागलेली हुल्लडबाजी आणि बेधुंदपणा यामुळे अपघात आणि विकृतीत वाढ होऊ लागली आहे. या साऱ्यावर प्रशासनाचे कुठलेही लक्ष नसल्याने हा सारा व्यवसायच आता बदनामीच्या दिशेने जाण्याची भीती अनेकांना वाटते आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या एका बाजूला अथांग, स्वच्छ, सुंदर सागरकिनारा तर दुसऱ्या बाजूला सह्य़ाद्री तथा पश्चिम घाटाचा पट्टा लाभला आहे. यातील पश्चिम घाट तर पर्यटनासाठी विपूल, विलोभनीय व अचंबित करून टाकणाऱ्या निसर्गाची खाणच आहे. याच परिसरात जिल्ह्य़ात सुमारे दीडशे ते दोनशे इंच पाऊस कोसळतो. यातून अनेक धबधबे जन्म घेतात. हे धबधबे वाहू लागले की स्थानिक जिल्ह्य़ातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातून पर्यटक इकडे येत असतात. यातही आंबोली हा सर्वाधिक प्रसिद्ध! आंबोलीशिवाय दोडामार्ग तालुक्यातील मांगेली, कणकवली तालुक्यातील नापणे तसेच मालवणनजीक असणारे शिवडाव असे प्रसिद्ध धबधबे आहेत. इथेही पर्यटकांची गर्दी असते. पण आता या भाऊगर्दीचा त्यांच्या गोंधळाचा स्थानिक लोकांना त्रास होऊ लागला आहे. या गर्दीचे नियोजन व्हावे असे सर्वाना वाटते. आंबोली घाट रस्त्यावरच ठिकठिकाणी धबधबे आहेत. या रस्त्यावरच सर्व पर्यटक थांबतात. शनिवार - रविवारी तर याला जत्रेचे स्वरूप येते. या साऱ्या गर्दीचा येथील वाहतुकीवर परिणाम होतो. आंबोली घाट रस्ता हा गोवा व कर्नाटक राज्यांना जोडणारा आंतरराज्य मार्ग आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनात हा रस्ता अनेकदा बंद होतो. शिवाय या पर्यटकांमध्ये अनेकजण मद्य प्राशन करून हुल्लडबाजी करत असल्यामुळे त्याचा इथे येणाऱ्या अन्य पर्यटक व प्रवाशांनाही त्रास होतो. आंबोली घाटातील धबधबे प्रवाहित झाल्यानंतर होणारी कायमस्वरूपी गर्दी पाहता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काही व्यवस्था करावी अशी नागरिकांमधऊन मागणी होत आहे. सर्वात महत्त्वाचे इथे येणाऱ्या मद्यपींवर कारवाई आणि इथे येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ तातडीने करण्याची गरज आहे. आंबोली घाटात जागोजागी कोसळणाऱ्या या धबधब्यांमुळे खडकांच्या भेगांत पाणी जाऊन दरड कोसळण्याच्या घटनाही इथे घडत असतात. अशी दरड कोसळल्याने गेल्या वर्षी २६ दिवस तर यंदा १० दिवस घाट बंद होता. घाटातील मुख्य धबधब्यावर पूर्वी दोन वेळा पर्यटकांवर दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे धबधब्यांवरून पर्यटक कोसळून जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. आंबोलीतील कावळेसार पॉईंट हा गर्दी खेचणारा पॉईंट आहे, पण या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. दोन वर्षांपूर्वी या पॉईंटवर जाणाऱ्या पर्यटकांची गाडीच वाहून गेली होती. त्यामुळे कावळेसार पॉईंट रस्ता नदीवर संरक्षक िभत बांधण्याची गरज आहे.एकीकडे पर्यटन जिल्हा म्हणून गोडवे गाताना या स्थळी साधा रस्ता, स्वच्छतागृह, पार्किंग यासारख्या सुविधा नसल्याने येथे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. एकूणच सिंधुदुर्गमधील हे पावसाळी पर्यटन वाढत असताना त्याला प्रशासनाकडून वेळीच एखाद्या शिस्तीचे वळण आणि सुविधांचे पाठबळ मिळत नसल्याने ते धोकादायक दिशेने भरकटू लागले आहे. |
No comments:
Post a Comment