Tuesday, July 26, 2011

मुंबई-ठाणे परिसरातील निसर्गप्रेमी पावसाळी सहलीसाठी प्रथम पसंती देत असलेल्या माळशेज घाटास गेल्या काही वर्षांत हुल्लडबाज पर्यटकांचा वेढा पडला असून, दिवसेंदिवस त्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. विशेषत: शनिवार-रविवारी अथवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी तर या घाटात डोंगरमाथ्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या स्थळाचे एका ओंगळवाण्या ठिकाणात रुपांतर होते. अर्धनग्न अवस्थेत, हातात दारूच्या बाटल्या घेऊन बेभान होऊन नाचणाऱ्या या पर्यटकांच्या उपद्रवामुळे शनिवार-रविवारी कुटुंबासह माळशेजला जाऊ नका, असा सल्ला देण्याची वेळ आली आहे.
माळशेजप्रमाणेच मध्य रेल्वेवरील बदलापूर-कर्जत रेल्वेस्थानकांपासून तीन ते पाच किलोमीटर परिसरातील अनेक पावसाळी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापूरजवळील कोंडेश्वर, वांगणीजवळील भगीरथ, टपालवाडी, भिवपुरी-कर्जत दरम्यानचा आशाणे तसेच माथेरान या गिरिस्थानकाच्या वाटेवर पावसाळय़ात आढळणाऱ्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. पावसाळय़ात किमान शनिवार-रविवारी या ठिकाणी पुरेसे पोलीस संरक्षण देण्याची मागणी बरीच वर्षे केली जात आहे. मात्र पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे आजवर याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
शहरी वातावरणाचा उबग आला की सहलीच्या निमित्ताने थोडे देशाटन करावे, या हेतूने मुंबई-ठाण्यातील बरीच मंडळी आपापल्या समवयस्क मित्रांसमवेत जवळच्या ठिकाणी जातात. एकदिवसीय सहलींसाठी माळशेज आणि परिसरातील स्थळे त्यांच्यासाठी आदर्श ठरतात. मात्र तरुण पर्यटकांचा अतिउत्साह आणि संरक्षणाचा अभाव, यामुळे ही पर्यटनस्थळे आता धोकादायक ठरली आहेत. काही दिवसांपूर्वी कोंडेश्वर येथे डोंबिवलीतून आलेल्या तरुण पर्यटकांना स्थानिक रहिवाशांनी मारहाण केली. धबधब्याखाली अंघोळ करण्याच्या नादात पाण्याचा पुरेसा अंदाज न आल्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. माळशेजमध्ये मोबाइलची रेंजही मिळत नसल्याने अपघातप्रसंगी मदत मिळविण्याच्या दृष्टीने अडचणी येतात. किमान पावसाळय़ाच्या दिवसांत शनिवार-रविवारी माळशेजमध्ये ठराविक अंतरावर मदत केंद्र उपलब्ध करून द्यावेत, अशी पर्यटकांची अपेक्षा आहे.
माळशेजसारख्या ठिकाणी तर केवळ पावसाळय़ातच नव्हे तर वर्षभर पर्यटक येऊ शकतात. मात्र सुरक्षितता आणि सुविधा देण्याबाबत प्रशासन असमर्थ ठरल्याने नैसर्गिक सौंदर्यामुळे वर्षां सहलींचे केंद्र ठरलेल्या या भागातील ठिकाणांचे पर्यटनस्थळांमध्ये रूपांतर होऊ शकलेले नाही. आता उशिरा का होईना, शासनाला जाग येऊन माळशेज घाट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे. त्यासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी दिली.
या निधीतून पर्यटकांना बसण्यासाठी बाके, कठडय़ांचे मजबुतीकरण, घाटातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. अर्थात, त्याआधी तातडीने इथे येणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण, त्यांना पुरेसे संरक्षण आणि आपत्कालीन मदत देणे गरजेचे आहे. अन्यथा माळशेजचे हे सौंदर्य फक्त तरुणांच्या हुल्लडबाजीपुरतेच राहील!   

No comments:

Post a Comment