विदर्भ: ना सुरक्षा ना व्यवस्था! |
राखी चव्हाण पावसाळा सुरू झाला की लगेच कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत आऊटिंगचे बेत सुरू होतात. प्रत्येकजण थोडेसे ऑफबीट, वेगळय़ा पर्यटनस्थळाच्या शोधात असतो, पण पावसाळी पर्यटनात मिळणाऱ्या आनंदासोबतच अलीकडच्या काही काळात वाढत चाललेली हुल्लडबाजी आणि पर्यटनाच्या नावाखाली होणारा तळीरामांचा हैदोस, याचे गालबोट लागतेय हे निश्चित! इंदौरमध्ये अलीकडेच पावसाळी पर्यटनाची मजा लुटायला गेलेल्या कुटुंबाचा अतिउत्साहामुळे पाण्याच्या वाहत्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. या घटनेला आठ दिवस लोटत नाही तोच विदर्भाचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात सीमाडोह मार्गावर त्याच वेळी दोन युवकांचा आणि अगदी कालपरवाच भीमकुंड धबधब्यात उतरत असताना पाय घसरून पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमधील एका डॉक्टराला जीव गमवावा लागला. चिखलदऱ्यावर निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण आहे, पण तेवढेच हे पर्यटनस्थळ धोकादायक आहे. भीमकुंडाच्या वरच्या बाजूला कठडे आहेत पण, सुरक्षारक्षकाअभावी पर्यटक हे कठडे तोडून आत जातात आणि जीव गमावून बसतात. प्रवेश करतानाचा एक फलक सोडला तर इतर कोणत्याही ठिकाणी धोक्याचे इशारे देणारे फलक नाहीत. घाटवळणाचा हा रस्ता पावसाळय़ात अधिकच निसरडा होतो आणि पर्यटकांचे अतिउत्साहीपण बरेचदा त्यांचा जीव घेते. चंद्रपूर जिल्हय़ातील ब्रम्हपुरी तालुक्यात ब्रिटिशांनी बांधलेल्या घोडाझरी तलावाला आता १०० वष्रे पूर्ण झाली आहेत. पावसाळय़ात हा तलाव पूर्ण भरल्यानंतर घोडय़ाचा आकार स्पष्टपणे दिसतो आणि हे वेगळेपण बघण्यासाठीच जिल्हय़ातीलच नव्हे तर दुरूनही या ठिकाणी पर्यटक येतात. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर ‘सांडव्या’तून वाहणाऱ्या पाण्याची मजा लुटण्यासाठी पर्यटक येतात खरे, मात्र तेवढेच ते जीवघेणेसुद्धा ठरते. तीन वर्षांपूर्वी याच वाहत्या पाण्यात अतिउत्साही दोन पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्यानंतरसुद्धा पर्यटक ‘बोटिंग’ची मजा लुटतात, पण ही मजा कधी जिवावर बेतू शकते, याचे त्यांना भान राहात नाही. मुळातच या ठिकाणी कोणतीही प्रशासकीयव्यवस्था नाही. बुलढाणा जिल्हय़ातील लोणार सरोवराचे निसर्गसौंदर्य अद्याप अबाधित आहे. पण जागतिक स्तरावर नोंद होऊनही या ठिकाणी पर्यटकांसाठी म्हणावी अशा सुविधा नाही. पर्यटन विस्तारासाठी अलीकडेच पर्यटन विभागाने १० कोटी रुपये मंजूर केले. यापूर्वीसुद्धा ३५ लाख रुपयांची मंजुरी मिळाली होती, पण नवीन भिंत उभारण्याऐवजी ब्रिटिशकालीन भिंतीवरच भिंत चढवण्यात आली. जनतेच्या डोळय़ांतील ही धूळफेक पर्यटकांच्या जिवावर बेतू शकते, याचे भान कदाचित प्रशासनाला नाही. नागपूर जिल्हय़ातील खिंडसी हे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे खास आवडते ठिकाण! वर्षभर पर्यटकांची इथे ये-जा असतेच, पण अलीकडच्या काळात तरुणांची वाढणारी गर्दी या पावसाळी पर्यटनाला गालबोट लावेल की काय, अशी स्थिती सध्या इथे आहे. पर्यटकांना खुणावणाऱ्या या स्थळी तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे एका विकृतीचेच दर्शन घडते. मुळातच यापैकी कुठल्याच पर्यटनस्थळावर ना सुरक्षा यंत्रणा आहे ना प्रशासनाचा वचक. अलीकडे पर्यटनाचा ‘कॉन्सेप्ट’ मुळात बदलत चालला आहे. ‘एन्जॉयमेंट’ ऐवजी ‘पार्टी’ ही पर्यटनाची व्याख्या झाली आहे. खाऊन झाल्यानंतर तिथेच प्लॅस्टिक प्लेट्स फेकणे, दारू पिऊन बाटल्या त्याच ठिकाणी टाकणे हा प्रकार हल्ली सर्वच पर्यटनस्थळाबाबत घडून येतो आहे. चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती जिल्हय़ातील मेळघाट पर्यटकांचे पावसाळय़ातील आवडते ठिकाण, मात्र पर्यटकांनीच येथील निसर्गसौंदर्याला गालबोट लावले आहे. कदाचित यामुळेच कधी नव्हे ते ताडोबा व्याघ्र प्रकल्प इतक्या वर्षांत पहिल्यांदाच बंद ठेवण्याची वेळ वन विभागावर आली. निसर्गाचा खरा अनुभव येतो तो पावसाळय़ात, पण पर्यटकच या निसर्गाचे सौंदर्य बाधित करतील तर ‘इको टुरिझम’च्या संकल्पनेवर नक्की गदा आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पर्यटन विभाग असो किंवा जिल्हा प्रशासन अथवा पोलीस प्रशासन या सर्वानी एकत्रित येऊन काही व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. |
No comments:
Post a Comment