दुगारवाडी धबधबा अपप्रवृत्तींचा वाढता प्रवाह |
चारुशीला कुलकर्णी पावसाळी पर्यटन म्हटले की ‘जेथे धबधबा तेथे गर्दी तोबा’ हे आलेच. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वच्छंदपणे, निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पावसाळ्यात तर चिंब झालेला निसर्ग जणू त्याला सादच घालत असतो. पावसाळी पर्यटनासाठी उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे प्रसिध्द असली तरी काही ठिकाणांचे संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याने जुनी ओळख लयास जाऊन त्यांची नवीन ओळख निर्माण झाली आहे. ती अर्थातच पर्यटकांसाठी हितावह नाही. अशा या ठिकाणांमध्ये नाशिक जिल्ह्य़ातील दुगारवाडी धबधब्याचा समावेश करावा लागेल. कधीकाळी कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींसह एक दिवसाच्या पावसाळी पर्यटनासाठी अगदी सुरक्षित असलेली दुगारवाडी आता अपप्रवृत्तीमुळे ‘जुगारवाडी’ झाली आहे. हिरवळीचा साज ल्यालेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हे ठिकाण तेथील धबधब्यासाठी प्रसिध्द आहे. युवावर्गाची येथे कायम झुंबड असते. त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील दुगारवाडी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी जावे लागते. अर्थात सोबतीला हिरवागार निसर्ग, कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस असल्याने थकवा असा जाणवत नाही. दूरवरून धबधब्याचे दर्शन रोमांचकारी वाटत असले तरी जवळ गेल्यावर त्याचा रौद्रपणा जाणवतो. शहरी जीवनातील कामाचा ताणतणाव घालविण्यासाठी, पावसात मित्र-मैत्रिणींसोबत चिंब भिजण्याची मजा अनुभवयाची असेल तर दुगारवाडीसारखे ठिकाण नाही. ढगांची भरलेली शाळा आणि धरतीचा हिरवागार साज. समोर प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा, सर्व काही पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे! कुटुंबासह किंवा मित्र-मैत्रिणींसह येथे येण्यातील मजा काही औरच आहे. परंतु अलीकडे या ठिकाणचा हा सात्त्विकपणा पूर्णपणे हरवला आहे. मद्यपी टोळक्यांचे आवडते ठिकाण म्हणून दुगारवाडी धबधब्याला पसंती देण्यात येत आहे. ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या दिसतात. झाडाच्या आडोशाला काय उद्योग सुरू असेल, याची कल्पना न केलेली बरी. एकटय़ा-दुकटय़ाला लूटमारीचे प्रकार तर कायम घडतात. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी कुठलीही वाहन व्यवस्था नसल्याने किमान दोन किलोमीटर तरी पायी जावे लागते. पायी जातांना मद्यपींकडून युवतींची छेड काढली जाते. दुगारवाडी धबधबा परिसरास पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील. धबधब्यापर्यंत पर्यटकांना मद्याची बाटली नेता येऊ नये म्हणून रस्त्यावर बचत गटांमार्फत त्यांची तपासणी करण्यात यावी, जेणेकरून बचत गटाच्या सदस्यांनाही काम मिळेल. परिसरातील युवकांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करता येणेही शक्य आहे. ‘दुगारवाडी धबधबा’ अपप्रवृत्तींमुळे चर्चेत असताना धुळे शहराजवळील ‘लळिंग किल्ला’ परिसर आजही पावसाळी पर्यटनासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून गणले जाते. धुळे तालुक्याच्या वेशीवर असलेला लळिंग किल्ला मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौफुलीपासून अवघ्या चार ते पाच किलोमीटरवर आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस किंवा खासगी वाहनाने महामार्गावर उतरून या किल्ल्यावर जाता येते. हिरवाईचे पांघरूण ल्यालेला हा किल्ला निसर्गप्रेमींसाठी एक आनंददायक ठेवाच आहे. किल्ल्यावरील ‘लांडोर बंगला’ परिसरही बघण्यासारखा. याठिकाणी असलेला धबधबा हेही एक आकर्षण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लांडोर बंगल्यात काही काळ वास्तव्यास असल्यामुळे या बंगल्याचे त्यादृष्टीनेही महत्त्व आहे. गर्द हिरवी झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मोकळी हवा याचा आस्वाद घेत असताना उंचावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना खुणावत राहतो. धबधबा परिसरातील जंगलात हरीण, मोर, माकड हे दर्शन देत असतात. काही वेळा बिबटय़ाची डरकाळीही ऐकायला मिळते. सुटीच्या दिवशी पर्यटकांचा वावर या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात असतो. एरवीही पर्यटकांचा राबता या ठिकाणी आपल्या पाहायला मिळेल. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे. वन विभागाचे कर्मचारी परिसरात सतत गस्त घालत असल्यामुळे येथे अजूनपर्यंत अनुचित प्रकार घडलेले नाहीत. अशीच व्यवस्था इतर सर्व पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी झाल्यास उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावरील महत्त्व निश्चितच वाढेल. |
No comments:
Post a Comment