Tuesday, July 19, 2011









अकोले... नगर जिल्ह्याच्या पश्‍चिमेला असलेला, निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केलेला सह्याद्रीच्या कुशीतील तालुका... राज्यातील सर्वांत उंच पर्वतशिखर कळसूबाई... सर्वाधिक पावसाचे ठिकाण रतनवाडी-घाटघर आणि देशभरातील हौशी, साहसी पर्यटकांना खुणावणारा हरिश्‍चंद्रगडही याच तालुक्‍यात... जिल्ह्याचे "काश्‍मीर' असे त्याचे वर्णन केले, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याच लौकिकाचा उपयोग करून पर्यटनातून रोजगारविकास झाला, तर तालुक्‍यातील आदिवासींचेही जीवनमान सुधारण्यास मदत होईल, हे निश्‍चित! 


पावसाळा हा खास करून मुंबई-पुण्याच्या हौशी पर्यटकांना अकोल्याकडे आकर्षित करणारा ऋतू. गिरिशिखरांचा मेघदूताशी सारखा संवाद चाललेला... आभाळातून कोसळणाऱ्या जलधारा आणि त्यांना कवेत घेऊन दुर्मिळ वृक्षवेलींनी संपन्न अशा वनराईने बहरलेल्या दऱ्याखोऱ्यांत टाकणारी गिरिशिखरे... त्यामुळे तयार झालेले नयनमनोहर धबधबे... आणि या आनंदात चिंब व्हायला आलेले आबालवृद्ध... इथल्या निसर्गालाही जणू आलेल्या साऱ्यांना भरभरून देण्याची घाईच... म्हणूनच इथला सारा परिसर त्यांच्या स्वागतासाठी हिरवी शाल पांघरून सज्ज असतो...
अकोले तालुक्‍यातील विविध ठिकाणे वर्षभर पर्यटकांना खुणावत असतात. त्यात भंडारदरा धरण परिसर, कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड, रतनगड, घाटघर या ठिकाणांचा समावेश होतो. ही सर्व ठिकाणे एव्हाना मुंबई-पुण्याच्या पर्यटकांना माहिती झालेली असल्याने एकमेकांकडून माहिती घेऊन पर्यटक अकोले तालुक्‍यात येतात; पण अनेक जण फक्त भंडारदरा, रंधा धबधबा आणि जास्तीत जास्त कळसूबाई आणि रतनगड-घाटघर असे पर्यटन करून माघारी फिरतात. त्यांना अन्य तालुक्‍यातील छोट्या-मोठ्या पर्यटनस्थळांना नेण्याची "सफारी'सारखी व्यवस्था होणे आवश्‍यक आहे. तालुक्‍यातील भैरवगड, बाबरगड, पट्टा किल्ला बितनगड अशी ठिकाणे ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांना आव्हान देत असतात. त्याविषयीही प्रसार आणि प्रचाराची गरज आहे. या तालुक्‍याच्या पर्यटन विकासाकडे खास लक्ष दिले, तर आदिवासी बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमताही निसर्गानेच तालुक्‍याला बहाल केली आहे...

पर्यटन विकासातून रोजगारवृद्धी भंडारदरा धरण परिसरात वर्षभरात सुमारे चार ते पाच लाख पर्यटक हजेरी लावतात. त्यांच्यामुळे परिसरात सुमारे पाच ते दहा कोटींची उलाढाल होते; पण यातील सर्वाधिक उलाढाल हॉटेल व्यवसायात होते. मात्र त्यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना पुरेसा रोजगार मिळत नाही. भंडारदरा धरणातून रतनवाडीपर्यंत लॉन्च (होड्या) जातात. तेथे येणाऱ्या पर्यटकांसाठी होडीतून किंवा बोटीतून प्रवास पर्वणी ठरू शकेल. शासनाचे सर्व नियम आणि धरण सुरक्षिततेची काळजी घेऊन धरणाच्या सर्व बाजूंनी असलेल्या डोंगरांच्या कुशीतील मुबलक जागेत "बांधा-वापरा-हस्तांतरित करा' या तत्त्वावर "लेक व्ह्यू रेसॉर्ट' आणि बोटिंग क्‍लबसारख्या योजना राबवल्या, तर पर्यटकांना आकर्षित करण्यास हातभार लागेल. परिणामी स्थानिक तरुणांना रोजगारही मिळू शकेल.

कृषी उत्पादनांची विक्री तालुक्‍यातील आदिवासी शेतकरी पिकवत असलेला दर्जेदार तांदूळ मुंबई-पुण्यापेक्षा कमी भावात उपलब्ध झाला, तर अनेक पर्यटकांना तो खरेदी करणे आवडेल. शिर्डीला येणारे भाविक-पर्यटक परतताना हमखास रस्त्यावर विक्रीसाठी असलेले पेरू घेऊन जातात. शेजारच्या नाशिक जिल्ह्यात विविध कारणांनी येणारे पर्यटक, भाविक किंवा प्रवासीही शेतकऱ्यांनीच रस्त्याच्या कडेला मांडलेल्या स्टॉलवरून कांदे, द्राक्षे, मनुके, डाळिंब आदींची मुबलक खरेदी करतात. त्यातून जास्त नफा शेतकऱ्यांना मिळतो. त्याच धर्तीवर अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपण पिकवलेला तांदूळ पर्यटकांना विकला, तर त्यातून नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकते.
--------------------

बचतगटांचा सहभाग शक्‍य
तालुक्‍यातील आदिवासी भागात असलेल्या दारिद्य्ररेषेखालील सुमारे ३८० बचत गटांच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्टॉल उभारून आदिवासींनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करता येईल. या माध्यमातूनच हिरड्यासारख्या दुर्मिळ औषधी वनस्पतींद्वारा आयुर्वेदिक उत्पादनेही तयार करून विकता येऊ शकतात. करवंद, जांभळे, आवळे असा रानमेवाही तेथे उपलब्ध करून दिला, तर आदिवासी तरुणांना उत्पन्नाचे आणखी एक साधन तयार होईल. मात्र त्यासाठी आधी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना तयार करणे अगत्याचे आहे.
--------------------
हरिश्‍चंद्रगडावरील पुष्पोत्सव हरिश्‍चंद्रगडावरील पुष्पोत्सव पाहणे म्हणजे स्वप्नातील दुनियेत जाणे असेच ठरते. हिमालयातील "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'शी तुलना होऊ शकेल, इतकी शेकडो प्रकारची हजारो रंगांची असंख्य फुले इथे उमलतात. नजर जाईल तिकडे फुलेच फुले... मात्र हा फुलांचा हंगाम असतो फक्त सप्टेंबर ते ऑक्‍टोबर या काळात. पावसाळा संपण्याचा आणि हिवाळा सुरू होण्याचा हा काळ. हा पुष्पोत्सव पाहण्यासाठी अनेक पर्यटक दर वर्षी येतात. दर सात वर्षांनी फुलणारी "कारवी' हेही इथले खास आकर्षण. निळ्या रंगाची कारवी फुलते तेव्हा हरिश्‍चंद्रगडावर निळी शाल पांघरल्याचे दिसते. २००७ मध्ये तेथे कारवी फुलली होती. आता ती २०१४ मध्ये फुलेल.

काजवा महोत्सव घाटघर आणि रतनवाडी परिसरात १५ मे ते १५ जून या काळात रात्रीच्या वेळी काजव्यांची झाडे फुलतात. असंख्य काजव्यांचे पुंजके झाडांवर चमकतात, तेव्हा आकाशातील चांदण्या जणू जमिनीवर येऊन लुकलुकतात असे दृश्‍य दिसते. त्याला परिसरात काजवा महोत्सव म्हणतात. मात्र कितीतरी पर्यटकांना याबाबत माहिती नाही. मे-जून हा काजव्यांचा प्रजननकाळ असल्याने आणि परिसरात सर्वाधिक असलेल्या सादड या झाडांची फुले त्यांचे आवडते अन्न असल्याने या काळात तिथे काजवे सर्वाधिक आढळतात. भंडारदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना खास सोय करून हा काजवा महोत्सव पाहण्यासाठी नेणे पर्यटन विकासाला चालना देणारे ठरेल.

पिंपरकणेचा उंच पूल राजूरजवळ पिंपरकणे येथे प्रवरा नदीवर उंचच उंच पूल बांधला जात आहे. या पुलावरून प्रवरा नदी इंग्रजी यू आकारात वळसा घेऊन वाहते. निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरमुळे तेथे वर्षभर पाणी राहणार आहे. या पुलामुळे आणि तेथेही बोटिंग क्‍लब स्थापन झाल्यास हे ठिकाण पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. त्यातून राजूरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि राजूरच्या पेढ्याला नवी बाजारपेठ उपलब्ध होईल.
निळवंडे धरणावर रोप वे
सध्या तालुक्‍यासह राज्यभर चर्चेत असलेल्या निळवंडे धरणाचा परिसरदेखील असाच निसर्गसंपदेने नटलेला आहे. तेथे धरणाच्या दोन्ही टोकांना असलेल्या डोंगरांवर "रोप-वे'चा प्रकल्प विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. तसा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला, तर तेथेही पर्यटकांना आकर्षित करता येणे शक्‍य आहे.
--------------------

आम्हाला काय वाटते...

निवारा व न्याहारी तालुक्‍यातील रतनवाडीसारख्या विविध ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांसाठी तेथेच "निवारा आणि न्याहारी' अशी योजना विचाराधीन आहे. स्थानिक नागरिकांना रोजगारासाठी त्याचा फायदा होऊ शकेल. महिला बचत गटांच्या माध्यमातूनही झुणका-भाकर केंद्रे किंवा अल्पोपाहार केंद्र स्थापण्याचा विचार आहे. भंडारदरा धरणालगतचे उद्यान विकसित करून धरणात "वॉटर स्पोर्टस्‌' सुरू केले, तर आणखी पर्यटक आकर्षित होतील आणि स्थानिक तरुणांना रोजगारही मिळेल. शेंडी येथे मी स्वतः कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. तेथे बचत गटांद्वारा उत्पादित तांदूळ-नागलीच्या विविध उत्पादनांची विक्रीही होऊ शकेल.
- अशोक भांगरे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, नगर

धरण सुरक्षितता व पर्यावरण जपावे भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांसाठी जलसंपदा विभागाकडून सुविधा देण्याच्या योजना आहेत. सध्या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या उद्यानाच्या विकासासाठी ५० लाख आणि भिंतीवरील मुख्य विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी ४३ लाख रुपये मंजूर आहेत. त्यातून पर्यटकांना सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शेंडीच्या पॉवर हाऊसजवळील नदीपात्रात बोटिंग क्‍लबला मान्यता देण्याचे प्रयत्न आहेत. धरण परिसरातही भिंतीपासून दोन किलोमीटरवर बोटिंग क्‍लबला मान्यता आहे. मात्र धरणाची सुरक्षितता आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
- रामनाथ आरोटे, शाखा अभियंता, भंडारदरा धरण

ट्रेकर्ससाठी आव्हानात्मक प्रदेश
हौशी पर्यटकांबरोबरच ट्रेकर्ससाठीही अकोले तालुक्‍यातील सह्याद्रीची डोंगररांग एक आकर्षण आहे. हरिश्‍चंद्रगड, पट्टा किल्ला, बितनगड, मदनगड, कुंजरगड, कोथळ्याचा भैरवगड हे सर्वांना ट्रेकिंगकरता सुलभ गड-किल्ले आहेत. आव्हान, थरारकता आणि निसर्गसौंदर्य एकाच वेळी अनुभवायचे असेल, तर अकोले तालुक्‍यातील ही ठिकाणे अत्यंत चांगली आहेत. या सर्व ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची सोय चांगली आहे; फक्त मुक्कामाची सोय झाली, तर हौशी पर्यटकांनाही त्यांचा आनंद घेता येईल.
- अविनाश जोशी, वैनतेय गिर्यारोहण-गिरिभ्रमण संस्था, नाशिक
--------------------

अकोले तालुक्‍यातील पर्यटनस्थळे
  • भंडारदरा धरण - चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला या धरणाचा परिसर पावसाळ्यात पाहणे म्हणजे पर्वणीच ठरते. भंडारदरा धरणाच्या उजवीकडून घाटघर-साम्रद-रतनगड मार्गे पुन्हा भंडारदरा अशी परिक्रमा केली, तर वाटेतील मनोहारी धबधबे आणि निसर्गसौंदर्य पाहणे पावसाळी पर्यटनाचा आगळा आनंद देणारे ठरते. 
  • अंब्रेला फॉल -भंडारदरा धरणातून पहिल्या दरवाजातून प्रवरा नदीत पाणी सोडल्यानंतर तेथे तयार होणारा छत्रीच्या आकाराचा धबधबा. धरणाच्या भिंतीलगतचे उद्यानही पर्यटकांच्या विसाव्याचे चांगले ठिकाण ठरते. 
  • घाटघर कोकणकडा - भंडारदरा धरणाच्या उजवीकडे २२ किलोमीटरवरील पर्यटकांचे आवडते ठिकाण. 
  • साम्रद - घाटघरपासून तीन किलोमीटरवर असलेले एक आदिवासी खेडे. तेथील सांदणदरी प्रसिद्ध आहे. मात्र पावसाळ्यात या सांदणदरीत जाणे धोकादायक ठरते. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात जाणे चांगले. 
  • रतनगड - साम्रदपासून आठ किलोमीटरवर असलेल्या रतनवाडीच्या मागे रतनगड हा प्राचीन किल्ला आहे. त्याला गो. नी. दांडेकर यांनी "रत्नगड' म्हणून गौरविले होते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी गावातील रत्नेश्‍वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. 
  • कळसूबाई - महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर (उंची १६४६ मीटर). हे शिखर आणि कळसूबाईच्या रांगेतच अलंग, मलंग आणि कुलंग आणि मदनगड हे किल्ले साहसी पर्यटकांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात. 
  • रंधा धबधबा - भंडारदऱ्यापासून १० किलोमीटरवर असलेला धबधबा. 
  • आंबित धरण - राजूरहून दक्षिणेला २६ किलोमीटरवर आंबित धरण आहे. पुण्याकडून येताना आळेफाटा-खुबी फाटा-तोलारखिंड. तेथून डावीकडे आंबित धरण, तर उजवीकडे हरिश्‍चंद्रगडाला जाता येते. 
  • हरिश्‍चंद्रगड - साहसी आणि हौशी पर्यटकांचे आवडते ठिकाण. सुमारे सोळाशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंती मंदिर आणि सुमारे दीड हजार लोक बसू शकतील अशा दहा गुहा आणि अनेक औषधी आणि दुर्मिळ वनस्पतींनी बहरलेली वनराई हे हरिश्‍चंद्रगडाचे वैशिष्ट्य. गडावरील कोकणकडा हे संपूर्ण देशभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र. हरिश्‍चंद्रगडाच्या रांगेतच कुंतलगड (कोंबडकिल्ला) आहे. 
  • फोफसंडी - कुंतलगडाच्या दक्षिणेला असलेले हे एक अत्यंत दुर्गम आदिवासी खेडे. चारही बाजूंनी गगनाला भिडणाऱ्या डोंगरांमुळे या गावात डोक्‍यावर येईपर्यंत सूर्य दिसत नाही आणि तीन-चार तासांच्या दर्शनानंतर तो दिसेनासा होतो. परिणामी इथे दुपारी चारलाच दिवस मावळतो, असे म्हटले जाते. गेल्याच वर्षी या गावाला जाण्यासाठी रस्ता तयार झाला आणि अकोले येथून बसही जाऊ लागली आहे. 

No comments:

Post a Comment