राजूरला १६ हजार रोपांची लागवड
राजूर - राजूर ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता ठेऊन सर्वागीण आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आश्वासन नियोजित सरपंच हेमलताताई पिचड यांनी दिले. या वाटचालीत काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील. त्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या. पर्यावरण संतुलीत ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत १६ हजार रोपे लावण्याचा प्रारंभ युवक नेते वैभव पिचड यांच्या हस्ते कोल्हार-घोटी रस्त्यावर झाला. पहिल्या टप्प्यात ३ हजार झाडे लावण्यात आली. त्यावेळी श्रीमती पिचड बोलत होत्या. ग्रामपंचायतीची निवडणूक त्याच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीच्या इतिहासात ७६ वर्षांत प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली, त्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. प्राचार्य टी. एन. कानवडे, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची या वेळी भाषणे झाली. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तानाजी पावडे, वन विभागाचे संगमोर, कृषी विभागाचे नाईक, तसेच शशिकांत देशमुख, गणपत देशमुख, पत्रकार शांताराम काळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment