७६ वर्षांत प्रथमच राजूर ग्रामपंचायत बिनविरोध |
हेमलता पिचड यांची सरपंचपदी निवड निश्चित राजूर, १४ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक अपेक्षेप्रमाणेच अखेर बिनविरोध झाली. माघारीच्या आदल्या दिवशी ७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पंचायतीच्या १७ जागा बिनविरोध झाल्या. १० जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या. गेल्या ७६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. गावकऱ्यांनी याचे जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, आदिवासी महिलेसाठी राखीव सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड यांची पत्नी हेमलताताई पिचड यांची निवड निश्चित असून, तशी घोषणा होणेच केवळ बाकी आहे. आज सकाळी सात उमेदवारांनी अर्ज माघारीचे पत्र युवक नेते वैभव पिचड यांच्याकडे दिले. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना समक्ष भेटून हे अर्ज सादर केल्याने हेमलताताई पिचड यांच्या नेतृत्वाखाली १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. राजूर ग्रामस्थ, स्वामी गगनगिरीमहाराज भक्त प्रतिष्ठान, राष्ट्रसेवा दल, राजूर पत्रकार संघ, सामाजिक-शैक्षणिक संस्था, व्यापारी असोसिएशन व युवा नेते वैभव पिचड यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. अर्ज भरतेवेळीच १० उमेदवार बिनविरोध निवडले गेले. संतोष मुर्तडक, भास्कर येलमामे, विजय लहामगे, वैशाली येलमामे, संजय मैड, संजय सूर्यवंशी, रेखा चव्हाण यांनी आज अर्ज मागे घेतले. वैभव पिचड यांनी या सर्वाचे स्वागत व सत्कार केला. बिनविरोध निवडले गेलेले प्रभागनिहाय सदस्य या प्रमाणे - प्रभाग १ - संतोष बंदसोडे व दौलत देशमुख. प्रभाग २ - मनोज कोंडार, रजनी टिभे व वर्षां नवाळी. प्रभाग ३ - भास्कर येलमामे, रोहिणी भारस्कर व सुरय्या तांबोळी. प्रभाग ४ - हेमलताताई पिचड, सखुबाई पवार, राजू हरिभाऊ कानकाटे. प्रभाग ५ - बाळासाहेब देशमुख, गंगूबाई देशमुख व नंदकिशोर चोथवे. प्रभाग ६ - गणपत देशमुख, पुष्पा निगळे व अंजली देशमुख. १७ सदस्यांमध्ये ९ अनुसूचित जाती-जमाती (५ महिला, ४ पुरूष), ५ इतरमागासवर्गीय (३ पुरूष, २ महिला), २ सर्वसाधारण (१ पुरूष, १ महिला), १ मागासवर्गीय अशी वर्गवारी आहे. |
No comments:
Post a Comment