Wednesday, June 15, 2011


निळवंडे कालव्यांच्या प्रश्नी आंदोलन चिघळलेBookmark and SharePrintE-mail
उद्या ‘अकोले बंद’
अकोले, १५ जून/वार्ताहर

निळवंडे पाणीहक्क संघर्ष समितीचे निळवंडे कालव्यांच्या प्रश्नी सुरू असलेले आंदोलन चिघळत चालले असून, दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडणाऱ्या आंदोलकांनी या विभागाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज दहन केले. या निमित्ताने आंदोलक-पोलिसांमध्ये पुन्हा आमनेसामने संघर्ष उद्भवला. न्याय्य मागण्या मान्य न केल्यास प्रसंगी निळवंडे धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला. दरम्यान, कृती समितीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शुक्रवारी (दि. १७) ‘अकोले बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.
मंत्रालयातील बैठकीनंतर काही काळ थंडावलेल्या आंदोलनाने आता पुन्हा उचल खाल्ली. आपल्या मागण्यांची तड लागण्यासाठी संघर्ष समिती रस्त्यावर उतरली. दोन दिवसांपूर्वी येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडण्याचा प्रयत्न झाला. तहसीलदारांच्या मध्यस्थीने त्या दिवसाचे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, कालव्यांची अकोले तालुक्यातील कामे बंद ठेवण्यास जलसंपदा विभागाने ठाम नकार दिल्याने कृती समितीनेही आपले आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आज जलसंपदा विभागाच्या पुतळ्याचे दहन करण्याचे आंदोलन घोषित केले होते.
जलसंपदा विभागाच्या धिक्काराच्या घोषणा देत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ती महात्मा फुले चौकात सभेत रूपांतर झाले. डॉ. अजित नवले, शांताराम वाळुंज, पाटीलबा सावंत, ‘अगस्ती’चे संचालक अशोक आरोटे, बाळासाहेब वाळुंज, सुरेश भोर आदींनी या वेळी या विभागाच्या गलथानपणावर जोरदार टीका केली. लोकप्रतिनिधींबरोबरच निळवंडे कालवाप्रश्नी बोटचेपेपणाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, माजी सभापती विठ्ठल चासकर, कैलास वाकचौरे, परबत नाईकवाडी, काँग्रेस नेते मधुकरराव नवले यांच्यावर नाव घेऊन टीका केली. आजच्या आंदोलनातही मोठा पोलीस तैनात होता. पाच पोलीस अधिकारी, ४० पोलीस यांच्याबरोबरच शीघ्र कृतिदल तैनात होते. नेत्यांची भाषणे संपल्यावर पुतळा जाळण्यासाठी तो मध्ये घेण्यात आला. मात्र, तो पेटविण्याआधीच पोलिसांनी झडप घालून हस्तगत करून पोलीस गाडीत टाकला. या वेळी पोलीस व आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली. आंदोलकांनी गाडीभोवती कडे केले. हे सुरू असतानाच गनिमी काव्याने आंदोलकांनी दुसरा पुतळा आणून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
  पेटण्यापूर्वीच तोही पोलिसांनी विझवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पुतळ्यावरून पोलीस व आंदोलकांची झोंबाझोंबी होऊन पुतळ्याचे तीनतेरा वाजले.

No comments:

Post a Comment