बिनविरोध निवडणूक, महिला सरपंचपदासाठी प्रथमच प्रयत्न राजूर, ६ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक आता प्रथमच बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या बरोबरच गावच्या सरपंचपदाची धुराही पहिल्यांदाच हेमलताताई पिचड यांच्या रूपाने एखाद्या महिलेकडे सोपविण्यात येण्याची चिन्हे आहेत. निवडणूक बिनविरोध व महिला सरपंच या दोन्ही बाबी सर्वपक्षीय सहमतीतून होत असल्याने राजकीयदृष्टय़ा ही महत्त्वाची बाब मानली जाते. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय होऊन ग्रामनिवडणूक समिती स्थापन करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ४५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सरपंच व समितीचे सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी दिली. महिलांच्या ९ जागा व पुरूषांच्या ८ अशा १७ जागांसाठी होत असलेली ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व गावाने एकत्र बैठक घेऊन सहमती दर्शविली. येत्या २६ जूनला ही निवडणूक होत आहे. गगनगिरीमहाराज प्रतिष्ठान, पत्रकार संघ, तरूण मंडळे, व्यापारी यांच्या पुढाकाराने व गावच्या व्यापक विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतानाच आदिवासी, वंजारी, तेली, मागासवर्गीय, शिंपी, सोनार, मारवाडी, मुस्लीम, कुंभार, सुतार यांच्यासह सर्व छोटय़ा-मोठय़ा समाजघटकांना गावच्या कारभारात व निर्णय प्रक्रियेत सामावून घेत विकासाचा नवीन मार्ग शोधणे ही काळाची गरज असल्याचे या संदर्भात सांगण्यात आले. त्या दृष्टीने उद्या (मंगळवारी) सकाळी ९ वाजता ग्रामस्थांनी बैठक आयोजित केली आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध होत असल्याबद्दल मधुकरराव पिचड यांनी समाधान व्यक्त केले. राजूर हे गाव ४० गाव डांगाणाचे प्रमुख असून प्रस्तावित तालुका आहे. गावच्या १७पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव असून, यात ५ महिला आदिवासी समाजाच्या, १ अनुसूचित जाती, २ इतर मागासवर्गीय समाज व १ खुला प्रवर्ग असे आरक्षण आहे. आठ जागा पुरूषांच्या असून ४ आदिवासी समाज, तर ३ इतर मागासवर्गीय व १ खुला प्रवर्ग यासाठी आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून सरपंचपद हेमलताताई पिचड यांनी स्वीकारावे, अशी आग्रही मागणी विठ्ठल मंदिरात आयोजित बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी केली. भास्कर येलमामे यांनी प्रास्ताविक केले. विनय सावंत, संतोष मुर्तडक, काशिनाथ भडांगे, संजय मैड, मुरलीधर वाडेकर यांनी या वेळी वरील मतप्रदर्शन केले. आदिवासी विकास महामंडळाचे संचालक व्ही. डी. देशमुख, सीताराम देशमुख, गणपत देशमुख, अरूण माळवे, नारायण माळवे, सिंधूताई पाबळकर, शशिकांत ओहरा, सुंदरलाल मेहता, सुनील शहा, पं. स. सभापती मंगल जाधव यांनी पिचड यांच्यामुळे दारूबंदी, तंटामुक्ती होऊन राजूरचा राज्यात लौकिक पसरला. आदर्श गावच्या यादीत राजूर अग्रस्थानी असेल, असे सांगितले. |
Monday, June 6, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment