Wednesday, June 15, 2011


‘मी तो हमाल’वर लवकरच चित्रपटBookmark and SharePrintE-mail
अनंत महादेवन दिग्दर्शक
नगर, १५ जून/वार्ताहर

‘मी तो हमाल’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात प्रसिद्धीस आलेल्या अप्पा कोरपे यांच्या जीवनावर आता याच नावाने चित्रपटनिर्मिती होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत महादेवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, तर निर्माते पुण्याचे उद्योजक वसंतराव मिटकरी आहेत.
गेल्या ४० वर्षांपासून अप्पा कोरपे हमाल, मापाडी या कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. राज्य हमाल मापाडी महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. अप्पांच्या जीवनावर चित्रपट काढण्याची कल्पना वसंतराव मिटकरी यांना सूचली. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याकडे त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली आहे.
पूर्वतयारीसाठी महादेवन यांनी नगरला येऊन अप्पांची भेट घेतली. अनंत महादेवन यांनी यापूर्वी दिल माँगे मोअर, दिल विल प्यार व्यार, अनामिका, अक्सर, अगर आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या ‘रेड अलर्ट - द वार विथ इन’ या चित्रपटाला दोन वर्षांपूर्वी स्टुटगार्ड फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला होता.
या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून नंदू आचरेकर जबाबदारी सांभाळत आहेत. संवाद संजय पवार यांचे आहेत. मंगेश जगताप सहनिर्माते आहेत. ‘मी सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटास चार राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्य सरकारचे सवरेत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिकही त्यास मिळाल्याने अप्पा कोरपे यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबतही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणार आहेत.
त्यादृष्टीने निर्मिती मूल्यांमध्ये कोणतीही कमतरता न ठेवता चित्रपट तयार करण्यात येणार असल्याची माहिती निर्माते मिटकरी यांनी दिली.

No comments:

Post a Comment