Saturday, June 25, 2011

सह्य़ाद्रीतील सर्वात खडतर डोंगरयात्रा कोणती असा सवाल जर खडा झाला तर उत्तर ठरलेलं आहे.. कळसूबाई रांग. महाराष्ट्राच्या या शिखरसम्राज्ञीच्या सानिध्यात वसलेले तीन सर्वागसुंदर गिरिदुर्ग म्हणजे अलंग-मदन व कुलंग. अभेद्यपणा तर या तिघांचा आधारस्तंभ आणि ट्रेकर्सच्या जिव्हाळ्याचा विषय. यातल्या अलंग आणि मदनचे अनेकजण निस्सीम भक्त आहेत. कातळारोहणाशिवाय अलंग आणि मदनचा माथा गाठणं खरोखरंच कठीण. त्यामुळे साहस ज्यांच्या नसानसात भिनले आहे अशांसाठी या दोन्ही किल्ल्यांची चढाई म्हणजे आभाळाला हात टेकल्यासमानच आहे. पण यातला तिसरा दुर्ग मात्र तुलनेने सोप्या चढाईमुळे गिर्यारोहकांच्या दुर्लक्षितपणाचा शिकार झाला आहे. ‘सह्य़ाद्रीतील सर्वोच्च चढाई’ असा नावलौकिक प्राप्त झालेला याच दुर्गमालिकेतील शेवटचा दुर्ग म्हणजे ‘कुलंगगड.’ बऱ्याचदा ‘पुन्हा केव्हातरी करू’ अशा क्षुल्लक कारणामुळे अनेकजण या स्वर्गसुखाला मुकतात, पण कुलंगच्या दर्शनाशिवाय मात्र ही दुर्गयात्रा अपूर्ण आहे.
आता या किल्ल्याला जायचे मार्ग अनेक, पण सोईचे मार्ग साधारणपणे दोन. नगर जिल्ह्य़ातील संगमनेरपासून  प्रवास सुरू करावा आणि संपवावा तो थेट पायथ्याच्या आंबेवाडीत. राजूर-भंडारदरा मार्गे दोन तासांच्या प्रवासानंतर आंबेवाडीची घरकुले आपल्याला दिसायला लागतात. दुसरा मार्ग म्हणजे राजूर-भंडारदरा शेंडीमार्गे पायथ्याचं घाटघर गाव गाठायचं (नाणेघाटाजवळील घाटघर वेगळं असून ते पुणे जिल्ह्य़ात आहे.) घाटघरचा कोकणकडा म्हणजे भीषणपणाचा इरसाल नमुना. घाटघरहून कुलंगला जायचा मार्ग म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. पुन्हा चढणही सोपी आहे. पण वाटाडय़ा मात्र हवा. ही वाट नगर व ठाणे जिल्ह्य़ांच्या सीमारेषेला चिकटून जात असल्याने कोकणातील डोंगररांगांचं देखणेपण अनुभवावं ते इथूनच. तिसरा मार्ग हा मदन आणि कुलंगच्या खिंडीतून कुलंगवर येतो. पण ज्यांना नुसता कुलंग करायचा आहे त्यांनी आपलं वरच्या दोन वाटांपैकी हवं तिथून यावं. कुठुनही जा. चार- पाच तासांची मनसोक्त पायपीट संयमाचा अंत पाहात असली तरी सुखावणारी आहे. या तीनही वाटांचा संगम होतो तो एका झाडापाशी. कुलंगची दिशादर्शक पाटी भटक्यांचे स्वागत करायला या झाडावर ठाण मांडून आहे. आता इथून सुरुवात होते ते कुलंगच्या खडय़ा चढणीला. मुरमाड लाल मातीचा कारवीने वेढलेला मार्ग आपले पाय ओढत राहतो, पण आपण लक्ष नाही द्यायचं. पंधरा-वीस मिनिटांनंतर ही चढण संपते ती पायऱ्यांच्या लांबलचक वाटेपाशी. मान उंच करून कुलंगच्या कातळकडय़ाकडे पाहात या पायऱ्यांचा मागोवा घेतला की कळतं या आपल्याला कुलंगच्या माथ्यापर्यंत साथ देणार आहेत. आपण त्यांच्यावर स्वार होऊन आपला मार्ग आक्रमत राहिलो की त्यांचा वाढत जाणारा अंश काही ठिकाणी मात्र धडकी भरवतो. डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे अंगावर येणारा कातळ यांच्या कचाटय़ात आपण सापडतो. पण सह्य़ाद्रीतील सर्वोच्च चढाई असणाऱ्या या किल्ल्याला मात्र सगळं माफ आहे. या अरुंद वाटेवर उजवीकडे एक छोटी गुहादेखील आहे. पूर्वी इथे दरवाजा असावा असे अनुमान काढता येते. आपले धापावलेले ऊर इथं शांत करायचे आणि गुहेतून चौकटीतून सहज बाहेर नजर टाकायची. मदनगडाचा आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या कळसूबाई शिखराचा नजारा मात्र सारा शिणवटा घालवणारा आहे. आता सुरू होतो तो शेवटचा खडा चढ. सुमारे शंभर उभ्या पायऱ्या चढल्या की उजवीकडे कुलंगच्या भग्न दरवाजाचे दोन बुरुज दिसतात. इथे कुलंगची चढाई संपते. पण ‘सब्र का फल मिठा होता है’ या उक्तीचा प्रत्यय यायला सुरुवात झालेली असते. दरवाजातून आत पाऊल ठेवल्यावर डावीकडे व उजवीकडे पसरत गेलेलं कुलंगचं विस्तीर्ण पठार आहे. आधी कुठं जायचं हा प्रश्न साहजिक आहे. पण पाठीवरच्या भरलेल्या सॅकने व त्यात कुलंगच्या कठीण चढाईने हाडं खिळखिळी केलेली असल्याने आपण आधी उजवीकडे जाऊ. उजवीकडे कुलंगच्या प्रशस्त अशा मुक्कामायोग्य गुहा आहेत. पाठीवरचं जड झालेलं ओझं इथं उतरवलं की कसं बरं वाटतं. कुलंग किल्ला साधारणपणे पूर्व पश्चिम पसरला आहे. किल्ल्यावर येईपर्यंत दुपार होते. कुलंगच्या पश्चिम टोकावरून दिसणारा सूर्यास्त बघायचा असेल तर आधी पूर्वेकडची बाजू फिरायला बाहेर पडायचं आणि नंतर पश्चिमेकडील अवशेष पाहात सूर्यास्ताचा आनंद लुटायचा.
गुहा डावीकडे ठेवून पुढे गेलं की लागतो कुलंगवरील सुंदर असा नऊ टाक्यांचा समूह. खडकात खोदलेली ही टाकी हीच तर कुलंगची खासियत आहे. कोणत्याही टाक्यातलं पाणी प्या. थंडगारपणा आणि सह्य़ाद्रीतल्या पाणवठय़ाची विशेष चव सगळीकडे सारखीच आहे. या टाक्यांच्या साधारण मध्यावर खडकातच कोरलेले गणपतीचे शिल्प आहे. या टाक्यांपासून सरळ चालत सुटलो की पाण्याची आणखी काही खोदीव टाकी दिसतात, पण या टाक्यांचे वैशिष्टय़ म्हणजे या टाक्यांमधील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवण्यासाठी दगडांचा बांध घातलेला आहे. किल्ल्यावर पाण्याचे जिवंत झरे नसल्याने साठवलेल्या पाण्यावरच गडावरील सैन्याला गुजराण करावी लागत आहे. त्यामुळे गडावर जास्तीत जास्त पाणसाठा राहावा यासाठी ही सोय. कुलंगच्या या बाजूला एवढेच अवशेष आहेत. पण इथून घडणारे अलंग, मदन, कळसूबाई, रतनगड, भंडारदरा जलाशय, आजोबा डोंगर, पाबरगड यांचे दृष्य मात्र स्फूर्तिदायक आहे. इथे दोन घटका आराम करायचा आणि पिछे मूड करून गडाच्या पश्चिम टोकाकडे निघायचं. आपल्या मुक्कामाच्या गुहांच्या पुढे जाणारी पायवाट धरून पुढे चालत राहिलं की गडावरील खऱ्या अवशेषांना सुरुवात होते. सुरुवातीला पाण्याची भलीमोठी टाकी आहेत. गुहांच्या अगदी जवळ असल्याने या पाण्याचा वापर निर्धोकपणे करता येतो. पुढे गडाचे भग्नावशेष दिसायला लागतात. कुलंगवरचे दोन वाडे जरी पडलेले असले तरी त्यांच्या दोन बाजूंच्या भिंती मात्र अजूनही मजबूत आहेत. पुढे काही इमारतींचे पूर्णपणे ढासळलेले अवशेष आहेत. या अवशेषांची संख्या बघता कुलंगवर पूर्वी बऱ्यापैकी राबता असणार याची खात्री पटते. कुलंगच्या पश्चिम टोकावरून ठाणे जिल्ह्य़ातील डोंगर बघितले की नजरेचं पारणं फिटतं. वातावरण स्वच्छ असेल तर माहुलीचा किल्लाही दिसू शकतो. इथून दिसणाऱ्या सूर्यास्ताच्या दृश्याला मात्र तोड नाही. घाटमाथ्यावरील शेवटचे ठिकाण असल्याने हा नजारा एकमेवाद्वितीय आहे. तो डोळ्यात साठवून घ्यायचा आणि गडफेरीचा समारोप करायचा.
कुलंग किल्ला व्यवस्थित पाहायचा असेल तर किमान दोन तास हाताशी हवेत. आता मागं फिरून दिवसभर झालेली तंगडतोड घालवण्यासाठी गुहांमध्ये पथाऱ्या पसरल्या की दिवसभराचा सगळा भ्रमंतीपट डोळ्यांसमोरून सरकायला लागतो. कुलंगवरच्या या प्रशस्त गुहांमधला मुक्काम हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. किल्ल्याचं भौगोलिक स्थान, पाण्याची टाकी, अवशेष, मुक्कामाची उत्कृष्ट सोय आणि अर्थातच वरून दिसणारे खास दृष्य या सर्व वैशिष्टय़ांनी कुलंगला समृद्ध केले आहे. दैनंदिन आयुष्याच्या चौकटीतून बाहेर पडून दोन दिवस सुखात घालवायचे असतील तर कुलंगला पर्याय नाही. थोडक्यात काय तर कुलंग हा सर्वार्थाने भटकंतीचे परिपूर्ण ‘पॅकेज’ आहे. ते अनुभवायचं असेल तर वाट वाकडी केलीच पाहिजे.

No comments:

Post a Comment