Thursday, June 9, 2011


अकोले, ९ जून/वार्ताहर
वातावरणात निरव शांतता, सुखद गारवा, आकाशातील टिपूर चांदणे, काजव्यांचा चमचमाट अन् मंद शीतल चंद्रप्रकाश.. भंडारदऱ्याच्या आसमंतात सध्या असा अनोखा प्रकाशोत्सव सुरू आहे. रात्रीच्या अंधारात काळ्याशार डांबरी सडकेवरून, रानवाटातून या प्रकाशपर्वात आकाशातील चंद्रकोरीच्या साक्षीने भटकंती करणे हा एक आगळा अनुभव.
पावसाळ्याच्या उंबरठय़ावर, घाटघर-रतनवाडी-भंडारदरा परिसरात दरवर्षीच प्रकाशोत्सव रंगतो. मे महिना संपता संपता या परिसरातील काही झाडांवर काजवे वस्तीला येतात. पाहता पाहता त्यांची संख्या वाढू लागते. काजव्यांच्या वास्तव्याने रात्रीच्या अंधारात भयाण वाटणारी झाडे चैतन्याने जणू मोहरून जातात. लुकलुकत्या काजव्यांमुळे या झाडांचा जणू कायापालट होतो. आकाशातील तारकादळच जसे या झाडावर अवतरल्याचा भास होतो. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अथवा दिवाळीत झाडांवर उघडझाप करणाऱ्या दिव्यांची रोषणाई केली जाते. अशा झाडांची आठवण काजव्यांनी मोहरलेले झाड पाहताना होते. वर्षांराणीच्या आगमनाची वर्दी देणारे हे प्रकाशपर्व मान्सूनच्या आगमनानंतर दोन-तीन पावसांतच लुप्त होते.
भंडारदऱ्यातील काजव्यांचा हा प्रकाशोत्सव सध्या ऐन भरात आहे. कोकणात मान्सून दाखल झाला असला, तरी घाटमाथा ओलांडून तो अजून घाटघर, भंडारदरा परिसरात पोहोचलेला नाही. त्यामुळे रात्री आकाश तसे निरभ्रच असते. मध्यंतरी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने भंडारदऱ्याच्या हवेत सुखद गारवा निर्माण केला आहे. रात्रीच्या अंधारात मंद चंद्रप्रकाशाने सभोवतालच्या जंगलास, डोंगरदऱ्यांना वेगळेच रूप प्राप्त होते. एरवी निरव शांतता जंगलाच्या साक्षीने भयाण वाटू लागते. अशा वेळी केलेला प्रवास अंगावर शहारे आणणारा असतो. पण आता काजव्यांमुळे उजळून निघालेल्या झाडांमुळे तोच प्रवास रोमांचकारी वाटत आहे. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी हौशी व धाडशी निसर्गप्रेमी रात्रीच्या अंधारात भंडारदरा परिसरात भटकंती करीत आहेत. या वर्षी काजव्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्तच असल्याचे या परिसरात नियमित भेट देणाऱ्यांचे निरीक्षण आहे.
भंडारदऱ्याच्या पश्चिमेकडे पांजऱ्यापर्यंत, दक्षिणेला मुतखेल, कोलटेंभ्यापर्यंत, तर उत्तरेला वाकी, बारीपर्यंत केलेल्या भटकंतीत काजव्यांमुळे उजळणारी बरीच झाडे दिसतात. एरवी अशी झाडे शोधण्यासही बरीच भटकंती करावी लागे. पण सध्या डांबरी सडकेवरून पाच-सात मिनिटे चालले तर काजव्यांच्या अशा वस्त्याच दृष्टीस पडतात. कधी बाजूच्या दरीत तर कधी रस्त्याच्या कडेला. निसर्गाचा हा मनोहारी आविष्कार अजून किती दिवस अनुभवण्यास मिळमार ते मान्सूनच्या आगमनावरच अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment