Saturday, June 25, 2011


Print
अकोले, २५ जून/वार्ताहर
निळवंडे धरणाचे कालवे अकोले तालुक्यापुरते बारमाही असतील. उपसा सिंचनाद्वारे किंवा पाटाद्वारे पाणी घेणे हे दोन्ही पर्याय तालुक्यातील शेतक ऱ्यांना उपलब्ध असतील. तसेच केवळ अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय कालवे बंद पाईपचे असतील. त्यास २०० कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती आमदार मधुकर पिचड यांनी दिली.
नव्यानेच बदलून आलेले जलसंपदाचे अधीक्षक अभियंता वा. ल. साबळे यांनी येथील विश्रामगृहावर पिचड यांची भेट घेतली. निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे व जी. बी. नाबर हेही त्यांच्याबरोबर होते. चर्चेनंतर पिचड पत्रकारांशी बोलत होते. अकोले तालुक्यातील कालव्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून २-३ दिवसांत ते पूर्ण होईल. हे कालवे बंद पाईपचे असतील. त्यातून पाझर तलाव, तसेच बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.
निळवंडे प्रकल्पाचे मुख्य कालवे ६१० मीटर तलांकावरूनच निघतील. हे कालवे विनाअस्तराचे असतील. तसेच त्यामध्ये ठरावीक अंतरावर झडपा बसवण्यात येणार आहेत. या कालव्यांतून अकोले तालुक्याला बारमाही पाणी मिळेल, असे पिचड यांनी स्पष्ट केले.
प्रवरा खोऱ्यात सध्या उपसा सिंचनाद्वारे भंडारदऱ्याचे पाणी शेतीला दिले जाते. आपल्या शेतीला उपसा सिंचन की पाटाने पाणी द्यायचे याचा निर्णय संबंधित शेतक ऱ्यांवर अवलंबून आहे, असे पिचड म्हणाले. निळवंडे जलाशयातून ४४ कोटी खर्चाच्या ३ उपसा सिंचन योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे दिवाळीपर्यंत पूर्ण होतील. लवकरच माळेगाव-कातळापूर या चौथ्या योजनेचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात पाण्यासंदर्भातील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही पिचड म्हणाले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, वैभव पिचड, मिनानाथ पांडे, परबत नाईकवाडी, काँग्रेसचे अशोक भांगरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment