भंडारदऱ्याच्या पाण्यात बुडून रोह्य़ातील अधिकाऱ्याचा मृत्यू |
राजूर, १२ जून/वार्ताहर भंडारदरा धरण पाहण्यास आलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या रोहा येथील सहायक अधिकाऱ्याचा धरणाच्या पाण्यात पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाला. प्रशांत वामन गाडगीळ (वय ३५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. येथे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांकडे दिला. येथेच अग्निसंस्कार करून नातेवाईकांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. गाडगीळ यांचा मित्रपरिवार व विमा अधिकारी या वेळी उपस्थित होते. रोहा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गाडगीळ शुक्रवारी धरण पाहण्यास आले होते. हॉटेल अमृतेश्वरमध्ये खोली बुक करून संध्याकाळी नाईट ड्रेसवर धरण परिसरात ते फिरावयास गेले. मात्र, ते रात्री परत आले नाहीत. धरणाच्या कडेला पाण्यात पाय बुडवत असताना तोल जाऊन पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सकाळी अकराच्या दरम्यान हॉटेलमधील राजेश राठोड यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांत खबर दिली. सहायक फौजदार कोडम यांनी घटनास्थळी भेट दिली. गाडगीळ यांच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांवरून नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांचे भाऊ प्रताप गाडगीळ, चनलते, शाखाधिकारी रवींद्र देवधर, कोंडार ढुमणे, केळकर आले शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, मृतदेह नेण्यास १४ तास लागणार असल्याने राजूर येथेच अग्निसंस्कार करण्यात आले. पत्रकार शांताराम काळे, गिरीश बोऱ्हाडे, प्रवीण डेरे, कल्पेश वराडे, देवराम जाधव, नंदकुमार चोथवे, संतोष बंदसोडे यांनी मदत केली. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार तपास करीत आहेत. |
No comments:
Post a Comment