| चैत्यभूमीची राष्ट्रवादीला घाई, बारामतीत मात्र आंबेडकर स्टेडियमचा २० वर्षे खोळंबा |
| पुणे, ३ जून / विशेष प्रतिनिधी बारामतीमधील माजी नगरसेवक विजय गव्हाणे हे या आंबेडकर स्टेडियमसाठी सातत्याने लढा देत असून, आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासही झालेल्या अक्ष्यम्य विलंबाविरोधात त्यांना आवाज उठवावा लागला होता. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक करण्यात येणाऱ्या या दुर्लक्षामुळे दलित समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. गव्हाणे यांनी ‘लोकसत्ता’ला आपल्या लढय़ाची माहिती कथन केली. बारामतीमधील या नियोजित स्टेडियमच्या जागी आधी दलित वस्ती होती. ती स्टेडियमसाठी हटविण्यात आली. १९९१ मध्ये आंबेडकर जन्मशताब्दी असल्याने बांधकाम सुरू झालेल्या स्टेडियमला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक गव्हाणे यांनी दिला. मात्र ‘स्टेडियमला पवार यांच्या कुटुंबापैकी एकाचे नाव देण्यात येणार आहे, त्यामुळे असा ठराव देऊ नको, असे बजावण्यात आल्याचे गव्हाणे यांनी सांगण्यात आले. ‘मात्र तरीही मी ठराव मांडलाच. तर ठरावाला अनुमोदक मिळण्याचीही बोंब होत. ठरावावर सर्वाच्या अखरे सह्य़ा झाल्यावर लागलीच रंगाऱ्याला बोलावून काम चालू असलेल्या स्टेडियमवर आंबेडकर यांचे नाव रंगविण्यास सांगितले. माझी ही कृती सत्ताधाऱ्यांना आवडली नाही आणि त्यानंतर त्याचा राग स्टेडियमच्या कामावर काढण्यात आला. त्यानंतर अद्यापपर्यंत स्टेडियम पूर्णच झालेले नाही. आता तेथे घाण साचली आहे,’ गव्हाणे यांनी उद्विग्नतेने सांगितले. ‘‘या स्टेडियमचे काम चालू असताना बारामतीत इनडोअर स्टेडियम झाले, माळेगावला स्वतंत्र स्टेडियम झाले, मात्र आंबेडकरांच्या नावाचे स्टेडियम अपूर्णच ठेवण्यात आले आहे,’’ याबद्दल गव्हाणे यांनी खेद व्यक्त केला. आंबेडकर स्टेडियमप्रमाणेच आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठीही येथील सत्ताधाऱ्यांशी झुंज द्यावी लागली असे सांगून गव्हाणे म्हणाले, ‘माझ्या आधीच्या नगरसेवकांनी आंबेडकर पुतळा बसविण्याचा केलेला ठराव दाबून ठेवण्यात आला होता. मी तो ठराव शोधून काढला आणि तो बसविण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. अखेरीस नाइलाजाने पुतळा समिती नेमण्यात आली, पण त्यातून मला वगळून केवळ पवारसमर्थकांना घेण्यात आले. पुतळा समिती नेमल्यानंतर सगळे थंड झाले. मी उपोषण केले तेव्हा चबुतरा बसविण्याचा ठराव मंजूर झाला, पण त्याची निविदा कोणीच भरली नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागले. पुतळ्यासाठी निधी देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले, पण तो मिळविण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागला.’ पवार कुटुंबाच्या विरोधात गेल्याची राजकीय किंमत आपल्याला मोजावी लागली, असे सांगून गव्हाणे म्हणाले, की १९८४ मध्ये मी प्रथम नगरसेवकपदी निवडून आलो आणि त्यानंतर सलग सहा वेळा मी निवडून आलो. १९९१ मध्ये आंबेडकर स्टेडियमचा ठराव मांडल्यानंतर माझा वॉर्ड राखीव करण्याचा प्रयत्न झाला. तरीही मीजिंकलो. अखेरीस गेल्या निवडणुकीत माझा वॉर्ड संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आला आणि अखेरीस मला पाडण्यात आले. |
No comments:
Post a Comment