Tuesday, May 12, 2026

जननी जन्मभूमी आमदार लहामटे

अकोले, ता. १३ : “जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही सुंदर असते, याचा प्रत्यय मला माझ्या लव्हाळी गावाकडे पाहिल्यावर आजही येतो,” अशा भावनिक शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक सकाळ प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या आपल्या जन्मगावाची महती, इतिहास आणि लोकसंस्कृती उलगडून सांगितली. “सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांनी वेढलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लव्हाळी गावात माझे बालपण गेले. याच मातीत मी रांगलो, खेळलो, धावलो आणि शिकलो. पुढे शिक्षणासाठी साकिरवाडी येथे गेलो, तर राजूर ही माझी कर्मभूमी ठरली,” असे ते म्हणाले. लव्हाळी गावाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी गावात रस्ते, वीज आणि पाण्याच्या सुविधा नव्हत्या. मातीची आणि कौलारू घरे हेच गावाचे वैशिष्ट्य होते. पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी केली जाई. फुटलेली कौले बदलून नवीन कौले टाकली जात. “अशा साध्या, संघर्षमय वातावरणात माझा जन्म झाला. वडील शाळामास्तर होते, तर आई शेती आणि घरकाम सांभाळत होती. दोन भाऊ, एक बहीण आणि मी असा आमचा परिवार होता,” असे त्यांनी सांगितले. गावातील सामाजिक रचनेविषयी बोलताना त्यांनी बारा बलुतेदार पद्धतीची आठवण सांगितली. “सुतार बाबा शेतीची लाकडी कामे करायचे, लोहार बाबा नांगर, विळे, कोयते, कुऱ्हाडी तयार करून द्यायचे. परीट घोड्यावर येऊन कपडे व गोधड्या धुऊन द्यायचा. तेली वर्षभर पुरेल इतके तेल आणून द्यायचा, तर वंजारी बोंबील व मांदेली देऊन जायचा. चार महिन्यांनंतर पीक आल्यानंतर त्यांना धान्यरूपाने बिदागी दिली जायची,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनपद्धतीचे जिवंत चित्र उभे केले.“वाघ बारसं हा आमच्या गावातील अत्यंत महत्त्वाचा सण होता. त्या दिवशी आम्ही लहान मुले जंगलात जाऊन लाकडे गोळा करायचो. त्यानंतर चूल पेटवून मोठ्या भगुल्यात भाताची खीर तयार केली जायची. मग नदीच्या काठावर जाऊन अंघोळ करायचो. आमच्यातील एक जण ‘वाघ्या’ बनायचा आणि बाकीची मुले भाताचे छोटे गोळे करून त्याच्यावर मारायची. सूरपारंब्या खेळण्यात संपूर्ण दिवस कसा निघून जायचा ते समजायचेही नाही. संध्याकाळी पुन्हा नदीत डुबकी मारून जनावरे घेऊन घरी परतायचो,” असे त्यांनी सांगितले. “रात्रीच्या वेळी गावात ‘चिली पाटी’सारखे पारंपरिक खेळ रंगायचे. गावातील लोक एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे. त्या काळातील वातावरण अतिशय रमणीय आणि जिव्हाळ्याचे होते,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनातील एकोप्याची आठवण सांगितली. गावातील ‘इर्जुक’ परंपरेविषयी बोलताना ते म्हणाले, “इर्जुक म्हणजे सामुदायिक श्रमदान. एखाद्या शेतकऱ्याचे शेत तयार करणे, फुटलेला बांध बांधणे, पडघई किंवा राबणीची कामे असली की गावकरी एकत्र येऊन काम करायचे. दिवस मावळतीला गेला की तिखट-गोड जेवणाचा बेत असायचा. त्यानंतर गाणी, नाच आणि आनंदाने गाव दुमदुमून जायचे. त्या काळातील गावगाडा हा खऱ्या अर्थाने माणुसकीवर चालणारा होता.” आपल्या वडिलांच्या शिक्षणसेवेच्या आठवणी सांगताना त्यांनी म्हटले, “वडील शाळामास्तर असल्याने रात्री गावात रात्रशाळा भरायची. गावातील गायखे म्हणजे गुराखी तरुण मोठाले टोंगळे, कोपरी आणि अर्धी इजारी घालून शिकायला यायचे. त्यांना अगदी सोप्या पद्धतीने अक्षरओळख शिकवली जायची. ‘इकडून एक वाटी, तिकडून एक वाटी, मध्यभागी एक काठी म्हणजे क’ अशा पद्धतीने मूळाक्षरे शिकवली जात होती. शिक्षण, संस्कार आणि सामुदायिक जीवन हेच त्या काळातील गावाचे खरे वैभव होते,” असे ते म्हणाले.

Monday, April 27, 2026

समाजभान जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

समाजभान जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडणारी पत्रकारिता, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि शिक्षण क्षेत्रातील समर्पित नेतृत्व यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. आपल्या कार्यातून त्यांनी केवळ वैयक्तिक ओळख निर्माण केली नाही, तर समाजजीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. पत्रकार म्हणून शांताराम काळे यांनी ग्रामीण भागातील समस्या, विकासकामांतील अडथळे, नागरिकांच्या अडचणी आणि सामाजिक घडामोडी प्रभावीपणे समाजासमोर मांडल्या. वस्तुनिष्ठता, निर्भीडपणा आणि जनसामान्यांच्या हितासाठी ठाम भूमिका घेणारे पत्रकार म्हणून त्यांनी विश्वासार्हता संपादन केली आहे. ग्रामीण पत्रकारितेला जबाबदारीची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांचे कार्य केवळ बातम्यांपुरते मर्यादित राहिले नाही. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, विविध जनहिताच्या उपक्रमांना चालना देणे आणि युवकांना विधायक मार्ग दाखविणे हे कार्य सातत्याने केले. समाजाशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख दृढ झाली आहे. स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूरचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कारमूल्यांची जोड मिळावी, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. शिक्षण हीच ग्रामीण विकासाची खरी गुरुकिल्ली आहे, या विश्वासातून त्यांनी काम पुढे नेले. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली, पालकांचा विश्वास दृढ झाला आणि विद्यार्थ्यांसाठी नवी संधी निर्माण झाली. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत समतोल साधत समाजासाठी कार्य करणारे शांताराम काळे हे निश्चितच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. आजच्या काळात समाजासाठी नि:स्वार्थीपणे काम करणारी माणसे दुर्मीळ होत चालली आहेत. अशा वेळी शांताराम काळे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे आशेचा किरण ठरतात. समाजहिताचा ध्यास घेऊन काम करणाऱ्यांचा सन्मान होणे, हीच खरी समाजाची प्रगती ठरेल.

Friday, April 3, 2026

Photo

येडूबाई देवी यात्रेत भाविकांची उसळलेली गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती येडूबाई यात्रेत लाखोंची गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती

येडूबाई देवी यात्रेत भाविकांची उसळलेली गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती येडूबाई यात्रेत लाखोंची गर्दी; नवसपूर्तीसाठी बोकड-कोंबड्यांची आहुती 📍 अकोले, ता. १८ : अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूबाई देवी यात्रेत यंदा लाखो भिल्ल समाज बांधवांनी उपस्थिती लावत श्रद्धेचा जल्लोष केला. चैत्र पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या या तीन दिवसीय यात्रेत नवसपूर्तीसाठी हजारो बोकड व कोंबड्यांची आहुती देण्यात आली. भिल्ल समाजाची कुलदेवता मानल्या जाणाऱ्या येडूबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अंगावर असूड मारत, कापूर जाळत, लोटांगण घालत भाविकांनी गडावर जात देवीचा जयजयकार केला. यात्रेची सुरुवात पहाटे अभिषेकाने होत असून त्यानंतर देवीला पारंपरिक पोशाख चढविण्यात येतो. दुपारी गोंधळ, आरती व भजन कार्यक्रम पार पडतात. सायंकाळी ‘छबिना’ मिरवणूक काढण्यात येते. डफ, हलगीच्या निनादात काठ्या नाचवत मिरवणूक गावातून गडावर पोहोचते. छबिना मंदिरात आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत वाघाई व गाडीवान देवतांसमोर नवसपूर्तीसाठी बोकड व कोंबड्यांची आहुती दिली जाते. त्यानंतर परिसरात सामूहिक स्वयंपाक व भोजनाचा कार्यक्रम रंगतो. यात्रेदरम्यान भिल्ल समाजातील बांधव काही दिवस मुक्काम करत परस्पर संवाद, नातेसंबंध व सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात. त्यामुळे हा उत्सव सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरतो. दरम्यान, गड परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी होत आहे. तर प्राण्यांच्या आहुतीला पर्याय शोधावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असली तरी ही परंपरा कायम ठेवण्याचा भिल्ल समाजाचा ठाम पवित्रा आहे.

Tuesday, March 31, 2026

Sakal

https://news2.sakaalmedia.com/SmartBureauapi/ereporterapp

Monday, March 9, 2026

*पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या हस्ते ऋणानुबंधचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण संपन्न* https://godatirnews.com/runanubandh-purskar-2025/

Thursday, February 26, 2026

लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा...

लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा... परंपरेने चालत आलेल्या व अत्यंत विचारपूर्वक सुरू केलेल्या अनेक चांगल्या रीतीरिवाज, पध्दतींचे विकृतीकरण झाले की त्याचे काय होते याचा अनुभव आपण आताच्या लग्न समारंभातील अनेक पध्दतीमध्ये घेत आहोत. मूळ तो रिवाज का सुरू झाला, त्यामागील भावना, पावित्र्य काय होते याचा विचार न करताच त्याचे अवडंबर माजवण्याची वाईट स्पर्धा समाजाला लागली आहे. त्यात तुम्ही हे करताय ते चुकीचे आहे असे त्यांना कोण सांगतही नाही आणि ते चुकीचे आहे असेही समाजाला वाटत नाही. तसे वाटत असते तर अशा काही पध्दती कमी किंवा बंद झाल्या असत्या. प्रत्यक्षात तसे न होता त्या अधिक भडकपणे साजऱ्या करून आनंद मिळवण्याची समाजात जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येकजण जे सुरू आहे त्याच्या पुढे एक पाऊल टाकत आहे. हल्ली लग्न, गावातील असो की शहरातील. हळदी लावण्याच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम आणि मद्यपान करून धिंगाणा हे सुत्रच घट्टच झाले आहे. या शॉवरसाठी किमान तीन हजारांपासून पैसे मोजायला लागतात. त्याशिवाय हळद लावणारे पाहुणे किती आहेत त्यावर पाच किंवा दहा हजार लिटर पाण्याची व्यवस्था करावी लागते. पाण्याची नासाडीचा विचार करणाऱ्याला खुळ्यातच काढले जाते. पोरांच्या हौसेपुढे असल्या फालतू गोष्टींचा विचार करणारा मागासलेल्या मनोवृत्तीचा किंवा मुलांचा चांगलं बघवत नाही असा ठरतो. लग्नाच्या आदल्या दिवशी किमान तीन तास हा धिंगाणा सुरू असतो. त्यात हळद वाटीभरच असते आणि उधळली जाते ती पिवडीच असते. ती लावल्याने नव्हे अंगावर ओतल्याने केस आणि चेहराही विद्रूप होऊन जातो. डोळे चरचरतात. एका अर्थाने आपल्या लग्नसमारंभातील एका चांगल्या रिवाजाचेच समाजाने केलेले हे विद्रूपीकरण आहे. मुळात नवरा-नवरीला हळद लावण्यामागील भावना आरोग्याशी जोडलेली आहे. हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरापासून आपल्या सर्वच धार्मिक कार्यात केला गेला आहे. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ती जंतुनाशक आहे. म्हणूनच ती लग्नापूर्वी लावली जाते. त्यामागेही दोन कारणे आहेत. दोन भिन्न कुटुंबातील व्यक्ती एकत्र येताना त्यांना परस्परांपासून कोणताच संसर्ग होऊ नये हा त्यातील मुख्य गाभा. त्यांची सुरक्षितता म्हणून हळद लावायची. दुसरे असे की आपल्या संस्कृतीनेच असे रिवाज आपल्या सामाजिक जीवनात पेरले आहेत की त्यातून नात्याची वीण अधिकाधिक घट्ट व्हावी. पूर्वी हळद लावण्यापूर्वी हळद दळण्याचा कार्यक्रम होत असे. भल्या मोठ्या लाकडी जात्यात ती हळकुंडे दळायची. त्याला साऱ्या भावकीला बोलवले जाई. दळलेली हळद अगोदर ज्यांच्या नावचे देवक आहे त्यांना लावली जाई. मग ती नवऱ्याला लावायची. त्यासाठी भिजवलेली उष्टी हळद नवरीच्या गावाला वाटीतून पाठवून दिली जाई. ही हळद आल्याशिवाय नवरीला परस्पर हळद लावली जात नसे. आपल्या ताटातले अर्धे होणाऱ्या पत्नीसाठी काढून देण्याची भावना म्हणजे तिला मनापासून स्वीकारले हा कृतीतून दिलेला विश्वास असे. दोघांना एकत्र आणणारा हा एक संस्कारच आहे. अक्षतापूर्वी नवऱ्यास बैलगाडी, सायकल, घोडा, किंवा मोटारीतून श्रीबंधनाला नेले जाते. मुख्यत: ग्रामदैवताला जाऊन नमस्कार केला जातो. नवीन आयुष्याची (मुख्यत: प्रजननास परवानगी) सुरुवात करताना गावपांढरीची सावली आपल्यावर असावी असा त्यामागे हेतू. देवाची परवानगी घेण्याची प्रथा. अशा अनेक प्रथा-परंपरा, रिवाज समाजव्यवस्थेने नातेसंबंध अधिक घट्ट व्हावेत या हेतूने सुरू केल्या. त्यातला गाभा हरवला आणि उत्सवीकरणाला महत्त्व आले आहे..

Tuesday, February 24, 2026

माणसाला माणुसकीची ओळख करून देणारी माऊली संस्था आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे

माणसाला माणुसकीची ओळख करून देणारी माऊली संस्था आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे
यांच्या कार्याला भेटीतून सलाम अकोले प्रतिनिधी : समाजाने विस्मृतीत टाकलेल्या मनोरुग्ण व निराधार महिलांना माणुसकीचा आधार देत त्यांना नवजीवन देण्याचे कार्य करणाऱ्या आ. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचित्रा धामणे यांच्या माऊली संस्थेला भेट देण्याचा योग लाभणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. श्रावण आणि त्यांच्या मातोश्रींची भेट हे या भेटीचे औचित्य होते. आजच्या धावपळीच्या आणि स्वकेंद्रित जीवनशैलीत एक दांपत्य झपाटल्यासारखे कार्य करत सुमारे साडेचारशे मनोरुग्ण महिला व पन्नासहून अधिक लहान मुलांचे आई-वडील बनले आहे. समाजभान हरवलेल्या महिलांना पुन्हा समाजात उभे करण्याचे माणुसकीचे दर्शन माऊली संस्थेत अनुभवायला मिळाले. संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास धामणे दांपत्यांनी सांगताना अनेक हृदयस्पर्शी अनुभव समोर आले. संस्थेत दाखल झालेल्या महिलांमध्ये वकील, डॉक्टर, एम.फिल. पदवीधर, शिक्षिका, कवयित्री अशा उच्चशिक्षित महिलांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक आजारामुळे भरकटलेल्या या महिलांना संस्थेने सुरक्षित आश्रय, सन्मान आणि स्वतःचे घर दिले आहे. माऊली संस्था व्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरत आहे. येथे प्रत्येक महिला स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसते. काही महिला स्वयंपाकगृह, काही बेकरी, काही बाग-बगीचा तर काही गोशाळेची जबाबदारी सांभाळतात. श्रमातून स्वाभिमान आणि कामातून आत्मविश्वास निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे. संस्थेत सर्वांना समान वागणूक दिली जाते. मोठा-लहान असा भेदभाव नाही. महिलांना नियमित औषधोपचार वेळेवर दिले जातात. स्वावलंबनाकडे वाटचाल करत संस्था आता स्वयंपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असून येथे वाढणारी मुलेही सक्षम भविष्य घडविण्यास सज्ज होत आहेत. जगाची ‘माऊली’ म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख केला जातो; त्याचप्रमाणे माऊली संस्था आज अनेक मनोरुग्ण महिला व त्यांच्या मुलांची खरी माऊली ठरत आहे. संस्थेतील कार्य पाहिल्यानंतर मन नतमस्तक होते आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याची जाणीव होते.

हरिश्चंद्रगड... फोटो - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर

हरिश्चंद्रगड... फोटो - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर अगदी तोंडांत फेस यायची पाळी आली, तेव्हां त्या पायांखालच्या अन् चढावरून उताराला लागतांच हरिश्चन्द्रेश्वराच्या देवळाचा कळस डोकावला. शपथपूर्वक सांगतों, मीं अक्षरश: तोंडांत दोन बोटं खुपसली! इतक्या दूर, रहाटत्या जगापासून इतक्या अन्तर्भागांत, अशा गच्च रानांत हैं इतकं वैभवशाली बांधकाम कुणी केलं आहे, असं कुणी जर आम्हांसमोर भविष्य वर्तवलं असतं, तर आम्ही त्याला वेड्यांत काढलं असतं! अदमासें पन्नास फूट उंचीचं, काळ्या पाषाणाचं मंदिर आम्हांला खुणावीत उभं होतं! वेडावून जाऊन खुळ्यापिश्यासारखे धांवतच निघालों. मंदिराच्या बाहेर बांधलेली प्राकाराची देवडी ओलांडून रावळाच्या चौबाजूंना असलेल्या खोदीव गुहामंदिरांच्या समोर उतरलों, अन् कुतूहलांत बुडून, विस्मयचकित दृष्टीनं तें सगळं न्याहाळू लागलों. इतकं कुतूहल, कीं प्राण शोधूं पाहात असलेली तहानही आम्ही क्षणभर विसरून गेलों! आमचंच कांहीं एवढं नवल नव्हे, तर ज्या साहेबानं गेल्या शतकांत मुंबई राज्याचं गॅजेटिअर लिहिलं, तो देखील या मन्दिराला 'अद्भुत पद्धतीनं बांधलेलं' म्हणाला होता! देऊळ हेच गडावरलं एकटं नवल नव्हे... - 'दुर्गदर्शन'. (१९७० साली किर्लोस्कर मासिकात गोनीदांनी हरिश्चंद्रगडावर लिहिलेल्या लेखातून) महाराष्ट्रांत इतके किल्ले ! त्यांपैकीं कुण्या एका गिरिदुर्गावर या मंदिरासारखं मंदिर नाहीं ! मंदिरांतील हरिश्चन्द्रेश्वराची पूजा चारी दिशांनीं आंत जाऊन करतां येते. मंदिराच्या प्राकारांत शिरण्यापूर्वी मंगळगंगेवर बांधलेला छोटासा सेतु ओलांडावा लागतो. मंदिराच्या तीन बाजूंस - खरं तर दोनच बाजूंस, डावीकडे आणि पाठीमागे खडकांत कोरलेल्या ओवऱ्या आहेत. पैकीं मागच्या उजवीकडील ओवरींत आम्ही उतरलों. देऊळ किती वर्षांपूर्वी बांधलेलं ? कांहीं कुठं उल्लेख नाहीं. शिलालेख आहेत, ते सातशे वर्षांपूर्वीचे. वणवणा चहूं दिशा भटकत होतों. केदारेश्वराच्या लेण्यांत गेलों. तिथल्या गारथंड पाण्यांत उतरून शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घातली. - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर. ('दुर्गभ्रमणगाथा') हरिश्चंद्रगड आज जरा जास्तच प्रसिद्ध झाला आहे, पण पाच दशकांपूर्वी गो.नी.दाण्डेकरांनी हरिश्चंद्रगडावर केलेल्या भटकंती व लेखनामुळे हरिश्चंद्रगडाची ओळख महाराष्ट्रातल्या जनमानसाला झाली होती. त्यांनी १९७० साली किर्लोस्कर मासिकात हरिश्चंद्रगडावर लेख लिहिला, त्यात त्यांनी हरिश्चंद्रगडावर असलेल्या शिलालेखांविषयीही विस्ताराने लिहिलं. त्या शिलालेखांत चांगदेव, ज्ञानेश्वर, नामदेव यांच्याविषयी उल्लेख असल्याचं त्यांनी जाहीर केलं, तेव्हा रा.चिं.ढेरे, डॉ. वि.भि.कोलते, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अशा अनेक इतिहास अभ्यासकांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या 'चक्रपाणि' या ग्रंथांत म्हटलं : '- अलिकडे प्रख्यात मराठी लेखक श्री. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हे त्यांच्या आवडीच्या भ्रमंतींत हरिश्चन्द्रगडावर गेले असतां त्यांना तेथील हरिश्चन्द्रेश्वराच्या प्राकाराच्या भिंतीवर बाहेरील डाव्या बाजूला असलेल्या लेखाचें महत्त्व जाणवलें. त्यांनीं हरिश्चन्द्रगडावरील आपल्या यात्रावर्णनपर लेखांत 'चक्रपाणि वटेश्वरः नन्दतु तस्य सुतः........' असें त्या लेखाच्या प्रारंभींच्या भागाचें वाचनही दिलें. त्यामुळे मराठी वाङ्मयाचे संशोधन करणाऱ्यांचें लक्ष हरिश्चन्द्रगडाकडे वेधलें गेलें.' गोनीदांनी हरिश्चंद्रगडावर 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये खूप छान लिहिलेले आहे. त्यांच्यासारखा तर शक्य नाही, पण आज सोशल मीडिया, गर्दी, बाजार यापूर्वीचा हरिश्चंद्रगड एका तपापूर्वी अनुभवता आला ही भावना आणि त्या आठवणी सुखद वाटतात. Pranav Kulkarni #छायाचित्रकार_गोनीदा

Thursday, February 19, 2026

शिवरायांची चरणधूळ मस्तकावर धारण केलेला विश्रामगड!

शिवरायांची चरणधूळ मस्तकावर धारण केलेला विश्रामगड! — भाऊसाहेब चासकर महाराष्ट्राला जसे विपुल दुर्गवैभव लाभले आहे, तसेच वैभव अकोले तालुक्यालाही लाभलेले दिसते. तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून सह्याद्रीची मुख्य डोंगररांग उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते. नाशिक जिल्ह्यातील आडगड-औंढा या दुर्गद्वयीसह विश्रामगड, बितनगड, महांकाळ डोंगर, अलंग, मदन, कुलंग, रतनगड, पाबरगड, भैरवगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, कुंजीरगड अशी राकट आणि बेलाग दुर्गांची मालिका येथे उभी आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरही याच दुर्गमालिकेत विराजमान आहे. या सर्व गडांमध्ये पट्टा उर्फ विश्रामगड अधिक भाग्यवान ठरतो. कारण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या गडाला लाभला आहे. महाराजांच्या वास्तव्याने ही भूमी पावन आणि इतिहासाने समृद्ध झाली. नगर-नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर ताठ उभा असलेला हा गड आजही दिमाखात इतिहासाची साक्ष देतो. गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. पट्टेवाडीमार्गे जाणारी पूर्वेकडील वाट सर्वात सोपी मानली जाते. टाकेद-म्हैसवळण घाटातून कोकणवाडीमार्गे दक्षिणेकडून जाणारी वाट तुलनेने अवघड आहे, तर भगूर-देवळालीकडून निनवी-गिरवाडीमार्गे जाणारा तिसरा मार्ग अधिक खडतर आणि दमवणारा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १३९२ मीटर उंचीवर असलेल्या या गडाची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. आकाशातून पाहिल्यास पंख पसरलेल्या गरुडासारखा त्याचा आकार दिसतो. स्वराज्याची उत्तरेकडील सरहद्द म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित होते. गडावर प्रवेश करताना कातळात कोरलेल्या गुहा, लक्ष्मण महाराजांची समाधी, थंडगार पाण्याचे झरे आणि भक्कम त्र्यंबक दरवाजा इतिहासाची साक्ष देताना दिसतात. भगवती देवीचे मंदिर, कातळात कोरलेली पाण्याची टाकी आणि अक्षय तृतीयेची यात्रा या गडाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवतात. गडावर तब्बल तीस पाण्याच्या टाक्या असून विस्तीर्ण पठारावरून चारही दिशांचा मुलुख नजरेत सामावतो. सन १६७९ मधील ऐतिहासिक प्रसंगामुळे विश्रामगडाचे महत्त्व अधिक वाढते. दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात जालन्याची लूट करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडाकडे निघाले असताना मुघल सरदार रणमस्तखान त्यांच्या मागावर होता. संगमनेर परिसरात तुंबळ युद्ध झाले. युद्धस्थितीत बहिर्जी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराज निवडक घोडेस्वारांसह मध्यरात्री पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले आणि २१ नोव्हेंबर १६७९ रोजी गडावर पोहोचले. दक्षिण मोहिमेच्या दगदगीमुळे महाराजांची तब्येत खालावली होती. येथील थंड हवामान, शांत परिसर आणि आदिवासी महादेव कोळ्यांच्या पहाऱ्यात महाराजांना विश्रांती लाभली. जवळपास सतरादिवस वास्तव्य केल्यानंतर गडावरून निघताना राजांनीच या किल्ल्याला ‘विश्रामगड’ असे नाव दिल्याची परंपरा सांगितली जाते. पुढे बाजीराव पेशव्यांचेही काही काळ येथे वास्तव्य होते. २०१२ साली महाराजांच्या आगमनास ३३३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गडावर पुतळा उभारण्यात आला. २१ नोव्हेंबर हा दिवस ‘शिवपदस्पर्श दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवजयंतीनिमित्तही मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी येथे येतात. आज गडकोटांकडे पाहण्यातील उदासीनता चिंताजनक आहे. भग्नावस्थेतील राजवाडा जतनाची मागणी करतो आहे. गडांचे संवर्धन म्हणजे इतिहासाचे संरक्षण होय. केवळ जयजयकार नव्हे, तर इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमानातील प्रश्नांना उत्तर शोधणे ही खरी शिवभक्ती आहे. ढाल-तलवारीचा अभिमान असावा, भगवे झेंडेही अभिमानाने फडकावेत; परंतु आजच्या काळाला शांतता, विचार आणि कृतीची गरज आहे. तरुणांनी गडवाटा तुडवत इतिहास जाणून घ्यावा, त्यातून भविष्य घडवावे. स्मरणरंजनात न रमाता इतिहासातून शिकणे हीच शिवरायांना खरी अभिवंदना ठरेल. – भाऊसाहेब चासकर, अकोले (नगर)(सदस्य – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व राज्य शालेय शिक्षण विभाग विचार गट)मो. ९४२२८५५१५१ | bhauchaskar@gmail.com

Tuesday, January 27, 2026

श्रमप्रतिष्ठेचा खरा उत्सव

श्रमप्रतिष्ठेचा खरा उत्सव प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ ध्वज, भाषणे आणि औपचारिकता नव्हे; तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार होय. त्या मूल्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे मूल्य म्हणजे श्रमप्रतिष्ठा. अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सफाई कामगार महिला नंदा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या मूल्याला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला आहे. समाजात आजही श्रम करणाऱ्या घटकांकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. स्वच्छता कामगारांचे योगदान रोज अनुभवत असूनही त्यांचा सन्मान करण्याची मानसिकता अद्याप विकसित झालेली नाही, ही खंत आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य सफाई कामगार महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा करणे, ही केवळ शालेय कृती नसून सामाजिक परिवर्तनाची ठिणगी आहे. “काम लहान-मोठे नसते, माणूस मोठा असतो” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचे कार्य या उपक्रमातून घडले. भविष्यातील डॉक्टर, अधिकारी, अभियंते घडणाऱ्या या वर्गखोल्यांमध्ये जर आजच श्रमाचे महत्त्व रुजले, तर उद्याचा समाज अधिक समतावादी व संवेदनशील बनेल. श्रमिकांच्या सन्मानातून राष्ट्राची ताकद वाढते. स्वच्छता कामगार हे समाजाचे मूक आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टांवरच आरोग्य, स्वच्छता व शिस्त टिकून आहे. अशा हातांनी राष्ट्रध्वज फडकवला जाणे, हा खऱ्या अर्थाने प्रजासत्ताकाचा विजय आहे. अकोलेतील हा उपक्रम इतर शाळा, संस्था व प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरावा, हीच अपेक्षा. कारण श्रमाचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा सन्मान होय. कोट - मी साधी सफाई कामगार राजूर मधील पहाटे ५वाजता उठून साफ सफाई केली साडी बदलली व बरोबर सात वाजता राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विधालायत हजर होऊन माझे हस्ते ध्वजवंदन झाले .माझ्या श्रमाची प्रतिष्ठा मला पाहायला मिळाली दोन तप कष्ट करून मला दिलेला सन्मान मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही पंतप्रधान यांनी श्रमाला प्रतिष्ठा देऊन स्वच्छतेचा संदेश दिला ते काम मी अविरत सुरू ठेवेन,नंदाबाई पवार (सफाई कामगार)

सफाई कामगार महिला नंदाबाई च्या हस्ते ध्वजारोहण

अकोले,ता.२६:सर्वसामान्य सफाई कर्मचारी असून सुद्धा ध्वजारोहणाचा सन्मान दिला याचा मला आनंद होत आहे. कष्टातून पुढे आलेल्यांचा सन्मान केला जातो असे प्रतिपादन नंदा पवार यांनी श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण प्रसंगी केले.यावेळी संस्थेचे सचिव बापू काळे ,अभिशेठ नवाळी, रामशेठ पन्हाळे ,डॉ. बाबासाहेब गोडगे ,रमाकांत डेरे , ऋषिकेश काळे ,कोरडे साहेब ,गजानन घाटकर,प्रियंका नवाळी, वर्षाताई शेलार,श्रीराम पन्हाळे,लहानु परबत उपस्थित होते. राजुर ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार असणाऱ्या श्रीमती नंदा पवार यांच्या हस्ते उच्च माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण करण्यात आले तर माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण अभिशेठ नवाळी यांच्या हस्ते करण्यात आले. नंदा पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे आम्ही पाईक असल्याचे सांगितले. कचरा करणारे गावकरी असले तरी स्वच्छता करणारे आम्ही स्वच्छता दूत आहोत. आमच्या कामामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाही याचे आम्हाला समाधान मिळते.अशा सामान्य स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मला जो सन्मान दिला त्याचा खूप आनंद आहे. आयुष्यभर केलेल्या कामाचे चीज झाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण करणाऱ्या अभिशेठ नवाळी यांनी प्रजासत्ताक दिन हा आनंदाचा क्षण आहे. या विद्यालयाने सर्व सामान्यांचा विचार करून ध्वजारोहणाला बोलावले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. कष्टातून पुढे आलेल्यांचा सन्मान केला.तुमच्यासारखा विद्यार्थी असताना पाव लाद्या विकून, घरोघरी गॅस टाक्या पोहोच करून माझे कुटुंब चालवायचो. तुम्ही आदर्श समोर ठेवा,आपले ध्येय निश्चित करा तरच तुमचे स्वप्न साकार होईल. भविष्यात नोकरी लागेल याची शाश्वती नाही,त्यामुळे आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून मार्गक्रमन करा. यासाठी मेहनत महत्त्वाची आहे.विश्वास ,इनामदार ,चिकाटी असेल तरच पुढे जाल. गरिबांच्या मुलांना पुढे नेणारे हे विद्यालय आहे ,विज्ञान प्रदर्शनातून राज्य पातळीवर निवड झालेला सिद्धेश हंगेकर तुमच्या समोर आदर्श आहे .आई,वडील,गुरुजन यांच्या आदर करा त्यांची जाणीव ठेवली तर नक्कीच यशाच्या पायरीकडे जाल असे सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव बापू काळे यांनी आज आपण श्रमिकाच्या हस्ते ध्वजारोहण केले ही गौरवाची बाब आहे. विद्यार्थ्यांसमोर श्रमप्रतिष्ठेचे समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा मूल्य नक्की रुजेल. समाज उपयोगी काम करा. प्रत्येक क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वाची आहे. यासाठी विद्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी केंद्र सुरू केले जाईल त्यातून मोठे अधिकारी व्हा व भारताचे प्रजासत्ताक मजबूत करा असे त्यांनी सांगितले. यावेळी ऋषिकेश काळे, रमाकांत डेरे, श्रीराम पन्हाळे, प्रवीण देठे यांनीही मनोगते व्यक्त केली. असद शेख, अभिनव भांगरे, शिवप्रसाद पंडित,मानसी खाडे या विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केली. देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.त्यानंतर अतिथी, पालक व ग्रामस्थांसमोर संगीत कवायत अतिशय सुंदर व तालबद्ध पद्धतीने सादर करण्यात आली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटातून जिल्ह्यात प्रथम आलेल्या सिद्धेश हंगेकर व प्रयोगशाळा कर्मचारी गटातून जिल्ह्यात प्रथम आलेल्या श्रीनिवास मुळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दिव्यांग सिद्धेश हंगेकरच्या राज्यस्तरीय सहभागासाठी मान्यवरांनी आर्थिक स्वरूपात मदत दिली तसेच विद्यार्थ्यांनीही खाऊच्या पैशातून सिद्धार्थला सहकार्य केले. यानंतर विद्यार्थ्यांना अभिशेठ नवाळी, राजुर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या बिस्किट व चॉकलेटच्या खाऊचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी तर आभार तानाजी फापाळे यांनी मानले.

Thursday, January 15, 2026

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत घोणस साप ,राजूर नळपाणी पुरवठा योजनेचे तीन तेरा

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत घोणस साप ,राजूर नळपाणी पुरवठा योजनेचे तीन तेरा राजूर,ता.१५ : राजूरला पाणी पुरवठा करणाऱ्या ण्याच्या टाकीत चक्क दोन साप ढिळुन आले. या घटनेनंतर टाकीच्या उच्छतेचे काम हाती घेण्यात आले. मस्थांना पाचव्या दिवशी म्हणजेच हिन्यातून पाच ते सहा वेळा पिण्याचे णी मिळत आहे. णीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नाकडे मपंचायतीला लक्ष देण्यास वेळ मिळत ही का? असा सवाल सामान्य गरिकांमधून व्यक्त केला जात आहे. नळ निळवंडे धरणाच्या बाजूस राजूर ाणी पुरवठ्यासाठी जॅकवेल उभारण्यात ाली आहे. या जॅकवेलमधून पाणी चलण्यासाठी अगोदर ८० अश्वशक्तीचे ान विद्युतपंप बसविण्यात आले होते. निंतर १०० अश्वशक्तीचे दोन पंप सविण्यात आले आहेत. शहराच्या रच्या बाजूला असलेल्या टाकीत हे णी सोडले जाते व तेथून फिल्टर होऊन णीपुरवठा करण्यात येतो. यात नेकदा एक पंप नादुरूस्त असतो. लोकांच्या जिवाशी खेळायचे आहे का ? पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत मंगळवारी दोन विषारी साप आढळून आले. तुम्हाला लोकांच्या जिवाशीच खेळायचे आहे का? स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील वर्षी काविळीच्या साथरोगात जिल्हा प्रशासन कामाला लागले होते. आताही पाण्याची टाकी स्वच्छ नाही, मंगळवारचा प्रकार लक्षात आल्यानंतर बुधवारी टाकीची स्वच्छता सुरू केली आहे. नियमितपणे टाकी स्वच्छ करण्यासाठी यांना वेळ देता येत नाही का?, असे सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख म्हणाले. मागील वर्षी राजूरमध्ये दूषित पाण्यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ काविळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यात अनेक ग्रामस्थ आजारी पडले तर दोन मुलींनी आपला जीव गमावला होता. असे होऊनही अद्यापही ग्रामपंचायत पाणीपुरवठा सुरळीत करण्यास अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.दिवसांनी पिण्याचे पाणी 66 मंगळवारी एक घोणस सर्प टाकीत आढळून आला. दुसरा बाजूला होता. हे दोन्ही सर्प पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. बुधवारी पाणी पुरवठा करणारी टाकी स्वच्छ करण्यात आली आहे जीवन प्राधिकरण विभागाने तयार केलेली ही योजना सदोष असल्याने पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. संतोष बनसोडे, उपसरपंच राजूर. कोट - पाण्याची टाकी स्वच्छ न करणे, टीसीएल न टाकणे तसेच पाणी फिल्टर न करता डायरेक्ट वापर यामुळे काविळीचा प्रादुर्भाव झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत स्थानिक प्रशासनास जबाबदार धरले होते. विद्युतपंप नेहमीच नादुरुस्त कसे होतात? त्यामुळे राजूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. महिन्यातून पाच ते सहा वेळा म्हणजेच वर्षात अडीच-तीन महिने पाणीपुरवठा होतो. मग पाणीपट्टी वर्षाची का आकारता ? संतोष मुर्तडक, शिवसेना नेते राजूर.

Saturday, January 3, 2026

अभयारण्य की उपेक्षेचा मृत्यूकक्ष?

अभयारण्य की उपेक्षेचा मृत्यूकक्ष?
हरिश्चंद्रगड–कळसूबाई अभयारण्यातील अस्वस्थ करणारे वास्तव हरिश्चंद्रगड–कळसूबाई अभयारण्य हे केवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पर्यटनस्थळ नाही, तर शेकडो पशु-पक्ष्यांचे नैसर्गिक घर आहे. मात्र आज या अभयारण्याचे रूपांतर हळूहळू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वन्यजीवांच्या मृत्यूकक्षात होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. कागदोपत्री संरक्षण, प्रत्यक्षात उपेक्षा—हीच आज या अभयारण्याची ओळख बनली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. गवताळ प्रदेश कोरडे पडले असून, फळझाडांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. परिणामी हरीण, सांबर, रानडुक्कर, माकडे तसेच असंख्य पक्षी भूक आणि तहानेने तडफडत आहेत. हा निसर्गाचा कोप नाही, तर मानवी आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम आहे. दरवर्षी उन्हाळा येतो—हे प्रशासनाला माहीत नाही काय? मग पाणवठ्यांची वेळेत दुरुस्ती का होत नाही? कृत्रिम पाणवठे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा छावण्या या केवळ फाईलमध्येच का मर्यादित राहतात? निधी मंजूर होतो, योजना जाहीर होतात, पण अभयारण्यात मात्र वन्यजीव उपाशी मरत आहेत—ही तफावत कोणाच्या खिशातून बोलते? खाद्य आणि पाण्याअभावी वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत. शेतीचे नुकसान होत आहे, अपघात वाढत आहेत आणि मानव-वन्यजीव संघर्ष उफाळून येत आहे. याची जबाबदारी कोणाची? वन्यजीवांना त्यांच्या हक्काच्या जंगलात सुरक्षित ठेवणे हेच प्रशासनाचे कर्तव्य असताना, ते कर्तव्य पार पाडण्यात अपयश येत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा, वन्यजीव दिनाचे औपचारिक कार्यक्रम आणि फलकांवरील घोषवाक्ये यांचा या उपाशी जीवांना काहीही उपयोग नाही. गरज आहे ती तत्काळ कृतीची—पाणवठे सुरू करा, चारा छावण्या उघडा, वन्यजीवांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र पथके तैनात करा. अन्यथा उद्या एखाद्या दुर्मिळ प्रजातीचा मृत्यू झाल्यावर हळहळ व्यक्त करून काहीही साध्य होणार नाही. जर आजही प्रशासन जागे झाले नाही, तर इतिहास हे नोंद घेईल की हरिश्चंद्रगड–कळसूबाई अभयारण्य निसर्गामुळे नव्हे, तर प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ओस पडले. प्रश्न फक्त वन्यजीवांचा नाही, तर आपल्या संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचाही आहे.

Sunday, December 14, 2025

१०८ चित्रपटाच्या शूटिंग भंडारदरा परिसरात

अकोले: अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या भंडारदरा धरणाच्या आयुष्यात १०८ पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. त्यात पन्नासपेक्षा अधिक गाण्याच्या चित्रीकरणांचा समावेश आहे. भंडारदरा येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रभाकर देशमुख यांनी भंडारदऱ्याच्या शताब्दी वर्षातील एक उपक्रम म्हणून येथे चित्रीकरण झालेल्या चित्रपटांचा शोध घेण्याचे ठरविले. भंडारदरा, रंधा परिसरात चित्रीकरण झालेल्या १०८ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे संदर्भ त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्यात पन्नास एक गाण्याचा समावेश आहे. भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्रिटिशकालीन बागेत व भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणाऱ्या प्रसिद्ध ‘आंब्रेला फॉल’च्या सानिध्यात अनेक सदाबहार गीतांचे चित्रीकरण झालेले आहे. मधुमती चित्रपटात वैजयंतीमाला “आजा रे परदेशी मै तो कबसे खडी इस पार “अशी साद घालते, ती याच धबधब्याच्या साक्षीने तर उजाला मध्ये “झुमता मोसम मस्त महिना ” म्हणत शम्मी कपूर व मालासिन्हा जोशात नाचले ते याच परिसरात“सुहाना सफर और ये मौसम हसी” (मधुमती), “काशी देखी मथुरा देखी देखी तीरथ सारे ” (नागिन), “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर (जबक ), “कोई प्यार की देखे जादुगरी,” (कोहिनूर), सौ बार जनम लेंगे, सौ बार पना होंगे ( उस्तादोंके उस्ताद ), क्या करते थे साजना, तुम इनसे दूर रहके (लाल दुपट्टा मलमलका) अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांनाही या धबधब्याच्या कोसळत्या धारांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. तर “ये धरती चांद सितारे, ये नादिया पवन घटाये”(कुर्बानी),  “ये शाम मस्तानी, मदहोश किये जा” (कटी पतंग) या गाण्यांना रंधा धबधब्याची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ हिंदीत नव्हे तर मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा रंधा धबधबा यांनी भुरळ पाडली आहे. “सजना ग भुललो मी, काय जादू झाली” (भिंगरी) “तुझे ते फुलांचे श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग (चिनू ) ही मराठी गाणीही या परिसरातच चित्रित झाली आहेत.आजपर्यंत अशी पन्नास गाणी प्रभाकर  देशमुख यांनी शोधली आहेत. या १०८ चित्रपटांचे चित्रीकरण रंधा फॉल, भंडारदरा परिसरात झाल्याचे संदर्भ त्यांनी मिळविले आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोककुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मलासिन्हा, मधुबाला सलमानखान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार चित्रीकरणासाठी येथे आलेले आहेत. शतक महोत्सवात प्रदर्शन आजपर्यंत भंडारदरा परिसरात चित्रित झालेल्या १०८ चित्रपटांची देशमुख यांनी वर्षनिहाय यादी केली आहे. या चित्रपटांच्या पोस्टरची छायाचित्र मिळवत त्याचा एक छान अल्बम त्यांनी तयार केला आहे. भंडारदऱ्याच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात याचे पोस्टर प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनही चित्रपट शोधण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. होमी वाडिया यांच्या फिअरलेस नादियाची प्रमुख भूमिका असणाऱ्या व १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डायमंड क्वीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यामुळे हा भंडारदऱ्यात चित्रित झालेला पहिला, दुसरा चित्रपट असावा तर धनुष व अक्षरा हसन यांचा शमिताभ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेले आहेसबस्क्राईब करा Sign In Marathi News maharashtra bhandardara dam beauty attracts filmmakers for over 108 shoots akole news amy ‘भंडारदरा’चे निसर्ग सौंदर्य तब्बल १०८ चित्रपटे व गाण्यांतून; शताब्दीनिमित्त कलाशिक्षकाने शोधले चित्रीकरणाचे संदर्भ अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. Written by लोकसत्ता टीम December 13, 2025 18:38 IST  Follow Us ‘भंडारदरा’चे निसर्ग सौंदर्य तब्बल १०८ चित्रपटे व गाण्यांतून; शताब्दीनिमित्त कलाशिक्षकाने शोधले चित्रीकरणाचे संदर्भ ( प्रातिनिधिक छायाचित्र ) अकोले: अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या भंडारदरा धरणाच्या आयुष्यात १०८ पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. त्यात पन्नासपेक्षा अधिक गाण्याच्या चित्रीकरणांचा समावेश आहे. भंडारदरा येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रभाकर देशमुख यांनी भंडारदऱ्याच्या शताब्दी वर्षातील एक उपक्रम म्हणून येथे चित्रीकरण झालेल्या चित्रपटांचा शोध घेण्याचे ठरविले. भंडारदरा, रंधा परिसरात चित्रीकरण झालेल्या १०८ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे संदर्भ त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्यात पन्नास एक गाण्याचा समावेश आहे. भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्रिटिशकालीन बागेत व भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणाऱ्या प्रसिद्ध ‘आंब्रेला फॉल’च्या सानिध्यात अनेक सदाबहार गीतांचे चित्रीकरण झालेले आहे. मधुमती चित्रपटात वैजयंतीमाला “आजा रे परदेशी मै तो कबसे खडी इस पार “अशी साद घालते, ती याच धबधब्याच्या साक्षीने तर उजाला मध्ये “झुमता मोसम मस्त महिना ” म्हणत शम्मी कपूर व मालासिन्हा जोशात नाचले ते याच परिसरात. “सुहाना सफर और ये मौसम हसी” (मधुमती), “काशी देखी मथुरा देखी देखी तीरथ सारे ” (नागिन), “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर (जबक ), “कोई प्यार की देखे जादुगरी,” (कोहिनूर), सौ बार जनम लेंगे, सौ बार पना होंगे ( उस्तादोंके उस्ताद ), क्या करते थे साजना, तुम इनसे दूर रहके (लाल दुपट्टा मलमलका) अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांनाही या धबधब्याच्या कोसळत्या धारांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. तर “ये धरती चांद सितारे, ये नादिया पवन घटाये”(कुर्बानी),  “ये शाम मस्तानी, मदहोश किये जा” (कटी पतंग) या गाण्यांना रंधा धबधब्याची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ हिंदीत नव्हे तर मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा रंधा धबधबा यांनी भुरळ पाडली आहे. “सजना ग भुललो मी, काय जादू झाली” (भिंगरी) “तुझे ते फुलांचे श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग (चिनू ) ही मराठी गाणीही या परिसरातच चित्रित झाली आहेत.आजपर्यंत अशी पन्नास गाणी प्रभाकर  देशमुख यांनी शोधली आहेत. हेही वाचा Mumbai-Goa Highway Accident: मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; कोलाडजवळ बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू या १०८ चित्रपटांचे चित्रीकरण रंधा फॉल, भंडारदरा परिसरात झाल्याचे संदर्भ त्यांनी मिळविले आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोककुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मलासिन्हा, मधुबाला सलमानखान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार चित्रीकरणासाठी येथे आलेले आहेत. शतक महोत्सवात प्रदर्शन आजपर्यंत भंडारदरा परिसरात चित्रित झालेल्या १०८ चित्रपटांची देशमुख यांनी वर्षनिहाय यादी केली आहे. या चित्रपटांच्या पोस्टरची छायाचित्र मिळवत त्याचा एक छान अल्बम त्यांनी तयार केला आहे. भंडारदऱ्याच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात याचे पोस्टर प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनही चित्रपट शोधण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. भंडारदरा परिसरातील निसर्ग अतिशय सुंदर आहे. राज्यातील धबधबे फक्त पावसाळ्यात कोसळत असतात. मात्र भंडारदरा धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडतात, तेव्हा आंब्रेला फॉल वाहू लागतो. त्यामुळे वर्षभर अगदी उन्हाळ्यातही आवर्तन काळात आंब्रेला फॉल, रंधा फॉल कोसळत असतात. यामुळे तसेच मुंबईहून भंडारदराचे अंतर २०० किमी पेक्षाही कमी असल्यामुळे चित्रीकरणासाठी भंडारदरा परिसराला प्राधान्य मिळत गेले.  होमी वाडिया यांच्या फिअरलेस नादियाची प्रमुख भूमिका असणाऱ्या व १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डायमंड क्वीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यामुळे हा भंडारदऱ्यात चित्रित झालेला पहिला, दुसरा चित्रपट असावा तर धनुष व अक्षरा हसन यांचा शमिताभ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेले आहे. दुर्गा खोटे शाहू मोडक यांचा भरत मिलाप (१९४२) दिलीपकुमार कामिनी कौशल यांची भूमिका असणारा आरजु (१९५०) राजकपूर नर्गिस यांचा आशियाना (१९५२) दिलीपकुमार नर्गिस यांचा आन (१९५२) औरत (१९५३) प्रेमनाथ बिना रॉय, नागिन (१९५४) प्रदीपकुमार वैजयंतीमाला, नाता (१९५५) मधुबाला अभि भट्टाचार्या, एकसाल (१९५७) अशोककुमार मधुबाला, परवरीष (१९५८) राजकपूर मालासिन्हा, कोहिनुर (१९६०) दिलीपकुमार मीनाकुमारी हे सुरवातीच्या वर्षांमध्ये येथे चित्रीकरण झालेले काही चित्रपट.  काही चित्रपटांच्या दृश्यांसाठी प्रसंगी सेट उभा करीत. महिपाल व श्यामा यांच्या जबक मधील “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर हमे याद राखना” या गाण्यासाठी भंडारदरा धरण पायथ्याशी असणाऱ्या बागेत भव्य सेट उभारण्यात आला होता. तर परिसरातील भाषेत, नदीत, सपाट मैदानातही काही दृश्यांचे गाण्याचे चित्रीकरण करण्यात येत असे. गंगा जमुनामधील वैजयंतीमाला वर चित्रित “होरे होरे जनन घुंगरू बाजे” हे समूह नृत्य असेच शेतातील मैदानात चित्रित झालेले आहे. हिंदीच्या तुलनेत येथे चित्रीकरण झालेले मराठी चित्रपट फारच थोडे असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

पोलीस वसाहत दुर्लक्षित

अकोले,ता.९: अकोले शहर पोलिसांची वसाहत मधील सर्व सदनिका मोडकळीस आल्या असून पोलीस कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असून या वसाहतीतील सदनिकाचा ताबा मात्र घुशी,उंदीर, सरपटणारे प्राणी यांनी घेतला आहे .शहराच्या मध्यवस्तीत असणारे पोलीस स्टेशन व स्टेशन शेजारी असणारी व कोल्हार घोटी रस्त्यालगत असणारी पोलीस वसाहत दुर्लक्षित होत असून स्थानिक पोलीस अधिकारी याबाबत उदासीन आहेत . सुमारे सत्तर गावांचे नियोजन करण्यासाठी अकोले पोलीस स्टेशनची स्थापना झाली असून चाळीस पोलीस कर्मचारी येथे काम करतात त्यांच्या निवासाची सोय होणे आवश्यक असून याबाबीकडे पोलीस खाते लक्ष्य देताना दिसत नाही .शहराच्या रोड लगत असणाऱ्या पोलीस वसाहतीची मोठी पडझड झाली असून स्वच्छताग्रह बंद पडले आहे .एक दोन पोलीस कर्मचारी वगळता उर्वरित कर्मचारी मात्र भाड्याच्या सदनिका घेऊन राहतात पोलीस स्टेशन जवळ असणाऱ्या सदनिका सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केल्या तर या सदनिका चनगल्या स्थितीत येऊन कर्मचारी त्याचा वापर करू शकतात मात्र तसे पाऊल उचलताना कुणीही दिसत नाही . जिल्हा पोलिस अधीक्षक,अथवा उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांनी याबाबत लक्ष्य घालणे आवश्यक असून अकोले पोलीस वसाहत ही अहिल्यानागर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेली निवासस्थाने आहेत, जिथे पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात; पोलीस सदनिकांच्या अडचणींमध्ये जुन्या आणि दयनीय इमारती, अपुऱ्या सोयीसुविधा, अपुऱ्या जागा, आणि कर्मचाऱ्यांच्या राहणीमानातील समस्यांचा समावेश होतो, ज्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो; परंतु आता अनेक शहरांमध्ये नवीन आणि सुसज्ज इमारती बांधल्या जात आहेत, आणि सरकार या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, ज्यात नवीन बांधकाम आणि भाडेतत्त्वावर सदनिका देणे यांचा समावेश आहे.  मुख्य अडचणी: जुने आणि जीर्ण इमारती: अनेक ठिकाणी पोलीस वसाहती खूप जुन्या झाल्या आहेत आणि त्यांची अवस्था खराब आहे, ज्यामुळे राहणे कठीण होते. अपुरे निवासस्थान: पोलिसांना त्यांच्या कुटुंबासाठी पुरेशा मोठ्या आणि चांगल्या सदनिका मिळत नाहीत, विशेषतः ग्रामीण भागात. सोयीसुविधांचा अभाव: आधुनिक सुविधांची कमतरता आणि अपुऱ्या जागेमुळे पोलिसांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. कामाचा ताण आणि राहणीमान: कामाचे जास्त तास आणि अनियमित शिफ्टमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो, ज्यामुळे सदनिकांची समस्या आणखी गंभीर वाटते.  कोट - सरकारचे आणि पोलिसांचे प्रयत्न: अकोले शहरात सदनिका खराब झाल्या असून नवीन सदनिकाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठविण्यात आला आहे . नवीन बांधकाम: राज्य सरकार जुन्या वसाहतींच्या जागी नवीन, बहुमजली आणि सुसज्ज इमारती बांधत आहे, सुसज्ज सदनिका: पहिल्यांदाच सुसज्ज सदनिका पुरविल्या जात आहेत, ज्यामुळे पोलिसांचे राहणीमान सुधारत आहे. भाडेतत्त्वावरील पर्याय: काही ठिकाणी पोलीस कर्मचारी भाड्याच्या सदनिकांमध्ये राहू शकतात, ज्यांची पडताळणी पोलीस खात्यामार्फत होते. ऑनलाइन सेवा: भाडेकरूंची माहिती घेण्यासाठी आणि सदनिका देण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केल्या आहेत.  थोडक्यात, पोलिसांच्या सदनिकांची समस्या गंभीर असली तरी, सरकार आणि पोलीस विभाग मिळून यावर उपाययोजना करत आहेत. गणेश बोरसे पी आय अकोले पोलीस स्टेशन
दर महिन्याला होणाऱ्या गरोदर , स्तनदा माता यांच्या सर्वे मध्ये अकोले तालुक्यात ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि १ अविवाहित मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती