सेवानिवृत्ती
जवळ जवळ ३२ वर्षे त्यांनी स्टेट बँकेत काढली. ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांना 'सेवानिवृत्ती'बद्दल जे वाटते ते त्यानी या लेखात लिहीले आहे.
हिमांशु
----------------------------------------------------
सेवानिवृत्ती झाली - पुढे काय?
आयुष्याची पाने उलटली,
सेवानिवृत्ती देखील झाली,
संसाराची कर्तव्ये संपली,
वृत्तीदेखील निमाली,
अन् 'निवृत्तीची' सुरुवात झाली!!!
प्रत्येक व्यक्तीची ओळख समाजात दोन गोष्टींमुळे होते. जन्मानंतरचे चिकटलेले नावाचे लेबल अन् नोकरी / व्यवसायाचे लेबल. दोन्ही गोष्टीची सुरुवात एका ध्येयाने होत असते, पाट्या टाकण्यासाठी कोणीच जन्म घेत नाही की नोकरी व्यवसाय करत नाही.
जन्मतः 'स्व'चा शोध घेण्याचे अन् त्या परमेश्वरात विलीन होण्याचे ध्येय असते. नोकरी, व्यवसाय सुखाने चरितार्थ चालविण्याचे ध्येय. ध्येयाचा प्रवास सतत सुरु असतो. ध्येय म्हटले की मर्यादा आली. 'स्व'चा शोध घेण्यासाठी आयुष्य ही मर्यादा अन् नोकरीसाठी सर्वसाधारणपणे वय वर्ष साठीची. तीस वर्षांपेक्षा अधिक नोकरीत एकाच ध्येयाने धावल्यानंतर जो एक मुक्कामाचा पडाव येतो, तो 'सेवानिवृत्तीचा'! काही क्षणाची उसंत, पुढच्या प्रवासाची तयारी, एक सिंहावलोकन करण्याचा टप्पा.
एक सिंहावलोकन - आयुष्याची अन् उमेदीची, तीस वर्षांपेक्षा अधिक व्यस्ततेत घालविलेला काळ! नोकरी अन् संसारात झालेली तारेवरची कसरत. एका वर्तुळासारखा झालेला हा प्रवास - कधी परिघावरून तर कधी केंद्रबिंदू. ही धडपड म्हणजेच जिवंतपणाचे लक्षण मानायचे, कर्ता-करविता असल्याचा भास निर्माण करायचा. जबाबदारी, कर्तव्य यांची सांगड घालता घालता लक्षात येते की लग्नानंतर सुरुवातीला दोघे होते, तेच आता देखील आहेत. मुलांचे शिक्षण पूर्ण होवून ती नोकरीला लागली आहेत. पंखात बळ घेवून गगनभरारी घेत आहेत अन् साथीदाराबरोबर घरट्यात रमली आहेत. प्रगतिचा आलेख खूप उंचावलेला असतो. कर्ता-करविता कोणी वेगळाच आहे, हे जाणवत असते, पण त्याचा प्रयत्नपूर्वक विसर पडलेला असतो. तीस वर्षांपेक्षा जास्त उमेदीचा काळ ज्या ठिकाणी घालवलेला असतो, त्याच ठिकाणी नारळ अन् शाल याचा स्वीकार करावा लागतो. त्याचक्षणी भान ठेवून संसारातून मानाचे श्रीफळ अन् मायेची उबदार शाल मनापासून आनंदाने स्वीकारायची असते. ख-या अर्थाने 'सेवानिवृत्त' होवून 'निवृत्ती' स्वीकारायची असते.
सेवानिवृत्तीने वयाची जाणीव करुन दिलेली असते, शरीर कुरकुरायला लागते. बुद्धी अन् मनाचे विचार काय कमावले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडत असतात. काय काय करायचे राहिले याचा विचार सुरु होतो. सप्तसुरांचे संगीत मनाला भुरळ पाडते. पु.ल., गदिमा, कुसुमाग्रज... सारे जवळचे वाटायला लागतात. आमटे कुटुंबियांचे उत्तुंग ध्येय अन् त्यागाने भारावून गेल्यासारखे होते. आगगाडीचे रुळ मृगजळाच्यामागे धावायला लागतात. विपुल संतसाहित्यात कुठून प्रवेश करायचा याचा अंदाजच येत नाही. 'सत्संग' अन् 'आस्था' यासारखे कार्यक्रम गोंधळात भर घालतात. प्राणायाम आणि योगाचे वर्ग शरीरस्वास्थ्यासाठी बोलावत असतात. थोडक्यात काय तर सेवानिवृत्तीनंतर काय हा प्रश्न तसाच राहतो आणि त्याचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न!
सेवानिवृत्तीनंतर खरतर आयुष्यातला एक नविन टप्पा, नविन मार्ग, 'स्व'चा शोध घेण्याचा श्री गणेशा! सुरुवात अशी की जी सहज असावी, आनंद देणारी अन् आनंद घेणारी असावी. 'हृदयातून' अन् हृदयाच्या प्रत्येक 'स्पंदना'तून असावी. जगण्याची उर्मी असावी, जगण्याची स्फुर्ती असावी. खरतर ही एक नविन ओळख असते, स्वतःची स्वतःशी झालेली! तीस-चाळीस वर्षांच्या 'वृत्ती'तून म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार, सुख-दु:ख यातून बाहेर पडण्याची वेळ. 'सेवानिवृत्ती' स्वीकारायची, 'वृत्ती' सोडायची, पण निवृत्त व्हायचे नाही. आयुष्याच्या दैवी देणगीतून निवृत्त व्हायचे नाही. ज्या ज्या वेळेला जे जे होईल, ते ते स्वीकारत जायचे, अगदी सहजतेने अन् आनंदाने.
याची सुरुवात दोन फुलस्केप पेपर्सपासून करायची, एका पेपरवर क्लेशदायक घटना, दु:खद क्षण - अगदी थेट लहानपणापासून. आई-वडिलांचे धपाटे, मास्तरांची पट्टी, प्रतिसादाला साद न देणारी कॉलेजकन्या! नोकरीतील तारस्वरातील मैफल, आठवणीतील अशा अनेक गोष्टी या कागदावर उतरवून काढायच्या.
दुस-या पेपरवर आनंददयी घटनांची साखळी जोडायची. उंच उडवलेला पतंग, सायकल चालविता येण्याचा क्षण - ज्या ज्या छोट्या गोष्टीतून आनंद दिला, बघितला, घेतला सारे क्षण टिपायचे. एका क्षणाचे वजन काकणभर जास्त होते. मन आनंदाने भरून जाते. दिसतो, जाणवतो तो फक्त आनंदच आनंद!
दु:ख देणा-या गोष्टींची परत परत उजळणी करायची. अन् तो कागद चक्क फाडून फेकून द्यायचा. त्या दु:खद आठवणी मनाच्या मुळापासून उपटून टाकायच्या. स्मृतीतून हद्दपार करायच्या, परत त्यांची आठवण न काढण्यासाठी. मग राहतात त्या फक्त दुस-या कागदावरील आनंददायी घटना! चुकून काही दु:खद प्रसंग, घटना घडल्या तरी आनंददायी घटनांची उजळणी करायची. मग जी प्रक्रिया सुरू होते ती शुद्धिकरणाची - मनाच्या शुद्धतेची पहिली पायरी!
मग मनाची झेप फक्त आनंददायी क्षणांपर्यंतच जाते. आनंददायी क्षण हृदयाकडे प्रवाहित होतात आणि मन आपोआप हृदयात विरून जाते. बुद्धि हा सारा खेळ चौकसपणे बघत असते. बघता बघता सा-या कसोट्या पार करीत नकळत बुद्धिदेखील त्यात प्रवाही होते. मेंदूची तल्लखता अधिकच वाढते. आनंदाच्या या लहरी शरीरभर प्रवाहित होतात. नित्यनविन श्वासासारखी अन् हृदयाच्या स्पंदनाप्रमाणे आनंद देणारी, जिवंतपणाची जाणीव करून देणारी अन् म्हणूनच हृदयाच्या स्पंदनातून जगण्याची एक लय गवसते!
हृदयाचे 'स्पंदन' हीच खरी ओळख. देहाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे आणि जिवंतपणा जपणे, हे कर्तव्य हृदय सतत, सहजपणे अन् आनंदाने करत असते. खरतर प्राणवायू अगदी सूक्ष्म स्वरूपात लागतो, पण तो सतत लागतो. स्पंदनातून रक्त शुद्ध करण्यासाठी अन् यातून शरीरभर प्राणाचा, चैतन्याचा, तेजाचा, अगदी परमेश्वराचादेखील संचार होण्यापुरता! प्राण, चैतन्य, तेज... ज्याला जसे भावते, तसे नाव दिले जाते. या क्रियेतून हृदय सा-या देहाला आनंद देते आणि त्याच आनंदात आनंदून जाते. खरतर या क्रियेला देहातील, मेंदूतील कुठलीही शक्ति उपयोगी पडत नाही. आनंद देणारा अन् घेणारा, स्पंदनातून जाणवणारा श्वासच! मन, बुद्धी डोळ्यांना दिसत नाही किंवा कुठल्याही अवयवाप्रमाणे दाखवता येत नाही. पण हृदय दाखवता येते... हृदयाचे स्पंदन जाणवते, अगदी आनंदाच्या कारंज्याप्रमाणे नाचणारे, बागडणारे! स्पंदनातून श्वास पुरवण्याचे, देहात अन् देहाबाहेरील विश्वाला श्वास पुरवणा-याचे आभार मानीत त्या विश्व-निर्मात्या परमेश्वराचा जप हृदय सतत करीत असते. इथेच हृदय, 'स्व'चा शोध करीत आनंदाने 'स्व'त विलीन होण्याची प्रक्रिया सुरू होते, स्पंदनातून परमेश्वरात विलीन होण्याचा मार्ग गवसतो!
या आनंदाचा शोध घेत मार्गस्थ होणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य बाकी राहते. श्वासाचा प्रवाह, स्पंदनाचे संगीत ऐकत बुद्धीला आणि मनाला त्या प्रवाहात विसर्जीत करणे हाच काय तो प्रवास चालू राहतो. स्पंदनाचा आवाज तोच खरा 'स्व'चा 'स्व'शी झालेला 'संवाद'! ज्याला भावेल तसा तो 'आतला आवाज'! अगदी अनंत स्वरूपात अन् अनंत नामात! आपापल्यापरीने या आनंदाचा शोध घेणे हाच निवृत्तीनंतरचा मार्ग! एकदा का हा आनंदाचा ठेवा सापडला की निवृत्तीचा अर्थ उमगायला लागतो. मग बाकी व्यावहारीक, पारमार्थिक गोष्टी अगदी आपोआप, सहजपणे घडायला लागतात. अगदी स्पंदनातून विश्व-निर्मात्यात विलीन होत आपण निवृत्त होतो.
हृदयातून जीवनाचा आनंद देणे,
हृदयातून जीवनाचा आनंद घेणे,
स्वतःचा स्वतःशी 'संवाद' साधणे
हेच खरे 'निवृत्ती'नंतरचे जगणे!!!!!
No comments:
Post a Comment