Tuesday, December 9, 2025
अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात
अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात
दारू, गुटखा, गांजा अन् ड्रग्सचे सर्वत्र जाळे; प्रशासनाची बघ्याची भूमिका
अकोले, ता. ८ ः तालुक्यात सध्या निवडणुका, राजकारणाच्या हालचाली जोरात सुरू असतानाच तरुणाईच्या भवितव्यावरील सर्वात गंभीर प्रश्नाकडे मात्र सर्वांचे लक्ष दुरावले आहे. रोजगार, शिक्षण या पलीकडे जाऊन आज तरुण जिवंत राहतील की नाही, हा प्रश्न व्यसनमुक्ती अभियानासमोर उभा ठाकला आहे. अकोले तालुक्यात सर्व प्रकारच्या व्यसनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे.
पूर्वी केवळ दारू हा व्यसनाचा मुख्य मार्ग होता. मात्र आज परिस्थिती भयावह झाली असून दारू, गुटखा, सिगारेट, गांजा आणि अगदी ड्रग्जही ग्रामीण भागापर्यंत पोचले आहेत. मध्यंतरी राजूर येथे ड्रग्ससह गुन्हेगार पकडल्याची घटना चर्चेत होती. अकोले शहरातील नदीकाठावर तर तरुण उघडपणे गांजा ओढत बसलेले दिसतात. महाविद्यालय परिसरातही सर्रास सिगारेट, तंबाखू उपलब्ध असून त्यामागे दलालीचे जाळेही निर्माण झाले आहे. व्यसनातून काही खूनही तालुक्यात घडले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गुटखाबंदी असूनही किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. यामुळे राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाची केवळ कागदी अंमलबजावणी होत असल्याचे दिसते. दारूविक्रीविरोधात काही प्रमाणात गावागावात विरोध दिसतो; परंतु गुटख्याबाबत मात्र समाजातील प्रमुख मंडळीही गप्प दिसत आहेत. परिणामी तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा आरोग्य विभागाचा इशारा आहे.
संगमनेर, घारगाव, ठाणगाव, शेंडी या मार्गांवरून रोज रात्री दारूच्या गाड्या तालुक्यात दाखल होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या वाहनांचे क्रमांक, विक्रेत्यांची नावे पोलिस प्रशासनाला वारंवार दिल्यानंतरही कारवाई नगण्य असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. संगमनेरमध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असताना देखील ही वाहतूक रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने दोन्ही विभागांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांची जबाबदारीही आज प्रश्नचिन्हाखाली आली आहे. ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले तरी गावकऱ्यांची उदासीनता दिसते. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना नोटीस देत गुटखा विक्री केल्यास शॉप अॅक्ट रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच ज्या बीटअधिकाऱ्यांच्या हद्दीत दारू सापडेल, त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
व्यसनांचे वाढते सावट रोखण्यासाठी पोलिसांसह गावपातळीवरील नेतृत्वाने ठोस पावले उचलली नाहीत, तर अकोले तालुक्यातील तरुणाईचे भविष्य अंधारमय होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
--------
कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनाचा विषयावर चर्चा व्हावी.
- हेरंब कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment