Saturday, December 6, 2025
आदरणीय मधुकरराव पिचड: प्रथम स्मृतिदिन औचित्य ) प्रधान मास्तरांचे कर्तबगार शिष्य : लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड .
( आदरणीय मधुकरराव पिचड: प्रथम स्मृतिदिन औचित्य )
प्रधान मास्तरांचे कर्तबगार शिष्य :
लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड .
---------------------------------------------
( $ डॉ . सुनील शिंदे : अगस्त्य फीचर्स , अकोले )
दुर्दम्य आस , इच्छाशक्ती ही फार फार मोलाची गोष्ट आहे . मन:शक्ती - मनाचे सामर्थ्य लाख मोलाचे . काही माणसं विजीगीषु वृत्तीची असतात .. म्हणजे सातत्याने विजयी असण्याची - होण्याची ती आस . आयुष्यातील लहानमोठ्या कोणत्याही प्रसंगात , संघर्षात - संकटात अथवा अडथळ्यात अजिबात खचून न जाता - न डगमगता उभं राहण्यासाठी मनाचा खंबीरपणा असावा लागतो . सर्वांनाच नसते ही देण . सर्वांनाच नाही साध्य होत ही बाब ..
लोकनायक - लोकनेते सन्मा . पिचड साहेब अशाच दुर्मिळ देण असणाऱ्या मोजक्या लढाऊ बाण्याच्या माणसांप्रमाणे होते . त्यांच्या या वैशिष्ट्याचा पुरेपूर प्रत्यय मी दोन तीन महिन्यांपूर्वी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी विशेषांक संपादन काळात अनुभवला ! त्यावेळी सलग दोन - तीन महिन्यांच्या काळात त्यांची आणि माझी प्राचार्य डॉ . भास्कर शेळकेंसमवेत अन् प्रसंगी स्वतंत्रपणे वारंवार बैठक व्हायची तेंव्हा हा अनुभव आला . अथकपणे पिचड साहेब कधी पक्ष कार्यालयात , तर कधी संस्था कार्यालयात , तर कधी कॉलेज च्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कार्यालयात ठाण मांडून फीडबॅक घ्यायचे .. माझ्याशी चर्चा करताना अपडेट घेत .. तर कधी ' काय वाटते सर या मुद्द्यावर तुम्हाला ? ..' असे मोठ्या मनाने विचारत ! तर कधी अकोल्यात यायला नाही शक्य झाले तर थेट राजूरला मला आणि प्राचार्य डॉ . शेळके सरांना अंदाज घेत आवर्जून आस्था - आपुलकीने बोलावून घेऊन बातचीत करीत असत .
एवढेच नाही तर अकोलेत , कधी नाशिकमध्ये सकाळीच नियोजित वेळेत सुवर्ण महोत्सवी कामानिमित्त उत्साहाने वयाचा विचार बाजूला ठेवून भेटीगाठीसाठी निघायचे आम्हाला घेऊन ! सक्रीय चैतन्याचा हा झपाटा थक्क करणारा ..
सातत्याने समाजकारण - राजकारणात समन्वयवादी भूमिका घ्यायची हा त्यांचा कटाक्ष असे . समजूतदारपणामुळेच त्यांनी तालुक्यासह राज्यात माणसे जोडली , जनसंपर्क टिकविला .
महाराष्ट्रातील विख्यात समाजवादी विचारवंत , ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि विख्यात वक्ते तसेच प्राध्यापक आदरणीय कै . ग . प्र . प्रधान तथा महाराष्ट्राचे ' प्रधान मास्तर ' यांचे विद्यार्थी म्हणजे आदरणीय लोकनेते , माजीमंत्री मधुकरराव पिचड ! या ओळखीत आणि निर्देशातच सारे काही आले .
पिचड साहेब पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज चे विद्यार्थी . आदरणीय पिचड साहेबांना ते प्रधान मास्तरांचे शिष्य होते ही बाब कायमच अभिमानास्पद - भूषणावह वाटत आली . प्रभावी वक्तृत्व , वैचारिक मांडणीची वेधक शैली अन् विद्यार्थी प्रश्नांसंदर्भातील तत्कालीन स्थितीत केलेले नेतृत्व यांमुळे मधुकरराव पिचड हे आदरणीय प्रधान मास्तरांचे लाडके ठरले .
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त तसेच कार्यकारी विश्वस्त म्हणून आदरणीय दादासाहेब रुपवतेंच्या प्रभावी संघटन कौशल्याप्रमाणेच दादासाहेबांच्या पश्चात आदरणीय पिचड साहेबांनी आपल्या विलक्षण कार्यशैलीत तसेच मुत्सद्देगिरीने सर्वपक्षीय मोट कार्यकारिणीच्या सातत्यपूर्ण मांडणीत बांधली ही बाब ध्यानी घ्यावी लागेल . १९७४ साली महाविद्यालय सुरु होताना विडी कामगार , रोजगार हमी मजूर , शेतकरी , तालुक्यातील शिक्षक यांच्यासह शिक्षण प्रेमी आणि राजकीय धुरिणांनी जसे अनमोल योगदान नोंदविले त्यास तोड नाही . पिचड साहेब राजूरच्या तत्कालीन दूध डेअरीचे चेअरमन होते . दूध उत्पादकांकडून डेअरीच्या माध्यमातून एक दिवसाच्या दूधाची रक्कम मा . पिचड साहेबांनी महाविद्यालय उभारणी कामात मिळवून दिली . विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ( यु . जी . सी . : नवी दिल्ली ) ग्रँट मंजूर व्हावी यासाठी तत्कालीन राज्य मंत्री मंडळातील मा . पतंगराव कदमांकडे निर्वाणीचा पाठपुरावा करुन महाविद्यालयास अनुदान मिळवून देण्यात मोलाची भूमिका पिचड साहेबांनी पार पाडली .
लोकनेते आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक विकास कामांच्या प्रगतीपर वाटचालीत अकोले तालुका एज्युकेशन संस्था आणि अगस्ती महाविद्यालयाची गुणवत्तेची पताका दिमाखात फडकत राहिली आहे . याच परंपरेत सुरु झालेला स्रोत अखंडपणे प्रवाही राहिला असून या ओघात आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या कुशल नेतृत्वाखाली रस्त्यांचे जाळे , सहकारी संस्थाची गती , साखर कारखाना , दुग्ध विकास यंत्रणा , जलक्रांती , बाजार समित्या , धरणे , कालवे , बंधारे , जलविद्युत प्रकल्प अशा अनेकविध स्तरावर विकास गंगा प्रवाहित राहिली आहे .
पिचड यांच्या आजवरच्या वाटचालीत आणि कारकिर्दीत : निळवंडे धरणाची गती - निर्मिती , अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्मिती , दूध व्यावसायिक संघ , आदिवासींच्या न्याय्य हक्कांचा संघर्ष , आदिवासी योजनांसंदर्भातील कायदे , भंडारदरा धरण पाण्यावरील हक्काचा लढा - फेरवाटपाची मागणी , चाकबंद आंदोलन , तालुक्यातील अन्य धरणे , बंधारे , कालवे , पिंपळगाव खांड धरण , प्रभावी जलक्रांतीची यशोगाथा , सहकारी संस्थांचे जाळे , शासकीय आश्रमशाळांची प्रभावी मंजुरी , दुर्गम ग्रामीण - आदिवासी वाड्यापाड्यांतील , भागातील रस्ते अशी विविध कामांची साखळीच मजबूत स्वरुपात निर्माण झाली .
राजकारण , समाजकारण , सहकार या महत्वपूर्ण क्षेत्रातील कर्तबगारीपलीकडे आणखी एक वेगळा पैलू माजी मंत्री आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या संदर्भात वेधक आणि लक्षणीय आहे , हा पैलू वाचनाचा ! अभ्यासपूर्ण पाठपुरावा आणि मांडणी स्वीकृत कामकाजाच्या बाबतीत करणे ही पिचड साहेबांची खासियत .
अकोले तालुक्यातील शेती , पाणीप्रश्न , धरणे - बंधारे , सहकारी संस्था , मूळ आदिवासींच्या सत्यतेविषयी शासकीय अन् न्यायालयीन संघर्ष यासंदर्भातील पिचड यांनी सातत्याने दिलेला लढा तसेच राज्यातील एकूणच राजकारणात सत्तेत असताना आणि विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना त्यांनी दाखविलेले नैपुण्य राजकीय पटलावर आहे . तथापि सर्वस्वी निराळा असा प्रभावी वाचन वैशिष्ट्याचा पैलू लक्षणीय राहिला .
ऐतिहासिक वाङ्गमय तसेच सामाजिक क्षेत्रातील धुरिणांवरील चरित्र - आत्मचरित्रपर पुस्तकांच्या वाचनावर पिचड यांचा अधिक भर आहे . विशेषतः शहाजी राजे , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शंभूराजे ( संभाजी राजे ) , महात्मा जोतीराव फुले , बाळ गंगाधर टिळक , गोपाळ गणेश आगरकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन यासंदर्भातले वाचन मा . पिचड यांनी सातत्याने केले आहे . बाबासाहेबांची घटनेची प्रत अधिक वेधक असल्याचे पिचड यांचे मत होते .
आदरणीय डॉ . गोविंद गारे यांनी अथक संशोधनाधारित केलेल्या ग्रंथ लेखनाचे वाचन हे पिचड यांचे लक्षवेधी वैशिष्ट्य . ' स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक ' ' महाराष्ट्रातील आदिवासी जमाती ' आदिवासी वीर पुरुष ' ' सातपुड्यातील भिल्ल ' ' आदिवासी लोककथा ' ही डॉ . गोविंद गारे यांची ग्रंथसंपदा पिचड यांनी वाचलेली . " जगाला माहीत नसलेला क्रांतिकारी वीर राघोजी भांगरेच्या इतिहासाचा संशोधकीय मागोवा गोविंद गारेंनी परिश्रमपूर्वक घेतला आणि मांडला . या ऐतिहासिक संदर्भासह आदिवासी विश्वाच्या एकूणच ऐतिहासिक अभ्यासाच्या वाचनाचा उपयोग मूळ आदिवासी अन् खोट्या आदिवासींच्या प्रश्नावरील लढा देताना झाला .. " ही मधुकरराव पिचड यांची भावना होती .
वाचनाने माणूस घडतो , दृष्टी व्यापक होते हे तर सत्यच . सर्वांगीण विकासासाठी वाचन ठरते पूरक . वैचारिक प्रगल्भता बाणते ही बाब लक्षात घ्यावी लागेल . स्वतंत्र विचारशैली विकसित होते . वैचारिक भूमिका डोळसपणे मांडता येणे सुलभ ठरते . कोणताही सामाजिक लढा - संघर्ष हाती घेताना चौफेर वाचनाचा उपयोग - लाभ अथवा दूरगामी यथोचित परिणाम होतो हा पिचड यांचा दखलपात्र अनुभव राहिला .
' आगरकर लेखसंग्रह ' , ' इंडियाज फ्रीडम स्ट्रगल : एपिक ऑफ् सँक्रिफाईस अँड सफरिंग ' , ' परस्यूट ऑफ् आयडियल्स ' , ' लोकमान्य टिळक : अ बायोग्राफी ' ( इंग्लिश ) , ' साता उत्तरांची कहाणी ' , ' सत्याग्रही गांधीजी ' ही ग . प्र . प्रधानांची प्रमुख पुस्तके पिचड यांना भावलेली . आवडत्या पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह त्यांच्याकडे होता .
अकोले तालुक्यातील लेखकांची आणि संत - साधुचरित व्यक्तिंवर आधारित चरित्रपर पुस्तके देखील पिचड यांच्या वाचनात आवर्जून असतात . उंचखडकचे विख्यात संत यशवंतबाबांवरील साहित्य त्यांना आवडले . गो . नी . दांडेकर , दया पवार यांच्यापासून तर अण्णासाहेब देशमुख यांच्या पुस्तकांपर्यंतचे वाचनही निर्देशिता येईल .
सवडीनुसार वाचन करणे नव्हे तर वाचनासाठी सवड काढणे हे पिचड यांचे वैशिष्ट्य ! त्यांच्या वाचनात विविधता होती . निवडक अन् दर्जेदार पुस्तकांच्या वाचनावर अधिक भर आहे . पदवी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजशी आणि पर्यायाने आदरणीय प्रधान मास्तरांशी संपर्क आल्याने पिचडांचे वाचन , अभ्यासू बाणा अधिक दिशादर्शक ठरला .
हव्या असलेल्या पुस्तकाचा पाठपुरावा करताना प्रसंगी पिचड यांनी वेळेला अगस्ती अकोले महाविद्यालयातील दुर्मिळ संग्राह्य पुस्तकांसाठी देखील संपर्कात राहून वाचनाची आवड टिकवून ठेवली . एकूणच राजकीय , सामाजिक , सहकार , शिक्षण , शेती क्षेत्रातील कार्यासाठी - निर्णयक्षम वाटचालीत त्यांना वाचन प्रक्रियेतील आवड प्रेरणादायी , उपयुक्त ठरली ही बाब अलग नाही करता येत . वाचनाचा असा हा वेधक पैलू लक्षणीय .
राजकीय - सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढला किंवा वेधक कार्य चर्चेत आले की विरोधकांची कमी नसते , तथापि आपल्या चाहत्या - स्नेहांकित परिवाराबरोबरच विरोधकांमध्येही आदरयुक्त दबदबा असणे ही बाब सोपी नसते , सहजसाध्य नसते . तरीही यासंदर्भात आदरणीय पिचडांनी आदराची भावना आणि विलक्षण दबदबा टिकवून ठेवला हे विसरून चालणार नाही .
शिक्षण , समाजकारण , राजकारण , आदिवासी प्रश्न , जलनीती अशा एकूणच विविध प्रवाही आघाड्यांवरील निर्णायक कामगिरीबरोबरच अकोले ता . एज्युकेशन संस्थेच्या व्यवस्थापनाचा चोख कारभार यथोचित घडीसह पिचड साहेबांनी सुस्थितीत ठेवला ही बाब सदैव संस्मरणीय राहील . 💐👏👏
--------------------------------------------
📝 $ डॉ . सुनील शिंदे
अगस्त्य फीचर्स
अकोले / अहमदनगर
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment