Saturday, December 6, 2025
नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलाचा वाद
नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलाचा वाद
अकोले, संगमनेर, सिन्नर पुन्हा विकासाच्या कडेला?
अकोले, ता. ७ : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ प्रवासाचा पर्याय नसून उत्तर महाराष्ट्र, अकोले, संगमनेर, सिन्नर पट्टा व पुणे महानगराला जोडणारा महत्त्वाचा विकासमार्ग मानला जातो. गेल्या काही वर्षांत नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, पुणे हा सर्वेक्षण पूर्ण झालेला आणि जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असलेला मार्ग निश्चित होता. त्यामुळे या पट्ट्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास वेगाने झेपावण्याची आशा निर्माण झाली होती.
मात्र अलीकडेच संसदेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर, चाकण, पुणे असा पूर्णपणे वेगळा मार्ग ‘तांत्रिक कारणांमुळे’ जाहीर केल्याने नवीन वादळ उठले आहे. नारायणगाव येथील जीओमआरटी केंद्राची अडचण पुढे करून मार्गबदलाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी, हा निर्णय तांत्रिक की राजकीय? असा प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे.
--------
मूळ मार्गच सर्वात उपयुक्त का?
देशातील सर्वाधिक गर्दीचा संगमनेर, पुणे मार्ग, ५-७ तासांचा त्रासदायक प्रवास
चाकण एमआयडीसीकडे जाणारी प्रचंड औद्योगिक वाहतूक;
दररोजची वाहतूक कोंडी
उत्तर व पश्चिम महाराष्ट्र या दोन औद्योगिक पट्ट्यांना थेट जोडणारा दुवा
डीपीआर तयार, सर्वेक्षण पूर्ण, जमीन अधिग्रहण सुरू
सरकारी खर्च व श्रम वाया?
----------
विकासाचा प्रवाह मागे पडण्याचा धोक
नव्या मार्गाने हा पट्टा पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मागे पडण्याचा धोका आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांची आहे. त्यामुळे मार्ग बदल करू नये, अशी मागणी होत आहे. हा प्रश्न फक्त रेल्वेमार्गाचा नाही; येत्या ५० वर्षांच्या विकासदिशेचा आहे.
---------
खासदार–आमदारांची ठाम भूमिका
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्याजित तांबे यांनीदेखील अत्यंत आक्रमक आणि तर्कशुद्ध पद्धतीने भूमिका मांडत मार्गबदलाचा विरोध नोंदवला आहे.
------
जनआंदोलनाची हाक
या भागातील नागरिकांना दररोजचा वाहतुकीचा त्रास असह्य झाला आहे. उद्योग, शेती, शिक्षण व आरोग्यसेवांसाठी हा रेल्वेमार्ग जीवनरेषा बनू शकतो. म्हणूनच या मागणीसाठी आता मोठ्या प्रमाणात, सुसंघटित जनआंदोलन अपरिहार्य असल्याचे नागरिकांचे मत आहे.
-----------
नाशिक-पुणे रेल्वे हा या भागाच्या भवितव्याचा महामार्ग आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग मूळ सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण मार्गेच हवा. जनतेचा निर्धार आणि राजकीय इच्छाशक्ती एकत्र आल्यास निर्णय बदलू शकतो; मात्र मोठे, सातत्यपूर्ण जनआंदोलन उभे राहिलेच पाहिजे.
- भाऊसाहेब चासकर, आम्ही अकोलेकर.
कोट - पुणे नाशिक रेल्वे अकोले तालुक्यातून जाण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पक्ष भेद विसरून एकत्र येण्याची आवश्यकता असून तसे न घडल्यास हात हलवत बसावे लागेल रेल्वे मार्ग बदलून अकोले तालुक्याच्या विकासावर परिणाम होत असेल व यात राजकारण येत असेल तर भंडारदरा,निळवंडे, आढळा चे पाणी अडवून बंद करावे लागेल बाजीराव दराडे (ओबीसी नेते)
कोट - अकोले तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत रेल्वे जर तालुक्यात आली तर तालुक्याचा पर्यटन विकास वेगात होईल येथील शेतकरी सकस अन्न धान्य पिकवतो त्याचा मालाला चांगले मार्केट मिळेल मात्र रेल्वे मार्ग बदलण्याचा घाट कुणी घालत असेल तर उच्च न्यायालयात जाऊन न्याय मिळवावा लागेल ऍड ,बाळासाहेब वैध (कायदे तज्ञ,अकोले )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment